‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग 8

लग्न मोडल्याची बातमी रेवतीपर्यंत पोहोचली आणि ती लगबगीने माहेरी आली. मुलाकडील मंडळींच्या अवास्तव मागण्या ऐकून तिलाही धक्काच बसला. तात्या आणि नीताताई नाराज होते, तर श्वेताही लग्न मोडल्यामुळे दुखावली गेली होती. तात्यांना आता राहून राहून वाटत होते, ‘आपण रेवती आणि शंतनूच्या लग्नाला दिलेला नकार त्यांच्या किती जिव्हारी लागला असेल!’
रेवतीने सारंगला पत्र लिहून ही बातमी कळवली. ‘जमत असेल तर इकडे या’ म्हणून सांगितले. पण नीताताईंना पुढची चिंता लागून राहिली होती. ‘कोण लग्न करेल आपल्या मुलीशी?’ लोकही आता कुजबुज करू लागले होते.
इकडे सारंग आता नव्या ऑफिसमध्ये रुळला होता. बढती मिळाली असल्याने त्याचे कामही वाढले होते. हळूहळू नव्या घरी त्याने थोडे सामान नेऊन ठेवले. त्याला रेवतीची, घरची आठवण येत होती. आता श्वेताच्या लग्नाच्या निमित्ताने जाऊन
रेवतीला इकडे घेऊन यावे. असा विचार करत असतानाच अचानक तिचे पत्र आले. त्यात श्वेताचे लग्न मोडल्याची बातमी होती. हे वाचून सारंगला धक्काच बसला. त्याने ऑफिसमध्ये सुट्टीसाठी अर्ज करून आपल्या साहेबांना विनंती केली आणि त्याला पुढच्याच आठवड्यात चार दिवसांची रजा मिळाली. घरी न कळवताच त्याने इकडे येण्याची तयारी सुरू केली.
इकडे नीताताईंचे रडून हाल झाले होते. मालती बाई त्यांना समजवायला आल्या होत्या. “झाले ते एका अर्थाने बरेच झाले. निदान त्यांच्या मनात काय आहे ते तरी कळाले आपल्याला. पोरीला लग्नानंतर त्रास झाला असता, तर काय केले असते आपण? पुन्हा लग्न जुळेल हो पोरीचे. तुम्ही काळजी करू नका. आपण प्रयत्न करू.”
मालतीबाईंच्या या शब्दांनी शरदराव आणि नीताताईंना धीर आला.
अचानक सारंगच्या येण्याने साऱ्यांनाच आनंद झाला. “अहो, अचानक कसे काय आलात तुम्ही? निदान कळवायचे तरी.” सारंगला पाहून रेवतीला खूप आनंद झाला होता. त्याने रेवतीला चार दिवसांनी तिकडे जायचे असल्याने तयारी करायला सांगितली. तशा मालतीबाई आणि रेवती तयारी लागल्या.
आज मालतीबाईंनी रेवतीला खूप दिवसांनी इतके आनंदात पाहिले होते. खरंच रेवती खुश होती. इतके दिवस सारंगची कमी तिला जाणवत होती, त्याच्या आठवणीत ती अस्वस्थ होत होती. पण तिचे तिलाच कळत नव्हते..असे का होते आहे ते! आज सारंगला समोर पाहून तिच्या मनाने जणू प्रेमाची साक्ष दिली होती.
‘यांच्या आठवणीत रमून जाणं, आतुरतेने वाट पाहणं, त्यांचं अनामिक ओढ वाटणं हे सारं प्रेम तर नाही? मग शंतनूचं काय? खरंतर त्या वाटेवरून मी खूप पुढे आले आहे. आता मागे राहिल्या आहेत त्या केवळ पुसटशा आठवणी. सारंगनी मला समजून घेतलं, वेळ दिला. पण नियतीने ज्याच्याशी साता जन्माची गाठ बांधली, त्याला असं सोडून मी कुठे जाणार होते? शंतनूकडे? मग लोक काय म्हंटले असते? आपल्या प्रेमासाठी आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला दूर लोटायचं? नाही..कधीच नाही.
खऱ्या प्रेमाची ताकद विरहात असते. शंतनूचा विरह सहन केला. पण आता मला सारंगना नाही गमवायचे. जुने सारे विसरून नव्याने आयुष्याची सुरुवात करायची आहे.’ रेवतीचे विचार धावत होते.
“रेवती.. अगं कुठे हरवलीस? कधीची हाक मारते आहे मी! हे खायचे -प्यायचे सारे सामान बांधून ठेवले आहे. जाताना आठवणीने घेऊन जा.” मालतीबाई रेवतीच्या चेहेऱ्यावरचा आनंद निरखत म्हणाल्या.
“हो आई. तुम्ही दोघेही चला ना. तेवढाच बदल होईल.” रेवती सासुबाईंना म्हणाली.
“नको गं बाई. यांच्या कामाचं ठिकाण निश्चित नाही. आज इथे तर उद्या तिथे आणि इथेही कोणीतरी हवेच ना? येऊ आम्ही नंतर केव्हातरी. तुम्ही दोघं निवांत राहा. इथली काळजी अजिबात करू नका. काही लागलंच तर आम्ही कळवू आणि तुम्हाला काही लागलेच तर आम्हाला कळवा.” मालतीबाई.
दुसऱ्या दिवशी सारंग आणि रेवती माहेरी आले. जावयाला पाहून तात्यांना खूप आनंद झाला. “सारंगराव पोरींचा बाप असणं म्हणजे
जबाबदारीच काम आहे हे मात्र खरं. त्यांना शिकवण, मोठं करणं, त्यांची लग्न करणं ही मोठी जबाबदारी आणि आपली मुलगी चांगल्या घरी पडणं म्हणजे नशीबच म्हणायचं. त्यांना सासरी काही त्रास तर होत नसेल? कोणी काही बोल लावत नसेल ना? माझी लेक सुखाने संसार करत असेल ना? हे असे विचार मनात येत राहतात. लेकीच लग्न ठरेपर्यंत काळजी आणि झाल्यानंतरही काळजीच करायची आई -बापाने. आता श्वेताचेच पाहा. सारं काही उत्तम जमून आलं. पण कुठे काय त्यांच्या मनात आलं नि सगळं फिस्कटलं. आजकाल हुंडा कोण मागतं? उलट मी तर म्हणतो, लग्नाचा खर्च मुलीकडील आणि मुलाकडील लोकांनी निम्मा -निम्मा द्यायला हवा.”
“तात्या तुम्ही काळजी करू नका. होईल सारे नीट. मी स्वतः लक्ष घालतो यात आणि कोणी योग्य मुलगा असल्यास कळवतो.” सारंग तात्यांना धीर देत म्हणाला.
रेवती आणि सारंग गावी जाणार म्हणून नको म्हणत असताना देखील नीताताईंनी रेवतीला थोडे सामान बांधून दिले.
“तिकडे दोघेच राहणार आहात. सांभाळून राहा. अधून -मधून खुशालीची पत्र पाठवत राहा.”
नीताताई काळजीने म्हणाल्या.
“आई तुम्ही नका काळजी करू. सारी व्यवस्था आहे तिथे.” सारंग नीताताईंना म्हणाला.
काही वेळातच दोघे निरोप घेऊन तेथून निघाले.
“अहो, राग गेला का माझ्यावरचा?” रेवती
सारंगच्या मागे गाडीवर बसत म्हणाली.
“मी रागावलो नव्हतो रेवती. दुखावलो गेलो होतो. प्रेम करणं हा काही गुन्हा नव्हे. पण ही गोष्ट माझ्यापासून तू लपवलीस. याचे दुःख झाले होते मला. आता तुझे काय म्हणणे आहे?” सारंग.
“तसे काहीच नाही. मला तुमच्या सोबत घेऊन चला इतकेच.” रेवती.
“बस् इतकेच? अगं इतक्या दिवसात आठवण आली नाही का माझी? मग ती पत्रं उगाच का पाठवत होतीस? तुझ्या मनात काय आहे हे मला कळले आहे. पण तुला ते जाणवले की नाही हे तुलाच माहित. हो ना?” सारंग.
तुम्ही इथून गेलात आणि माझं मन चलबिचल झालं. लग्नानंतर आपोआप प्रेम होतं म्हणे!सहवासाने झालेलं प्रेम. ते मी अनुभवलं. तुमच्यासारखा नवरा शोधूनही सापडला नसता मला. कदाचित नियतीनेच आपली गाठ बांधली असेल. तुमचं तात्यांची काळजी घेणं, आईला समजावणं, श्वेताला पाठच्या बहिणीप्रमाणे वागवणं, मला समजून घेणं..खूप काही सांगून गेलं. मी कधी प्रेमात पडले तुमच्या, माझे मलाच कळले नाही. शंतनू माझा भूतकाळ होता. तो तसाच राहु द्या. तो पूर्णपणे मिटला जाणार नाही. पण त्या भूतकाळाचा आपल्या संसारावर कोणताही परिणाम होणार नाही..हा शब्द देते मी तुम्हाला.” रेवती.
सारंगने आपली गाडी एका निवांत अशा रस्त्यावर थांबवली.” तुम्हा स्त्रियांचं मन किती निराळं असतं! हेच खरं. तुम्हा दोघांचं एक होणं तुमच्या नशिबी नव्हतं. मग त्यासाठी तात्यांना का दोष द्यायचा? मी तुला पाहतच तुझ्या प्रेमात पडलो. पण तुझ्या आयुष्यात माझ्याआधी आणखी कोणीतरी होतं ही गोष्ट माझ्यासाठी खूप वेदनादायी होती. तू माझ्या जवळ असूनही माझी नाहीस ही भावना त्रासदायक होती. पण जेव्हा विचार केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. यात चूक कोणाचीच नाही. आपल्या नशिबात जे असते तेच घडते. होती. पण जेव्हा विचार केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. यात चूक कोणाचीच नाही. आपल्या नशिबात जे असते तेच घडते.
पुढे एका बाकावर बसत तो म्हणाला,” रेवती बस इथे.” ती बसताच त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला.
“अहो, काय हे? बघेल ना कोणीतरी.” रेवती हात त्याच्या हातातून सोडवत म्हणाली.
“कोणी पाहिलं तर सांगेन मी, बायकोचा हात हातात घेतला आहे म्हणून.
रेवती नेहमी माणसं चुकीची नसतात. कधी परिस्थिती वेगळीच असते, त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. श्वेताचेच बघ, सारं काही जुळून आलं. पण मनात हाव शिरली आणि नातं जुळण्याआधीच संपल. मी हवं तर संकेतशी बोलू का? एक शेवटचा प्रयत्न म्हणून?”
“तात्यांना विचारुन बोला हवं तर. पण मला वाटत नाही, तात्या आता परवानगी देतील म्हणून. बरं घरी जायचे का आता? खूप उशीर होत आला.” रेवती म्हणाली तसे दोघे उठले.
घरी येताच रेवती आणि सारंगचे फुललेले चेहरे पाहून मालतीबाईनां खूप समाधान वाटले.
दोन दिवसांनी तात्या, नीताताई आणि श्वेता रेवती आणि सारंगला निरोप द्यायला गेले. “तात्या तुम्ही म्हणत असाल, तर मी संकेतशी बोललो असतो एकदा.”
“नको सारंगराव त्याची काही एक गरज नाही. एकदा विश्वास गमावला त्यांनी. आता परत त्या सामंत मंडळींवर विश्वास ठेवणे कठीण जाईल. त्यापेक्षा आणखी स्थळ पाहू. देवाची इच्छा असेल तर मिळेल एखादं चांगलं.” तात्या म्हणाले.
आवराआवर झाली. सारंगच्या वडिलांनी आपल्या मित्राची गाडी बोलावली होती. त्यात सारे सामान भरून सारंग आणि रेवती सर्वांचा निरोप घेऊन निघाले. त्यांची गाडी दूरवर जाईपर्यंत भरल्या डोळ्यांनी मालतीबाईं हात हालवत राहिल्या. पुढे स्वतःला सावरून म्हणाल्या, “पोरं गेली आता घर खायला उठेल मला. आमचे हे घरी नसतात, तशी मी एकटीच असते. इतके दिवस रेवती होती सोबतीला. आता तीही नसेल. नीताताई, अधून मधून श्वेताला एखादी चक्कर मारायला सांगा. तेवढाच आपला विरंगुळा. तसेही तिचे ऑफिस जवळच आहे इथून.”
तशी नीताताईंनी होकार देत आपली मान डोलावली आणि ते तिघे आपल्या घरी जायला निघाले.
दोन तासांनी रेवती आणि सारंग नव्या घरी पोहोचले. “अहो, घर किती छान आहे!” रेवतीला नवं घर खूपच आवडलं. मोठं अंगण, घराच्या आसपास मोकळी जागा, बाग-बगीचा, ऐसपैस परसदार पाहून रेवती खुश झाली. आई -बाबाही यायला हवे होते ना? त्यांनाही घर पाहून खूप छान वाटलं असतं.” रेवती हातातले सामान ठेवत म्हणाली.
क्रमशः
===================
मागील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag7/
पुढील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag9/
===================
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.