‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग 6

रेवतीने नोकरीसाठी अर्ज केला आणि तिला मुलाखतीसाठी बोलावणं आलं. पहिलीच मुलाखत आल्याने रेवती थोडी अस्वस्थ झाली. नाही म्हणता म्हणता सारंग तिला ऑफिसमध्ये सोडायला गेला.
“मी बाहेर थांबतो रेवती. तुझं झालं की ये.”
सारंग रेवतीला म्हणाला.
श्वेता होतीच तिथे. त्यामुळे रेवतीला थोडं बरं वाटलं.
मुलाखत छान झाली आणि रेवतीला नोकरी मिळाली. दोन दिवसांनी हजर व्हायला सांगितले. रेवतीला खूप आनंद झाला. श्वेता सोबत तिने सारे ऑफिस पाहून घेतले आणि ती ही आनंदाची बातमी सांगायला सारंगकडे धावत गेली. नोकरी मिळाली हे ऐकून सारंगलाही आनंद झाला.
“माझ्या येण्या -जाण्याच्या वाटेवर आहे तुझे ऑफिस. मी रोज सोडायला येत जाईन तुला.” सारंग रेवतीला म्हणाला.
“हो चालेल. अहो जाताना आईकडे जाऊया का? ही बातमी कधी आई आणि तात्यांना सांगते असे झाले आहे!” रेवती उत्साहाने म्हणाली.
रेवतीला नोकरी मिळाली म्हणून आई आणि तात्यांनाही खूप आनंद झाला. “तुझ्या सासरी नोकरी केलेली चालते ना? मग आमची काही हरकत नाही.” तात्या रेवतीला म्हणाले.
दोन दिवसांनी रेवती आपल्या ऑफिसमध्ये हजर झाली. काम समजून घ्यायला, नव्या ओळखी व्हायला थोडे दिवस गेले. श्वेता मदतीला होतीच. मात्र रेवतीने सारे समजून घेऊन मनापासून कामाला सुरुवात केली. हळूहळू ओळखी वाढतील तशा रेवतीला नव्या मैत्रिणी मिळाल्या. आता ती रोज सारंगसोबत येत -जात होती.
मालतीबाई आता रोज सारंगबरोबरच रेवतीलाही डबा देऊ लागल्या. एकूणच रेवती खुश होती. तिच्या नव्याने काहीतरी घडू पाहत होतं.
“रेवती आज मला रात्री यायला उशीर होईल.
येताना तू एकटी येशील? किंवा असे कर तू सरळ तुझ्या आईकडे थांब. माझे काम आटोपून मी तुला तिथेच न्यायला येईन.” सारंग आवरता आवरता म्हणाला. हे ऐकून रेवती मान डोलावली.
“आई आज आम्हाला यायला उशीर होईल.” असे म्हणत दोघेही घरातून बाहेर पडले. रेवती आणि सारंग मधला अबोला जरी कमी झाला असला तरी सारंग अजून तसा घुश्यातच होता.
संध्याकाळी काम आटोपून रेवती आईकडे जायला निघाली. श्वेताचे काम पूर्ण व्हायला उशीर असल्याने ती ऑफिसमधून एकटीच बाहेर पडली.
घर जवळ आले तसे तिने आपल्या चालण्याचा वेग कमी केला आणि अचानक एका वळणावर तिची नि शंतनूची भेट झाली. अचानक एकमेकांना समोर पाहून दोघांनाही काय बोलावं ते सुचेना.
काही मिनिट शांततेत गेली. तसा शंतनू म्हणाला,
“कशी आहेस रेवती?”
“ठीक तर आहे आणि तू..तू कसा आहेस? असं कानावर आलं तू तुझी इथली नोकरी सोडून दुसरीकडे नोकरीसाठी गेला आहेस.” रेवती.
“हो. अगं म्हणावा तसा पगार इथे मिळत नव्हता आणि तसा ही मी जाणारच होतो. ते तुला सांगणारच होतो मी. पण अचानक त्या दिवशी तात्या…ते जाऊदे. तू आत्ता यावेळी इथे कशी?”
“तात्या काय? शंतनू? कधी भेटले होते तुला? आपल्या लग्नाआधी? की नंतर?” रेवती घाईघाईने म्हणाली.
“ते आता महत्वाचं नाही गं. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे आता. रेवा, एका प्रश्नाचे अगदी खरं उत्तर देशील मला?” शंतनू रेवतीच्या डोळ्यात पाहत म्हणाला.
“देईन. पण तू हे जे अर्धवट बोलणे सोडलेस ना. ते मला पूर्णपणे कळायला हवं शंतनू.” रेवती चिडून म्हणाली.
तसा शंतनू थोडा विचार करत पुढे म्हणाला, “तुला पाहायला मुलगा येणार होता, त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तात्या मला भेटायला आले होते. म्हणाले, तू रेवतीला विसरून जा. तिच्याशी लग्न करायचा स्वप्नात देखील विचार करू नकोस. तिचे लग्न माझ्या मर्जीनुसारच होणार. तिचा हात कुणाच्याही हाती द्यायला मी काही दुधखुळा नाही. शेवटी बाप आहे मी तिचा.
“मग मी त्यांना म्हणालो, तात्या आमचं प्रेम आहे एकमेकांवर. लग्न करायचे आहे आम्हाला. आता चांगली नोकरीही मिळाली आहे मला.
तसे तात्या उसळून म्हणाले, ते प्रेमबीम सारं काही झुट असतं रे. पण काहीही झालं तरी रेवतीचं लग्न मी म्हणेन तिथेच होईल आणि खबरदार यातला एकही शब्द तिला कळाला तर, गाठ माझ्याशी आहे. तिला पुन्हा भेटायचा देखील प्रयत्न करू नकोस. असे म्हणून तात्या तिथून निघून गेले.
दुसऱ्या दिवशी आपली देवळात भेट झाली. केवळ श्वेताने निरोप पाठवला आणि तुला शेवटचे पाहता येईल म्हणून मी तिथे आलो. त्यावेळी तू म्हणाली होतीस, घरी येऊन तात्यांकडे रीतसर माझा हात माग. पण तात्यांनी कधीच परवानगी दिली नसती आपल्या लग्नाला.”
“काय? शंतनू हे सारं खरं बोलतो आहेस तू?” रेवतीला विश्वास बसत नव्हता. तात्या हे असं काही करू शकतील असे वाटलेही नव्हते मला. पण आता काहीच उपयोग नाही. तू ही लग्न कर शंतनू आणि सुखाचा संसार कर.”
“तू माझ्यासोबत असतीस, तर माझा संसार सुखाचा झाला असता रेवती. माझा निर्णय झाला आहे, कधीही लग्न न करण्याचा. कारण माझ्या आयुष्यातली तुझी जागा मला कोणालाच द्यायची नाही. ती जागा फक्त तुझी आणि तुझीच आहे रेवा.”
“असे म्हणू नको रे. पहिलं आणि खरं प्रेम कोणाच्याच नशिबी नसतं असं म्हणतात. तू लग्न कर आणि आयुष्याची नव्याने सुरुवात कर.” रेवती.
“रेवा, मला एका प्रश्नाचे उत्तर दे. तुझं माझ्यावर अजूनही तितकेच प्रेम आहे? की तू विसरलीस मला? शंतनू.
“प्रेमाचं माहित नाही शंतनू. पण अजूनही तुझी आठवण सतावते मला. सारंगना सारे काही माहित झाले आपल्याबद्दल. कुठून कळाले ते माहित नाही. पण आमच्यात अजूनही नवरा -बायकोचे नाते नाही. शंतनू ,मी आयुष्याच्या अशा वळणावर उभी आहे, जिथून माघारी येण्याचा कोणताही मार्ग नाही. आपण झालं गेलं विसरून आयुष्याची नव्याने सुरुवात करू.”
” हे शक्य नाही रेवती. मी आयुष्यभर तुझी वाट पाहायला तयार आहे. मात्र तुझी जागा मी दुसऱ्या कोणालाच देऊ शकत नाही, कधीच नाही.” असे म्हणत शंतनू तिथून निघून गेला आणि रेवती पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत बराच वेळ तशीच उभी राहिली.
“ताई, अगं इथे काय करते आहेस? अजून घरी गेलीच नाहीस का?” श्वेताच्या हाकेने रेवती भानावर आली.
“तू…तू उशीरा येणार होतीस ना?” रेवती गडबडीने डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली.
“हो. काम झालं म्हणून आले. पण तुला काय झालं? अशी का दिसते आहेस?” श्वेता रेवतीचा चेहरा निरखत म्हणाली.
“ते अगं शंतनू अचानक भेटला आणि…”
“आणि काय?” श्वेता काळजीने म्हणाली.
शंतनूने सांगितलेली सारी हकीकत तिने श्वेताला सांगितली.
“मग तर तात्यांना जाब विचारायलाच हवा ताई. त्यांना काय हक्क होता? त्यांनी थोडं तुम्हाला समजून घ्यायला हवं होतं.”
“नको श्वेता. आता याचा काहीच उपयोग नाही. पण शंतनूला कोणीतरी समजवायला हवं गं. तू समजवशील का त्याला? खूप एकटा पडला आहे तो आणि सारंगना देखील हे सारे माहित झाले आहे. कुठून कळाले, कोणी सांगितले.. मला माहित नाही. यावरून वादही झाला आम्हा दोघांत. बरेच दिवस अबोला धरून होते गं हे माझ्याशी. आता कुठे गाडी रुळावर येते आहे.
पण बघ ना एका स्त्रीचं आयुष्य कसं असतं? लहानपणापासून आपले वडील जे सांगतील ते ऐकायचं. नंतर नवऱ्याचा शब्द प्रमाण मानायचा, आपल्या सासू-सासर्यांच्या मर्जीनुसार वागायचं. साऱ्यांची मन राखायची आणि ती..ती मात्र इतरांना खुश ठेवण्याच्या नादात
स्वतःचं मन हरवून बसते.” रेवती उद्विग्न होऊन बोलत होती.
“ताई, रागावू नको. पण सारंग भाऊजींना मीच सांगितलं होतं. तुझ्या अलिप्त वागण्यामुळे ते फार काळजीत होते. पण त्यांनी वचन दिले होते मला. ते कुणाला काही सांगणार नाहीत म्हणून.
तू आधी शांत हो. घरी जाऊ आणि नंतर बघू काय करायचं ते.”
“श्वेता काय केलंस हे तू? अशी का वागलीस? जरा विचार करायचा होतास अगं, माझ्या जागी तू असतीस तर काय केले असतेस?” रेवती
श्वेताकडे न पाहताच चालू लागली.
दोघी घरी आल्या आणि मागोमाग सारंगही आला. काही वेळ बसून मग सारंग आणि रेवती आपल्या घरी गेले.
“तात्या, थोडं बोलायचं होतं. श्वेता तात्यांसमोर बसत म्हणाली. तुम्ही शंतनूची भेट घेतली होती?असं का वागलात तात्या? त्याची चूक काय होती? तुम्ही थोडं समजून घेतलं असतं तर…आज ताई आणि शंतनू दोघेही सुखी असते.”
“म्हणजे? म्हणायचं काय आहे तुला? बापाला उलटून विचारण्याएवढी मोठी झालीस की काय आता?” तात्या उसळून म्हणाले.
“तसे नाही तात्या. शंतनूने आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या एका नकारामुळे त्याने हा निर्णय घेतला. एखाद्याचे आयुष्य विस्कटून टाकायचा हक्क कुणालाच नाही. ना तुम्हाला ना मला.” श्वेता.
“घेतला असेल त्याने निर्णय. तो त्याचा प्रश्न आहे. पण तुझी ताई तरी सुखी आहे ना? मग झालं तर.” तात्या नरमाईच्या आवाजात म्हणाले.
“दिसायला सारेच सुखी असतात. पण मन सुखी हवं ना? मान्य आहे, सारंग भाऊजी, ताईचे सासू – सासरे ही चांगली माणसं आहेत..
पण शंतनूचा हा निर्णय तुम्हाला तरी योग्य वाटतो का तात्या? शंतनू साठ्यांचा एकुलता एक मुलगा आहे. उद्या जर मी असा निर्णय घेतला तर चालेल का तुम्हाला?
“बस्. श्वेता फार बोललीस. काहीही झालं तरी तुझे वडील आहेत ते.” आई श्वेतावर ओरडली.
“माफ करा तात्या. पण ताई आणि शंतनूच्या लग्नाला केवळ एक बाप म्हणून विरोध केलात. शंतनूच्या चांगल्या गोष्टी तुम्ही पाहायचा प्रयत्न केला असता तर फार बरे झाले असते.”
क्रमशः
===================
मागील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag5/
पुढील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag7/
===================
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.