Skip to content Skip to sidebar Skip to footer

भांडान

का गं गप बसायलीस?. चूल कोन पेटीवनार? तुजा बा? भुका लागल्याती. पोटात कावळे कावकाव करायल्याती कवापासना.

सांगा की तुमच्या मायला चूलीत आग घालाया.

मायला काहून? तुला कशापायी आणलीया? मायकडून कामं करुन घियाला? आगं जरा वयाचा इचार कर माह्या मायच्या.

व्हय तर वयाचा इचार करती. निसती कचाकचा भांडती तवा कुठं जातं तिचं शीकपन.

काय गं भवाने काय सांगायली माह्या पोराले? माह्याविरद्ध भडकवतीस व्हय?

माये, ती ठिक भडकवील पन मिया भडकीन काय? माह्या धेनात हायेत तू माह्यासाठी उपसलेलं कष्ट.

तर रं पोटचा पोर ना तू माहा. ही बया परक्याची. तवा वचावचा बोलिती. इतकी बोलिती इतकी बोलिती का वाटतं..वाटतं जीभ काढून हातात द्यावी..पन मंग तुझ्यापायी गप र्हावं लागतं.

व्हय तर सासूबाई, तू आनि गप रहाती..खरं बोल बाय. अर्धी लाकडं मसनात गेली तुझी. जरा देवाला तरी भी.

का भिऊ? मी म्हंती का भिऊ? काय त्या देवाचं पैकं उसनं घितलयत की काय मिया?

तुमची कर्म सासूबाई तुमची कर्म..सतरा येळा माह्या मायबापूला बोल लाविता. कायबी मनाला येल ते बोलिता.😭

उगा कायबी सांगू नगं.

मंग कोन सांगी व्हतं त्या कुंभाराच्या म्हातारीला की माहे मायबापू कंजूस हायती. मी सवताच्या कानानं आइकलं.

अगं ए भवाने..कंजूसच बोलले ना गं..शिव्या तर नै नं घातिल्या. लै मोठी आईबापावाली आली..जा माह्यराला ताँड घिऊन. माह्या पोराला नइन पोरगी बघिन मी.

मिया काय म्हनतो माय..गपा ना आता..दोघीबी गपा..मीच आणितो शेरातसून नइन बायको.

थोबाड बघितलैस का रं आरशात? दुसरं लगिन करायला निघायलाय. गौरीसारी सून हाये माझी. आणून तरी बघ सटवीला. नाय तंगडी तोडीली दोघांचीबी तर दुरुपदा नाव न्हाय लावायची मी.

अगं माय,आता तर तूच बोलीत व्हतीस न्हवं..नवी सूनबाई आणणार म्हून.

आरं रताळ्या, त्ये आमचं सासूसुनेचं भांडान..खरं आसतं थोडीच. ये गं माजी बाय ती.

सासूबाssई(म्हनत सून सासूच्या गळ्यात पडीते गडी टोपी काढून टकूरं खाजवीत र्हातो.).

–गीता गरुड.

===========

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: