
सुभाषराव मोठ्या लगबगीने घराचा उंबरठा ओलांडतात आणि सुषमाताईंना आनंदाने म्हणतात….
सुभाषराव – अगं सुषमा ऐकलंस का गं…?
सुषमाताई – काय झालं…असं एकदम हर्षवायू होऊन ओरडायला…?
सुभाषराव – अगं हर्षवायू होऊन ओरडू नको तर काय करू…बातमीच तशी आहे…
सुषमाताई – कसली बातमी…जरा मलाही कळू देत…
सुभाषराव – अगं तुला आपला नंद्या माहिती आहे का…
सुषमाताई – कोण नंद्या….
सुभाषराव – अगं…नंदकुमार शिंदे…सध्या बॅंगलोरला असतो…तो बँगलोरला असतो पण त्याचा मुलगा शिरीष सध्या पुण्यात असतो नोकरीनिमित्ताने…चांगला इंजिनिअर आहे तो…
सुषमाताई – अग्गोबाई…चांगला मोठा झाला कि शिरीष…लहानपणी पाहिलं होत त्याला…!
सुभाषराव – अगं आपल्या राधिकाला अगदी साजेसा असा आहे…म्हणूनच मी पण लगेच राधिकाच्या लग्नाबद्दल नंद्याला बोलून टाकलं…
सुषमाताई – काय…? लगेच कसं काय बोलून टाकलं तुम्ही…घरी घेऊन यायचं मग बोललो असतो रीतसर…
सुभाषराव – अगं एवढा कसला विचार करतेस लहानपणीपासूनचा मित्र आहे माझा मी काय त्याला एकदम थेट नाही बोललो…पहिलं सांगितलं मी कि आपणही राधिकासाठी चांगली-चांगली स्थळं पाहतोय…मग त्यानेच एकदम विचारलं आपल्या राधिकासाठी…त्याचाच मुलगा शिरीष…!
सुषमाताई – अच्छा असं झालं तर…मग काही हरकत नाही तसंही योग्य वयात आणि वेळेत सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे…!
सुभाषराव – हो ना…चांगला इंजिनिअर जावई मिळतोय मला…तेही सरकारी नोकरी असलेला….
तेवढ्यात सुभाषरावांचा फोन खणाणतो….फोन पाहताच सुषमाताईंना इशाऱ्याने सांगतात की नंदकुमार चा फोन आहे म्हणून….दोघेही बोलू लागतात…
सुभाषराव – अरे बोल ना नंद्या…ओह्ह्ह….सॉरी…सॉरी…नंदकुमारराव…
नंदकुमारराव – अरे सुभाष….एवढं कसली फॉर्मालिटी…म्हण की लेका नंद्या…
सुभाषराव – काही नाही रे असच आता तुमच्याशी आम्ही वाकून बोललो पाहिजे…
नंदकुमारराव – मस्करी करू नकोस हा…आपलं नातं अधिसारखाच मैत्रीचं राहील पाहिजे म्हणून तू मला नेहमीसारखाच अरे कारे करून बोल….असं अहो जाहो नको करुस यार…
सुभाषराव – बरं….कसा काय फोन केलास…
नंदकुमाराव – काही नाही रे…आपला शिरीष आहे ना राधिकाला भेटायचं म्हणतोय म्हणजे आमची तशी इच्छा आहे….म्हणजे कसं मनमोकळं बोलता येईल दोघांनाही…तुला काय वाटतं…
सुभाषराव – अरे वाह…मस्तय की…मी राधिकाला विचारून ताबडतोब सांगतो…अरे पण कुठे आणि कसे भेटतील दोघे…?
नंदकुमारराव – अरे शिरीष येईलच ऑफिसला जात असतानाच भेटेल म्हणालाय मला त्याचा तसा फोनही आलाय मला…पत्ता एस एम एस करतो मी तुला रेस्टोरंटचा…हा…पण जास्त जण जाऊ नका त्यांच्याबरोबर जरा मोकळं बोलू देत एकमेकांना…
सुभाषराव – हो अरे चालेन…मी बोलतो राधिकाशी…
नंदकुमाराव – चल बरं ठेवतो फोन आणि लवकरच भेटूत आपण…
सुभाषराव – हो हो….चालेन…
असं म्हणून सुभाषराव फोन ठेऊन देतात आणि त्यांना प्रश्न पडतो…! मांजराच्या गळ्यात घंटा नेमकं कोण बांधणार…म्हणून सुभाषराव राधिकाकडे बोलण्यासाठी गेले…जरा भीतीच वाटतं होती त्यांना कारण लग्न म्हंटल की तांडव घालणारी राधिका असा नावलौकिक आधीच राधिकाने मिळवला होता …म्हणून सोबत सुषमाताईंनाही घेऊन गेले…सुभाषराव आपल्या लेकीपुढे लग्नाचा प्रस्ताव मांडतात…
सुभाषराव – राधा…काय करतेस…मला ना तुझ्याशी बोलायचं होत..
राधिका – बोला ना पप्पा…पण लग्न सोडून काहीही बोला…
सुभाषराव – सुषमा बोल बाई तूच सांग हिला….
सुषमाताई – राधे….सोने ऐक गं…
राधिका – आई…मला नाही गं आवडत असं कुणीतरी मला पाहायला येतंय…आणि मी पोळ्याच्या बैलासारखा नटून थटून जायचं त्यांच्या समोर…
सुषमाताई – अगं काहीही असत तुझं…आता मी तर नटूनही बसले नव्हते जेव्हा तुझे बाबा मला पाहायला येणार होते…तरीही चाललंय ना आमचं सुखाने…एकमेकांच्या सोबतीने…आयुष्यात सोबत लागतेच…समजेल तुला हळू हळू…आम्ही गेल्यावर…
राधिका – आई…नेहमीचं आहे तुझं…एकुलती एक आहे मग एखादा भाऊ बहीण का नाही दिला मला…ठीक आहे जाते मी पाहायला…
सुभाषराव आणि सुषमाताई दोघांनाही उसासा टाकला एकदाचा गंगेत घोड न्हालं म्हणून दोघांनाही समाधान वाटलं…अगदी लढाई जिंकून आल्यासारखं सुभाषरावाना वाटतं होत….पण दुसरीकडे राधिका मात्र आपण शिरीषला कसे पसंत पडणार नाही याचे बेत आखत होती…म्हणून राधिका एक खूप साधाच ड्रेस निवडते केसांची तेल लावून घट्ट वेणी बांधण्याचं ठरवते….आणि पायात घालायला साधीशी चप्पल निवडून ठेवते…दुसऱ्याच दिवशी नंदकुमाररावानी दिलेला पत्ता घेऊन राधिका आपल्या आईसोबत ठरलेल्या रेस्टोरंट मध्ये जाण्यासाठी निघतेच तेवढ्यात आपल्या मुलीच्या बावळ्या वेशाकडे पाहून राधिकाला बोल लावते…
सुषमाताई – राधा….ए बाई…हा काय वेष…किती बावळट दिसतीय…तेल का लावलं आणि केसांना…
राधिका – आई…तू शांत राहा ना जरा…अशा मुलांना अशाच मुली आवडतात…बघ तू कसा पसंत करतो मला बघच तू…
सुषमाताई आपल्या मुलीच्या बावळ्या वेशाकडे पाहत आणि नावं ठेवत रेस्टोरंटपाशी येऊन पोचतातही.. दोघांनाही मनमोकळं बोलता यावं म्हणून सुषमाताई लांब जाऊन बसतात….दोघांचेही बोलणी सुरु होतात….राधिका मात्र शिरीषकडे न पाहता सीसीडीत लावलेल्या टीव्ही कडे एकटक पाहत असते म्हणून शिरीष स्वतःच बोलायला सुरुवात करतो….
शिरीष – तुमचा आवडता छंद कोणता…?
राधिका – टीव्ही पाहणं….
शिरीष – हो ते आलं लक्षात माझ्या…आताही तुमचं लक्ष टीव्ही कडेच आहे….
राधिका एकही शब्द बोलत नाही….म्हणून शिरीष बोलू लागतो…
शिरीष – बरं….तुमचा आवडता खाद्यपदार्थ कोणता…म्हणजे कुठल्या प्रकारचं जेवण तुम्हाला आवडत….?
राधिका – सगळ्या प्रकारचं….
शिरीष – मला ना साऊथ इंडियन जेवण खूप आवडत…
राधिका – मला साऊथ इंडियन डिशेश बिलकुल आवडत नाही…बस…
शिरीष – बरं तुम्हाला कुठला ब्रँड आवडतो व्रिस्ट वॉच मधला…?
राधिका – टायटन…!
शिरीष – ईईई….मला तर सिको चा ब्रँड खूप आवडतो…बघा की मी तेच तर घड्याळ घालून आलोय…तसंही सिको इंटरनॅशनल ब्रँड आहे आणि टायटन लोकल ब्रँड आहे….
आता यावर मात्र राधिकाला राग येऊ लागतो आणि शिरीषला नकार द्यायचं ती पक्के करते…पण तरीही शिरीष बोलका असल्याने राधिकाशी तो बोलतो…
शिरीष – आणि तुम्हाला सांगायचंच राहील…साधी चप्पल घालणाऱ्या मुली मला बिलकुल नाही आवडत….मला ना कशा हाय हिल्स घालणाऱ्या मुली जाम आवडतात….कसं ना हाईट सुंदर दिसते त्यात
राधिकाने तर चप्पल घातली होती म्हणून राधिका रागारागाने कॉफी पिऊन टाकते आणि सुटलो एकदाचे म्हणून राधिका शिरीषला बाय म्हणते…कारण शिरीषच्या प्रश्नावरून तरी राधिका समजून जाते की आपण शिरीषला पसंत नाही आहोत…म्हणून राधिका म्हणते
राधिका – चला तर मग निघुयात आपण…!
शिरीष – हो चालेन की…मलाही उशीर होतोय…
असं म्हणून शिरीष राधिकाकडे बघून स्मितहास्य करतो….पण राधिका काही शिरीषकडे पाहून हसत नाही…शिरीषचा निरोप घेऊन झाल्यावर राधिका रागारागाने ओढणी सावरत आपल्या आईला म्हणते…
राधिका – जरा जास्तच बोलघेवडा आहे हा….आणि मला एवढं बोलणं आवडतही नाही…बघ नकार देईल मला हा…!
सुषमा – पाहूया उद्या….पण मला तर मस्तच वाटला तो…
दोघीही मायलेकी घरी जातात आणि घडलेला सगळं सुभाषरावाना सांगू लागते…सुभाषरावही हसून सोडून देतात मग दुसऱ्याच दिवशी नंदकुमारराव सुभाषरावाना फोन करतात आणि शिरीषला राधिका पसंत असल्याचं सांगतात…राधिका मात्र शिरीषचा होकार ऐकून अचंबित होते…आणि स्वतःकडून राधिका नकार सांगते नकाराचं कारण म्हणजे शिरीष खूपच बोलतो…हे सांगून मोकळी होते…सुभाषराव आपल्या मित्राला मोकळेपणाने सांगतात पण शिरीष बोलका आणि मोकळ्या स्वभावाचा आहे म्हणून राधिकाला समजावतात आणि राजी करतात….जेव्हा दोघांची खऱ्या अर्थाने बोलणी सुरु होतात तेव्हा राधिका शिरीषला बोलते…
राधिका – मला होकार कसा काय दिलात तुम्ही…आणि एवढे उलट सुलट प्रश्न का बरं विचारलेत मला…
शिरीष – राधिका तुझ्याआधी मी एका ठिकाणी मुलीला पाहण्यासाठी गेलो…पण तिथे तर मला वेगळाच अनुभव आला…त्या मुलीचं सगळं लक्ष माझ्या ब्रँडेड घड्याळ आणि कपड्यांवरती होतं…आणि मला सारखी सारखी तेच विचारायची…थोडक्यात तिचं माझ्याकडे लक्षच नव्हतं….आणि तुझ्याशी बोलताना तुझं लक्ष माझ्या कपड्यांवर आणि घड्याळांवर नव्हतंच मुळी म्हणून मी फक्त कन्फर्म करत होतो की तू नक्की काय विचार करतेस म्हणून मी तुला असे प्रश्न केले…
शिरीषकडून एकदम खरे उत्तर ऐकताच राधिका आपोआपच शिरीषकडे आकर्षित झाली आणि… केहते…सूनते…’ बातो बातों ‘ मे प्यार हो जायेगा…..! याची प्रचिती राधिकाला आली….
Post navigation

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.