Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

झोपेतून आळसातच ती उठली. कालचा दिवस पसारा आवरता आवरता कसा संपला कळलंच नाही. घर शिफ्टींग करणं काही सोप्प काम नाही. असा विचार तिच्या मनात येऊन गेला. काल उत्साहाच्या भरात हे तिथं ठेवू, हे इथं ठेवू करत किती काम केलं त्याचा शिणवटा आज जाणवत होता. गेले होते. बेडवरूनच तिने सभोवार
नजर फिरवली. सर्व वस्तू छान आपापल्या जागी बसल्या होत्या. एक हलकंसं हसू तिच्या चेहर्‍यावर उमटलं.
सोनू गाढ झोपेत होती आणि अहोंनी तर काय ताणून दिली होती. आता आपल्याला तरी उठायलाच हवं या जाणिवेने ती उठली. अजून भांड्याचा पसारा थोडा-फार तसाच होता. नित्यकर्म आवरून तिनं चहाचं आधण गॅसवर ठेवलं. आजपासून स्वातंत्र्य. रोजच्या रामरगाड्यापासून आराम.
नवर्‍याच्या एका प्रोजेक्टसाठी ती, नवरा व मुलगी काही काळासाठी एकत्र कुटुंबातून स्वतंत्र राहण्यास आली होती. या भागातून संजयचं ऑफिस त्याला जवळ पडणार होतं आणि त्याचा वेळ वाचणार होता. मृणालही मनातून सुखावली होती. तिने मस्त चहा केला. आणि कप हातात घेऊन ती निवांत मोबाईल पाहत बसली. सोनू
लहान असल्याने शाळेची काहीच गडबड नव्हती. नवर्‍याने पण आज ऑफिसला दांडी मारली होती. उद्यापासून ऑफिस सुरू होणार होते.
थोड्या वेळाने सगळे उठले. म रोजची गडबड. स्वयंपाक पाणी, बाजारहाट यात दिवस कसा संपला तिला कळलंच नाही.
दुसर्‍या दिवशी ती सकाळी उठून डब्याची तयारी करू लागली. जय ने जाताना ढीगभर सूचना दिल्या. “ही हाय सोसायटी आहे. दार उघडं ठेवू नको, शेजारी ओळख
काढायला जाऊ नको. सोनूवर नीट लक्ष ठेव. आईशी तासन्तास फोनवर बोलू नको.” तिनं हो हो करत मान डोलवत दरवाजा ओढून घेतला व त्याला बाय करण्यासाठी
गॅलरीत आली तो गाडी काढेपर्यंत ती तशीच उभी राहिली मग ती आत वळणार तोच तिला समोरच्या गॅलरीत काहीतरी हालचाल दिसली. ती क्षणभर थांबली
आणि… आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्‍वाच बसेना. ‘माय गॉड!’ “अरे तू इथे कसा?” ती जवळ जवळ जोरात ओरडलीच.
समोरच्या गॅलरीत उभा असलेला राजही तिला बघून चकित झाला. तोही “अगं तू?” म्हणत खूश झाला. पण अंतरामुळं आणि आजूबाजूच्या सो कॉल्ड चकचकीत
वातावरणामुळे त्यांना जास्त काही बोलता आलं नाही. मग नंतर भेटू या खाणांखुणांवरच ती आत आली आणि सोनूही उठून बसून रडू लागली होती.
मग रोजच्या गडबडीत, कामांच्या रगाड्यात ती राजला विसरूनही गेली. दुपारी जरा आडवी झाली तेव्हा तिला परत आठवण आली, “अरे, हा इथे कसा? पण आता
कसा लागणार शोध आणि कशी होणार भेट?” राज तिचा कॉलेजचा मित्र होता. तसं दोघांमध्ये निव्वळ मैत्रीचं नातं होतं पण… तरीही मनात कुठेतरी खोल काहीतरी
वेगळंही होतं. तिनं गॅलरीत येऊन पाहिलं तर सगळं सामसूम होतं.
जयला कळलं तर त्याला काय वाटेल त्यापेक्षा नकोच ही भेट वाढवायला नको असा विचार तिच्या मनात येऊन गेला. आणि ती भूतकाळावर पडदा टाकून आपल्या
रोजच्या कामात व्यस्त झाली.
आठवडा असाच गेला. गॅलरीत तिचं कधीतरी लक्ष जायचं पण सगळं सामसूम असायचं. रात्री उशिरा कधीतरी लाईट दिसायचा. रविवारी सकाळी नऊ वाजता
दाराची बेल वाजली. मृणाल जरा संभ्रमातच दार उघडायला गेली, ‘कोण मेलं तडमडलं सकाळी सकाळीच?’ दार उउघडलं, बघते तर समोर राज उभा. “अरे आत ये
ना.” ती हसतच म्हणाली.
मग जयशी तिने राजची ओळख करून दिली. राज ही सकाळी लवकर बाहेर पडे तो संध्याकाळी उशिरानं घरी परतत असे त्यामुळे आठवडाभर त्यालाही मनात असून
सुद्धा मृणालला भेटता आलं नव्हतं. पण त्यानं सिक्युरिटीकडे चौकशी करून तिच्याबद्दल माहिती काढली होती. चहा-नाश्ता-गप्पा अशात रविवार सकाळ मस्त गेली.
राज आणि जयची पण छान ओळख झाली. आणि जयनेही फार चौकशी केली नाही याचं मृणालला बरंच वाटलं. जयलाही या नवीन जागेत, अपरिचित ठिकाणी
आपल्या बायकोच्या का असेना ओळखीचे कुणीतरी आहे याचा फार आनंद झाला.
मग असंच कधीतरी 15-20 दिवसांनी त्यांची भेट होत असे.
फोन, व्हाटस् अ‍ॅप यावर मेसेज देवाण-घेवाण होत असे.
एक दिवस मृणालला राजचा मेसेज आला, “हम तो बैठे ते आपके इंतजार में, आपने तो पराया कर दिया’
मृणालला काही कळेचना
तिनं स्मायली टाकून विषय संपवला.
एक दिवस राजने फोन केला. तो म्हणाला, “मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आपण भेटायचं का?”
मृणाल म्हणाली, “ये ना घरी.”
राज म्हणाला, “नको घरी नको. बाहेर भेटू.”
“नाही रे बाहेर नाही शक्य. मी सोनूला घेऊन कुठे येऊ? काय काम आहे?” मृणाल.
“असंच.” राज.
असेच दिवस पुढे पुढे सरकत होते जय ही आपल्या कामात व्यस्त होता. रविवारीही त्याला जावं लागत असे. एका रविवारी सकाळीच जय बाहेर पडला. मृणाल
आपलं आवरत होती. तेवढ्यात बेल वाजली. तर समोर राज उभा. तिच्या छातीत धडधडू लागलं.
मग जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारताच तो म्हणाला, “मृणाल, मला तू खूप आवडत होतीस. तुझ्याही मनात तसंच होतं का?”
ती काहीच बोलली नाही. तिच्याही मनात काहूर उठले. “हो सांगावं का याला.” तिला वाटलं खरंच सगळं सोडून जावं याच्याबरोबर, पण….
तेवढ्यात छोटी सोनू तिकडे आली आणि मामा, मामा करत राजच्या मांडीवर बसली. राज एकदम गप्प झाला.
मग थोड्या वेळाने राज निघून गेला. मृणालही थोडी डिस्टर्ब झाली. मग राजचे मेसेज, फोन येऊ लागले. ती दोघं फोनवर बोलू लागली. आपण कसे एकमेकांत गुंतलो
होतो वगैरे वगैरे तिलाही छान वाटत होतं. पण मनातून आपण आपल्या नवर्‍याशी प्रतारणा करत आहोत याबद्दलही मन खात होतं.
एक दिवस राजने तिच्याकडे आपल्याबरोबर बाहेर येण्याचा हट्ट धरला.
तो म्हणाला, “जर तू आज आली नाहीस तर आपले नातं संपलं.” तिला वाईट वाटलं. पण तिनं काहीच उत्तर दिलं नाही. मग शांतपणे आपल्या मनोदेवतेला कौल
लावला की मी हे करते आहे ते बरोबर आहे का चूक आहे?
एकीकडे नितांत प्रेम करणारा नवरा आणि दुसरीकडे भूतकाळातील प्रेम? आपण जर आज गेलो तर तो रोजच मागणी करेल आणि कधी ना कधी नवर्‍याला याचा सुगावा
लागेल. मग आपलं नातं संपून जाईल छोट्या सोनूचेही हाल होतील. आणि काय कमी आहे अत्ता आपल्या आयुष्यात की, आपण मृगजळामागे धावावं?” नवरा
वेळ देऊ शकत नाही. पण तो कुणासाठी झटतोय, आपल्यासाठीच ना? तिनं कपाट उघडलं तर सगळे कपडे एकमेकांत मिसळले होते. तिने विचार केला ही निर्जीव
गोष्ट इतकी बेमालूमपणे एकमेकांत मिसळली आहे आणि मी… मी… शी! तिला आपलाच धिक्कार वाटला.
तिने राजला फोन करून ती येत नसल्याचे सांगितले व यापुढे आपणास फोन करून त्रास न देण्याचे ही कळवले.
थोड्या वेळाने राजचा तिला फोन आला. तो म्हणाला, “सॉरी मृणाल.”
मग थोड्या प्रमाणात राजचे मेसेज येतच राहिले आणि एक दिवस अचानक राज निताला घेऊन दारात हजर झाला व आपले लग्न ठरल्याचे सांगितले. मृणाल मनोमन
खूश झाली. तिच्या मनावरील जळमटं दूर झाली. संध्याकाळी तिनं राजला फोन करून सांगितले, “आपण छान मित्र राहू. तेच आपल्या सर्वांच्या हिताचं आहे.”
राजनेही तिचे म्हणणे 100 टक्के खरे असल्याची कबुली दिली. आणि मृणालला निताच्या रूपात एक नवी मैत्रीण मिळाली.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *