Ritbhatmarathi

Search
Close this search box.

‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग 9

“आई – बाबा येतील गं. काय गडबड आहे? आता सध्या तरी इथे फक्त तू आणि मीच आहोत. मी असं ऐकलं आहे की तू छान कविता करतेस म्हणे?कधीतरी माझ्यावर एखादी कविता कर..बघू तरी ऐकायला कशी वाटते?” सारंग रेवतीच्या डोळ्यात मिश्किलपणे पाहत म्हणाला.

“करेन की. त्यात काय एवढे? शब्द जुळले की कविता तयार होते आणि..”

“पण त्यातून व्यक्त होणाऱ्या भावनाही हृदयापर्यंत पोहोचायला हव्यात. हो ना?” सारंग मधेच तिचे बोलणे थांबवत म्हणाला.

“हो तर. त्याविना कवितेचा अर्थच समजत नाही.” रेवती.

“पण माझी पुरी कविता तर माझ्यासमोर आहे आणि तिच्या भावना नुकत्याच नव्याने माझ्या हृदयापर्यंत पोहोचल्या आहेत.” असे म्हणत
सारंगने रेवतीला हलकेच आपल्या मिठीत घेतले. तशी रेवती लाजून आणखीनच त्याच्या मिठीत शिरली.

सारंग आणि रेवतीला जाऊन महिना होत आला. रेवती नव्या घरी रुळली होती, तर आजूबाजूला तिच्या ओळखीही झाल्या होत्या. नव्या मैत्रिणी मिळाल्याने तिचा वेळही छान जात होता. रेवती दर आठवड्याला आपल्या माहेरी आणि मालतीबाईंना न चुकता पत्र पाठवत होती. तर इकडे श्वेतासाठी स्थळांची शोध मोहीम जोरदार चालू होती.

अचानक एक दिवस संकेत श्वेताच्या ऑफिसमध्ये आला.
“तुम्ही इथे?” अचानक संकेतला पाहून श्वेताला धक्काच बसला.
“हो.थोडं काम होतं. म्हणजे बोलायचं होतं. बाहेर जाऊन बोललं तर चालेल का?” संकेत इकडे तिकडे पाहत म्हणाला. तशी श्वेता संकेत सोबत ऑफिसच्या बाहेर आली.

“बोला, काय काम होतं? पण माझ्याकडे फार वेळ नाही हां. खूप काम बाकी आहे.” श्वेता थोड्या घुश्यातच म्हणाली.

“हो. एकच विचारायचं होतं. तुम्ही माझ्याशी लग्न कराल?” अचानक संकेतच्या या प्रश्नाने श्वेता गांगरली.

“अहो, पण तुमच्याच मागण्यांमुळे लग्न मोडले ना आपले. हे विसरलात का तुम्ही?” श्वेता.

“हो. ती चूकचं म्हणायची आमची. आपले ठरलेले लग्न मोडले आणि आम्ही दुसऱ्या उत्तम स्थळाला होकार दिला. खरंतर माझी इच्छा नव्हती. पण आई -बाबांच्या पुढे माझे काही चालेना. तेव्हाही माझ्या मनात फक्त आणि फक्त तुम्हीच होतात. तरीही मी केवळ होकार द्यायचा म्हणून दिला.”

“मग तेही फिस्कटले का?” श्वेता मध्येच म्हणाली.

“हो. म्हणजे त्यांच्या मागण्या खूप होत्या. मुलाला भरपूर पगार असावा. स्वतःच मोठं घर, शेती, गाडी असावी, तरीही मुलाने स्वतंत्र राहावं. सासू – सासऱ्यांनी त्यांच्या संसारात नसती लुडबुड करू नये. मुलीच्या मदतीला नोकर -चाकर असावेत. आणखी अशा मागण्या जणू यांची मुलगी सरकारी अधिकारी म्हणूनच घरात काम करणार होती!” हे ऐकून श्वेताला हसू आलं.

“मग पुढे.”

“मग काय आई -बाबा नाही म्हणाले. असल्या मागण्या असतील तर हे लग्न नकोच आम्हाला. तेव्हा कुठे त्यांना आपली चूक कळली. आई म्हणाली, श्वेताचे स्थळ चांगलेच होते. आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. आता त्यांच्याकडे जायचे तरी कोणत्या तोंडाने? माफी मागायची ही लाज वाटते आता. मग मीच म्हणालो, मी जाऊन एकदा विचारुन येतो. गेले तीन -चार दिवस मी यायचे म्हणतो तुम्हाला भेटायला. पण धाडसच होत नव्हते. शेवटी आज काहीही झाले तरी जायचे म्हणून आलो. खरचं माफ करा आम्हाला.” संकेत हात जोडत म्हणाला.

“माफी मागायची असेल तर ती आई आणि तात्यांची मागा. माझी नको. पण तुमच्या वागण्यामुळे आम्हाला मनस्ताप झाला हे ही तितकेच खरे आहे.” श्वेता.

“तेही खरेच. पण..माझे आई -बाबा तुमच्याकडे माफी मागायला यायचे म्हणतात. तुम्ही तात्यांच्या कानावर हे घातलं तर बरं होईल.” संकेत श्वेताचा अंदाज घेत म्हणाला.

“तुम्ही मनापासून बोलत असाल तर तात्यांना सांगेन मी. पण एक अट आहे. पुन्हा लग्न मोडणार असाल तर आमच्या घरी फिरकायचे देखील नाही आणि तात्यांचा होकार असेल तरच मी हे लग्न करेन.” श्वेता.

“नाही. तसे पुन्हा होणार नाही. आता आमच्या मागण्याही काही नाहीत. बघा, हवं तर मी कान पकडून माफी मागतो मी तुमची.” असे म्हणत संकेतने खरचं आपले कान पकडले. त्याचा आवेश पाहून श्वेताला पुन्हा हसू आलं.

आपलं हसू आवरत ती संकेतला म्हणाली, “उद्या याच वेळी तात्यांना विचारून निरोप देईन मी. बरं आता येऊ का मी? बराच वेळ झाला आहे.”

“हो. मी वाट पाहीन उद्या.” संकेत श्वेताकडे एकटक पाहत म्हणाला. तशी श्वेता काहीशी लाजून निघून गेली.

घरी गेल्यावर श्वेताने सारं काही तात्यांच्या कानावर घातले. तसे तात्या भडकले. “त्यांना म्हणावं, आता जाग आली का तुम्हाला? तेव्हा अक्कल कुठे गेली होती यांची? आमची झालेली मानहानी भरून काढणार असाल, तरच आमच्या दरात या. नाहीतर इकडे फिरकू देखील नका.”

“पण तात्या संकेतनी माफी तर मागितली आहे.” श्वेता थोडी अडखळत बोलली.

“माफी मागून झालेला मनस्ताप भरून काढणार आहेत का ते? नाही ना? मग आता माझा स्पष्ट नकार आहे या लग्नाला.” तात्या.

थोडा वेळ शांततेत गेला. मग नीताताई श्वेताला म्हणाल्या, “हे म्हणतात ते सारं खरचं आहे. पण तुझी काय इच्छा आहे बाळा?”

“आई हे स्थळ मला पसंत होतं गं. पण जे काही झालं.. त्यामुळे सारं बिनसलं. संकेत तसे मनाने चांगले वाटतात. पण तात्या नाही म्हणतात तर माझाही नकार आहे या लग्नाला.” श्वेता.

“माझा नकार यासाठी आहे, जेणे करुन तुला पुढे त्रास होऊ नये. अगं मुलगा चांगला असून काय करायचे? घरची माणसेही चांगली हवीत. उद्या उठून तुला त्रास झाला म्हणजे आम्ही काय करायचे?”

“तसे काही होणार नाही तात्या. हा माझा शब्द आहे.” असे म्हणत संकेत आत आला आणि पाठोपाठ त्याचे आई -वडीलही आले.

“आम्हाला माफ करा हो. आमचं खरचं चुकलं.” संकेतचे आई -वडील तात्या आणि नीताताईंपुढे हात जोडून उभे राहिले.

“आत्ता उपरती झाली म्हणायची! काय हो
संकेतराव आता कुठे गेला तुमचा ताठा? काय त्या तुमच्या मागण्या, हुंडा, मानपान? कुठे गेली ती तुमच्या तोलामोलाची स्थळ? त्यांना मागण्या पटल्या नाहीत का तुमच्या? माफी मागतात म्हणे..किती मनस्ताप झाला आम्हाला. तो भरून काढणार आहात का?” तात्या मोठ्यांनी बोलत धडपडत खुर्चीत बसले.

“शरदराव तुमचे सारे बरोबर आहे. पण असा
स्वतःला त्रास करून घेऊ नका. काय बोलायचे ते बोला आम्हाला. पण पोरांची पसंती आहे अजूनही. त्यासाठी तरी लग्नाला होकार द्या. लग्न थोडक्यात करू. हवं तर लग्नाचा सारा खर्च आम्ही करू. खरंतर माफी मागायला ही तोंड नाही राहिले आम्हाला. पण एकवार मोठ्या मनाने माफ करून टाका.” संकेतचे वडील तात्यांना म्हणाले.

संकेत आणि श्वेताला एकमेकांशी लग्न करायचे होते, त्यामुळे हो, नाही करत शेवटी तात्या या लग्नाला तयार झाले. पण तात्यांनी ‘आमच्या मुलीला कुठलाही त्रास होता कामा नये.’ अशी अट घातली त्यांना.

संकेत आणि श्वेताच्या इच्छेप्रमाणे लग्न रजिस्टर पद्धतीने करायचे ठरले. लग्नाला साधारण
महिन्याभराचा अवधी होता. नीताताईंनी रेवतीला पत्र लिहून बोलावणे धाडले आणि लग्न कसे जुळले हेही सविस्तर सांगितले. संकेत आणि श्वेताचे लग्न पुन्हा जुळल्याने रेवती आणि सारंगला आनंद झाला. काही का असेना श्वेताची गाडी रुळावर येत होती.

बऱ्यापैकी तयारी झाली असल्याने आणि लग्न रजिस्टर पद्धतीने व्हायचे असल्याने लग्नाची फारशी गडबड नव्हती. आता संकेत आणि श्वेता जवळपास रोज भेटत होते. एकमेकांना जाणून, समजून घ्यायचा प्रयत्न करत होते.

..आणि एक दिवस शंतनू आलेला पाहून तात्या साठ्यांच्या घरी जाऊन त्याची माफी मागून आले.तेव्हा कुठे तात्यांना मनावरचे ओझे उतरल्यासारखे वाटले.

इकडे यायच्या तयारीत असलेली रेवती अचानक आजारी पडली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही तपासण्या करून झाल्या आणि ती ‘आई ‘होणार असल्याच्या बातमीने सारंग आणि रेवतीचा आनंद गगनात मावेनासा झाला.
सारंगने मालतीबाईंना तातडीने बोलावून घेतले. ही गोड बातमी ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला. एव्हाना ही बातमी रेवतीच्या माहेरी पोहोचली होती.
नीताताईंना कधी एकदा रेवतीला भेटते असे झाले होते. पण रेवतीची प्रकृती थोडी नाजूक असल्याने डॉक्टरांनी तिला विश्रांती घ्यायला सांगितली होती आणि प्रवासही टाळायला सांगितला होता. आता रेवती लग्नाला येऊ शकेल की नाही याची नीताताईंना काळजी लागून राहिली. काळजी लागून राहिली.ताईंना काळजी लागून राहिली.
मालतीबाई तिची नीट काळजी घेत होत्या. काय हवं काय नको पाहत होत्या. हळूहळू तब्येत सुधारली आणि डॉक्टरांनी रेवतीला जायला परवानगी दिली. मात्र दगदग, धावपळ टाळायला सांगितली. रेवती माहेरी आली आणि साऱ्यांना तिचे कौतुक, लाड करावे तेवढे थोडे वाटू लागले.

लग्नाचा दिवस उजाडला. सारंग दोन दिवसांची सुट्टी घेऊन लग्नाला हजर झाला. संकेत आणि श्वेताचे लग्न एकदाचे पार पडले. लग्नानंतर देवदर्शन झाल्यावर श्वेताची पाठवणी झाली. सासरी आलेल्या श्वेताचे अगदी छान स्वागत झाले. सासू -सासरे तिला जीव लावत होते. संकेतही तिची काळजी घेत होता. हळूहळू श्वेता सासरी रुळू लागली.

तिसरा महिना संपला आणि रेवती थोडी निश्चिंत झाली. तिचा होणारा त्रास हळूहळू कमी होत होता आणि तब्येतही सुधारत होती. पण या ना त्या कारणाने दवाखान्याच्या वाऱ्या चालूच होत्या. तात्या हौसेने रेवतीसाठी सारे काही करत होते. तिला जपत होते. नीताताईही तिची नीट काळजी घेत होत्या. सारंगही अधून -मधून सुट्टी काढून येत होता.

एक दिवस श्वेता आणि शंतनूची गाठ पडली आणि
शंतनूचे लग्न ठरल्याची बातमी आली. त्यामुळे साऱ्यांनाच आनंद झाला.

काही दिवसांनी श्वेताची बढती झाली. त्यामुळे सारे खुश झाले.

दिवस सरत होते. एक दिवस रेवतीचे डोहाळ जेवण सासरी होणार असल्याने मालतीबाई तिला घरी घेऊन आल्या.

क्रमशः

================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag8/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag10/

===================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *