Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सुलभा माझी बालपणीची मैत्रीण. आमच्या दोघींची घट्ट मैत्री होती. आम्ही एकाच शाळेत होतो. एकत्रच वाढलो आम्ही दोघी. परीक्षेतही एका पाठोपाठ एक असा पहिला आणि दुसरा क्रमांक आम्ही पटवायचो . पाहता पाहता दहावी आणि बारावीही झाली आमची. सुलभाचे आई वडील छोट्याश्या खेड्यातून आले असल्या कारणाने गावाकडचीच त्यांची विचारसरणी….पोरीचं लवकरात लवकर लग्न करून टाकावं असं त्यांना वाटत होतं.  परंतु सुलभाची पुढे शिकायची इच्छा होती. पोरगी अभ्यासाला हुशारही होती. तसेच वाणी इतकी शुद्ध कि एखाद्या वकिलाला देखील लाजवेल. सुलभाला शिकून शिक्षक होयचं होत.

एक दिवस मी सुलभाच्या घरी गेले. २ खोल्यांचं तीच घर आणि त्यात तिच्यासोबत तिचे आई, वडील आणि तिचे दोघे भाऊ असे ५ जण घरात राहतं. तिच्या आईने माझ्यासाठी चहा ठेवला.

चहा पिता पिता मी सुलभाला विचारलं,

“सुलभा कधी घेतेय मग कॉलेजात प्रवेश.? “

इतक्यात सुलभाची आई रागानेच म्हणाली, “आमच्या सुलभीचं लगीन करायचं हाय आता आणि काय व्ह काय ठेवलं त्या शिक्षिणात….पोरीच्या जातीनं कसं घरात कामात लक्ष घालावं आणि लगीन होऊन शिक्षण कामी येईल व्ह.? सासूला कामात काय बी कमी दिसली कि चांगलं कान पकडीन आणि काढीन आईचं उद्धार….ए सुलभे…चाल एवढे कुरडया टाकू लाग म्हयासोबत …”

एवढं बोलून सुलभाची आई सुलभाला घेऊन निघून गेली. सुलभाच्या घरात तिच्या आई पुढे कुणाचं नाही चालायचं. सुलभाच्या वडिलांना काम नव्हतं मिळत. आधी ट्रकवर ड्राइव्हर होते पण एकदा ट्रक धडकावला म्हणून मालकानेही कामावरून काढून टाकलं होत. त्यामुळे सुलभाची आई दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करून संसाराचा गाढा एकटीच ओढत होती.  

महिन्याभरानंतर सुलभाची आई माझ्या घरी आली तो सुलभाच्या लग्नाची पत्रिका घेऊनच. माझ्या आईने त्यांना हळदी कुंकू लावले आणि त्यांचे तोंड गोड केलं तसं दोघींच्या गप्पा सुरु झाल्या. माझी आई म्हणाली,

“काय मग, काय करतात जावईबापू?” 

सुलभाची आई – ” नगरपालिकेच्या शाळेत शिकिवतो. गावाकडं शेती वाडी बी हाय चांगली. आमची सुलभी सुखात राहीन बघा.”

माझी आई – “पोरीचं अगदी कल्याण झालं कि हो…पोरगी सुखात राहिली म्हणजे झालं अजून काय पाहिजे. माझ्या रूपालाही असंच स्थळ येऊ दे हो, मग मी बिनधास्त देवदर्शन करायला मोकळी…. “

सुलभाची आई – “व्हाय पोरीची जात हि लवकरच उजवावी लागतीय..”

असं म्हणून सुलभाची आई निघून गेली.

सुलभाच्या लग्नाला १५ दिवस होते अजून… करवली म्हणून मी तयार होतेच त्यानिमित्ताने माझे येणे-जाणे सुलभाच्या घरी चालू होतेच..लग्नाआधी एक दिवस सासरच्या मंडळींसोबत बैठक ठरली होती. त्यात सासरच्या मंडळींसोबत जात पंचायतीचे लोकही सहभागी झाली होती. मला आणि सुलभाला काही कळेनाच कि लग्नाआधी हि सभा कसली….आम्हाला सगळ्यांनी बाहेरच काढून दिलं होतं.

तेवढ्यात सुलभाचा लहान भाऊ आमच्याजवळ आला आणि सांगू लागला कि ताई तुले लग्नाच्या पहिल्या रात्री नव्ह शिक्षा देणार आहे….ती पण अशी तशी न्हाय….जळत्या कोळशावर चालायची..

आम्हाला दोघीनांही सुलभाचा भाऊ काय बोलतोय कळेना…म्हणून आम्ही पटकन घरात जाऊन बघितलं तर तिथे सगळे जण एकमेकांना मिठी मारून अभिनंदन करत होते आणि सगळेच आनंदात होते. तेव्हा कुठे आमचा जीवात जीव आला.

“चल चावट कुठला…काहीही सांगतो” असं म्हणून सुलभाने आपल्या भावाच्या डोक्यात मजेने एक फटका मारला.  

पाहता पाहताच सुलभाचे लग्नही थाटामाटात पार पडले. मी पाठराखीण असल्याने तिच्यासोबतच होते. तिचा गृहप्रवेश झाला. सुलभाच्या सासरचं घर बऱयापैकी मोठं होत. घराच्या पुढे आणि मागे प्रशस्त अंगण होतं. थोड्याच वेळात जात पंचायतीचे लोक घरात येऊन बसली. हि तीच लोकं होती जी लग्नाआधी सुलभाच्या घरी आली होती. थोड्या वेळात सुलभाची जाऊ आमच्या जवळ आली आणि सुलभाला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि सुलभाला घेऊन परत बाहेर आली. बाहेर आली तेव्हा सुलभा फक्त परकर आणि ब्लॉउज वरच होती. तिच्या बांगड्याही बांधल्या होत्या. आम्हा दोघीनांही काही कळेनासं झालं पण त्यानंतर कुणीही मला सुलभा जवळ फिरकू नाही दिल. थोड्या वेळात दिवाणखान्यात बसलेल्या माणसांची कुजबुज माझ्या कानावर पडली, “कौमार्य चाचणी …मुलगी कोरी आहे कि नाही….”

आता कुठे माझ्या डोक्यात ट्यूब पेटली होती. सुलभाचा भाऊ त्या दिवशी सांगत होता ते खरंच होत. सुलभाची तिला नांदवायच्या आधी व्हर्जिनिटी टेस्ट होणार होती आणि त्यात ती पास नाही झाली तर तिला जळत्या कोळश्यावर चालायची शिक्षा आणि सोबतच कोर्टामध्ये सोडचिट्ठीचा अर्ज….मला माझ्या कानावर विश्वासच बसेना.

थोड्याच वेळात सुलभाचा पती खोलीत गेला आणि त्याने खोलीचं दार बंद केलं…आणि त्याने जस दार बंद केलं तसं माझ्या काळजाचे ठोके वाजायला लागले ऑपेरेशन थेटरच्या बाहेर कुणा जवळच्या व्यक्तीचं आत ऑपेरेशन चाललेलं असतं आणि बाहेर त्याचे जवळचे नातेवाईक सगळे चिंताग्रस्त अवस्थेत डॉक्टर कधी येतायेत आणि निकाल देतायेत ह्याची वाट बघत असतात  अगदी तसेच बाहेर बसलेले नरधमी लोकं सुलभाचा नवरा काय निकाल घेऊन येतोय ह्याची वाटच बघत होते. मला तर काय सुचेनासं झालं होतं..एकदा मनात विचार आला कि पोलिसांना गुपचूप कळवावं पण दुसरीकडे असं वाटलं कि सुलभा खरंच पास झाली आणि मग माझ्यामुळे तिचा सुखी संसार उध्वस्त नको होयला ….म्हणून मीही गप्पच बसले होते.

थोड्याच वेळात सुलभाचा नवरा बाहेर आला आणि पांढरं बेडशीट हातात घेत म्हणाला ,”मुलगी कोरीच आहे..पास झाली मुलगी..”

दिवाणखान्यातले सगळे आनंदाने उसळायलाच लागले होते. माझ्याही जिवंत जीव आला आणि पटकन मी सुलभाच्या खोलीत गेले आणि आतून दार बंद केलं. सुलभा गुडघ्यांमध्ये डोकं घालून ढसाढसा रडत होती. मी जाताच तिने मला मिठी मारली आणि जोरात रडायला लागली.

“अगं एवढं काय झालं तुला रडायला? पास झालीस ना तू ..मग सोड ते रडणं आता…चल तयार हो….बाहेर सगळे वाट बघतायेत..पूजाविधी अजून राहिलं आहे..”

“रूपा मी पास नाही झाले गं..”

“मी – काय? हे कसं शक्य आहे. त्याने बाहेर येऊन सगळ्यांना रक्ताचे डाग लागलेलं बेडशीट दाखवलं .”

सुलभा – “रूपा, माझा नवरा म्हणजे देवमाणूसच भेटला मला. तो खूप चांगला आहे. मुळात आज आमच्यात असं काहीच नाही झालं….तो मला म्हणाला कि तुला जितका टाइम घ्यायचा तेवढा घे मी जबरदस्ती कधीच नाही करणार…फक्त ह्या बाहेरच्या कर्मठ समाजाला धडा शिकवायचा म्हणून त्यांनी त्यांचं पायाचं बोट कापलं….आणि….”

एवढं बोलून सुलभा अजूनच रडायला लागली आणि मी ऐकून सुन्न झाले कि खरंच अशा बुरटलेल्या समाजात सुलभाच्या नवऱ्यासारखा एक आशेचा किरण बनून येतो आणि अख्ख्या समाजालाच बदलून टाकतो. पण तो सुद्धा समाजसोबती असता तर आज सुलभासोबत काय झालं असतं ह्याचा विचार सुद्धा करवत नाही.

तेवढ्यात सुलभाची जाऊ तिथे आली आणि मी भानावर आले….”अगं सुलभा चल उठ लवकर…तयार हो..आज मी तुला साडी नेसवते.”

मी सुलभाला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कानात मंत्र फुकला, “आज माझ्यासमोर बोलली ते शेवटचं बोलली….अजून कुणासमोर हे बोलू नकोस….”

© RitBhatमराठी

 

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories