बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग 4

चार दिवस कसे पट्कन निघून गेले. रेवती श्वेताला सोबत घेऊन आपल्या सासरी गेली. मालतीबाईंनी श्वेताचे छान स्वागत केले. आपल्या अल्लड, अवखळ स्वभावाने श्वेता तिथे रमली. लवकरच तिची आणि सारंगची गट्टी जमली. मालतीबाईंना मुलगी नव्हती. त्यामुळे रेवती आणि श्वेताच्या येण्याने घर अगदी भरून गेल्यासारखे वाटत होते त्यांना. रेवतीचा स्वभाव हळूहळू खुलत होता. त्यामुळे मालतीबाई सुखावल्या होत्या.
पण सारंग आणि रेवतीची म्हणावी तशी गट्टी जमली नव्हती अजूनही. त्यामुळे सारंग उदास होता. आपल्या बायकोशी छान गप्पा माराव्यात, एकमेकांची काही गुपित ऐकावी, हातात हात घेऊन फिरायला जावं..असं त्याला खूप वाटायचं. पण रेवती त्याच्यापासून दूर राहणं पसंत करत होती. तिचं असं गप्प राहणं त्याला सतावत होतं.
“नक्की काय बिनसलं आहे रेवतीचं?” एक दिवस धाडस करून त्याने श्वेताला विचारलं.
“कुठे काय? काहीच नाही.” श्वेता त्याला म्हणाली.
“मग रेवती अशी उदास का असते? तिला मी पसंत नव्हतो का?”
“तसं काहीच नाही.”श्वेता.
“मग नक्की कारण तरी काय? बोल. श्वेता प्लीज. तूही असं गप्प राहू नको.” सारंग काकुळतीला येऊन बोलत होता.
“भाऊजी अहो तसं काळजी करण्यासारखं काहीच नाही. तात्यांनी सांगितलं आहे, कुठे काही बोलायचं नाही म्हणून.” असे म्हणत श्वेताने आपली जीभ चावली. पण आता काहीच उपयोग नव्हता. शब्द तोंडून बाहेर पडले होते.
“म्हणजे?” सारंग.
“मी सांगते. पण तुम्ही रागावू नका. ताई आणि शंतनूचं एकमेकांवर प्रेम होतं. पण तात्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला.” श्वेता थोडी भीत भीतच बोलली.
“अस्सं..?हा शंतनू कोण? सारंग.
“तिच्या कॉलेजमध्ये होता. ताईच्या कविता ऐकून, वाचून त्याचं मन जडल होतं तिच्यावर. पण आता हा विषय संपला आहे. तोही इथे राहत नाही, मोठ्या शहरात नोकरी धरली आहे त्याने. पण भाऊजी मी हे सारं काही तुम्हाला सांगितलं आहे हे ताईला किंवा तात्यांना कळू देऊ नका. नाहीतर माझे काही खरे नाही.” श्वेता घाईघाईने म्हणाली.
“मी वचन देतो तुला. नाही कळणार हे कोणाला. तू नको काळजी करू आणि हो थँक्स.. हे सारं सांगितल्याबद्दल.” सारंग.
“पण भाऊजी तुम्ही ताईला काहीच बोलू नका. कारण तिची यात काहीच चूक नाही. तिने फक्त तात्यांच्या शब्दाचा मान राखला.” श्वेता काळजीने म्हणाली.
इतक्यात रेवती आल्याने हा विषय तिथेच थांबला.
दुसऱ्या दिवशी तात्या आणि नीताताई श्वेताला घरी न्यायला आले. मालतीबाईंनी त्यांचा यथायोग्य मानपान केला आणि श्वेताला खूप साऱ्या भेटवस्तू दिल्या.
“अहो, इतके सारे कशासाठी?” नीताताई संकोचून मालतीबाईंना म्हणाल्या.
“तुमच्या मुली दिवसभर इथे घरभर बागडल्या, घर कसं अगदी भरून गेल्यासारखे वाटलं आम्हाला. तुमची धाकटीही गुणी आहे. मला अजून एक मुलगा असता, तर दुसरी सून करून घेतली असती मी तिला.” मालतीबाईंचे हे बोल ऐकून तात्या आणि नीताताईंना समाधान वाटले.
“मालतीबाई..आता मुलांचा पहिला दिवाळसण जवळ आला. आम्ही नंतर रीतसर आमंत्रण देऊच. पण म्हंटल आधी कल्पना द्यावी. आपण साऱ्यांनी सहकुटुंब घरी यावं, ही विनंती.” नीताताई आणि तात्या निघताना म्हणाले आणि साऱ्यांचा निरोप घेऊन ते श्वेतासह बाहेर पडले.
तशा मालतीबाई रेवती आणि सारंगकडे पाहून म्हणाल्या, “इथे बसा जरा बोलायचे आहे तुम्हा दोघांशी.” हे ऐकून रेवतीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. ती घाबरून गेली.
“अहो, सुनबाई इतकं घाबरायच कारण नाही काही. बसा, मग सविस्तर सांगते सारं.” मालतीबाई हसतच रेवतीला म्हणाल्या.
“रेवती तू या घरची एकुलती एक सून. तू हे घरं आपलं समजून सांभाळावं, सासू -सासरे म्हणून आमचा मान ठेवावा, यासारख्या अपेक्षा आम्हाला तुझ्याकडून असणं साहजिकच आहे आणि एकंदरीत तुझा स्वभाव पाहता तू त्या पूर्ण करशील याचीही खात्री आहे आम्हाला आणि हेही लक्षात ठेव. तुला कधीही, काहीही अडचण आली तरी आम्ही कायम तुझ्या मदतीला असू. तुझ्या मनात काही सलत असेल तर निश्चित आम्हाला सांग. मार्ग काढू आपण त्यातून. पण अशी उदास नको गं राहू. मन मोकळं करत जा, माझ्याकडे नाही तरी निदान सारंगशी तरी मनमोकळ बोलत जा.
या घरी तुला पूर्ण स्वातंत्र्य असेल. नोकरी करणार असशील तर आमचे काही म्हणणे नाही आणि करणार नसशील तरी, घर सांभाळेलस तरी आमचे काही म्हणणे नाही.”
हे ऐकून रेवतीच्या मनावरचे दडपण थोडे कमी झाले.
“आई, तुम्ही सांगितलेले सारं काही लक्षात ठेवेन मी.” रेवती आपल्या सासुबाईंना म्हणाली.
“बरं तुमचं झालं असलं तर मी एक बोलू का?” सारंग विषय बदलत म्हणाला,
“आई मी आणि रेवती चार दिवस कुठेतरी बाहेर फिरून यावं म्हणतो.”
“हो जाऊन या.” मालतीबाईंनी परवानगी दिली आणि त्या आपल्या खोलीत निघून गेल्या.
“रेवती आपण कधी आणि कुठे जायचं हे माझ्या कामावर ठरवू. म्हणजे मला सुट्टीही मिळायला हवी. मी उद्याच सुट्टीचा अर्ज टाकतो. चालेल ना तुला?” सारंग रेवतीकडे पाहत म्हणाला.
सारंगच्या एकटक पाहण्याने रेवती अस्वस्थ झाली. “हो. चालेल मला.” इतके बोलून ती आत निघून गेली.
सारंगला सुट्टी मिळताच त्याने गोव्याला जायचे ठरवले.
“आपण इतक्या दूर जायचे? इथेच जवळपास गेलो तर नाही का चालणार?” रेवती बॅग भरताना सारंगला विचारत होती.
“अगं, फार काही लांब नाही ते. मी सोबत आहेच ना तुझ्या? एकटीला नाही पाठवतो आहे मी तुला आणि गाडी आपलीच आहे. सोबत ड्रायव्हर काका आहेतच. त्यामुळे काळजी नसावी.”
दुसऱ्याच दिवशी रेवती आणि सारंग घरातून बाहेर पडले. काही तासांतच दोघे गोव्याला पोहोचले. तिथली राहण्याची व्यवस्था सारंगने आधीच आरक्षित करून ठेवली होती, त्यामुळे काही अडचण आली नाही. तिथलं मोकळं वातावरण, निसर्गसौंदर्य, पसरलेला अथांग समुद्र पाहून रेवती थोडी मोकळी झाली. तिच्या मनावरचा ताण थोडा कमी झाला.
“मग..इथे येऊन आवडलं का आमच्या राणी सरकारांना?” सारंग रेवतीचा हात हातात घेत म्हणाला. अचानक त्या स्पर्शाने रेवती भांबावली.
“हो.आवडलं तर. खूपच छान आहे ही जागा.” रेवती सारंगच्या हातातून आपला हात सोडवत म्हणाली.
तसा सारंग रेवतीच्या आणखी जवळ आला. तशी रेवती मागे वळून जाणार इतक्यात सारंगने तिला अडवले.
“आज माझ्या जागी जर शंतनू असता, तरीही तू अशीच निघून गेली असतीस?” सारंगच्या डोळ्यातला राग पाहून रेवती जागच्या जागी खिळून उभी राहिली. सारंगच्या तोंडून शंतनूचे नाव ऐकून रेवतीला घाम फुटला.
“तू…तुम्हाला कसे माहिती? म्हणजे हे कोणी सांगितले?” रेवतीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता.
“ते महत्वाचे नाही. पण हे खरे आहे ना?” सारंग तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला. तशी रेवती रडू लागली.
“म्हणजे हे खरे आहे तर..” उसासा सोडत सारंग म्हणाला.
“रेवती बस इथे.” सारंग समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाला. तरीही रेवती तशीच उभी राहिली.
“मी म्हणतो, बस इथे.” सारंगच्या चढलेल्या आवाजाने घाबरून रेवती समोरच्या खुर्चीवर बसली. तसा तोही तिच्या जवळ बसला.
“मी तुला आधीच विचारले होते याबाबत. मग तेव्हाच का नाही सांगितलेस रेवती? काहीतरी मार्ग काढला असता आपण. तात्यांचा नकार होता तुमच्या लग्नाला! बरोबर ना? म्हणून तू माझ्याशी लग्न केलेस? बोल रेवती. तुझा हा शांतपणा मला सहन नाही होत आता. अगं आपल्या लग्नाची किती स्वप्न रंगवली होती मी. तुम्हा मुलींच्या आयुष्यातला सर्वात सुंदर प्रसंग म्हणजे लग्न ना? तसाच आम्हा पुरुषांच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय प्रसंग असतो तो. तोही स्वप्न पाहतो, आपल्या जोडीदाराची. आपल्या जोडीदाराच्या रुपाने त्याच्या आयुष्यात हक्काची एक सखी येते, तो आपल्या मनातलं सारं काही बोलू शकतो तिच्याशी.
तुला पाहून वाटलं आपल्या स्वप्नातला जोडीदार तुझ्या रुपाने माझ्या आयुष्यात आला. तुझे पाणीदार डोळे, चाफेकळी नाक, चेहऱ्यावरचा शांतपणा..पाहून मी प्रेमात पडलो तुझ्या. आपलं लग्न ठरलं तेव्हाच मला काहीतरी चुकतंय असं वाटतं होतं. तेव्हाच जर मला हे कळलं असतं तर मी माघार घेतली असती. का वागलीस अशी? तुझं लग्न जरी माझ्याबरोबर झालं असलं तरी तू मनाने माझी नाहीस.. कसा संसार करू मी तुझ्याबरोबर? बोल काहीतरी. खरचं ही शांतता नाही सहन होत मला.
मी खूप विचार केला यावर. तू.. शंतनूकडे जाऊ शकतेस. आईच्या खूप अपेक्षा होत्या तुझ्याकडून. पण मी समजावेन तिला आणि बाकी परिस्थितीही मी सांभाळून घेईन. तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल.” सारंग रेवतीची नजर टाळत म्हणाला.
“आम्हालाही मन असतं रेवती. मात्र मनातलं बोललं की आम्हाला लोक कमजोर समजतात. आम्हाला धड व्यक्त होता येत नाही, की साऱ्या गोष्टी मनात साठवता येत नाहीत. अशावेळी काय करायला हवं आम्ही? तू विचार कर आणि निर्णय घे. तो मला मान्य असेल.” सारंग आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला.
“अहो तुम्ही शांत व्हा. आपलं लग्न झालं आहे. हे विसरून कसं चालेल? आणि असा कसा निर्णय घेऊ मी? घरचे काय म्हणतील, लोक काय म्हणतील? शंतनू माझा भूतकाळ होता. तो विसरणे थोडं अवघड आहे हे खरं. कदाचित काळाच्या ओघात त्याच्या आठवणी पुसट होत जातीलही..थोडा वेळ द्या मला. सारं काही ठीक होईल. मला तुम्हाला अंधारात ठेवायचं नव्हतं. पण तात्याच म्हणाले, हा विषय इथून पुढे कायमचा बंद. कारण तात्यांना तुम्ही मनापासून पसंत होता. त्यांच्या शब्दाबाहेर मी कशी जाणार? शेवटी ते माझे वडील..आणि शंतनूचे देखील हेच म्हणणे होते की तात्यांनी परवानगी दिली तरच आपण लग्न करू म्हणून. अखेर तात्यांनी परवानगी दिली नाहीच. पण मला थोडा वेळ द्या. मी जुन्या आठवणी पुसायचा नक्की प्रयत्न करेन.” रेवती सारंगचा हात हातात घेत म्हणाली.
क्रमशः
====================
मागील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag3/
पुढील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag5/
===================
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.