Skip to content Skip to sidebar Skip to footer

भेटीत तुष्टता मोठी (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

रीतभातमराठी_ लघुकथा_ स्पर्धा_ जाने_२२

©️®️ Rashmi Kaslikar

सुरेल सनईचे सूर, मेहंदीचा आणि गजऱ्यांचा दरवळणारा मंद सुगंध, मांडव, तोरण, दिव्या ची झगमगाट असं हे गोजिरवाणे नटलेले घर सांगत कि ‘लग्नासाठी सुसज्ज आहे म्हणून!’ राघवच्या घरी हि लगीनघाई सुरु होती. लाडक्या लेकीचं म्हणजे सायलीचे लग्न, मग काय कसलीच कमतरता नको. राघव सगळीकडं अगदी जातीने लक्ष घालत होता. लग्नासाठी वऱ्हाडी येणे सुरु झाले होते. सगळीकडे कशी लगबग होती. लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले होते.
दिवसभर वऱ्हाडयांचे स्वागत करून, त्यांची छान व्यवस्था करून दिवस कसा मावळला हे समजलेच नाही. दमून भागून रात्री तो बिछान्यावर पडला. मुलीचा बाप तो! त्याला कसली येतेय झोप. पडल्या पडल्या तो सगळ्या गोष्टींचा आढावा घेत होता. मनात उद्याच्या योजना आखत होता, पण मनाला एकच रुख रुख होती, ती म्हणजे त्याच्या बहिणींना तो मनाप्रमाणे आमंत्रित करू शकला नाही. ‘उद्या तरी सगळ्यांना फोन करून सांगावे लागेल’, त्याचे मन त्याला सारखे खात होते. मुलीच्या लग्नाला तरी सगळ्यांनी यावे अशी त्याची खूप इच्छा होती. पण इतक्या वेळेवर आमंत्रण दिल्यावर कोण येणार? नुसती जीवाची घालमेल होत होती. याच विचारात असताना त्याला कधी डोळा लागला ते कळलेच नाही.
राघवच्या लग्नानंतर, बायकोने घराचा ताबा घेतला आणि आपल्या कुटुंबाला सगळ्यांपासून जरा अलिप्तच ठेवले. सुरवातीपासूनच तिचे राघवच्या घरच्यांशी पटले नाही. त्याला पाच बहिणी आणि एक भाऊ असा भाला मोठा परिवार त्याच्या सोबत होता, पण तो सगळ्यांपासून बराच लांब गेला होता. संसाराच्या सुरवातीला बरेचदा त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण सगळे व्यर्थ! पुढे वादविवाद टाळावेत आणि लग्न टिकावे म्हणून तो देखील तिच्या विरोधात गेला नाही. सायली व आदित्यच्या जन्मानंतर तो आपसुकच संसारात रममाण झाला. परंतु वयाच्या या वळणावर आपले भावंडं हवेहवेसे वाटत होते. आपल्या मुलीला सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दयावे, सुख- दुःखाची देवाणघेवाण व्हावी किमान एकमेकांना बघता तरी यावे असे त्याला सारखे वाटत होते.
सकाळ झाली आणि राघवने ठरविल्याप्रमाणे एक एक करून सगळ्या बहिणींना फोन लावले. अर्थात तिकडून प्रतिसाद अपेक्षेप्रमाणेच येत होते-“इतक्या वेळेवर कोणी आमंत्रण देतं का?” आता मात्र राघव खूप निराश झाला. ताई ला फक्त फोन करायचा राहिला, पण ‘ती देखील हेच उत्तर देईल ! असो …करू थोड्यावेळाने’, असे म्हणून तो इतर कामात व्यस्त झाला.
राघवाची मोठी बहीण म्हणजे ताई तिचा मात्र राघव वर फार जीव. ती फक्त त्याच्या फोन ची आतुरतेने वाट बघत होती. ती सध्या तिच्या धाकट्या मुलाकडे आलेली होती. राघावला हे माहित नसल्याने तो तिच्या मोठ्या मुलाला फोन करेल हे ती जाणून होती म्हणून तिने तीन चार वेळा तिच्या मोठ्या मुलाला विचारले कि, “अरे, मामाचा काही फोन आला का रे? आला कि ताबोडतोब कळव बरं का ..” तिचा जीव सारखा कासावीस होत होता, मनात सारखे येत होते कि खरंच आपल्याला आमंत्रणाची गरज आहे का? आपण का असे इतके औपचारिक वागायचे, शेवटी लहान भाऊ आहे आपला. शिवाय राघव मितभाषी, तो स्वतःहून कधीही व्यक्त होणार नाही, अगदी लहानपानापासून असाच आहे. बायकोसमोर कधी काय बोलतो तो? ती म्हणेल ती पूर्व दिशा! हे सगळे आपल्याला माहिती असून देखील इतका काय विचार करायचा? इतर कोणी जाओ कि नको आपण जायलाच हवे, हक्काने. तो किती एकटा पडलाय त्याने त्याचे दुःख कधी आपल्यासमोर मांडले नाही. आम्हा सगळ्यांपासून दूर राहून एकट्याने सहन केले. त्याच्या या आनंदात मला सहभागी झालेच पाहिजे असा विचार करून ती बॅग भरते आणि मुलाला म्हणते मला उद्या सकाळी बस मध्ये बसवून दे बाबा !
राघव थोड्यावेळाने ताईच्या मोठ्या मुलाला फोन करतो, लगेच तो आईला कळवतो-“आई मामाचा फोन आला होता गं, पण बघ तुला जमेल तर जा. अगदी वेळेवर कळवलंय त्याने.
“बघते” असे म्हणून ती फोन ठेवते. त्याला काय माहिती ताईसाहेबांच्या मनाची तयारी केव्हाच झालीये ते!
दुसऱ्यादिवशी पहाटेची बस गाठते आणि लग्नाच्या आधी ताई तिथे पोहचते.
कार्यलयात सगळी कडे लगबग सुरु असते. राघव, कोणीही येणार नाही अशी धारणा करून आपली जबाबदारी चोख पार पाडत असतो.
त्याचवेळी आदित्यचा आवाज कानी येतो , “आत्या sss! कधी आलीस? ये ये! “असे म्हणून तिची बॅग घेतो व तिला प्रेमाने खुर्चीत बसवतो. हे ऐकताच राघव वळून बघतो तर काय -चक्क ताई समोर ! दोघेही एकमेकांकडे बघतात-दोघांनाही शब्दांची आवश्यकताच भासत नाही. आकस्मित भेटीचा आनंद तर अवर्णनीयच! दोघांचे भरलेले डोळे बरंच काही सांगत होते. “खूप आनंद झाला ताई, तू आलीस”, असे ओल्या आवाजात तो म्हणाला. त्याची कासावीस तिच्या मनाला चिरून गेली. या भेटीने जाणवले कि कधी कधी तासंतास बोलून देखील किंवा वारंवार भेटून देखील असा अनुभव येत नाही. भेटीत डोळेच आधी भेटतात आणि ते सांगून जातात आनंद, दुःख व अलिप्तपणाही आणि अश्या या भेटीला मोल नाही कदाचित म्हणूनच असे म्हणतात कि भेटीत तुष्टता मोठी! नातं मग ते कुठलेही असोत त्यातला मीपणा संपुष्टात आला तरच ते बहरतं.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.