
वरुणचा मेसेज पाहून रेवती गोंधळातच पडली. तिने लागलीच शालूला फोन केला. शालूलाही माहीतच होतं कि आज वरुण धाडस करून रेवतीला आपल्या भावना सांगणार म्हणून. पण शालूने परिस्थिती व्यवस्थित हाताळली आणि रेवतीला जाणीव करून दिली कि वरुण खूप चांगला आणि घरंदाज मुलगा आहे. आणि मूळचा श्रीमंत असूनदेखील त्याची शिक्षणाकडे असलेली ओढ हेच सिद्ध करत होते कि पैसा कितीही असला तरी स्वतः पायावर उभे राहणे महत्वाचे असते.
रेवतीला थोडीफार जाणीव झाली पण कुठलाही टोकाचा निर्णय घेण्याआधी तिला वरुणचा स्वभाव जाणून घायचा होता. पण साहजिकच आहे तिच्याही मनात वरुणबद्दल एक आपुलकी निर्माण झाली होती आणि तिला असं झालं होतं कि सोमवारी निळ्या शर्ट मध्ये असणाऱ्या वरुणला ती कधी पाहते.
अखेरीस सोमवार उजाडला. आज रेवतीची फ्लाईट होती. आज ती एका अनोळखी व्यक्तीला पाहणार होती जो तिच्यावर प्रेम करायला लागला होता. रेवतीने तिच्या भावनांवर नियंत्रण होतं कारण तिला कुणावरही विश्वास ठेवून भावनेच्या आहारी जायचं नव्हतं. पण हो हि भावना कुणाच्याही मनात येणं साहजिकच आहे कि आपण कुणालातरी आवडतो आहे आणि मग आपण साहजिकच आरश्यासमोर स्वतःला न्याहाळल्याशिवाय राहत नाही. रेवतीही ह्या गोष्टीला अपवाद नव्हती.
कोण असेल हा वरुण? कसा दिसत असेन आणि फ्लाईटमध्ये तो आपल्याला दिसल्यावर आपली रिऍक्शन काय असेल असे सगळे प्रश्न तिच्यासमोर उभे राहिले होते आणि हे प्रश्न स्वतःला विचारता विचारता ती स्वतःला आरशात सारखं चाचपत होती जणू काही तिलाही वरुण समोर परफेक्ट दिसायचं होतं. रेवती मस्तपैकी तैयार होऊन निघाली. तिच्या फ्लाईटची वेळ झाली होती. आज ती थोडी अपसेटच होती. केव्हापासून तिला छातीत धडधडायला झालं होतं. फ्लाईटचं बोर्डिंग चालू झालं होतं. रेवती फ्लाईटच्या दरवाजातच उभी राहून आलेल्या प्रवाशांचं स्वागत करत होती. पण आज तिची नजर त्या निळ्या शर्ट घातलेल्या वरुणलाच शोधत होती. एक एक करून सर्व प्रवासी फ्लाईट मध्ये आले पण निळ्या शर्टातला वरुण तिला दिसलाच नाही. खरंतर वरुण फ्लाईट मध्ये आला होता पण त्याने मुद्दाम निळ्या रंगाचा शर्ट न घालता पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. वरुण त्या पांढऱ्या शर्ट मध्ये खूपच उठून दिसत होता. प्रवाशांचं स्वागत करता करता रेवतीने वरुणला पाहिलं सुद्धा कारण तो इतका देखणा दिसत होता कि कुणाचीही नजर त्याच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही.
सगळे प्रवासी आले आणि थोड्याच वेळात वैमानिकाने टेकऑफची घोषणा केली. आता रेवतीची घालमेल चालू झाली होती. कदाचित स्वागत करत असताना वरुण तिच्या नजरेतून सुटला असेल म्हणून तिने फ्लाईटमध्ये लांबपर्यंत नजर फिरवली पण तिला निळ्या रंगाच्या शर्ट मध्ये कुणीच दिसलं नाही.
वरुण रेवतीची होणारी घालमेल बघत होता आणि मनातल्या मनात हसत होता कि आपल्या एका मेसेजने खरंच रेवतीच्या मनात एक बिंब उमटलं होतं. २ तासांच्या फ्लाईट मध्ये रेवती बऱ्याचदा वरुण जवळ आली होती पण तिने त्याला फक्त एक प्रवासी समजून आपली परिपूर्ण सेवा दिली होती. संपूर्णवेळ तिच्या मनात एकाच प्रश्नाने काहूर केलं होतं कि वरुण का नसेल आला. रेवती तिच्या प्रश्नामध्ये एवढी मग्न होती कि तिने वरुणचं नाव प्रवाश्यांच्या यादी मध्येही तपासायची तसदी घेतली नव्हती कारण तिची नजर त्या निळ्या शर्टमधल्या व्यक्तीलाच शोधत होती.
आज मुंबई ते दिल्ली चे ते २ तास वरुणचे तर फार मस्त गेले होते पण रेवतीसाठी मात्र आज पहिल्यांदा हा प्रवास फार जड झाला होता. तिला कधी एकदाची फ्लाईट लॅन्ड होते असं झालं होतं. शेवटी फ्लाईट लॅन्ड झाली. रेवती एअरपोर्ट वर असेलेल्या हॉटेलवर विश्रांतीसाठी गेली. ती आपल्या रूम वर पोहोचली आणि रूम उघडताच तिला आश्चर्यचा धक्काच बसला. तिची संपूर्ण रूम गुलाबाच्या फुलांनी सजवलेली होती. सगळीकडे इत्तराचा सुगंध दरवळत होता. समोर एक कॅसेट रेकॉर्डर ठेवला होता. रेवतीने ते ऑन केलं तर त्यात एका व्यक्तीचा आवाज रेकॉर्ड केला होता….
“हाय रेवती, कशी आहेस?”
“मला माहीत आहे आज तू खूप अपसेट आहेस आणि तेही माझ्यामुळे….तू पूर्णवेळ मलाच शोधत होतीस आणि तुझी हि घालमेल मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघत होतो. “
“बऱ्याचदा असं वाटलं कि बस्स आता तुला फ्लाईट मधेच सगळं सांगावं आणि तुला एक घट्ट मिठी मारावी पण दुसऱ्या क्षणी स्वतःला आवरलं कारण हे सरप्राईझ तुला कसं देता आलं असतं मग…”
“बरं आता तू म्हणशील कि मी फ्लाईट मध्ये कुठे होतो…तर तुझ्या माहितीसाठी सांगतो कि मी तुझ्या सोबतच होतो संपूर्णवेळ आणि एक सेकंदसुध्दा मी तुला माझ्या नजरेआड नाही होऊ दिलं.”
“तुला माझ्यामुळे त्रास झाला त्याबद्दल खरंच क्षमस्व आहे मी तुझा”
कॅसेट संपताच रेवतीच्या रूमच्या दरवाजातून कुणीतरी “” म्हणालं.
रेवतीने मागे वळून पाहिलं तर दरवाजात वरुण गुलाबांच्या फुलांचा भला मोठा गुच्छ घेऊन आपल्या गुडघ्यांवर टेकला होता.
पुढे वरुणला पाहून रेवतीची काय रिऍक्शन होते….रेवती वरुणला स्वीकारेन का….हे वाचण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा.
===================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा
Post navigation

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.