बकेट लिस्ट

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
‘‘चला चला लवकर बॅगा आणा इथे! मी डिक्की उघडली आहे.’’ शशांकची नुसती गडबड सुरू होती. स्वरूपा आणि तिच्या सासर्यांनी सर्व बॅगा गाडीजवळ नेल्या. सासूबाई आत सगळं झाकपाक झालंय ना नजर टाकायला गेल्या. आता फक्त 10 च मिनिटांत गाडीला स्टार्टर मारायचा आणि मस्त ट्रीपला सुरुवात… ट्रीप कम काम आणि मध्येमध्ये आराम… सगळ्यांच्या चेहर्यावर आनंद पसरला होता. या दोन वर्षांच्या काळात कुठे जाणं नाही की कुणाचं येणं नाही. त्यामुळे सर्वांनाच कंटाळा आला होता. अचानक शशांकला ऑफिसच्या कामासाठी बेंगलोरला जावं लागणार होतं, तिथेच शशांकची बहीणही होती, बरेच दिवस ती सर्वांना बोलवत होतीच. या निमित्ताने सगळेच जाऊ म्हणून सर्व जण तयार झाले होते. काल संध्याकाळीच हा बेत ठरला. त्यामुळे नुसती धावपळ सुरू होती.
या सगळ्या धांदलीत स्वरूपाचं तिच्या फोनकडे लक्षच नव्हतं. पण आता शशांकचा फोन वाजू लागला,
‘‘बाबा, काय सगळं ठीक आहे ना?’’
‘‘हो हो आहे तर मस्त मजेत आहोत आम्ही सगळे.’’
‘‘मग आई फोन का उचलत नाहीये.’’
‘‘अरे आम्ही सगळे तुझ्या आत्याकडे निघालोय ना त्या गडबडीत आहोत सगळे.’’
‘‘अरे देवा!’’
‘‘का रे काय झालं?’’
‘‘तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी मी आज रात्रीच इथून निघतोय आणि उद्यापर्यंत पोहोचेन. मी बुकींग केलंय.’’
शशांकला काय करावं काहीच समजेना.
‘‘स्वरूपा, स्वरूपा अगं ऐकलंस का?’’
‘‘हो हो आलेच! काय झालं?’’
‘‘अगं शार्दुल निघालाय मुंबईहून उद्या सकाळी येईल म्हणतोय.’’
‘‘अरे हो का?’’
हो ना! मग काय शार्दूलचा फोन तसाच होल्ड वर ठेवून शशांक, स्वरूपा, सासू-सासरे सर्वांची चर्चा सुरू झाली. शशांक तू जा कामासाठी आम्ही थांबतो इथेच शार्दूल येणारे तर वगैरे वगैरे. कोण काय बोलतंय कोणालाच काही कळत नव्हतं. तिकडून शार्दूलचं टुमणं चालू होतं. तुम्ही जा… मी येणं रद्द करतो. परत येईन.
शेवटी स्वरूपा म्हणाली,
‘‘थोडं थांबा मी काय म्हणतेय ऐका.’’ मग तिने शशांकला काम आहे म्हणून आणि आई-बाबांची नणंद अगदी डोळे लावून वाट बघत आहे त्यामुळे तुम्ही सर्व जा मी एकटी थांबते हा पर्याय काढला.
‘‘तू एकटी कशी थांबशील?’’ सासूबाईंचा प्रश्न.
‘‘आजच्या रात्रीचा तर प्रश्न आहे, उद्या शार्दूल येतोच आहे. तुम्हीही चार दिवसांत येताय म्हणजे शार्दूलची आणि तुमची भेटही होईल.’’ स्वरूपाने तोडगा काढला. नाही होय करता करता ती तिघजण तयार झाली आणि बेंगलोरला रवाना झाली. आणि स्वरूपा हुश्श करून सोफ्यावर बसली.
आता मंडळींना जाऊन तासभर तरी झाला होता. नक्कीच कोणी परत येणार नव्हतं. स्वरूपाने शार्दूलला फोन करून थँक्स म्हटलं.
‘‘आई, थँक्स काय? पण तू असं का केलंस? जायचंस ना मस्तपैकी आत्याकडे… जरा घराच्या बाहेर मज्जा करून आली असतीस.’’
‘‘खरं आहे रे शार्दूल, पण तू आलास ना की मी सांगेन तुला मी का नाही गेले. तसंही तू दोन दिवसांनीच येणार आहेस ना? उद्या नाही ना?’’
शार्दूलकडून पण तो उद्या येणार नसल्याची खात्री स्वरूपाने हळूच करून घेतली. मग तिचं तिलाच वाटलं काय झालंय काय आपल्याला? कोणी नको वाटतंय? आपला मुलगा, नवरा, सासू-सासरे सर्व किती चांगले आहेत. आपल्याला कुणाचाच काही त्रास पण नाही तरीही जरा एकांत हवासा वाटतोय.
मग ती दहा मिनिटं सोफ्यावर शांतपणे डोळे मिटून बसली. किती दिवसांत असा एकांत तिला मिळाला नव्हता.
स्वरूपा हे दे, स्वरूपा ते दे, हे कुठे आहे नी ते कुठे आहे? सगळ्यांच्या अपेक्षा आणि आवडीनिवडी जपता जपता ती तिचं जगणंच विसरून गेली होती. परवाच कुठेतरी तिच्या वाचनात आलं होतं की, जग स्वत:साठी, तुला काय आवडतं हे आठव आणि तिला खरंच वाटलं, भरपूर आलं घातलेला, साय घातलेला चहा आपल्याला आवडतो तसा चहाच कित्येक दिवसांत आपण प्यायला नाहीये, खमंग बटाटेवडा गरम गरम कित्येक वर्षांत गरम गरम खाल्ला नाही. वडा राहुदे, गरम गरम वरण भात, त्यावर मस्त लिंबू, तूप सुद्धा आपण खाल्लं नाहीये. सगळ्यांची ताटं वाढून आपलं ताट वाढायला घेईपर्यंत सगळं गारढोण. आता या दोन दिवसांत फक्त वरणभात खायचा. तिने ठरवूनच टाकलं.
वरण लिंबू तूप, आरोग्यासाठी खाऊ खूप! तिला शार्दूलच्या शाळेतलं वाक्य आठवलं आणि तिने ते अगदी तालासुरात म्हणून पण पाहिलं. असं बोललं तर म्हणतील वेडी आहे का ही? पण आता कोण ऐकणारे? ती हसली.
मध्येच नवर्याचा फोन आला, सुखरूप पोहोचलो. काय झालं ना मनासारखं?
‘‘थँक्स शशांक, तूही माझ्या या कटात सामील झाल्याबद्दल.’’
‘‘अगं कट कसला त्यात, तुला एकांत हवासा वाटणं यात काही गैर नाही. जिले अपनी जिंदगी.’’
‘‘खरंच खूप भारी वाटतंय.’’
‘‘ओके एंजॉय.. सगळे जेवणासाठी वाट बघतायत आणि तुला मिस करतायत हं…’’ त्याने हसून सांगितलं.
‘‘हम्म ! बाय!’’
तिच्या मनात विचार येत होते, नणदेकडे गेलो तरी जेवण-खाणं आयतं मिळालं असतं, पण नणंद म्हणाली असती,
‘‘स्वरूपा, तेवढं आई-बाबांच्या गोळ्यांचं बघ बाई, तुलाच माहीत आहे सगळं!’’
बाबा म्हणाले असते, ‘‘मला कसा भात लागतो स्वरूपाला विचार ती बरोबर सांगते.’’
आईंनी सांगितलं असतं, ‘‘स्वरूपा, मला लागते तशी कडक कॉफी तेवढी तूच कर बाई!’’ कारण त्यांना माझ्याच हातची कॉफी लागते,
शशांक म्हणाला असता, ‘‘माझं घड्याळ कुठं ठेवलंय बघ ग! मला चहा कर गं’’ हे सगळं करताना मलाही छान वाटतं, पण आता माझंही वय होऊ लागलंय, कधीतरी चिडचीड होते, मलाही कधीतरी माझ्या मनासारखं काहीतरी करावंस वाटतंच की… किंवा कुणीतरी आपल्याला तुला काय आवडतं असं विचारावं वाटतंच की, पण हे काही सर्वजण घरात असताना शक्य नाही.
मग ते दोन-तीन दिवस स्वरूपाने मस्त पूर्ण जगून घेतलं. कधी वरण भात तर कधी बाहेरचा वडा-पाव खाऊन भूक भागवली. मैत्रिणींना गोळा करून पिक्चरला गेली, मॉर्निंग वॉक झालंच तर इव्हिनिंग वॉक, म्हणावंसं वाटलं तर एखादं गाणं अगदी दिलखुलासपणे म्हटलं. हवे ते ड्रेस घालून पाहिलं. बकेट लिस्टमध्ये जे जे काही होतं ते सर्व करून पाहिलं. दोन दिवसांनी मात्र तिला वाटू लागलं. आता बास आता घरात माणसं हवीत.
आधी मुलगा आला, मग नवरा, सासू-सासरे आले. घर भरलं. शांतता अनुभवलेल्या घराला पुन्हा ती चिवचिव, गडबड, गोंधळ हवासा वाटू लागला. तप्त उन्हाळ्यानंतर पावसाच्या सरी आल्या की, जसं मन आनंदतं, तृप्त होतं तसं झालं स्वरूपाचं. मरगळ जाऊन तिला आता परत उत्साह आला होता आणि सगळ्यांच्या सेवेसाठी ती तत्पर झाली होती.
तिच्या चेहर्यावर ओसंडणारा उत्साह पाहून शशांक हळूच तिच्या कानात म्हणत होता,
‘‘किती फ्रेश झालीयस? तुला कधी हवा असेल असा एकांत तेव्हा सांग मी माझं बेंगलोरला काम काढतो.’’
हे वाक्य ऐकून स्वरूपा खूशच झाली आणि यावर्षीची बकेट लिस्ट साठवू लागली.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
====================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============