Ritbhatmarathi

Search
Close this search box.

भोंडला किंवा हादगा कसा साजरा करतात? पौराणिक कथा आणि विधी

bhondla celebration in marathi: आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. सुर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करतो. आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या संध्याकाळपासनं कोजागिरीपर्यंत भोंडला साजरा केला जातो. भोंडला महाराष्ट्रात विविध नावांनी साजरा केला जातो. विदर्भात भुलाबाई, कोकणात हादगा तर काही ठिकाणी भोंडला या नावाने हा सण साजरा करतात.

या सणामागची पौराणिक कथा अशी की एक दिवस कैलास पर्वतावर शंकरपार्वती सारीपट खेळत बसले होते. पार्वतीकडून शंकर म्हणजेच भुलोबा हरले व पार्वती म्हणजे भुलाबाईवर रुसून दूर निघून गेले. शंकराला रिझवण्यासाठी पार्वतीने भिल्लीणीचे रुप घेतले. ती भिल्लीण म्हणजे भुलाबाई. ती नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेते. शंकर पार्वतीच्या रूपाला भुलले म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा म्हणतात. तर पार्वतीला भुलाबाई म्हणतात.

● हादगा हा सण काही ठिकाणी नऊ दिवस तर काही ठिकाणी सोळा दिवस साजरा करतात.

●हादगा/भोंडला जिच्या घरी साजरा होणार ती छान नटूनथटून तयार होते. इतर स्त्रिया, कुमारिका तिच्या अंगणात जमतात.

●अंगणात पाट ठेवून त्यावर खडूने/ रांगोळीने अथवा तांदूळाने हत्तीचे चित्र काढले जाते. काही ठीकाणी दोन हत्ती समोरासमोर काढून त्यांच्या सोंडी वर उंचावलेल्या दाखवतात व सोंडींत हार परिधान केलेला दाखवतात. पाटाभोवती रांगोळी काढतात. फुलांनी, फळांनी सजावट करतात. सौख्यसम्रुद्धीचे, हस्त नक्षत्राचे प्रतिक असलेल्या हत्तीची पूजा करतात. या पाटाभोवती लहान मुलींचा फेर , बाहेर स्त्रियांचा फेर असे फेर धरतात.  भोंडल्याची गाणी गातात, विविध प्रकारच्या फुगड्या घालतात.

सम्रुद्धीचे प्रतिक हत्ती. वर्षा ऋतुत पर्जन्यराजाचे आगमन झाल्यापासनं पर्जन्यराजाने मुक्त हस्ताने त्याच्याकडच्या वर्षासरींची बरसात भूतलावर केलेली असते. शेतकऱ्याने शेतात पेरलेली पिके तयार व्हायला आली असतात. नदी, नाले, ओहळ सारे तुडुंब भरून वहात असतात. झाडे,पशुपक्षी,अवघ्या प्राणीमात्रावर पर्जन्यराजाने क्रुपा केलेली असते. पर्जन्यराजाचे आभार मानण्यासाठी म्हणून त्याचे प्रतिक हत्ती याची पूजा केली जाते.

जिच्या अंगणी भोंडला आसेल ती खेळ झाला की खिरापत देते. ही डब्यातली खिरापत सहज मिळत नाही तर ओळखावी लागते. नाही ओळखता आली तर मग काही हिंट दिल्या जातात. वाजते का म्हंटल्यावर ती मुलगी डबा वाजून दाखवते किंवा तिखट की गोड विचारलं जातं. खिरापतीत दडपेपोहे, चणे, वड्या,भडंग,..असे विविध प्रकार असतात. खिरापत ही चढत्या क्रमाने असते. पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन.. शेवटच्या दिवशी ठिकठिकाणच्या खिरापती खाऊन नि खेळ खेळून मुली इतक्या दमतात की घरी येऊन सरळ झोपून देतात.

जाणून घ्या महाराष्ट्रातील देवींचे साडेतीन शक्तिपीठे (sadetin shaktipeeth) आणि त्यांचा इतिहास

नवरात्री मध्ये घट कसे बसवायचे. जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी

bhondla celebration in marathi: जुन्या काळी खऱ्या अर्थाने रांधा, वाढा नि उष्टी काढा इतपतच बाईचं आयुष्य मर्यादित होतं. लग्नही लवकर होत. अगदी वयाच्या चौदापंधराव्या वर्षीही लग्ने होत. सासरी बऱ्याचजणींना फार कामे करावी लागत, टोमणेही बरेच ऐकावयास मिळत. यातून जरा बाहेर येण्यासाठी, एकमेकींची सुखदु:खे जाणून घेण्यासाठी, दैनंदिन रहाटगाडगं विसरून काही क्षण का होईना हसण्याखिदळण्यासाठी भोंडला ही प्रथा रुढ झाली असावी.
या भोंडल्याची गाणी स्त्रियांनीच रचली आहेत. आपल्या जीवनातील दाहक वास्तव, आनंदाचे क्षण त्यांनी या गीतांत रचून त्यांना चालीत गायले आहे आणि मौखिक परंपरेने ही गाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आली आहेत.

सर्वप्रथम पाटावर मांडलेल्या हत्तीची पूजा करतात.
गणेशाच्या आराधनेने भोंडल्याच्या गाण्यांची सुरुवात होते. त्यासाठी पहिले गीत गणेश आराधनेचे गातात.

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी
पारवळ घुमती गिरीजा कपारी
अंकाणा तुझी सात वर्ष
भोंडल्या तुझा सोळा वर्ष..

नणंदभावजयांच्याबद्दलही गीत गायले जाते.
नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडावर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असेल माझी गोरटी
घे काठी घाल पाठी
घराघराची लक्ष्मी मोठी
नणंदाभावजया म्हणजे अवघडच. तुझं माझं पटेना नि तुझ्यावाचून जमेना. क्षणात रुसवा, क्षणात दोस्ती असं या जोडगोळीचं चाललेलं असायचं, तेच गाण्यातून प्रतित होतं.

लहानसहान चुका कशा अनवधानाने होतात नि त्याबद्दल सजग राहिलं पाहिजे हे श्रीकांतकमलाकांत या गाण्यात कळतं.
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं
वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले
वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
केरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकला
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या..

एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू ..यात मुलींशी अंकओळख घडून यायची. त्याकाळी मुलींच शाळेत जाण्याचं प्रमाण कमी होतं म्हणून दैनंदिन व्यवहार करण्यासाठी अशी हसतखेळत झालेली अंकओळख महत्वाची होती.
एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू
चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू
पाचा लिंबांचा पाणोठा
माळ घाली हनुमंताला
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागे लपली राणी
अगं अगं राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारिक वाळू
तेथे खेळे चिल्लारी बाळू
चिल्लारी बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिंपीने दूध पाजले
पाटावरच्या गादीवर निजविले
निज रे निज रे चिल्लारी बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले की नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्टया पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी
तसेच या गीतातून बाईने मुलाला जन्म देऊन त्याचे पालनपोषण कसे करायचे असते, बाईला संसारधर्म करायचा असतो, स्वैंपाकपाणी करायचे असते, घरातल्यांना जेवण वाढायचे असते असं बरंचसं नकळतपणे, आडवळणाने मुलींच्या मनांवर बिंबवंलं जातं.

अक्कण माती चिक्कण माती , खळगा जो खणावा
अस्सा खळगा सुरेख बाई, जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई, रवा-पिठी काढावी
अश्शी रवा-पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या
अशा करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा
अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं
अस्सं आजोळ गोड बाई, खेळायला मिळतं

या गाण्याला किती सुरेख लय आहे! दोन दिसांचं इलुसं गुळसाखरेचं माहेर उपभोगायला मिळालेलं असतं, तिथल्या आठवणी बाया या गीतात मांडतात, त्यामानाने सासर कसं परकं वाटतय ही खंत व्यक्त करतात.करंज्यांची पाकक्रुतीही गाण्यात गुंफली आहे.

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता बत्ता
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा दत्ता ॥१॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता वाटी
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चाटी ॥२॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होती भाकर
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा प्रभाकर ॥३॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता चेंडू
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा बंडू  ॥४॥

शिवशंकर आणि पार्वतीमाता जणू आपल्यातलेच एक आहेत असे मानत त्यांच्यावर हे गंमतगाणे गुंफले आहे.

कारल्याचा वेल लाव गं सुने ,लाव गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥

कार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥

कार्ल्याला फूल येउ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥

कार्ल्याला फळ येऊ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फळ आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥४॥

कार्ल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥५॥

कार्ल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥६॥

आपलं उष्टं काढ ग सुने काढ ग सुने
मग जा तू आपल्या माहेरा माहेरा
माझं उष्टं काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा

आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा ॥७॥

या गाण्यात सासुरवासणीला माहेराला जायचंय माहेरची आठव येतेय पण सासू द्वाड, कितीही विनवणी केली तरी काही नं काही निमित्त काढून तिला सारखंसारखं माहेरा जाऊ देत नाही. शेवटी एकदा सासू परवानगी देते आणि मग वेणीफणी करून राणी माहेराला निघते.

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे मंगळवार । देवीला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे बुधवार । बृहस्पतीला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे गुरुवार । दत्ताला नमस्कार।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शुक्रवार । अंबाबाईला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शनिवार । शनिला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार ?
आज आहे रविवार । सुर्याला नमस्कार ।

या गाण्यात ठराविक वार हे त्या त्या देवाच्या पुजेसाठी राखीव आहेत हे सांगितले आहे.

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासरा
सासर्‍याने काय आणलं ग बाई ?
सासर्‍यानं आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥१॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासू
सासूने काय आणलंय गं?
सासुने आणले गोट
गोट मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥२॥

या गीतात सासरला वैतागून माहेरी गेलेल्या महिलेची व्यथा दिसते. शेवटी सासरा,सासू, इतरजण काही काही प्रलोभने दाखवून तिला मनवायला येतात..

आड बाई आडोणी,
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली सुपारी,
आमचा भोंडला दुपारी ।।

आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली मासोळी
आमचा भोंडला संध्याकाळी ।।

आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली कात्री
आमचा भोंडला रात्री ।।

आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडला शिंपला
आमचा भोंडला संपला।।

या आड बाई आडोणी गीताने खेळाची सांगता होते.

या गीतांतून जीवनाचे विविध पैलू मुलींपुढे मांडले जातात. खेळ खेळताखेळता पुढे आयुष्यात त्यांना काय काय, कसं कसं करावं लागणार आहे याची तोंडओळख करून दिली जाते आणि नकळतपणे ती मुलींच्या मनात रुजते.
भोंडला किंवा हादगा याचे कृषी संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. महिलांच्या सुफलीकरणाचा विधी म्हणून याकडे पाहिले जाते

हल्ली मात्र चित्र बदलले आहे. मुलीही मुलांएवढेच, किंचीत जास्तही शिक्षण घेतात. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे दोघांनी अर्थार्जनासाठी घराबाहेर पडणे निकडीचे असते. बाई जशी बाहेरचीही कामं करू लागली आहे तसे पुरुषांच्याही मानसिकतेत बदल होऊन तेही स्वैंपाक करणं, घराची साफसफाई करणं यात हातभार लावू लागले आहेत.

तरीही पुर्वीच्या स्त्रियांचे जीवनमान जाणून घेण्यासाठी, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडे बाजूला एकत्र येण्यासाठी पर्जन्यराजाचे आभार माण्यासाठी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून भोंडला आताही मांडला जातो. पाटावर सम्रुद्धीचे, हस्त नक्षत्राचे प्रतिक असलेल्या हत्तीचे चित्र काढून, त्याची पूजा करून साळकाया माळकाया फेर धरतात, गाणी गातात, निसर्गोत्सव आनंदाने, एकोप्याने साजरा करतात.

समाप्त

======================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *