आयुष्य अजून संपलं नाही!! (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

“#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा _जाने_२२”
©️®️ सौ.गीता गजानन गरुड.
“श्रावणी, बाळा किती वेळ लाईट सुरु असतो तुझ्या खोलीतला. वेळेवर झोपत जा. आता कुठे बरी होते आहेस. अशी जागरणं नको करत जाऊस.”
श्रावणीच्या पुढ्यात ओलखोबरं न् कोथिंबीर भुरभुरलेला उपमा ठेवताना सुमतीताई म्हणाल्या. श्रावणीने त्यावर लिंबू पिळलं..कलरफुल कॉम्बिनेशन..ती स्वत:शीच म्हणत दिलखुलास हसली.
‘खुळी पोर माझी..’ तिच्या लोभस चेहऱ्याकडे पहात सुमतीताई म्हणाल्या.
“बेटा आता बरं वाटतय ना. लवकरच फर्ममधे येऊ लाग..”श्रावणीचे पप्पा सुधाकरराव म्हणाले. ते स्वत: सीए होते. श्रावणीही त्यांच्याच फर्ममधे आर्टिकलशीप करत होती.
श्रावणीचं व शांतनुचं प्रेमप्रकरण गेली चार वर्ष सुरळीत चालू होतं. दोन्ही घरातनं त्यांच्या एकत्र हिंडण्याफिरण्याला पाठिंबा होता मात्र मर्यादा ओल़ांडू नका असं बजावून सांगण्यात आलं होतं.
रात्रीचं बाईकवरुन जोडीने फिरायला फार आवडायचं त्यांना..वारासुद्धा मधून जाणार नाही अशी श्रावणी बिलगायची शांतनुला..तो तिला गाणं म्हणायला सांगायचा..निर्जन रस्ता,वरती गडद निळ्या आकाशात चांदण्यांची मैफिल..साथीला मंदधुंद वारा..श्रावणी गाऊ लागायची..
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात
निजलेल्या गावातुन आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात
सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात
जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमुसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात….
तिचे स्वर शांतनुच्या ह्रदयात पाझरत. बास हेच अल्टिमेट डेस्टिनेशन..जगातला सर्वात सुखी माणूस मी असं तो स्वत:शी म्हणे.
अशाच एका रात्री..काही गुंडांनी त्यांना अडवलं होतं..शांतनु व श्रावणीला आडबाजूला घेऊन जाऊन श्रावणीवर शांतनुच्या समक्ष आळीपाळीने बलात्कार केला होता. शांतनु हतबल होता..अगतिक होता..काही करु शकत नव्हता त्या सशस्त्र गुंडांचं..त्यांचे चेहरे झाकलेले होते. फक्त डोळे दिसत होते.. दोघांचेही मोबाईल त्या गुंडांनी काढून घेतले न पळाले तिथून. श्रावणी कण्हत पडली होती.. शांतनु अतिशय घाबरला होता. तोही तेथून पसार झाला होता..श्रावणीला त्या स्थितीत एकटीला सोडून.
घरी आल्यावर त्याला अशा घाबरलेल्या अवस्थेत पाहून त्याच्या मम्मीने विचारलंच..तो रडू लागला..रडतच त्याने घडलेली घटना मम्मीला सांगितली..”मम्मी, मी श्रावणीला टाकून पळालो. मला गिल्टी वाटतय.”
त्याला समजावत मम्मी म्हणाली,”योग्यच केलंस तू. तिच्या नशिबाची ती. त्या गुंडांनी पुढे जाऊन तुझ्यावर हल्ला केला तर..लांबच रहा तू..जाऊसुद्धा नकोस तिला भेटायला.” मम्मी रात्रभर त्याचं थरथरतं अंग थोपटत राहिली होती.
गस्त घालणाऱ्या पोलिसांनी श्रावणीला त्या अवस्थेत पहाताच..तात्काळ तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं व तिच्या नातेवाईकांना फोन लावून कळवलं.
चारेक महिने श्रावणीवर उपचार सुरु होते. तिच्या गुप्तांगावर जखमा झाल्या होत्या. गर्भाशयाला इजा झाली होती. मनाची स्थिती तर त्याहीपेक्षा गंभीर होती.
सुमतीताई व सुधाकररावांची तर अतिशय केविलवाणी अवस्था झाली होती. श्रावणी..लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी झालेलं..त्यांचं एकुलतं एक अपत्य.. त्यांचा सारा जीव श्रावणीत होता. लहानपणापासनंच श्रावणी चुणचुणीत व हुशार होती. वक्तृत्वस्पर्धांमथे नंबर पटकवायची..कुणी म्हणालं श्रावणीचा आवाज श्रवणीय आहे..गाण्याच्या क्लासला घाला..सुमनताईंनी लेकीला गाण्याच्या क्लासला घातलं..तिथल्या विधाते बाईंनी या हिऱ्याला पैलू पाडले. जोडीने शालेय अभ्यासही सुरु होता. प्रत्येकवर्षी पहिल्या पाचात असायचीच.
वाणिज्य शाखेसाठी प्रख्यात अशा पोदार महाविद्यालयात प्रवेश मिळवला न् तिथेच एकदा संमेलनामधे शांतनु व तिचं द्वंद्वगीत होतं. गाण्याच्या सरावानिमित्ताने दोघांच्या भेटी वाढल्या. सरावानंतर घरी येताना इतरही गप्पा होऊ लागल्या. एकमेकांच्या आवडीनिवडी,विचार बऱ्यापैकी जुळत होते. कधी प्रेमात पडले..त्यांचं त्यांनाच कळलं नाही.
शांतनुला म्यानेजमेंटमधे रस होता..त्याने एमएमएस केलं..श्रावणी सीए करत होती..चांगल्या गुणांनी पास झाली नि आर्टिकलशीप करु लागली. शांतनुला कँपसमधून नोकरी मिळाली..दोघे सुखी संसाराची स्वप्नं पहायचे..अगदी लग्नात दोघांचे पेहराव काय असतील, मुलं किती होऊ द्यायची..त्यांना कोणत्या शाळेत घालायचं..सगळं सगळं वेलप्लान्ड होतं..
डॉक्टरांनी श्रावणीच्या डोक्यावर हात ठेवला व सुमतीताईंना म्हणाले..आता शारिरिकद्रुष्ट्या तुमची लेक फिट अँड फाइन आहे. तिला घरी घेऊन जाऊ शकता. फक्त तिचं मन जपा.
श्रावणी एडमिट झाल्यापासनं शांतनु एकदासुद्धा तिला बघायला हॉस्पिटलमध्ये गेला नव्हता. श्रावणीचा जीवलग सखा पळपुटा निघाला होता..तरी पोलिसांनी त्याला गाठून त्याची जबानी घेतली होती..त्यांचं तपासकार्य सुरु होतं.
महिनाभरापुर्वी शांतनुचं लग्न झाल्याची बातमी कळली श्रावणीला. श्रावणीने एक्सेप्ट केली ती न्यूज..जग कितीही पुढारलं तरी काही बाबतीत मागासलेलंच रहाणार..शांतनुचा तरी काय दोष..कोण अशी दुसऱ्यांनी वापरलेली मुलगी पत्नी म्हणून स्वीकारेल..ती स्वत:चीच समजूत घालत रहायची..
सुधाकररावांची चित्रकलेची आवड श्रावणीतही उतरली होती. वेळ सत्कारणी जावा..म्हणून तिने ड्रॉइंग बोर्ड,पेपर,रंग,कुंचले..सारं सामान आपल्या खोलीत मागवून घेतलं होतं.
रात्री तिला मधेच कधी जाग यायची..मग तिला शांतनुची आठव यायची..तिने त्याचं चित्र काढायला घेतलं..रोज थोडं थोडं काढत होती..आता रंग भरणं चालू केलं होतं..तेही रात्रीचंच..निरव शांतलेत..त्याचे सिल्की केस, हनुवटी,नाक..सारं कसं जसंच्या तसं..ऱंगछटाही अचूक..तिने डोळ्यांत रंग भरले न् ते पोट्रेट जणू सजीव झालं..श्रावणी पोट्रेटमधल्या तिच्या शांतनुला नजरेनेच बोलवायची. तो यायचाही न् तिची रात्र मोहरायची..
सकाळी श्रावणी अधिकच टवटवीत दिसायची. मुलगी माणसात येतेय..तिची प्रक्रुती सुधारतेय म्हणून सुधाकरराव व सुमतीताई खूष होते..शांतनुच्या लग्नामुळे ती कोलमडली नाही याचं त्यांना कौतुक वाटत होतं. कुणीतरी जोडीदार तिला नक्की मिळेल आणि नाही मिळालाच तरी आपण तिच्या पाठीशी आहोतच..अशी ती दोघं चर्चा करायची..
इकडे..अलिकडे रात्री बारानंतर..प्रणयाराधनेत मग्न असणारा शांतनु..अचानक बायकोला झुरळ फेकावं तसा बाजूला करी व पाण्यातनं बाहेर काढलेल्या मासोळीसारखा तडफडे..कुणीतरी आपल्याला शरीरसुखापासनं दूर ओढू पहातय..स्वत:जवळ बोलावतय एवढंच त्याला कळत होतं.
त्याची पत्नी..त्याचं हे रोजरोजचं नाटक पाहून थकली..जरुर हा मनोरुग्ण आहे..तिला वाटू लागलं..न् तिने तिची ब्याग भरली..शांतनुच्या मम्मीने गयावया केली..माझ्या लेकाला सोडून जाऊ नकोस म्हणाली.
“तुमच्या लेकाला बायकोची नाही तर वेड्याच्या इस्पितळात ठेवण्याची गरज आहे..”असं सांगत सासूचं तोंडही न बघता ती निघाली.
इकडे शांतनु पुरता डिप्रेशनमधे जाऊ लागला. त्याला खाण्यापिण्याची शुद्ध नव्हती. हातची नोकरी गेली..दिवसेंदिवस अंगाला पाणी लावत नसे, दाढी,केस सगळं वाढलं होतं..आईवडील दोघंही समाजातली प्रतिष्ठित माणसं..लेक असा का वागतोय..त्याला मानसोपचाराची गरज आहे..तज्ञ डॉक्टरांना दाखवुया..असं त्यांना वाटत नव्हतं..समाज काय म्हणेल..ही भिती वाटत होती.
यापुर्वी याच हुशार लेकाचं यश मिरवलेलं त्यांनी. तो एमएमएस झाला तेंव्हा भली जंगी पार्टी दिली होती..बिझनेसमधले सारे स्नेही आमंत्रित केले होते पण आता मात्र हा असा पराभूत शांतनु कोणाला दिसू नये म्हणून त्यांनी नोकरांनाही कामावरनं कमी केलं होतं.
त्यारात्री सुमतीताईंना मध्यरात्री जाग आली..त्यांच्या घशाला कोरड पडली होती..दोन दिवस येऊन गेलेल्या तापाने शरीर अगदी गळल्यासारखं झालं होतं. नेमकं रात्री बाजूला पाण्याचं भांडं ठेवायला विसरल्या होत्या.
सुधाकररावांना सांगतील..तर ते मंद सुरात घोरत होते..मग त्याच कशाबशा उठल्या न् किचनकडे वळल्या..पेलाभर पाणी पिताच बरं वाटलं त्यांना..
लगतच्या श्रावणीच्या रुमचा दिवा पेटत होता..चालायचंच म्हणत त्या झोपायला वळणार..इतक्यात हसण्याखिदळण्याचा,गप्पा मारण्याचा आवाज..तिच्या रुमच्या कीहोलमधनं त्या आत पाहू लागल्या..
श्रावणी चित्रातल्या शांतनुशी गप्पा मारत बसलेली. हातवारे करत होती..मोठमोठ्याने हसत होती..
सुमतीताई मटकन खालीच बसल्या..हे हे सारं विचित्र होतं..पचवणं अगदीच अवघड होतं..पोरगी सुधारतेय म्हणता म्हणता मनोरुग्ण होत होती.
त्या खोलीत येऊन स्फुंदू लागल्या. त्यांच्या हुंदक्यांनी सुधाकररावांना जाग आली. तेही घाबरले..”अगं झाल़ं काय? सांगतरी..” सुमतीताईंनी श्रावणीच्या शेजखोलीकडे बोट दाखवलं तसं सुधाकररावही घाबरले..पोरीने काही बरं वाईट..ते दरवाजापाशी गेले नि कीहोलमधनं पाहू लागले..
त्यांनाही तेच द्रुश्य दिसलं..आता श्रावणी..शांतनुच्या चित्राला बिलगली होती..जणू तोच चित्रातनं बाहेर येऊन तिला कवेत घेत होता.
मानसोपचारतज्ञांची भेट घेतली. त्यांनी श्रावणीला बोलतं केलं. आधी काही गोळ्या लिहून दिल्या.तदनंतर तिचं कौंसेलिंग सुरु झालं..तसं तिच्या आंतरमनातली सुप्त इच्छा बाहेर येऊ लागली. डॉक्टरांनी फार नाजूकपणे सांभाळलं हे प्रकरण..अन् श्रावणीला बाहेर काढलं यातून पण तिकडे शांतनूने मात्र आत्मत्येचा मार्ग निवडला..नि जीवनाचा डाव अर्धवट टाकून तो निघून गेला.
————
श्रावणी फर्ममधे जाऊ लागली. येताजाता कुणीकुणी कुजबुजायच्या..पण आईवडिलांची भक्कम साथ होती तिला. मान वरती करुन चालू लागली. फर्ममधे येणाऱ्या एका क्लायंटने सुधाकररावांच्या घरी जाऊन श्रावणीला मागणी घातली.
सुधाकररावांनी श्रावणीला बाहेर बोलावलं,”श्रावणीबेटा..आम्ही किती दिवस असणार तुझ्यासोबत..हे मनिष तुझ्याशी लग्न करायला इच्छुक आहेत. आता निर्णय तुझा आहे.”
श्रावणी मनिषकडे पहात म्हणाली,”तुम्हाला ठाऊकच असेल..माझ्यावर सामुहिक बलात्कार झाला होता ती न्यूज..कितीतरी चांगल्या मुली मिळतील तुम्हाला. प्लीज माझ्यावर मेहरबानी करु नका. मी जशी आहे तशी मस्त आहे.”
“श्रावणी, तो निव्वळ एक अपघात होता हे लक्षात घे. दोषींना शिक्षा होईलच पण त्याकरता तुझं आयुष्य पणाला नको लावूस. स्वतःच्या जीवाशी असा खेळ नको खेळूस..”
तरी श्रावणी मनिषचं बोलणं दुर्लक्षून आतल्या खोलीत निघून गेली.
काही दिवस,महिने लोटले..मनिषच्या येरझारा सुरुच होत्या.
एकदा सुधाकरराव ऑफिसातच कोसळले.. स्टाफने धावाधाव केली..सुधाकररावांना हॉस्पिटलाइज केलं. ती बातमी ऐकून सुमतीताईंचं बीपी शुट झालं..त्यांनाही हॉस्पिटलाइज केलं..दोघांचीही प्रक्रुती खालावली होती..अतिदक्षता विभागात हलवलं.होतं. नातेवाईक येऊन, हळहळ व्यक्त करुन,धीर देऊन जात होते..
यात मनिष मात्र श्रावणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. रात्रंदिवस तिथेच असायचा..डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे धावपळ करत होता..हवी ती इंजेक्शन्स आणून देत होता.
पंधरवड्यात सुधाकरराव व सुमतीताई, दोघंही बरे झाले. त्यांना डिस्चार्ज मिळाला तसं मनिष जाऊ लागला.
“अहो मनिष..वेट अ मिनिट..मला एकटीला सोडून कुठे चाललात. इतके दिवस साथ दिलीत तशी आयुष्यभरासाठी..” श्रावणीचे हे बोल ऐकून मनिषने हवेतच येss करत हात वर केले नं नाचू लागला..येणारीजाणारी लोकं त्याच्याकडे विस्मयाने पाहू लागली पण त्याला काही फरक पडणार नव्हता..आज त्याला त्याच्या ड्रीमगर्लने होकार दिला होता.
(समाप्त)
–©️®️ सौ.गीता गजानन गरुड.
========================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/