‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग 2

“अगं सकाळी सकाळी कुठे नेते आहेस मला?” रेवती आवरता आवरता श्वेताला म्हणत होती.
“कालच सांगितले ना तुला, देवीच्या दर्शनाला जायचे आहे म्हणून. आवर लगेच. तिथून पुढे मला कॉलेजला जायचं आहे.” रेवतीचा प्रश्नार्थक चेहरा पाहून श्वेता तिला गडबड करू लागली.
पुढच्या दहा मिनिटात दोघी आवरून घरातून बाहेर पडल्या.
“ताई आपण शंतनूला भेटायला चाललो आहोत. तात्यांना कळू नये म्हणून मी तुला आधी बोलले नाही. काल रात्री आईने सारं काही सांगितलं मला. मग सकाळी लवकर उठून शेजारच्या पिंट्याकडून शंतनूला निरोप पाठवला. तो आता आला असेल देवळात. तुम्ही दोघं बोला. मी तिथून पुढे कॉलेजला जाईन.” हे ऐकून रेवती आपल्या बहिणीचा हात हातात घेऊन मूकपणे चालत राहिली.
देवळाच्या आवारात शंतनूला पाहून रेवतीला एकदम भरून आलं. तिला खूप काही बोलायचं होतं त्याच्याशी. या दोघांची गाठ पडताच श्वेता कॉलेजला निघून गेली.
बराच वेळ कोणीच काही बोलेना.
“तात्यांनी आपल्या लग्नाला नकार दिला तर?” शंतनू रेवतीच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला.
“हे तुला कसे काय कळाले?” रेवती आपली नजर बाजूला करत म्हणाली.
“तुझा पडलेला चेहराच सांगतो आहे.” शंतनू.
“शंतनू तू एक काम करशील? आमच्या घरी येऊन तात्यांना रीतसर माझा हात मागशील?” रेवती.
“हे शक्य नाही आता.” शंतनू बसल्या जागेवरून उठत म्हणाला.
“पण का? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना?” रेवतीने त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली.
“आहे तर. अगदी जीवापाड प्रेम आहे माझे तुझ्यावर.” शंतनू.
“मग हा नकार का?” रेवती.
“मनातल्या साऱ्या गोष्टी कधी कधी व्यक्त करता येत नाहीत. हे हवं तर तसं समज.”शंतनू रेवतीची नजर टाळत म्हणाला.
“असे नको म्हणू रे. मला हे सारं हवं आहे. तुझ्या आठवणीत रमून जाणं, अनामिक ओढीने तुला भेटावसं वाटणं..त्याही पुढे जाऊन मला माझं सगळं आयुष्य तुझ्यासोबत काढायचं होतं. पण तात्यांनी परवानगी दिली नाही आणि त्यांच्या परवानगी शिवाय आपलं लग्न होणं शक्य नाही. मला हा विरह नको रे. फक्त तुझी सोबत हवी आहे. तू तात्यांना समजावं. कदाचित त्यांचे मन पालटेल. आज संध्याकाळी मला पाहायला मुलगा येणार आहे. आता तू नाही म्हंटलास ना तर मला त्याच्याशी लग्न करावं लागेल.”
“रेवा, कदाचित उद्या दुसरीच व्यक्ती तुझा हात हातात घेईल आणि माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करेल! जगातली सर्वात सुंदर भावना म्हणजे प्रेम. या प्रेमालाही सामाजिक मान्यता लागते. प्रेम म्हणजे एक जबाबदारी, एकमेकांवरचा विश्वास. त्याला अनेक बंधन, मर्यादा असतात. या भावनेला चेहरा नसतो, असते ते फक्त मन आणि तू आपल्या लग्नाचा विचार करत असशील तर.. केवळ एकमेकांची मनं जुळून चालत नाही गं.
त्यासाठी घरच्यांची परवानगीही लागते. तुझे तात्या आपल्या लग्नाला परवानगी कधीही देणार नाहीत. त्यामुळे मला विसरून जा आणि ते म्हणतील त्या मुलाशी तू लग्न कर.” क्षणभर रेवतीला शंतनूच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा भास झाला.
“ठीक आहे. तू म्हणशील तसेच होईल. एक शेवटचा प्रयत्न म्हणून मला तुला भेटायचे होते. माझं लग्न कोणाशीही होऊ दे. पण आयुष्यभर मी फक्त तुझ्यावर प्रेम करत राहीन. आपल्या आठवणी मी जीवापाड जपेन.” इतके बोलून रेवती मागे वळून न पाहता तिथून निघाली आणि शंतनू मात्र तिथेच बसून राहिला. रेवतीला दिसू नयेत म्हणून त्याने इतका वेळ थोपवून धरलेले डोळ्यातले अश्रू शेवटी ओघळलेच.
संध्याकाळी ठरल्या वेळेत जोशी मंडळी हजर झाली. तात्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं. एकंदरीत मुलाकडील मंडळींना रेवती पसंत आहे, असे दिसताच तात्यांनी आपणहून मुलाकडची सगळी माहिती विचारून घेतली आणि आपलीही सारी माहिती त्यांना सांगितली.
मुलाला म्हणजेच, “सारंगला ” रेवती आवडली होतीच. आता केवळ औपचारिकता बाकी होती. सारंगला रेवतीला काही विचारायचे होते. पण रेवतीने अजूनही सारंगकडे मान वर करून देखील पाहिले नव्हते. सारंगच्या आई मालतीबाई जेवढे प्रश्न विचारतील तेवढीच उत्तर देत होती रेवती. हे पाहून तात्या मात्र अस्वस्थ झाले होते. इतके चांगले स्थळ हातचे जायला नको, म्हणून गडबड करत होते.
शंतनूचा नकार रेवतीच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे ती शांत असली तरी मनातून अस्वस्थ होती.
अखेर सारंगच्या आईंनी ‘आम्हाला रेवती पसंत आहे.’ असे सांगितल्यावर तात्यांनी निःश्वास सोडला. रेवतीच्या शांत राहण्याला तात्यांनी होकार समजून रेवती आणि सारंगची सोयरीक पक्की केली.
निघताना रेवतीच्या होणाऱ्या सासुबाईंनी तिची ओटी भरून हातात पेढ्याचा पुडा दिला. मग रेवती रीत म्हणून त्यांच्या पाया पडली. तशा मालतीबाई तिला जवळ घेत म्हणाल्या, “माझी एकुलती एक होणारी सून आहेस तू. आमच्या घरी तुझं अगदी थाटामाटात स्वागत होईल बघ. ये लवकर. आम्ही सारे वाट पाहत आहोत तुझी.” हे ऐकून रेवती बळेच हसली.
“ताई, तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. तुमची मुलगी आता आमची झाली. तशी आमची मागणीही काही नाही. देवाच्या दयेने पुष्कळ आहे आम्हाला. तुम्ही केवळ नारळ आणि मुलगी द्या.” मालतीबाई नीताताईंना म्हणाल्या.
पाहुण्यांना निरोप देऊन तात्या लगबगीने घरात आले. “बघा, मी म्हंटल होतं ना? माणसं अगदी चांगली आहेत म्हणून. आपली मुलगी अगदी सुखात राहील तिथे. आपल्या लेकी सुखात असाव्यात, हे कोणत्या बापाला वाटणार नाही?”
“मग तात्या, ताईचं सुख कशात आहे हे माहिती असूनही तुम्ही असे का वागलात?” श्वेता मध्येच तात्यांच बोलणं तोडत म्हणाली.
“तुला काय कळतं यातलं? एका बापाच्या नजरेतून पोरीचं भविष्य पाहिलं की सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तुला.” शरदराव आपल्या धाकट्या मुलीवर खेकसत म्हणाले.
“पण तात्या एकदा..” श्वेता आणखी काही बोलणार इतक्यात नीताताईंनी तिला गप्प
राहण्याची खूण केली.
“अहो, मी काय म्हणते, रेवतीला एकदा पसंती विचारुन घ्या. पुढे जाऊन उगीच काही घोळ नको व्हायला.” असे म्हणत नीताताईंनी रेवतीला हाक मारली.
“आता तिला आणि काय विचारायचे? आपण होकार कळवला आहे ना त्यांना. मुलात नाकारण्यासारखे काहीच नाही. दिसायला राजबिंडा आहे, अगदी आपल्या रेवतीला शोभेल असा. चांगली नोकरी आहे. घरची माणसे स्वभावाने चांगली आहेत. आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. त्या साठयांच्या मुलाचे प्रकरण जोश्यांपर्यंत जाता कामा नये.” तात्या रेवतीकडे पाहत म्हणाले. तशी रेवती काहीच न बोलता पुन्हा आपल्या खोलीत निघून गेली.
दुसऱ्या दिवशी सारंगचा निरोप आला. लग्नाची पुढची बोलणी होण्याआधी त्याला रेवती सोबत थोडे बोलायचे होते. खरंतर रेवतीची जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण तात्या स्वतः तिला सारंगच्या घरी घेऊन आले. त्यामुळे रेवतीचा नाईलाज झाला.
चहापाणी झाल्यावर सारंगने रेवतीला आपला बंगला दाखवला आणि काही गोष्टी बोलण्यासाठी तो तिला बंगल्यालगतच्या बागेत घेऊन आला.
“रेवती मी तुला पसंत नाही का?” सारंगने सरळ मुद्द्यालाच हात घातला. “कारण काल पाहण्याच्या कार्यक्रमात तू माझ्याकडे एकदाही नजर वर करूनही पाहिले नाहीस. माझ्या आईने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अगदी तुटकपणे दिलीस. जेव्हा तुझा फोटो पाहिला ना मी, तेव्हाच तू खूप आवडलीस मला. पण तू ही मला पसंत करावसं अशी जबरदस्ती नाही करू शकत मी तुझ्यावर. अजूनही वेळ गेली नाही. तू हवा तर नकार देऊ शकतेस मला.”
“कालच होकार दिला आहे मी तुम्हाला. आता यामध्ये बदल होणे शक्य नाही.” रेवती निर्विकार चेहऱ्याने सारंगकडे पाहत म्हणाली.
“मग मला तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद का दिसत नाही? मला खरं खरं सांग रेवती, तुझ्या मनाविरुद्ध तर हे घडत नाही ना? की दुसरं कोणी आवडतं तुला?” सारंग.
बराच वेळ रेवती काहीच बोलली नाही. तिचं असं शांत बसणं सारंगला अस्वस्थ करत होतं. मग काही वेळाने शब्दांची जुळवा जुळव करत रेवती म्हणाली, “आपल्याला कोणी आवडतं.. यापेक्षा आपण कुणाला तरी आवडतो, हे जास्त महत्त्वाचं नाही का? या लग्नाला माझा होकार आहे.” हे ऐकून सारंगला जरी बरं वाटलं असलं तरी त्याचे समाधान झाले नव्हते.
इकडे मनासारखा जावई मिळाल्याने तात्या खुश होते. लग्नाचा जवळचा मुहूर्त पाहून लग्न लवकर उरकून टाकू म्हणून ते जोश्यांच्या मागे लागले होते. तरी तयारीला वेळ हवा म्हणून महिन्यानंतरचा मुहूर्त काढून दोन्ही घरी लग्नाची लगबग सुरु झाली.
“इतके दिवस पोरीचे लग्न ठरत नव्हते, तेव्हा जीवाला घोर लागून राहिला होता. पण आता ठरलेले लग्न नीट पार पडेल ना? याचा वेगळाच ताण आला आहे. आपल्या मुली किती लवकर मोठ्या झाल्या! त्याचं बालपण सरलं, शिक्षण पूर्ण झालं आणि बघता बघता लग्नाची वेळ आली.
पण नीता, रेवतीकडून अशी अपेक्षा नव्हती मला. त्या साठ्यांच्या मुलांत तिने काय पाहिलं देवच जाणे! तसा तो मुलगा चांगला आहे. पण केवळ प्रेमावर सारं भागत नाही. त्यासाठी
पैसाही महत्वाचा असतो. मान्य आहे, त्याच्याकडे चांगली नोकरी आहे.
पण सारंगरावांना जसा आपल्या आई -वडीलांकडून एक सुरक्षित पाठिंबा आहे, तसा त्या शंतनूला नाही. शेवटी कुठलाही बाप आपल्या पोरीच्या भविष्याचा विचार हा करणारच. पोरीचा बाप म्हणून जेवढा कडक वाटतो, तितकाच हळवा आहे मी. हे मी कोणाला दाखवून देत नाही इतकेच.
आपल्या मुलींना सारं काही दिलं आपण. मग त्यांच्या सुरक्षित भविष्याचा विचार केला तर काय चुकीचं केलं मी? माझंही माझ्या मुलींवर खूप प्रेम आहे गं. त्यांच्या लग्नाची तरतूद कशी करायची याची काळजी मला कधीच नव्हती. मात्र आपल्या लेकी एक ना एक दिवस हे घर सोडून परक्या घरी जाणार ही काळजी मला सतावत होती.” तात्या निताताईंशी बोलताना आज फार हळवे झाले होते.
“हे सारं जरी खरं असलं तरीही कुठेतरी रेवतीच्या मनाचा विचार व्हायला हवा होता, असे राहून राहून वाटते मला. तिचा जीव त्या शंतनूवर जडला. आता हे सारं विसरून ती सासरी सुखाने नांदायला हवी इतकीच माझी इच्छा आहे.” नीताताई तात्यांना म्हणाल्या.
क्रमशः
©️®️सायली
=====================
मागील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag1/
पुढील भाग:
https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag3/
=====================
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.