‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग ३

“बघा ना, आपली रेवू किती शांत, समंजस, हळवी. पण श्वेता मात्र अवखळ, अल्लड, थोडीशी रागीट. किती फरक आहे दोघींच्या स्वभावात! तरी श्वेता आपल्या ताईची सावली बनून राहते आणि माझं पानही हलत नाही रेवती शिवाय. रेवतीचं लग्न झाल्यावर घर किती सूनं सूनं वाटेल आम्हा दोघींना.” नीताताई हळव्या होत म्हणाल्या.
“जगाची रीतच आहे ती. मुलगी म्हंटले की एक ना एक दिवस लग्न होऊन ती सासरी जाणारच. बघा, रेवती आपल्या स्वभावाने सासरच्या मंडळींची मनं जिंकेल, त्यांना आपलंस करेल. विश्वास आहे मला.” नीताताईंचे बोलणे ऐकून तात्याही हळवे झाले.
तात्या आणि आईचे हे बोलणे नकळत रेवतीच्या कानावर पडत होते. तात्यांची हळवी बाजू आजच समजली तिला. तात्यांचही आपल्यावर खूप प्रेम आहे हे जाणून ती मनातून सुखावली. पण ‘माझं आणि शंतनूच प्रेम त्यांनी समजून घेतलं असतं तर खूप बरं झालं असतं.’ असं क्षणभर तिला वाटून गेलं. पण नशिबापुढे कोणाचे काय चालणार? हे तितकेच खरे आहे की मी शंतनूला विसरू शकत नाही.
“रेवा, अगं तू कॉलेजमधल्या वार्षिक संमेलनात तुझी ‘विरह’ नावाची कविता सादर कर. खूप खूप सुंदर आहे ती कविता.” शंतनू रेवतीच्या मागे लागला होता.
‘विरहाचा सुगंध श्वासात भरून घेतल्याविना खऱ्या प्रेमाची भावना हृदयापर्यंत पोहचत नाही. विरह म्हणजे प्रेमाचा अंकुर नव्याने फुलण्यासाठी झालेली शिशिरातली न सोसणारी पानगळ. विरहात मागे राहतात केवळ आठवणी, मग त्या सुखद असो वा दुःखद..’
अशा आशयाची कविता होती ती. शेवटी विरहच नशिबी होता तर..’ रेवती स्वतःशीच पुटपुटत होती.
“ताई.. श्वेताच्या हाकेने रेवती भानावर आली. अगं बाहेर तुझ्या होणाऱ्या सासुबाई आणि सासरे आले आहेत. कधीचे बोलवत आहेत तुला. चल लवकर.” श्वेताने रेवतीला ओढतच बाहेर नेले.
“साखरपुडा घरच्या घरी उरकून घेऊ आणि लग्न मात्र दणक्यात पार पडेल. अहो, आमच्याकडले हे पहिलेच कार्य. रीतीनुसार मानपान होतील. त्याची काळजी नको.” तात्या व्याह्यांशी अगदी उत्साहात बोलत होते.
रेवतीला पाहताच तिच्या सासुबाई उठून एकदम पुढे आल्या. “ये तुझीच वाट पाहत होतो आम्ही. ही अंगठीची काही डिझाईन्स आणली आहेत. बघून घे आणि एखादी निवड त्यातली.”
रेवती आणि श्वेता डिझाईन्स पाहू लागल्या. काही वेळाने एका डिझाईनची निवड करून रेवती आपल्या सासुबाईंच्या जवळ दिली.
“नीताताई, आमच्या सुनेच्या साड्या खरेदी मात्र आमच्याकडे राहील. पसंती जरी तिची असली तरी खरेदी आमच्याकडे लागली. मला मुलगी नाही. यामुळे माझी हौस तरी फिटेल.” मालतीबाई नीताताईंना म्हणाल्या. तशी नीताताईंनी हसून मान डोलावली.
काही वेळाने मानपानाच्या गोष्टी करून रेवतीचे सासू-सासरे निघून गेले.
“रेवू, काहीही म्हणा. तुझ्या होणाऱ्या सासुबाईंची गोष्टच निराळी आहे. असे काहीतरी वेगळेपण आहे त्यांच्यात, जे समोरच्यालाही आपलंसं करून घेतं आणि तुझे सासरेही स्वभावाने प्रेमळ वाटतात गं. त्यांचंही वागणं -बोलणं अगदी आदबशीर आहे आणि सारंगरावांचा तर प्रश्नच नाही.
खरं सांगू का रेवती, शोधूनही तुला असं सासर मिळालं नसतं. त्यामुळे नशिबात आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर आणि झालं गेलं विसरून जीवनाची पुन्हा नव्याने सुरुवात कर. तात्यांचा शंतनूला नकार देण्यामागे काहीतरी कारण असेलच ना? थोडं त्यांच्या जागी राहून विचार कर. या नकारामागेही तुझ्या भल्याचाच विचार असेल कदाचित.” आई आवरता आवरता रेवतीशी बोलत होती.
“ताई, एक सांगू का? शंतनूची गोष्ट वेगळीच होती. पण सारंग भाऊजीही उमदे वाटतात. खरंतर आमच्या कॉलेजच्या भाषेत तुम्ही दोघे एकदम ‘कूल कपल’ वाटता. अगदी मेड फॉर इच अदर..”
हे ऐकून रेवतीला हसूच आलं. कितीतरी दिवसांनी ती अशी मनमोकळी हसत होती. हे पाहून नीताताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मनातल्या मनातच रेवतीची दृष्ट काढली. ‘ही आयुष्यभर अशीच हसत राहू दे.’ अशी मनोमन प्रार्थना त्यांनी देवाला केली.
इकडे सारंगला रेवती शिवाय काही सुचत नव्हतं. त्याला रेवतीचा शांत स्वभाव खूपच आवडला होता. पण ‘तिच्या मनात काहीतरी वेगळंच आहे.’ हा विचार त्याचे मन खात होता. तरीही तिने लग्नाला होकार दिला असल्याने सारंग खुश होता.
पुढच्या आठवड्यात रेवती आणि सारंगचा साखरपुडा पार पडला आणि दोन्ही घरी लग्नाची लगबग सुरू झाली. रेवती बऱ्यापैकी सावरली असली तरी शंतनूचा विचार तिच्या डोक्यातून जात नव्हता. मात्र सारंगचा स्वभाव नकळत तिला आपलसं करत होता.
लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला, तसे घर पाहुण्यांनी भरून गेले. रेवतीच्या मावश्या, मामा – मामी, काका- काकू, भावंडं, इतर नातेवाईक असा सारा गोतावळा जमला. नीताताई उत्साहाने कामं करत होत्या, तर तात्या पाहुण्यांच्या सरबराईत गुंतले होते.
बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. नवरा- नवरीला हळद लागली. नीताताईंना आपल्या मुलीला पाहून भरून आलं. आता अगदी काही वेळातच तिची पाठवणी होईल या विचाराने त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
लग्नाचा मुहूर्त जवळ आला. आपल्या लेकीला वधूच्या वेशात पाहून शरदरावही गहिवरले. श्वेता करवली म्हणून उत्साहाने सगळीकडे मिरवत होती. मुहूर्त साधून भटजींनी मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. ‘लेकीच्या पहिल्या अक्षता आईने पाहू नयेत.’ म्हणून नीताताई बाजूच्या खोलीत येऊन थांबल्या. काही क्षणांतच सनई -चौघडे वाजले आणि रेवती आणि सारंगने एकमेकांच्या गळ्यात हार घातले. लग्न पार पडले. जेवणाच्या पंगतीही उठल्या.
पाठवणीच्या वेळी रेवती नीताताईंच्या गळ्यात पडून खूप खूप रडली. “ताई तुझी कमी खूप जाणवेल गं”..असे म्हणत श्वेताही तिला बिलगली. तात्याही भरल्या डोळ्यांनी आपली लेक आपल्याजवळ कधी येईल याची वाट पाहत राहिले. मात्र रेवतीचे ‘तात्या मी येते” इतकेच शब्द त्यांच्या कानावर पडले. तरीही तात्या आपल्या लाडक्या लेकीचा हात हातात घेत म्हणाले, “निष्ठुर वाटत असलो तरी तुझा बाप आहे मी इतकेच लक्षात ठेव.” रेवतीच्या चेहऱ्याकडे पाहून क्षणभर तात्यांना वाटले, ‘अगदी खऱ्या अर्थाने आपली लेक आज आपल्यापासून दूर चालली आहे. खरंच माझे चुकले तर नाही ना?’
मागे वळून पाहत रेवतीने आपल्या सगळ्या नातेवाईकांचा निरोप घेतला आणि ती सजवलेल्या गाडीत जाऊन बसली. तात्या आणि नीताताईंनी आपल्या व्याह्यांसमोर हात जोडले, “काही चुकले असल्यास क्षमा करा आणि आमच्या पोरीला सुखी ठेवा. ही विनंती.”
“शरदराव असे काय करता? तुमची मुलगी आमच्या घरी सून म्हणून नाही, तर लेक बनून येते आहे. ती आता आमची जबाबदारी. तुम्ही निश्चिंत रहा.” आपल्या व्याह्यांचे बोलणे ऐकून तात्यांच्या मनावरचे ओझे उतरले आणि भरल्या डोळ्यांनी त्यांनी रेवतीला निरोप दिला.
जोशींच्या घरी रेवतीचे जोरदार स्वागत झाले. नवी सून म्हणून पाहुणे मंडळी तिच्या मागेपुढे करू लागली. दुसऱ्या दिवशी पूजा झाली आणि सारी जोशी मंडळी देवदर्शनाला गेली.
सारंगला अजूनही काही उमगत नव्हते. रेवती म्हणावी तशी आनंदी दिसत नव्हती. खरंतर लग्न म्हणजे एका मुलीच्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग. मग त्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा सोडून, ती केवळ सोपस्कार पूर्ण केल्याप्रमाणे वागत होती. कोणी काही बोलले तर तेवढेच मोजके बोलत होती. मालतीबाई मात्र तिच्या या वागण्याकडे ‘ती अजून नवीन आहे ‘ असे म्हणत दुर्लक्ष करत होत्या. पण नाही म्हणता म्हणता रेवती सासरी रुळत होती.
जवळ जवळ पंधरा दिवसानंतर रेवती माहेरी गेली. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आलेल्या लेकीचे खूप कौतुक होत असते..नीताताईंनी रेवतीची दृष्ट काढून तिला घरात घेतले. जेवणं झाल्यावर दोघी मायलेकी बराच वेळ बोलत राहिल्या. रेवतीच्या चेहऱ्यावरचे नव्या नवरीचे तेज नीताताई निरखून पाहत होत्या. आपले लेक सासरी सुखात आहे, हे त्यांना न सांगताही कळत होते. काही वेळाने तात्या आणि श्वेता घरी आले. समोर रेवतीला पाहून दोघांनाही खूप आनंद झाला. तात्यांनी आपल्या लेकीची विचारपूस केली आणि श्वेता तिला घेऊन आपल्या खोलीत गेली.
“तायडू, तू कशी आहेस? आणि भाऊजी कसे आहेत गं?”
“आम्ही दोघेही ठीक आहोत.” रेवती म्हणाली.
“तसं नव्हे गं..म्हणजे भाऊजी स्वभावाने कसे आहेत? म्हणजे तुझ्याशी वागायला, बोलायला कसे आहेत? तुझी नीट काळजी घेतात ना?” श्वेता गडबडीने रेवतीला विचारत होती.
“हो अगं. किती प्रश्न विचारतेस एकाच वेळी? तिकडे स्वभावाने सगळेच चांगले आहेत. सासुबाई मला खूप सांभाळून घेतात आणि सासरे आहेत आपल्या तात्यांसारखेच. पण त्यांच्यासारखे कडक शिस्तीचे अजिबात नाहीत. सारंगही माझी खूप काळजी घेतात. इतकं ऐकून झालं ना समाधान?की आणखी काही ऐकायचं आहे..?” रेवती श्वेताला म्हणाली.
“हो तर. आता फिरायला कुठे जाणार आहात ते तेवढं सांग.” श्वेता रेवतीच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाली.
“ते काही अजून नाही ठरलं. बघू पुढचं पुढे आणि तुला कशाला हव्यात या नसत्या चौकश्या?” रेवती श्वेताचा कान पकडत म्हणाली.
“तू पुढचं काही सांगशील तर ऐकेनही. बरं मला एक सांगायचे होते की, शंतनू मोठ्या शहरात गेला आहे म्हणे नोकरीसाठी. इथली नोकरी कायमची सोडून. माझ्या कानावर इतकेच आले हा..बाकी मला माहीत नाही.” श्वेताने रेवतीला माहिती पुरवली.
“श्वेतू जाऊदे ना तो विषय. मला सांग तात्या आणि आई कसे आहेत?” रेवती.
“हो अगं. ते सांगायचे राहूनच गेले. तात्या उठता- बसता तुझी आठवण काढतात आता आणि आपल्या आईचे तर तुला माहितीच आहे. रेवू शिवाय माझे पानही हालत नाही, असे म्हणत घरातली सगळी कामे तिचं करून टाकते. मग तात्या मला कधी कधी ओरडत राहतात, रेवू सारखी घरकाम शिकून घे म्हणून. पण अजून मी त्यात लक्ष घातले नाही फारसे. ताई तू अजून इथे चार दिवस आहेस ना? नंतर मी येऊ का गं तुझ्या सासरी..चार दिवस राहायला? तशीही आता सुट्टीच आहे आम्हाला.”
“ये. पण मी सासूबाईंना विचारुन नक्की सांगेन.” रेवती म्हणाली आणि दोघी बहिणी आणखी बराच वेळ बोलत राहिल्या.
क्रमशः
====================
मागील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag2/
पुढील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag4/
====================
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.