Ritbhatmarathi

Search
Close this search box.

आज माधवरावांचं श्राद्ध होतं. माधवरावांना जाऊन २० वर्षे झाली होती पण सुलभाताई नित्यनियमाने दरवर्षी ब्राह्मणाला भोजन देऊन माधवरावांचं श्राद्ध करत.

गळ्यात सोन्याची मोहनमाळ, कानात सोन्याचे बुंदे, कपाळावर कोरलेली चंद्रकोर, हातात सोन्याच्या पाटल्या आणि अंगावर प्युअर कॉटनची साडी असा साज करून सुलभाताई माधवरावांच्या फोटो पुढे उभ्या होत्या. त्या निशब्द होऊन फोटो कडे एकटक बघत होत्या. माधवरावांचं फोटो मधलं स्मितहास्य बघून जणू तेही सुलभाताईंना एकटक न्याहाळत आहेत असच वाटत होतं. फोटो कडे बघता बघता सुलभाताईंच्या डोळ्यासमोर २०-२५ वर्षांपूर्वीचा भूतकाळ समोर उभा राहिला आणि त्या फ्लॅशबॅक मध्ये गेल्या.

पहाटे पहाटे घर मंदिरात घंटीचा नाद….आणि घरात सर्वत्र इत्तराचा सुवास….सुलभाताई पूजा होताच आरतीची थाळी घेऊन घरात सगळीकडे ओवाळत होत्या….तेवढ्यात माधवरावही  उठलेच.

“सुलभे मला ह्या १० वर्षात कधी अलार्मची गरज भासली नाही बघ….तुझा तो सकाळी सकाळी घंटीचा नाद आणि हा सुगंध….घर कसं अगदी प्रफुल्लित होऊन जातं….आणि हो तू हा जो साज श्रुंगार करून सकाळी सकाळी तयार होतेस त्यामुळे तुला पाहून मन अजूनच प्रसन्न होत माझं….धन्य ती लीला तुझी….”

सुलभाताई – “पुरे पुरे ते कौतुक आता….अंघोळ करून या..चहा ठेवलाय मी….आणि हो नाष्ट्या साठी काय बनवू…बेसनाचे धिरडे बनवू का ..?”

माधवराव – “वाह्ह!! तुझ्या हातचं बेसनाचं धिरडं…मग तर अजूनच मज्जा….एवढी सुंदर, सुशील, सुगरण बायको….अजून काय पाहिजे जीवनात”

सुलभाताई माधवरावांना चिडवुनच – “अहो तुम्ही आता जाता का अंघोळीला पटकन….आई आतमध्ये पूजा करतायेत….त्या बाहेर आल्या आणि तुम्हाला असं पाहिलं मग बघाच कशी धांदल उडते तुमची….मग करत बसा माझी तारीफ आईंसमोर”

असं हसतं खेळतं आयुष्य होतं माधवराव आणि सुलभाताईंचं….आणि त्यांच्या संसारात दोन फुलेही जाई आणि जयच्या नावाने उमलली होती. छोटं पण सुखी कुटुंब होतं. सुलभाताईंनी मराठी मध्ये ग्रॅज्युएशन केलं होतं पण लग्नानंतर घराची, मुलांची जबाबदारी चोख पार पडायची अशी सक्त ताकीदच दिली होती सुलभाताईंच्या सासूबाईंनी. त्यामुळे त्यांना लग्नानंतर इच्छा असूनही कुठे बाहेर नाही पडता आलं.

एक दिवस माधवराव ऑफिसला जाताना सुलभाला सांगून गेले कि, “सुलभे आज तू बँकेच्या आपल्या “जॉईंट अकाउंट”  वाल्या खात्यातून पैसे काढून आण…तुलाही बँकेचे व्यवहार माहिती पाहिजे ना गं….उद्या मी नाही राहिलो तर तुला कसं कळणार गं आपलं कुठे कुठे खातं आहे….कुणाच्या नावावर किती पैसे आहेत….”

सुलभाताई – “अहो असं अभद्र का हो बोलता तुम्ही…नुसतं सांगितलं असत तरी गेले असते मी बँकेत”

सासूबाई दोघांच्या गप्पा ऐकतच होत्या आणि काही टोकण्यावाचून राहणार होत्या का त्या?

“अरे माधवा….काहीही पटकन बोलून जातो का रे….आणि बायकांना कशाला व्यवहार शिकवायचे हो असले….चूल आणि मुलं काही कमी आहे जेव्हा तू तिला व्यवहार शिकायला लावतोय….अरे आम्ही काही हेच शिकून पोहोचलो कारे इथपर्यंत…. तुझे बाबा एक पैशांचं नाणं नाही दाखवायचे मला….व्यवहार तर लांबचीच गोष्ट “

आईच्या पुढे कुणाचं चालतं का…माधवरावही गेले निघून पण ते कायमचेच….

एकदा ऑफिसला जाताना त्यांना अपघात झाला आणि त्या अपघातात गेले ते निघून सुलभाच्या अंगावर सगळं टाकून…. पण सुलभा खमकी होती..थोड्याच दिवसांत ती सावरली आणि तिने सासूबाईंना व दोन्ही मुलांनाही आधार दिला. पण नातेवाईक डोळा लावूनच होते. माधवरावांचा भाऊ एवढे वर्ष कधी आपल्या आईला भेटायला आला नाही कि कधी साधी विचारपूसही केली नाही त्याने. पण माधवराव जसे गेले तास तो टपकला तिथे.

सुलभाताईंना आणि सासूबाईंना तो आला म्हणून धीर वाटला….काही दिवस त्याने सांत्वन केलं आणि खोटी आश्वासनं दिली कि सुलभाताईंना माधवरावांच्या खात्यातले पैसे, त्यांच्या इन्शुरन्स चे पैसे तो सुलभाला मिळून देईन. म्हणून त्याने कोऱ्या स्टॅम्प पेपर वर सुलभाच्या मोडक्या सह्या घेतल्या आणि हळू हळू सगळं स्वतःच्या नावावर केलं.

सुलभाताईंना जेव्हा कळालं तेव्हा फार उशीर झालेला होता. सासूबाईही डोक्याला हात लावून बसल्या होत्या. पण सुलभाला असं खचून चालणार नव्हतं. तिच्याकडे जेमतेम जे शिल्लक होतं ते म्हणजे तिचे लग्नाचे सोन्याचे दागिने जे घातल्यावर ती चार चौघात उठून दिसायची आणि माधवरावांनाही बिना दागिन्यांची सुलभा कधी आवडायची नाही. अंगावर एखादा जरी दाग नसेल तर ते तिला टोकायचे पण आज त्याच दागिन्यांना गहाण ठेवायची वेळ तिच्यावर आली होती.

दागिने गहाण ठेवून जे काही पैसे मिळाले त्यातून पोरांची शाळेची फी भरली आणि उरलेल्या पैशातून तिने शिवणकामाची मशीन विकत घेतली. सुलभाताईंना आधीपासूनच शिवनाची आवड होती. पण लग्नानंतर त्यांना तो छंद कधी जोपासता आला नाही. हळू हळू त्यांचा शिवणकामात जम बसला आणि त्यांना गिऱ्हाहीक मिळायला लागले.

सुलभाताईंनी शिवलेल्या कपड्यांची चर्चा जवळपासच्या गावांत होऊ लागली आणि एक दिवस त्याच्याकडे एका श्रीमंत बाईने तिच्या कंपनीतल्या कामगारांचे कपडे शिवायचे कॉन्ट्रॅक्ट सुलभाताईंना दिले. सुलभाताईंजवळ ना भांडवल ना मदतीचे चार हात होते. पण त्यांनी त्या बाईला आश्वासन दिल आणि दिवस रात्र एक करून ऑर्डर पूर्ण केली. त्या बदल्यात त्यांना तिच्या कडून चांगला मोबदलाही मिळाला. एवढी वर्ष धान्याच्या डब्ब्यांमध्ये पैसे साठवून ठेवलेल्या सुलभाताईंनी आता स्वतः शिकून बँकेत स्वतःचे खाते काढले आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून नाही पहिले. आज त्यांची स्वतःची सुलभा आणि माधवच्या नावावर पडलेली “सुमा” नावाची गारमेंटची कंपनी होती.  

“आई !! आई “

जाईचा आवाज ऐकल्यावर सुलभाताई दचकून भानावर आल्या.

जाई – “आई कधीची आवाज देतेय गं….कुठे हरपलीस एवढी….ते ब्राह्मण काका येतीलच एवढ्यात आणि गोखले काका (कंपनीचे मॅनेजर) आले आहेत तुझी सही घ्यायला….आज तू गेली नाही ऑफिसमध्ये….घरीच आलेत ते त्यामुळे”

सुलभाताईंनी गोखले काकांकडून फाईल घेतली. ती चारदा व्यवस्थित वाचली आणि सुवाच्च अक्षरात ताठ मानेने सही केली.

 

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories