भक्ती

©®सौ मधुर कुलकर्णी..पुणे
भक्तीला आज उठायला जरा उशीरच झाला. सकाळी अलार्म बंद केला आणि परत तिचा डोळा लागला.त्यामुळे रोजचं वेळेचं गणित चुकलं.तिने स्वतःच सगळं पटपट आवरल. सुधाताईंसाठी स्वयंपाकाचं काय काय करायचं ते टेबल वर लिहून ठेवलं. आज सुधाताई पण नेमक्या उशिरा येणार होत्या. तिने गाडीची,घराच्या लॅच ची किल्ली घेतली आणि आप्पांच्या खोलीकडे वळली.”आप्पा,मी निघतेय.सुधाताईंसाठी टेबल वर चिठ्ठी ठेवली आहे.आज जरा उशीरच झालाय मला, म्हणून तुमचा सांजा केला नाही,आजच्या दिवस राजगिरा लाही दुधात कालवून घ्या.पूजेची तयारी करणं पण जमलं नाही मला,फुलं फक्त परडीत ठेवलीय.आणि हो,सगळ्यात महत्वाचं, दाराला आतून कडी लावू नका,लॅच लावा,मी किल्ली घेतलीय.येते मी” भक्ती धावतच दाराकडे वळली.
भक्ती ही आप्पांची सून,शिशिर ची पत्नी.आप्पा आणि शालिनीताईंना दोन मुलं..शिशिर आणि रावी. रावी लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली.शालिनीताई कालच मुंबईला त्यांच्या मावस भावाकडे गेल्या होत्या,सगळी भावंड खूप वर्षांनी एकत्र जमणार होती.शिशिर ची नोकरी शीप वरची त्यामुळे घरात सध्या आप्पा आणि भक्ती.
शिशिर प्रथम भक्तीला घरी घेऊन आला होता तेव्हा भक्ती टीशर्ट, जीन्स मधेच होती,आधुनिक राहणीमान. आप्पांना काही ते रुचलं नाही.पहिल्यांदा सासरी चाललोय तर साडी घालावी ही त्यांची अपेक्षा.भक्तीचं बोलणंही अगदी मोकळं,कुठेही संकोच नव्हता,जणू काही आधी खूपदा भेटलीय.आप्पांच्या जुन्या मतांच्या सगळं विरुद्ध. शालिनीताई म्हणल्या,”अहो,गोड, लाघवी पोर आहे,बाह्यरूपावर जाऊ नका.”शेवटी आप्पांनी पडतं घेतलं आणि लग्नाला होकार दिला.
भक्ती खरं तर फिजिओथेरपिस्ट होती.पण शिशिर ची नोकरी शीपवरची, दोन महिने पुण्यात,दोन महिने शीप वर.लग्नानंतर त्याने भक्तीला सांगितले,”आपल्याला पैशाची कमी नाही पण तुझं शिक्षण वाया जाऊ नये म्हणून तू हवं तर पार्ट टाईम जॉब कर. आई,आप्पांची काळजी घे कारण दोन महिने मी इथे नसतो.” भक्तीनेही ते आनंदाने स्वीकारलं. दोन तास ती एका वृद्धाश्रमात जाऊन फिजिओथेरपी देत असे.पण हे काम ती विनामूल्य करत होती,एक समाजसेवा म्हणून.
आप्पांच्या मनात नेहमीचेच विचार घोळू लागलेत.हिच्या आईवडिलांनी हिचं नाव भक्ती कसं काय ठेवलं?नास्तिक नसली तरी फक्त देवाला नमस्कार करायची.माझी वृद्धाश्रमातली सेवा हाच माझा देव आहे म्हणायची.कुठलेही उपास तापास तिने कधीही केले नाहीत.आप्पांना ते पटत नव्हतं पण घरात वाद नकोत म्हणून ते बोलत नसत.
दारावरची बेल वाजली म्हणून आप्पा उठले.सुधाताई आल्या होत्या. त्यांनाच सांजा करायला सांगून ते स्नान करायला गेले.स्नान करून आल्यावर आज आप्पांना फार थकल्यासारखं वाटलं.देवाची स्तोत्र म्हणत ते पूजेची तयारी करू लागले.देव्हाऱ्यात देवही बरेच असल्यामुळे पूजेलाही निदान अर्धा तास तरी लागायचा.सुधाताई स्वयंपाक करून लॅच ओढून गेल्यात. आप्पांची आरती झाली आणि त्यांना दरदरून घाम फुटला, अस्वस्थ वाटायला लागलं. कसंबसं त्यांनी आवरलं आणि पाटावरून उठताच ते कोसळले.
भक्तीला आज विशेष काम नव्हतं,वृद्धाश्रमात गाण्याचा कार्यक्रम होता त्यामुळे बरीच मंडळी हॉलमधे होती.संयोजकांना सांगून ती घरी निघाली.पार्किंग मधे गाडी पार्क करून,पर्समधून तिने लॅच ची किल्ली काढली.दार उघडत ती म्हणली,”आप्पा,मी आलेय”. किल्ली जागेवर ठेऊन ती आत आली आणि आप्पांना खाली कोसळलेल्या अवस्थेत बघून ती घाबरली.तिला एकटीला आप्पांना उचलता येईना.शेजारच्या मिहीर ला तिने हाक दिली.दोघांनी मिळून आप्पांना कॉटवर ठेवले.फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे तिने भराभर फर्स्टएड केलं आणि डॉ देशपांड्यांना फोन लावला.डॉ देशपांड्यांनी आप्पांना तपासलं, शुगर अचानक वाढली होती आप्पांची,त्यांनी इंजेक्शन दिलं आणि काही औषध लिहून दिलीत.भक्ती अजूनही घाबरलेलीच होती.डॉ नी तिच्या पाठीवर थोपटलं आणि तिला धीर दिला,”डोन्ट वरी, दोन तीन तासात बरं वाटेल त्यांना,काही वाटलं तर मला फोन कर”.भक्तीने त्यांचे आभार मानले.तिने मिहीरला औषध आणायला सांगितली.
भक्ती आप्पांजवळ आली,त्यांच्या कपाळावरून हात फिरवला आणि नकळत तिचे डोळे भरून आलेत.ती आप्पांजवळच खुर्ची घेऊन वाचत बसली.तिला आप्पांच्या कण्हण्याचा आवाज आला.ती हळूच उठून त्यांचे पाय चेपू लागली.जरा वेळाने आप्पांना जाग आली तर भक्ती पाय चेपताना दिसली.त्यांनी अस्फुट हाक मारली,”भक्ती.”
भक्ती ताबडतोब उठली,त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणली,”आप्पा,किती घाबरले मी,आता थोडे दिवस तुम्ही फक्त आराम करायचा.तुमच्या देवांची पूजा सुद्धा मीच करेन,अगदी साग्रसंगीत,तुम्ही करता तशी”आप्पा मनापासून हसलेत.इतक्यात मोबाईल वाजला,शालिनीताईंचा फोन होता,”भक्ती,कसे आहात ग?ह्यांची तब्येत ठीक आहे ना?” “अहो आई,आम्ही दोघेही मजेत आहोत,तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. आम्ही दोघांनी आता मस्त पत्त्याचा डाव टाकलाय, रमी खेळतोय.तुम्ही मनसोक्त एन्जॉय करून या.”
आप्पांनी भक्तीकडे बघितलं,आज प्रथमच त्यांना तिच्या चेहऱ्यावरचे निर्मळ भाव दिसलेत,तिची नात्यांवरची श्रद्धा दिसली आणि आपण ह्या मुलीवर नास्तिक म्हणून नाराज होतो. “आप्पा कसला विचार करताय?मी आता तुम्हाला आवडतो तसा आलं घालून चहा आणते आणि आज तुमची आवडती जुनी गाणी ऐकू.”
स्वयंपाक घराकडे वळलेल्या भक्तीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना आप्पांचे डोळे काठोकाठ भरले आणि तिचं नाव किती सार्थ आहे हे जाणवलं.
माणसातल्या देवावर तिची भक्ती होती….
—-x—-
©®सौ मधुर कुलकर्णी..पुणे
====================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============