Skip to content Skip to sidebar Skip to footer

बिया

सगळी कडे युद्धाची दहशत पसरलेली. आयुष्य बंद दाराआड गुदमरलेलं. घरं जीव मुठीत धरून  अन मृत्यू दबा धरून बसलेला. अशाच एका घरात त्रिकोणी कुटुंब. आपल्या लेकीच्या डोळ्यातलं भविष्य संपून जाऊ नये यासाठी धडपडणारं. शाळा , शिक्षण, मैत्रिणी , खेळ सगळं मागे पडलंय. पोळी आता बंदुकीच्या गोळीत बदललीय. आशेसारखी भूकही परीक्षा घेणारी. अशा वेळी तिचा बाबा कसल्याशा झाकणावर रबर ताणून धरायचा. आणि आपल्या बोटाने ते “वाद्य”वाजवायचा. गाणं गायचा. कधी भूक खूप असह्य व्हायची तेव्हा तिची आई जवळच्या बिया सोलून द्यायची. कसल्याशा बिया असायच्या तिच्याजवळ. कुठून कुठून वेचलेल्या. ‘बिया भविष्याची बेगमी असतात’, तिची आई नेहमी म्हणायची.

याच बिया घेऊन तिचे आई बाबा कधी तिच्याशी खेळायचे. कधी पाढे शिकवायचे. त्यादिवशी कुठूनशा तांदळाच्या  कण्या मिळाल्या. सणा सारखा उत्साह संचारला. कित्येक महिन्यांनी धान्य पाहिलं होतं चुलीने. परमेश्वराचे आभार मानत प्रार्थना झाली. जेवणं झाली अन अंथरुणावर परी ची गोष्ट खुलत गेली. पापण्या कधी मिटल्या कळलंच नाही. अन दार धडधड वाजलं. काळजाचा ठोकाच चुकला. तिच्या आईने तिला रिकाम्या कणगीत लपवलं. देवा वाचव. …देव गाढ झोपी गेलेला.. सैनिक आले..क्षणभरात सगळ्या गोळ्या तिच्या बाबाच्या  छातीत रिकाम्या झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तिचा बाबा पाहून आईच्या तोंडून किंकाळी फुटली. तिच्या आईला फरफटत नेलं त्यांनी. बाई असण्याची मरणापेक्षा भयंकर शिक्षा भोगायला. ती गोठून गेली जागच्या जागी. 

पहाट झाली.तिला जाग आली. घर कोसळलं होतं कालच्या आघाताने. ती वाट फुटेल तिकडे जाऊ लागली. पायाखाली येणाऱ्या प्रेतांना अडखळून पडत होती. युद्ध शमलं होतं. पण आता कोण उरलं होतं? जेत्यांच्या छावणीत आवराआवर सुरू होती. जिंकण्याचा उन्माद कधीच ओसरला होता. साथीदारांना गमावून जिंकणं का कुठे जिंकणं असतं? ती चालत राहिली. पोटातली भूक, वेदना , भावना , गालावरच्या आसवांसोबत सुकून गेल्या होत्या. ती चालत राहिली. मोकळी जागा दिसताच थबकली. काहीसा विचार करून जमीन उकरू लागली. छोटासा खड्डा तयार झाला. त्यात तिनं फ्रॉकच्या खिशातल्या बिया पेरल्या. कुठूनसं पाणी आणून घातलं. तिच्या आईचे शब्द तिला आठवत होते…बिया भविष्याची बेगमी असतात.. ती तिथंच बी रुजण्याची वाट पाहू लागली…

Leave a Comment

error: