Skip to content Skip to sidebar Skip to footer

चैतन्य

सुमा ए सुमा ऽऽऽ माऊ हाक मारत राहिली. सुमाला मात्र तिला ओ द्यायचा प्रचंड कंटाळा आला होता. ही सतत हाका मारत बसते हिला काही काम नाही, धाम नाही. माझी मात्र सारी कामं राहतात. खरं बघायला गेलं तर मी मोठी हिच्यापेक्षा, पण ही मला नाचवते. आता मीही थकलेय कळत कसं नाही हिला? मी किती वेळा हिला गोड बोलून, रागावून, ओरडून सांगते, पण हिचं आपलं चालूच. सुमा प्रचंड वैतागली होती. तिलाच नाही तर घरालाही एक प्रकमारची मरगळच आली होती. चैतन्य नाहीसंच झालं होतं. घरात दोनच जीव सुमा आणि माऊ.

माऊ म्हणजे सुमाची धाकटी नणंद… म्हणजे तसं वयात फारसं अंतर नाही, पण तरीही माऊ लहान सुमा तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असेल. सुमाचं लग्न झालं तेव्हा माऊ शिकत होती. तिच्या मऊ स्वभावानुसार तिला माऊ हे नाव मिळालं होतं. सुमाचं घर भरलेलं होतं. सासू-सासरे, आजेसासू, एक लहान दीर आणि ही माऊ.

सुमा मोठी वहिनी म्हणून घरात आली आणि सगळ्यांच्या अपेक्षांचा तिच्यावर भडीमार होऊ लागला. सासू-सासर्‍यांना वाटे सुनेनं आयतं ताट हातात द्यावं, आजेसासूला वाटे नातसुनेनं आपली चौकशी करावी, दीरांना वाटे, वहिनीने आपलं चहापाणी बघावं. नवर्‍याच्या तर काय अपेक्षाच अपेक्षा, माझ्या माणसांचं कर आणि मलाही सुखी ठेव. सर्वांचं करता करता सुमा थकून जाई.

फक्त एक माऊच अशी होती की जी सुमाला आपलं काही काम करायला लावत नसे उलट तीच तिला कधीतरी गरम कॉफी, किंवा गरम गरम चहा करून देत असे. फक्त एक होतं की तिच्या मऊ स्वभावामुळे ती आपल्या आईला पण कधी म्हणत नसे, की वहिनीला किती काम पडतं वगैरे. पण माऊशी बोललं की सुमाला बरं वाटे. सुमाने ते दिवस आठवून मोठ्ठा उसासा टाकला.

काही असो, पण मजा होती तेव्हा. जसं सगळ्यांच्या अपेक्षा होत्या तसं सगळ्यांचं आपल्यावर प्रेमही होतं. आपण अथर्वच्या वेळी गरोदर राहिलो तेव्हा सगळ्यांनी काळजीही तितकीच घेतली होती. आणि मग सर्व जण आपापली कामं पण आपणच करायला लागली होती. घरातल्या माणसांमुळे अथर्व कधी मोठा झाला कळलंच नाही. खरंच फार मोठा झाला अथर्व….

तोपर्यंत सुमा सुमा म्हणून माऊची शंभरवेळा हाक मारून झाली होती. शेवटी सुमा कंटाळून आत गेलीच, बेडवर पडलेल्या माऊकडे पाहून तिला वाईट वाटलं. ‘‘काय झालं माऊ?’’ तिने राग गिळून शेवटी प्रेमाने विचारलंच

‘‘आज तारीख किती लक्षात आहे ना तुझ्या?’’

‘‘हो नसायला काय झालं? 20 सप्टेंबर..’’

‘‘मग?’’

‘‘काय मग? आज आपल्या अथर्वचा वाढदिवस आहे.’’

‘‘आपला?’’

‘‘हो ग आपलाच जरी तो रुसून गेला असला तरी कधीना कधीतरी येईलच बघ. माझा विश्‍वास आहे.’’

‘‘ऽऽऽ ’’ सुमाने मोठा उसासा टाकला.

‘‘माऊ, मी आता जरा काम करते. तुला काही चहापाणी हवं आहे का?’’

‘‘नको ग, पण किती काम करतेस? बस ना इथे माझ्याजवळ. सारखं काय आपलं काम काम.. असं कर तू चहा घेऊन ये आपल्या दोघींना आपण गप्पा मारू. आज सगळ्या कामाला सुट्टी दे. मला जेवायलाही काही नकोय. दुपारचं आहे त्यात आपण दोघी भागवून घेऊ.’’ माऊने एका दमात सर्व सांगितलं.

चहा घेता घेता नणदा-भावजयांच्या गप्पा रंगल्या. मागच्या सर्व घटनांची पुन्हा उजळणी झाली. अथर्वच्या लग्नानंतर लगेचच माऊचं लग्न झालं. पण दोन-चार वर्षांतच माऊ परत आली. तिच्या सासरच्यांनी तिला छळछळ छळलं. तिच्या सहनशील स्वभावामुळे ती आधी काहीच बोलली नाही. पण एकदा सुमाचा नवरा तिच्याकडे गेला असता त्याच्या सर्व लक्षात आलं आणि तो माऊला घेऊन घरी आला. तेव्हापासून माऊ इथेच राहू लागली, पण ती बरी आणि तिचं काम बरं. ती कशात फार ढवळाढवळ करत नसे. शक्यतो आपली खोली सोडून बाहेर येत नसे.

काळाच्या ओघात सुमाचे सासू-सासरे गेले, दीराचं लग्न झालं. त्याने नवीन बिर्‍हाड थाटलं. अथर्वही आता मोठा झाला होता. त्याला चांगली नोकरी लागली होती, पण त्याने आपलं लग्न आपणच ठरवलं होतं. जेव्हा त्याने हे वडिलांना सांगितलं तेव्हा वडिलांनी विरोध केला आणि अथर्व घर साडून गेला. गेल्यानंतर त्याने कुणाशीच काही संपर्क ठेवला नाही. काही कालावधीतच सुमाचा नवराही गेला. पण एकदा डोक्यात राख खालून गेलेला अथर्व परत आला नाही. तरुण वयात रक्त सळसळतं असतं हेच खरं.

आता सुमा आणि माऊ दोघीच घरात. भरल्या गोकुळाचे हे काय झाले? माऊला सारखं वाईट वाटे. घरातली सर्व माणसं गेली आपण मात्र इथंच आहोत असा विचार कुठेतरी तिचं मन पोखरू लागला आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला. मनाने मऊ असलेली माऊ अणखीनच खचली आणि हतबल झाली. तिच्यातली शक्ती नाहीशी झाली आणि ती जास्तीजास्त वेळ बेडवर पडून राहू लागली. अगदी शारीरिक गरजांपुरती ती उठत असे. नशीब ते तरी सुमाला करावं लागत नसे. बाकी सर्व कामे सुमाला करावी लागत होती याचंही माऊला वाईट वाटे, पण ती हतबल होती.

एकेक गोष्टी आठवून माऊ आणि सुमा कधी हसत होत्या तर कधी डोळ्यांतून पाणी काढत होत्या. माऊ म्हणाली,
‘‘सुमा, सगळे गेले पण मी मात्र तुला त्रास द्यायला राहिले बघ.’’

‘‘माऊ, तू आहेस म्हणून मी आहे ग, तू नसतीस तर मी एकटीने या मोठ्या घरात काय केलं असतं?’’ सुमाने तिचा प्रेमाने तिचा हात हातात घेऊन म्हंटलं.

‘‘हू ऽऽ म’’

‘‘फक्त एकच कर तू जरा मनाची उभारी घे, तुला काही झालेलं नाहीये. तू चालायचा प्रयत्न कर.’’

‘‘मी खूप ठरवते ग, पण…’’

‘‘होईल…’’ सुमाने आश्‍वासन दिलं.

आताशा माऊला मोबाइल वापरायचा छंद लागला होता. ती सतत त्या स्मार्ट फोनमध्ये डोकं खुपसून बसलेली असे. सुमा तिला कधीतरी ओरडत असे,

‘‘माऊ, अगं अशाने डोळे खराब होतील.’’

‘‘हो हो..’’ म्हणे ती पण परत आपलं तिचं काम सुरूच.

एक दिवस माऊच्या चेहर्‍यावर सुमाला वेगळीच चमक दिसली. त्या दिवशी सकाळी माऊ जरा उठली. हळू हळू का होईना तिनं एक-दोन कामं केली. सुमाने विचारलं पण ‘‘काय गं आज कसं काय?’’

‘‘काही नाही काही नाही.’’ म्हणत माऊ परत येऊन आडवी झाली. तिला दम लागला होता. मग सुमा तिला ओरडली. तीन वाजल्यापासून माऊने 1000 वेळा सुमाला विचारलं,

‘‘चार वाजले का ग?’’

‘‘माऊ, काय आहे चार वाजता?’’ शेवटी सुमाने कंटाळू विचारलं.

‘‘असंच ग..’’ माऊ म्हणाली.

चार वाजून गेले, माऊ हिरमुसली. उगाचंच खोटी आशा लावली. एकदा आपल्यापासून दुरावलेली माणसं परत येत नसतात हेच खरं.
साडेचार-पावणेपाचच्या सुमारास बेल वाजली आणि माऊच्या चेहर्‍यावर चमक आली. सुमाने दार उघडलं तर दारात अथर्व, त्याची बायको आणि छोटा मुलगा उभा होता. माऊ पण धडपडत बाहेर आली. सुमाला आश्‍चर्याचा धक्काच बसला. माय-लेकराची बरेच वर्षांनी भेट झाली.

‘‘आई, मी चुकलो. मला माफ कर.’’ अथर्वने आईची माफी मागितली.

‘‘कोण चूक, कोण बरोबर? खरंतर चुकत कोणीच नुसतं. पण परिस्थितीच वाईट असते.’’ सुमाने भरल्या अंत:करणाने सांगितलं. अथर्वच्या मुलाला आणि छानशा बायकोला बघून सुमाला फार समाधान वाटलं. काय करू नी काय नको असं तिला होऊन गेलं होतं.
पण हे सगळं कसं शक्य झालं याचंच सुमाला आश्‍चर्य वाटत राहिलं होतं. पण नंतर तिला उमगलं की माऊ जी सतत स्मार्ट फोनचा वापर करत होती त्यातून तिने अथर्वला शोधून काढलं. त्याला घरची परिस्थिती सांगितली. आईची अवस्था सांगितली आणि त्याला परत यायला भाग पाडलं.

आता घर पुन्हा भरलं होतं. माऊही बर्‍यापैकी उठून-बसून आपली कामं करत होती. नातवाच्या बडबडीनं घरातली परिस्थितीच बदलून गेली होती. मरगळलेल्या घराला एक प्रकारचं चैतन्य आलं होतं.

– सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: