बासुंदी | रबडी


बासुंदी हा गोडाचा पदार्थ महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणावारामध्ये पुरणपोळी प्रमाणेच बासुंदीलाही महत्व आहे. बासुंदी हा प्रकार खरं तर गुजरात,महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात केला जातो, पण उत्तर भारतातही बासुंदी रबडीच्या नावाने ओळखला जातो. पदार्थ तोच पण त्याची बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. बासुंदी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. आज आपण महाराष्ट्रामध्ये बासुंदी पारंपरिक रित्या कशी बनवली जाते ते बघू या.
बासुंदी साठी लागणारे साहित्य :
१) दूध – १ लिटर (म्हशीचं दूध वापरला तर उत्तम. पण काही ठिकाणी सणावाराला गाईच्या दुधाला महत्व असल्या कारणाने गाईचं दूध वापरलं तरी हरकत नाही)
२) चारोळ्या – २ चमचे
३) साखर – १ कप (तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता)
४) ड्राय फ्रुटस – बारीक कापलेले (त्यातही आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्राय फ्रुटस घालू शकता आम्ही इथे काजू बदाम आणि पिस्ता चा वापर केला आहे)
५) केसर – १ चिमूटभर
६) वेलची पूड – १ चमचा
बासुंदी बनवण्याची कृती :
बासुंदी करताना शक्यतो रुंद आकाराचे भांडे वापरावे जेणेकरून बासुंदी तळाला लागणार नाही. कढई वापरली तर उत्तम.
सर्वप्रथम दूध उकळून घ्यावे.दुधाला उकळी आली कि मंद आचेवर दूध शिजू द्यावे.
दूध शिजताना मधून मधून हलवत राहावे. बासुंदीला सतत हलवत राहणे गरजेचे नाही दुधाला सायीचा थर आला कि चमच्याने हलवून घ्यावे. असा प्रत्येक वेळी सायीचा थर आला कि दूध हलवावे.
दूध शिजतानाच त्यातलं एक वाटी दूध चमच्याने काढून घ्यावे आणि बाजूला काढलेल्या दुधात केसर टाकावे. ५ मिनिटे केसर दुधात भिजत ठेवावा आणि मग केसर दूध सगळ्या दुधात मिक्स करावे म्हणजे बासुंदीला चांगला रंग येतो.
दूध एकदाकी दाटसर झालं कि त्यात ड्राय फ्रुटस, वेलची पूड, साखर आणि चारोळ्या घालाव्या. चारोळ्याशिवाय बासुंदी पूर्ण नाही आणि मज्जाही येत नाही.
बासुंदी बनवताना खूप सय्यम लागतो, पण चविष्ट बासुंदी जर सणावाराला ताटात हवी असेल तर तो सय्यम उत्तमच आणि सोबत पुरी असेल ताटात तर त्याची काही वेगळीच मज्जा आहे.
===============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============