बांडगुळं

©️®️सौ.गीता गजानन गरुड.
प्रभाकरपंतांना लागोपाठ तीन मुली. जयश्री,भाग्यश्री व वनश्री. मुलाची आशा होतीच त्यांना. चौथ्यावेळेला घरात अगदी परीक्षेच्या निकालासारखं वातावरण.
मुली बाहेर ओट्यावर पचीने खेळत होत्या. सीमाच्या पोटात दुखायला लागलं तसं जयश्रीला दामोदरपंतांनी पार्वतीआजीकडे पाठवलं.
पार्वतीआजीला अंदाज होताच. ती लगोलग आली. याच्याआधीची सीमाची तिन्ही बाळंतपणं तिनेच तर केली होती. सीमाच्या माहेरची परिस्थिती नाजूक म्हणून पहिलं बाळंतपणही सासरीच झालं होतं.
प्रभाकरपंतांनी पाणी तापत ठेवलं व बाहेर येरझारा घालू लागले.
आईचा रडण्याचा आवाज ऐकून मुली बिचाऱ्या घाबरुन गेल्या. खेळ आवरून पडवीत गप्प बसून राहिल्या.
थोड्या वेळात पार्वतीआजी बाहेर आली व म्हणाली,”प्रभाकरा,हे बाळंतपण अवघड आहे रे बाबा. तू सीमाला जिल्हा रुग्णालयात घेऊन चल. मीही येते तुझ्यासोबत.” प्रभाकरपंत सीमाला व पार्वती आजींना गाडीतून घेऊन गेले. मुली घरी एकट्याच होत्या.
तिन्हीसांज झाली तशी जयश्रीने देवापाशी दिवा लावला. तिघींनी मिळून आईसाठी देवाजवळ प्रार्थना केली. मुलींच्या आजीने त्यांना मदतीला घेऊन चुलीत आग घातली. तांदळाच्या पीठाच्या भाकऱ्या भाजल्या. गरमागरम टम्म फुगलेल्या भाकऱ्या व घट्ट कवडीदही..मुली आवडीने जेवल्या.
तिघींनी मिळून भांडी घासली व आजीला बिलगून झोपी गेल्या.
रात्री मध्येच जयश्रीला जाग आली तर बाजूला आजी नव्हती. तिने आजीला साऱ्या खोल्यांत विजेरीच्या सहाय्याने पाहिलं. देवघरात आजी पाण्यात देव ठेवून बसली होती व देवाला यावेळी तरी माझ्या सुनेच्या पोटी पुत्ररत्न जन्माला घालं असं आर्जव करीत होती. आजीला वंशाचा दिवा हवा होता.
सकाळी पार्वतीबाई गोड बातमी घेऊन आल्या.
” अगं पोरींना भाऊ दिला रामेश्वरानं.”
आजी अगदी खूष झाली. यातून मुलींना मात्र एवढंच कळलं की मुलगा होणं ही घरासाठी अत्यावश्यक बाब होती.
चार दिवसांनी सीमा घरी आली. पार्वतीकाकू बाळाला अंघोळ घालायला व सीमाच्या मालीशसाठी येऊ लागल्या.
आजीने सीमासाठी सुका मेवा घालून मेथीचे लाडू वळले.
घरात सगळीकडे बाळगुटीचा,ओव्याधुपाचा सुगंध दरवळू लागला. तिघी बहिणी बाळाचे खूप लाड करायच्या. बाळही खुदकन हसायचा. बाळाचं बारसं केलं.
बारशात प्रभाकरपंतांनी गावजेवण घातलं. बाळाच्या बहिणी खणाचा परकर पोलका घालून मिरवत होत्या. बाळाच्या आत्याने बाळाचं नाव पुर्णांश ठेवलं.
पुर्णांश हळूहळू मोठा होऊ लागला. त्याच्या बाललीलांच आजीला कोण कौतुक. बाळाच्या पाठीवर तुळशीच्या पानाच्या आकाराचा डाग होता. तसाच डाग म्हणे आजोबांच्या पाठीवर होता. बाळाचे कान म्हणे आजोबांच्या कानासारखे लांबलचक होते. थोडक्यात बाळ म्हणजे आजीला आजोबांचा पुनर्जन्म वाटे. बाळ सकाळी मस्त झोपून राही व रात्री घर डोक्यावर घेई. मग आजी कौतुकाने म्हणे ,”यांच्यासारखाच त्रागा करतो गं बाई.”
जयश्री व भाग्यश्री समजुतदार होत्या. वनश्रीला मात्र वाटे की तिचेही बाळासारखे आईने,आजीने लाड करावेत. बाळ हळूहळू मोठा होऊ लागला. रांगू लागला,एकेक पाऊल टाकू लागला..दुडूदुडू धावू लागला.
प्रभाकरपंत कामावरुन आले की बाळाला घेऊन खेळवायचे. वनश्रीला वाटे की तिच्या वडलांनी तिच्यासोबतही कधीतरी खेळावं पण ते शक्य नव्हतं. प्रभाकरपंतांच्या द्रुष्टीने मुली म्हणजे त्यांच्या संसाराच्या व्रुक्षाला लागलेली बांडगुळं होत्या.
आजीच्या अतीलाडाने बाळ हट्टी होत होता. त्याला काहीही बोलायची किंवा एखादा धपाटा घालायची त्याच्या आईचीही टाप नव्हती कारण आजीच्या मते बाळाच्या रुपात तिचे यजमान जन्माला आले होते. मग सीमा आपल्या सासऱ्याला धपाटा कशी बरं घालेल??
मुली शाळेत जात होत्या. तिथे ..
छोटेसे बहीणभाऊ
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला
उद्याच्या युगाला
नवीन आकार देऊ..
अशा कविता शिकत होत्या व बाळाला म्हणून दाखवीत होत्या. कोणताही खाऊ घरी आणला की मोठा वाटा बाळासाठी काढून ठेवला जात होता.
वनश्री मग चिडायची. सारखे वाटे करा सांगायची. आजी म्हणायची,”अगं असं कसं,बाळ मुलगा आहे. त्याला तुमच्यापेक्षा जास्तच मिळणार. तो या घराचा वंशाचा दिवा आहे. तुमचं काय उद्या लग्न झालं की सासरी निघून जाल. हा सारा डोलारा पुढे बाळाला सांभाळायचा आहे.”
बाळ शाळेत जाऊ लागला. तो अभ्यासात हुशार होता. स्मरणशक्ती दांडगी होती. शिवाय बहिणींच मार्गदर्शन त्याला मिळायचं. आजीला भारी कौतुक वाटायचं, बाळाचं. त्याला पाण्याचा पेलाही आई,आजी हातात आणून द्यायच्या.
मुली वयात आल्या तशा दर महिन्याला त्यांना बाहेर बसावं लागे. तायांच हे वागणं वनश्री पहात होती. त्यांच ते चार दिवस वेगळ्या खोलीत निजणं,त्यांना वेगळं तांब्याभांड,त्यांच वेगळं जेवणाचं ताट. त्यांची भांडी इतर भांड्यांत मिसळत नसत. ती त्यांची त्या धुत. चार दिवसात त्यांना घरात प्रवेश नव्हता. शाळेत मात्र जायला परवानगी होती. शाळेतून आल्यावर घरच्या रिती चालू होत. त्यांना कोणी शिवत नसत. चार दिवसाने मुली आपली खोली सारवत. अंथरूणं विहिरीवर नेऊन स्वच्छ धूत.
वनश्रीलाही पाळी आली. मोठ्या दोघींना समजावून सांगितल्या त्याच रीतीभाती सीमाने वनश्रीलाही सांगितल्या. वनश्रीला ही अस्पृश्यता मुळीच आवडत नव्हती. कधी एकदा चार दिवस संपताहेत असं तिला होई.
वनश्रीला वाटे,”मी मुलगा झालो असतो तर किती बरं झालं असतं! असं वेगळं बसावं लागलं नसतं पण ते काही तिच्या नशिबी नव्हतं. शाळेत विज्ञानाचे धडे गिरवणं न् घरात चार दिवस असं वेगळं बसणं हे तिच्या बुद्धीला पटत नसे. ती मग विरोध करे.
सीमा तिला रागे भरे,”मोठ्या दोघी ऐकतात नं शहाण्यासारखं. तूच कोण मोठी व्हिक्टोरिया राणी लागून गेलीस! बाईच्या जन्माला आलैस ते बाईसारखं वाग. उगा त्यांच्या डोक्याला ताप नको देऊस. तीन मुली उजवायच्या म्हणजे कमी का कटकट आहे! कित्ती चपला झिजवाव्या लागणार आहेत देव जाणे.”
जयश्रीला पहायला मुलं येऊ लागली. सीमा, जयश्रीला छान बाहुलीसारखं साडीचोळी नेसवून तयार करे व बाहेरच्या खोलीत चहा,पोहे घेऊन पाठवी. बाकीच्या दोघींना मागीलदारी ठेवीत.
चारेक कांदापोह्यांचे कार्यक्रम उरकल्यावर पाचवे कांदेपोहे फळाला आले व जयश्रीचे लग्न जमले. जयश्रीच्या लग्नात प्रभाकरपंतांनी सात तोळे सोन्याचे दागिने तिच्या अंगावर घातले.
जयश्री सासरी नांदू लागली. तिचा नवरा प्रायव्हेट कंपनीत कामाला होता. नणंदबाई बरी नव्हती. जयश्रीपेक्षा दोन वर्षांनी लहान पण तिला जयश्रीचं कुणी कौतुक केलं, तर आवडत नसे. तिचा जळफळाट होई. नणंद सारख्यासारख्या जयश्रीच्या चुका काढे व तिला घालूनपाडून बोले.
जयश्री माहेराला आली की आईला सगळं सांगे व मनसोक्त रडे.
पण सीमा तिला म्हणे,” ते तुझ्या नशिबाचे भोग आहेत जयु,जे तुला भोगावेच लागणार. माहेर चार दिवसांच सासर जन्मांतरीचं. ती नणंद काय जाईल थोड्या वर्षांत तिच्या घरी. थोडीसी कळ काढ गं बाई.” जयु बिचारी चार दिवस पाहुण्यासारखी राही व तिच्या घरी जाई.
प्रभाकरपंतांनी भाग्यश्रीचं लग्न जुळवायला सुरुवात केली. भाग्यश्रीला मंगळ आहे हे ऐकताच त्यांच्या मनावर एकदम ताण आला. तिच्याचसारखा दुसरा मंगळवाला शोधायचा कोठून? प्रभाकरपंतांना रात्रीची नीज येईना.
ही पोरगी जन्मभर इथेच रहाणार की काय असं त्यांना वाटू लागलं. हळूहळू ही मंगळाची बातमी वाडीभर पसरली. तिथून ती तिखटमीठ लावून गावभर व पुढे पंचक्रोशीत पसरली. भागूचं लग्न जमण्याची काही चिन्हे दिसेनात.
प्रभाकरपंतांनी रोज उठून तिला डाफरायला सुरुवात केली. भागुलाही त्या घरात उपरं वाटू लागलं. एका रात्री ती तेथून निसटली. जवळ थोडे पैसे होते. बसने पुण्याला आली. तिथे एका महिला अनाथाश्रमात राहू लागली.
आकाशातल्या मंगळ ग्रहाने भाग्यश्रीच्या जीवनात फार मोठी उलथापालथ केली. भागू तिथे राहून पुढचं शिक्षण घेऊ लागली. तिने बीए बीएड केलं.आश्रमाच्या संचालिका वत्सलाताई यांचाही भागूवर फार जीव होता.त्या तिल्या शिकण्यासाठी प्रोत्साहन देत होत्या. काही वर्षांत तिला शिक्षिकेची नोकरीही मिळाली. घरच्यांशी तिने काही संबंध ठेवले नाहीत व प्रभाकर पंतांनीही तिची चौकशी करण्याचा प्रयत्न कधी केला नाही.
वनश्रीच्या लग्नाचं जमलं. वनश्रीला सासर छान मिळालं. नवरा,विशाल शिक्षक होता. गावात मान होता विशालला.
दोन महिने झाले असतील वनश्रीच्या लग्नाला..वनश्रीला दिवस राहिले.
डॉक्टरांनी खात्रीपूर्वक सांगितल्यावर तिने विशालला ही नवीन पाहुण्याच्या आगमनाची बातमी दिली. विशाल फार खूष झाला. त्याने वनश्रीला त्याच्या बाहुपाशात घेतले. ती रात्र त्या दोघांनी भविष्याची स्वप्न पहात साजरी केली. वनश्रीने सासूसासऱ्यांना ही गोड बातमी सांगितली. सासूला तर तिला कुठे ठेवू न् कुठे नको असं झालं होतं. वनश्री सुखाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होती.
जयश्रीच्या नणंदेचं लग्न झालं. घरात नवरा,ती व सासू . इनमीनतीन माणसं. त्यामुळे जयश्रीची कामेही भर्रकन आवरत. सासू आत्ता नातवासाठी आस लावून बसलेली. जयश्रीच्या लग्नाला सात वर्ष झाली तरी घरात पाळणा हलला नव्हता. सासूचं आडूनआडून बोलणं सुरु होतं.
जयश्री व तिचा नवरा मोहीत डॉक्टरकडे जात होते. जयश्रीची पाळी वगैरे व्यवस्थित होती. तिच्या शरीरात काही समस्या नव्हती. समस्या मोहीतमध्ये होती. त्याचे स्पर्म काऊंट अतिशय कमी होते. त्यावर उपचारही चालू होते पण मोहीतने जयश्रीला ही गोष्ट कोणाला न सांगण्याची तंबी दिली होती. बिचारी जयश्री तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात होती.
मोहीतची आई मोहीतला दुसऱ्या लग्नाबद्दल सुचवत होती पण मोहीत तिला तो जयश्रीशिवाय इतर कुणाचाही विचार करु शकत नाही म्हणून सांगे. त्यामुळे मग मोहीतची आई त्याचा राग जयश्रीवर काढे.
जयश्रीने घरी एकदा आईजवळ आपलं मन मोकळं केलं पण आईने तिला तू व तुझं नशीब असच सांगितलं. ती जयश्रीला म्हणाली,”जयू नारळ घेताना आपल्याला माहीत असतं का तो आत कसा आहे ते अगदी तसंच नवऱ्याचं व बायकोचंही. पदरात पडलंय ते पवित्र मानावं.”
वनश्रीचं पहिलं बाळंतपण माहेरी झालं. वनश्रीला मुलगी झाली. बारा दिवसांनी बारसं केलं मुलीचं नाव श्रीया ठेवलं. थोड्या दिवसांनी वनश्री सासरी गेली. सहा महिन्यांतच वनश्रीला परत दिवस राहिले. श्रीया आजीजवळ मस्त रहात होती. दोन महिने पुरे होताच वनश्रीचा नवरा विशाल, वनश्रीकडे गर्भजलचिकीत्सा करण्यासाठी हट्ट करु लागला.
” हे बघ वनश्री,मला मुलगी व मुलात काही फरक वाटत नाही पण तरीही वंशाला दिवा हा हवाच. परत मुलगी झाली तर,पुन्हा तिसऱ्यावेळी मुलगा होण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.”
“अहो,पण तुम्ही एवढे शिकलेले तरी तुमचे विचार एवढे बुरसटलेले कसे? मी कसलीही परीक्षा करुन घेणार नाही व माझं बाळ मग ते मुलगा असो वा मुलगी. ते देवाचं देणं. मुलगी असली तर तुम्ही माझ्या रक्तामासाच्या गोळ्याला मारुन टाकाल.”
विशाल चरफडतच घराबाहेर पडला.
तितक्यात वनश्रीची सासू वनश्रीजवळ आली व म्हणाली,”वनश्री,मी तुझ्या पाठीशी आहे. आत्ता तू बरोबर समज घातलीस त्याची. जास्तच करायला लागला तर मी बघते त्याला. तू मुळीच काळजी नको करुस. मुलगा असला म्हणून काय झालं. त्याचं चूक ते चूकच. मी शिरा केलाय. गरम आहे तोवर खाऊन घे. या दिवसांत खूश रहावं बाळा नाराज होऊ नये.”सासूच्या या बोलण्याने वनश्रीला खूप धीर आला.
पूर्णांशने प्रेमविवाह केल्याने प्रभाकरपंत नाराज झाले. शेवटच्या कार्याचा मोठा थाट घालायचा होता त्यांना पण सून त्यांच्या जातीतली नव्हती.
पूर्णांशला अतिलाडामुळे फार वाईट सवयी लागल्या. सारखे आईकडून पैसे घेऊन जायचा. त्याच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत होत्या. तो एका सटरफटरशा कंपनीत कामाला होता पण बापाच्या जीवावर त्याचा श्रीमंती थाट चालला होता. त्याच्या या थाटाला भुलूनच तर प्राजक्ताने त्याच्याशी लग्न केलं होतं. त्याची एकेक रुपं प्राजक्ताला आत्ता कुठे कळू लागली होती, पण माहेराहून पळून आलेल्या प्राजक्ताला दुसरा कुठलाच पर्याय दिसत नव्हता. लग्नाआधी पुर्णांश तिला भारी किंमतीचे सेंट,लिप्स्टीक्स,ड्रेसेस घेऊन द्यायचा. त्याच्या दिखावू श्रीमंतीला प्राजक्ता भुलली होती.
प्राजक्ता वेगळ्या जातीची असल्याने सासूसासऱ्यांना मुळीच आवडली नव्हती. तिला घरातून जा पण सांगता येत नव्हतं.
एकदा पुर्णांशला पोलिसांनी मारामारीच्या गुन्ह्यात अटक केली. प्रभाकरपंतांनी त्याला सोडवून आणलं. त्याच दिवशी त्यांनी पुर्णांशला व प्राजक्ताला घरातून हाकलून लावलं. शेवटी सीमाने त्यांची सोय पाठीमागच्या गेस्ट हाऊजयध्ये केली.
प्रभाकरपंतांच डोकं अधुनमधून खूप दुखायचं..असह्य वेदना व्हायच्या. शेवटी शहरातल्या इस्पितळात त्यांना नेलं. साऱ्या तपासण्या करण्यात आल्या . ब्रेन ट्युमरचं निदान झालं.शस्त्रक्रियेला बराच खर्च येणार होता.
सीमाने तिचं स्त्रीधन व रहाता वाडा गहाण ठेवला. शस्त्रक्रियेनंतर प्रभाकरपंत थोडे बरे झाले. वाडा सोडवायचा होता,दागिने सोडवायचे होते. बऱ्याच जणांकडे पैसे मागितले पण सगळ्यांनी पाठ फिरवली.
भाग्यश्रीला गावातल्या एका मैत्रिणीद्वारे आईवडलांची ही दुर्दशा कळली. तिने कर्ज काढलं व गावी जाऊन सावकाराकडून आईचं स्त्रीधन व वाडा सोडवला. प्रभाकरपंत अक्षरशः लहान मुलासारखे रडू लागले,” भागू कशाला मला मदत केलीस गं. तुम्हा लेकींना मी सदैव बांडगुळं समजत आलो. तुझ्या पत्रिकेत मंगळ दोष आहे म्हंटल्यावर मी तुला एक ब्यादच समजू लागलो होतो. तू मात्र या बापाला त्रास होऊ नये म्हणून गुपचूप निघून गेलीस. कुठे गेलीस,कशी आहेस हे जाणून घेण्याची मी कधी तसदी घेतली नाही.”
सीमा म्हणाली,” भागू,ज्या मुलाला आम्ही वंशाचा दिवा म्हणत होतो त्याने आमचे चांगलेच पांग फेडले. गावात तोंड दाखवायची सोय ठेवली नाही. सतरा व्यसनं त्याला. त्याच्या या दुर्दशेला आम्हीच कारणीभूत आहोत. आम्हीच त्याला अति लाडावून ठेवलं. मागेल तसे आणि मागेल तितके पैसे देत राहिलो.”
भागू म्हणाली,” विसरुन जा गं आई कटू आठवणी. मी तुमच्या नावावर काही रक्कम पोस्टात ठेवली आहे. त्याचं व्याज तुम्हाला दर महिन्याला मिळेल.अजून काही लागलं तर हक्काने कळवा मला. पत्ता व फोन नंबर डायरीत लिहून ठेवते. बरं आई, जयश्रीचं व वनूचं कसं चाललय गं?”
“अगं जयूताईला काही मुलबाळ झालं नाही. जावयांत काही दोष आहे म्हणे. मला सांगायला आलेली. मीच तिला दम देऊन माघारी पाठवली. कधीतरी एकदोन वर्षाने आम्हाला पहायला म्हणून फेरी मारते बघ.
वनूचं मात्र बरं चाललय. तिला दोन मुली आहेत. बालवाडी चालवते. मुलीही आत्ता मोठ्या झाल्या. मोठी यंदा बारावीला आहे. “
“आई प्राजक्ता बोलते का गं तुमच्याशी?”
” ती लाख बोलेल गं पण आम्हीच बोललो नाही तिच्याशी. जातीपातीच्या पट्ट्या डोळ्यावर ओढून घेतलेल्या नं आम्ही.”
“आई, मी प्राजक्ताला व पुर्णांशला माझ्यासोबत घेऊन जाते. पुर्णांशला पुनर्वसन केंद्रात भरती करते. तिथे माझे एक स्नेही आहेत. ते घेतील त्याची काळजी. प्राजक्ताला स्वतःच्या पायावर उभं करते. जयूताई व वनूचा पत्ता दे. त्यांनाही भेटते जाऊन. आपण सगळी पुन्हा एकत्र येऊया नं आई.”
“आणि तुझ्या लग्नाचं गं?”
“अगं ते कधी करावसं वाटलच नाही बघ मला. लहानपणापासून तुला घाबरत घाबरत जगताना बघत आले. मग म्हंटलं नकोच लग्न वगैरे. आश्रमातली सारी मुलंही माझीच आहेत की. माझ्यापेक्षा त्या मुलांना माझी जास्त गरज आहे आई.”
प्रभाकरपंतांनी जयश्री,वनश्री व जावयांनाही बोलावून घेतलं. घरात पूजा घातली. प्राजक्ताला व पूर्णांशला घरात घेतलं. प्रभाकरपंतांच लेकुरवाळं घर कितीतरी वर्षांनी मनापासून हसलं.
———-©️®️ सौ.गीता गजानन गरुड.
===========================
फोटो साभार – गूगल
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर, RitBhatमराठी घेऊन येत आहे लघुकथा स्पर्धा.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/