उन्हाळ्यात फिरायला कुठे जाल ? Best places to visit in Maharashtra in summer

Best places to visit in Maharashtra in summer : उन्हाळा म्हटलं की खूप उष्णता, घाम, गरमी, वारंवार लागणारी तहान आणि कडाक्याचे ऊन. मग यातून सुटका मिळण्यासाठी आहारात, वागण्यात अनेक बदल करावे लागतात आणि उन्हाळा कसा सुसह्य होईल याची काळजी घेतली जाते. आजकाल बदलते हवामान आणि वातावरणातील अवकाळी बदल सगळ्यांसाठीच खूप त्रासदायक होत आहेत. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक झाले आहे.
पण याच उन्हाळ्यात गरमीचा त्रास कमी करण्यासाठी आपण एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी गेलो तर ?? जी जागा आपल्याला जवळ आहे, जाण्या येण्यास सोईस्कर आहे, सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे निसर्गाचे अद्भुत वरदान लाभलेल्या आहेत. कोणाला आवडणार नाही अशा ठिकाणी जाऊन निसर्गाच्या कुशीत शिरायला ??
आपले महाराष्ट्र राज्य अशा थंड हवेच्या ठिकानांचे माहेरघर आहे. आपल्या महाराष्ट्राला अशा अद्भुत ठिकाणांचे भरभरून वरदान लाभलेले आहे. घनदाट जंगले ही निसर्गाचा श्वास आहेत आणि हा निसर्ग आपला श्वास आहे. निसर्ग नीट असेल तर आणि तरच आपले मानवी जीवन नीट राहू शकते, ऋतुमान कालचक्र व्यवस्थित राहू शकते आणि पर्यायाने आपले जीवन सुरळीत चालू शकते. देवाने ही निसर्गाची देणगी आपल्याला दिली आहे तर ते सौंदर्य अनुभवण्यासारखी दुसरी सुंदर गोष्ट असूच शकत नाही.
Best places to visit in Maharashtra in summer
१. महाबळेश्वर
१.१ महाबळेश्वर ची माहिती
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण प्रेक्षणीय स्थळ आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटाच्या रांगेत सहलीसाठी जाता येईल असे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन अशी ओळख असलेले आणि नगरपालिका असलेले तालुक्याचे शहर म्हणून हे ओळखले जाते. भारतातील हिरवळीने सजलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी हे एक आहे. ब्रिटिश राजवटीत मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी म्हणजे महाबळेश्वर. याच ब्रिटिश काळात लाभलेला उत्कृष्ट गिरिस्थान हे याचे लौकिक आजही तसेच कायम आहे.
१.२ महाबळेश्वर चे महत्त्व
महाबळेश्वर येथील महादेवाचे महाबळेश्वर मंदिर हे या ठिकाणचे मुख्य आकर्षण आहे. हे मंदिर यादव राजा सिंघन देव यांनी तेराव्या शतकात बांधले. महाबळेश्वर येथील हे मंदिर, जावळीचे खोरे आणि प्रतापगड यांना शिवरायांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. कारण शिवरायांनी अफजलखानाच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस या मंदिराला अर्पण केले होते. तसेच हे देवस्थान जागृत असल्याने शिवराय नेहमी इथे दर्शनासाठी येत असत. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणाला घनदाट जंगल आहे. त्यामुळेच याचे निसर्ग सौंदर्य पाहण्याजोगे आहे.
या मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गोवित्री या पाच नद्या उगम पावतात. यातील सावित्री ही नदी पश्चिम वहिनी तर बाकी चार नद्या पूर्व वहिनी आहेत. तसेच इथे पंचगंगा हे देऊळ पण आहे. वेण्णा नदीपासून वाहत असलेला तलाव हे अजून आकर्षणाचे ठिकाण आहे.
जवळच वाघाचे पाणी नावाचा जलाशय आहे, येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे. उंच डोंगर रंगामुळे पावसाचे प्रमाण इथे जास्त असल्यामुळे हा परिसर जलमय असतो. येथील निसर्ग सौंदर्य अलौकिक असल्याने पर्यटकांची गर्दी नेहमी असते.
स्ट्रॉबेरी, रासबेरी, जांभूळ मध, लाल मुळे आणि गाजरे यासाठी महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. येथे गुलकंद मोठ्या प्रमाणात मिळतो तसेच इथे मिळणारा मध हा खूप चविष्ट आणि प्रसिद्ध आहे.
१.३ महाबळेश्वर येथील प्रेक्षणीय स्थळे
महाबळेश्वर पासून सात किमी अंतरावर अनेक ठिकाणे आहेत. प्राचीन पाच मंदिरे आहेत जी पूर्वीच्या काळातील भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवतात. याशिवाय येथील बाजारपेठ, पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर, मंकी पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, वेण्णा लेक, केट्स पॉइंट, निडल होल पॉइंट, विल्सन पॉईंट, प्रतापगड, लिंगमळा धबधबा आणि लोडविक पॉइंट हे प्रसिद्ध डोंगराकडे म्हणजेच पर्यटक स्थळे आहेत.
१.४ महाबळेश्वर ला कसे जाल ?
बस : पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर येथून महाराष्ट्र शासनाच्या बस, खाजगी बस तसेच वहाने उपलब्ध आहेत. सातारा पासून ४५ किमी अंतरावर महाबळेश्वर आहे.
रेल्वे : रेल्वेने जाण्यासाठी सातारा रेल्वे स्टेशन सगळ्यात जवळचे आहे. पुणे, मुंबई वरून रेल्वे उपलब्ध आहेत.
विमान : पुणे आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ १८० आणि २०० किमी अंतरावर आहे.
१.५ महाबळेश्वर ला कधी जावे ?
हिवाळ्यात इथे खूप जास्त प्रमाणात थंडी असते तर पावसाळ्यात हा परिसर जलमय असतो. त्यामुळे उन्हाळ्यात जाणे योग्य ठरेल.

२. पाचगणी
२.१ पाचगणी ची माहिती
सातारा जिल्ह्यात असलेले महाबळेश्वर पासून अगदी १८-२० किमी अंतरावर असलेले अजून एक पर्यटन ठिकाण म्हणजे पाचगणी. निसर्गाने नटलेले, पब्लिक शाळांसाठी प्रसिध्द असलेले हे थंड हवेचे ठिकाण आहे. जुन्या काळात पारशी लोकांनी बांधलेले बंगले हे आजही आकर्षित केल्याशिवाय रहात नाहीत. निसर्गप्रेमी लोकांनी अवश्य भेट द्यावी असे ठिकाण आहे पाचगणी.
असे म्हणतात की ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वाला रस बाहेर पडला आणि डोंगर तयार झाले. याच पाच डोंगरांच्या समूहावर हे ठिकाण वसलेले असल्याने याचे नाव पाचगणी पडले असावे. डोंगरावर असल्याने उत्तम हवामान आणि निसर्गाचे देणे हे येथील खास आकर्षण आणि वैशिष्ट्य आहेत.
२. २ पाचगणी येथील प्रेक्षणीय स्थळे
खोल दऱ्या, धबधबे, कमळगड, टेबल लेंड, किडिज पार्क आणि गुफा ही येथील प्रसिद्ध आणि पहण्यासरखी ठिकाणे आहेत. येथील टेबल लेंड वर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
२.३ पाचगणी ला कधी जावे ?
हे ठिकाण डोंगरावर असल्याने इथेही पावसाळ्यात खूप पाणी आणि थंडीत थंड वातावरण असते. त्यामुळे उन्हाळ्यात जाणेच योग्य ठरेल.
२.४ पाचगणी ला कसे जाल ?
बस : पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर पासून बस उपलब्ध आहेत.
रेल्वे : सातारा रेल्वे स्टेशन सगळ्यात जवळ असून पाचगणी सातारा रेल्वे स्टेशन पासून ५२ किमी अंतरावर आहे.
विमान : पुणे स्टेशन सगळ्यात जवळ असून हे अंतर ११० किमी तर मुंबई पासून २४८ किमी अंतरावर आहे.

३. माथेरान
३.१ माथेरान ची माहिती
माथेरान हे रायगड जिल्ह्यात वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. हे ८०३ मीटर किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर वसलेले आहे. याच्या भोवती चारही बाजूंनी घनदाट झाडी आणि लाल पायवाटा आहेत. याच्याभोवती असलेली पठाराची टोके आणि पूर्व पश्चिम तसेच दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत त्यांनाच येथील प्रेक्षणीय ठिकाणे म्हटले आहे.
३.२ माथेरान चे महत्त्व
माथेरान हे शहर इंग्रजांनी वसवले असल्याने तेथील ठिकाणांची नावे ही त्यांनीच दिली आहेत. माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा वेगळी अशी डोंगर रांग आहे. कल्याणच्या मलंग गडपासुन ही रांग सुरू होते. या गडाला लागून बदलापूर डोंगर आहे. माथेरान हे मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सगळ्यात जवळची आणि निसर्गाने नटलेला जागा आहे.
३.३ माथेरान येथील प्रेक्षणीय स्थळे
शर्लोट लेक, पॅनोरमा पॉइंट, सनसेट पॉईंट किंवा पोरक्युसं पॉइंट, लुईझा पॉइंट, इको पॉइंट, चौक पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, गर्बट पॉइंट, दस्तुरी किंवा माउंट बेरी पॉइंट आणि रामबाग अशी बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
३.४ माथेरान ला कसे जाल ?
येथे जाण्यासाठी बरेच मार्ग आहेत.
पेब आणि माथेरानच्या सर्वोत्तम अशा पॅनोरमा पॉइंट मधून रेल्वे जाते. ही रेल्वे मुंबई पुणे मार्गे आहे.
लिटिल पॉइंट खालून जी वाट येते ती.
नेरळवरून डांबरी रस्ता आहे ती वाट माथेरान मध्ये जाते.
कर्जत दिशेने गर्बेट पॉइंट वरून निघणारी वाट माथेरान मध्ये जाते.
हेही वाचा
श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर Trimbakeshwar Jyotirling mandir in Marathi
सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्याला शिक्षणाचे माहेरघर असे का म्हणतात?
४. लवासा
४.१ लवासा ची माहिती
पुण्यापासून फक्त ६० किमी अंतरावर वेस्टर्न घाटात असलेला भारताचा पहिले प्लॅन हिल स्टेशन म्हणजे लवासा. ज्याचे रचना, दिखावा आणि डिझाईन हे इटालियन शहराशी प्रेरित होऊन तयार केले आहे. ते शहर आहे पोर्तोफिनो. त्यामुळेच या शहराच्या अनेक रस्त्यांना आणि इमारतींना पोर्तो फीनो ची नावे दिलेली आहेत.
हे मुंबई पासून १८७ किमी अंतरावर आहे. हे हिल स्टेशन खूप सुंदर आणि सगळ्या सोयी सुविधानी उपलब्ध असल्याने पर्यटकांची कायमच गर्दी असते. याच्या चारही बाजूंनी छान हिरवळ आणि निसर्गरम्य परिसर त्याच्या मध्ये तेमघरधरण आणि वरसगाव तलाव यामुळे याच्या सुंदरतेमध्ये भरच पडली आहे. ज्यांना निसर्ग आवडतो आणि या वातावरणात काही धाडसी कामे करायला आवडतात अशा लोकांनी एकवेळ अवश्य भेट द्यायलाच हवी.
४.२ लवासा चे महत्त्व
इथे ट्रेकिंग, माउंट नियारींग, केफिंग आणि तलावत पाण्याचे खेळ खेळण्याची मजा काही वेगळीच आहे. बाराही महिने इथले वातावरण थंड आणि सुखावणारे असते त्यामुळे कधीही आपण इथे जाऊ शकतो. त्याशिवाय शहरी धावपळ पासून दूर राहण्यासाठी तसेच जे लोक आयुर्वेद प्रिय आहेत अशा लोकांना आयुर्वेदिक सेंटर स्पा आणि मसाज यांचा सुखद अनुभव घेता येईल अशी सोय आहे. समुद्र तळापासून २००० फूट उंचीवर हे शहर आहे. नेहमीच थंड वातावरण आणि सुंदर निसर्ग यामुळे हा परिसर बघण्यासारखा आहे.
४.३ लवासा ला कधी जावे ?
हिवाळ्यात आणि पावसाळ्यात इथे जाणे योग्य आहे.
५. चिखलदरा
५.१ चिखलदरा ची माहिती
चिखलदरा हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. हे शहर सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची ३५६४ फूट आहे. यामुळेच इथली हवा ही थंड आणि आरोग्यास उत्तम असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगेतील मेळघाट रांगेत चिखलदरा येते.असे म्हणतात की पांडवांनी वनवासचा काही काळ इथे घालवला होता. इथेच विराट नगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याला भीमाने मारून जवळच्या नदीत फेकून दिले होते.
ही दरी किचकदरा पण पुढे याचा अपभ्रंश होत याचे नाव चिखलदरा पडले. याला विदर्भाचे नंदनवन असे म्हणतात. चारही बाजूने पर्वत रांगा आणि दाट हिरवळ यामुळे येथील वातावरण आनंद आणि मान शांती देणारे असते. त्यामुळेच पर्यटकांची गर्दी कायमच असते. इथे वाघ, मोर, रांकोंबडा, अस्वले असे प्राणी आढलतात. कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते कारण कॉफी साठी लागणारे ७० ते ८० फरणहाईट तापमान इथे असते.
५.२ चिखलदरा येथील प्रेक्षणीय स्थळे
इको पॉइंट, देवी पॉइंट, नर्सरी गार्डन, प्रॉस्पे ट पॉइंट, बेलाविस्ता पॉइंट, बेलेन ताईन , भिमकुंड, मंकी पॉइंट, लॉग लेन, विराट देवी आणि हरिकेन पॉइंट, धबधबा, मोझरी व हरिकेत पॉइंट, वानोद्यान, बहामनी किल्ला अशी बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
५.३ चिखलदरा कधी जावे ?
उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात या ठिकाणी अवश्य भेट द्यावी.
५.४ चिखलदरा कसे जाल ?
रेल्वे : पुणे नागपूर रेल्वे मार्गावर बडनेरा स्टेशन पासून बस किंवा खाजगी वाहने मिळतात. हे अंतर १०० किमी आहे.
बस : नागपूर आणि अमरावती येथून बस किंवा खाजगी वहाने उपलब्ध आहेत. नागपूर अमरावती हे अंतर १५४ किमी, अकोला चिखलदरा १०० किमी तर पुणे चिखलदरा ५५० किमी आहे.
विमान : नागपूर विमानतळ त्यासाठी योग्य आहे. हे अंतर २३० किमी आहे.
६. भीमा शंकर
६.१ भीमा शंकर ची माहिती
पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात वसलेले भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंग पैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंग मधून पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची अशी भीमा नदी उगम पावते म्हणून ओळखले याचे नाव भीमाशंकर पडले आहे. हे ठिकाण सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असून घनदाट जंगलाने वेढलेला आहे त्यामुळेच एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
हा भाग जंगलाने व्यापलेला असल्याने रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रान ससा, उदमांजर, बिबट्या असे अनेक प्राणी आणि पक्षी इथे पाहायला मिळतात. आपल्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी शेकरू फक्त इथेच पाहायला मिळतो. शेकरू म्हणजे तांबूस रंगाची उडणारी खार. गर्द झाडी, जंगल आणि उंच डोंगराच्या कुशीत वसलेले सुंदर ठिकाण आहे भीमा शंकर.
६.२ भीमा शंकर चे महत्त्व
शंकराचे हे मंदिर १२०० ते १४०० वर्षे जुने आहे. या मंदिराची रचना हेमाडपंथी असून मंदिराच्या छतावर आणि खांबावर सुरेख नक्षीकाम केलेले आहे. मंदिरावर दशवतराच्या कोरलेल्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या सभामंडपाबाहेर जी घंटी आहे ती चिमाजी अप्पांनी भेट दिली असल्याचे सांगण्यात येते. या घंटीचे वजन पाच मन इतके आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजाराम महाराज दर्शनासाठी येत असत.
तसेच पेशवे बाळाजी विश्वनाथ येऊन गेल्याचे नोंदी पण आहेत. हे ठिकाण पुण्या पासून १२७ किमी अंतरावर आहे. येथे शिवरात्र, श्रावण सोमवार दिवशी भाविक मोठ्या संख्येने येतात. ज्या भागात तेथील रहिवासी पिढ्यान् पिढ्या अध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन जपतात आणि राहतात अशा भागाला देवराई म्हणतात. भीमा शंकर मध्ये अशा १४ देवराई आहेत. त्यातील आहुपे नावाची देवराई १००० वर्षे जुनी आहे.
६.३ भीमा शंकर येथील प्रेक्षणीय स्थळे
गुप्त भीमाशंकर ( जिथे भीमा नदी ज्योतिर्लिंग मध्ये उगम पावून गुप्त होते आणि मंदिरा पासून जंगलात १.५ किमी अंतरावर पूर्वेला प्रकट होते ), कोकण कडा, सीताराम बाबा आश्रम, नागफणी.
६.४ भीमा शंकर ला कसे जाल ?
रेल्वे : यासाठी पुणे रेल्वे स्टेशन सगळ्यात जवळ आहे. हे अंतर १२५ किमी आहे.
बस : पुण्याहून दर अर्ध्या तासाला बस मिळतात. तसेच टॅक्सी, कार, खाजगी वहाने आहे.
तर ही सुंदर आणि निसर्गाने नटलेली ठिकाणे अवश्य बघा, निसर्गाचा आनंद लुटा आणि उन्हाळा मजेशीर घालवा.
===============