औक्षवंत_व्हा!

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.
नीलाक्षी व नीलचं लग्न होऊन अवघे सहा महिने झाले होते. दोघंही भरपूर पगारवाले. उच्चपदस्थ. नीलच्या आईवडिलांनी आधीच दोन घरं घेऊन ठेवली होती. नील व निलाक्षी नाही म्हणत असतानाही नीलच्या आईबाबांनी निक्षून सांगितलं की आत्ता आम्हाला काही दिवस एकांत द्या.
नील व निलाक्षीचा नाईलाज झाला. नीलच्या आईबाबांनी त्याला फक्त घर घेऊन दिलं होतं. बाकीची क्रोकरी,फर्निचर त्या नवीन जोडप्याला त्यांच्या आवडीने घ्यायचं स्वातंत्र्य दिलं होतं.
निलाक्षीने तिच्या मम्माला रहायला बोलावलं पण तिनेही जाणूनबुजून टाळाटाळ केली. येऊ आरामात असंच सांगितलं. दोघा चिमणाचिमणीने घरातले पडदे,बेड,टेलिव्हिजन, फ्रीज,वॉश़िग मशीन,कटलरी सगळं सगळं ऑनलाईन मागवलं. दुसऱ्या दिवशी सामान घरी हजर. ऑनलाईन शोधकामात कामवालीही मिळाली. पैसे थोडे जास्त गेले. बट फिकर नॉट. पगारही तगडा होता त्यामुळे त्याचं काही वाटलं नाही.
डेली रुटीन सुरु झालं. रमाक्का रोज सात वाजता यायची. आल्याबरोबर कामाला सुरुवात करायची. केरकचरा, दोघांचे डबे,त्यांच्या आवडीचा नाश्ता,चहा,कॉफी..करुन मग बेसिनमधली भांडी धुवून पुसून नीट रचून ठेवायची.
निलाक्षी साडेआठला घरातून बाहेर पडे तर नील साडे दहाला. नील जायच्या अगोदर रमाक्का सर्व आवरुन बाहेर पडे. रमाक्का, साध्याच पण स्वच्छ धुतलेल्या फुलाफुलांच्या नक्षीच्या साड्या नेसायची,केसात एखादं फुलं माळून यायची. स्वभावाने चांगली होती. कुरकुर फुरफुर नसायची तिची.
संध्याकाळी सहा वाजता रमाक्का शेजारच्या आजीकडून चावी घेऊन नीलनिलाक्षीच्या घराचं दार उघडायची व संध्याकाळचा स्वैंपाक करून ठेवायची. निलाक्षीच्या सुचनेप्रमाणे येतानाच भाजी घेऊन यायची. पै न् पैचा बरोबर हिशेब द्यायची. रमाक्कासारखी इमानी कामवाली मावशी मिळाल्याने नील व नीलाक्षीला संसार अगदीच सहज,सोप्पा वाटू लागला होता.
असेच सहा महिने निघून गेले. दोघांचेही आईवडील; त्यांचा सुखी संसार बघण्यासाठी येऊन चारपाच दिवस राहून तोंडभर आशीर्वाद,थैलीभर सूचना देऊन गेले.
निलाक्षीच्या मम्माने तिला बजावलंच की पुर्वी माझं ऐकलं नाहीस पण आत्ता तरी स्वैंपाक करायला शीक पण निलाक्षी म्हणाली,”यु नो नं मम्मा, वेळच नसतो. रोजच ओव्हर टाईम वर्क करावं लागतं. घरी आल्यावर ताणच उरत नाही आणि ही रमाक्का सगळं करते गं.”
निलाक्षीची मम्मा यावर एक सुस्कारा सोडून तिच्या यजमानांसोबत निघून गेली. निलाक्षीच्या सासूने तर आधीच ठरवलं होतं की त्यांच्या संसारात लुडबूड करायची नाही.
एकेदिवशी रमाक्काचा भल्या सकाळी फोन आला,”ताई, मला अर्जंट गावी जावं लागतय. भावाची तब्येत खराब हाय. पंधराएक दिसांनी येईन. तवर संभाळून घेवा.”
निलाक्षी तिला बरं म्हणाली व फोन ठेवला पण मग घरातली कामं..तिने पंधरा दिवसासाठी खालच्या अन्नपुर्णा सेंटरमध्ये पोळीभाजीचा डबा लावला. हाय काय नाय काय निशा स्वतःशीच म्हणाली. बाजूच्या आजीला रिक्वेस्ट केली. तिने तिच्याकडची मोलकरीण केर,लादी,भांड्यांसाठी पाठवली. अगदी चहासुद्धा अन्नपुर्णातून येऊ लागला..सोबत कांदेपोहे,आप्पे,शिरा काय हवं ते.
साताठ दिवस अगदी सुरळीत गेले. रमाक्काच्या हातचं जेवण मिळत नव्हतं पण तरी बऱ्यापैकी होतं. मेन म्हणजे आयतं मिळत होतं. त्यांचा डिलीव्हरी बॉय बरोबर वेळेवर पार्सल देऊन जात होता.
कसं कोण जाणे ते पोळीभाजी केंद्रही बंद झालं. निलाक्षीने विचार केला ये नहीं तो दूर का सही. ती स्कुटीवरनं जरा पुढे गेली तर तिथलंही केंद्र बंद. एक आजोबा तिथे टीफीन घ्यायला आले होते.त्यांनी दुकानावर लिहिलेल्या पाटीवरील मोबाइल नंबर फिरवला..’काय म्हणताय संप..कामवाल्यांचा..अहो असा कसा न सांगता संप तुमच्या कामवाल्यांचा. तरण्यांचं ठीक ओ, करुन खातील. आमच्यासारख्या असहाय्य व्रुद्धांनी काय करावं!’ आजोबांच पुढचं बोलणं ऐकायला निलाक्षी थांबलीच नव्हती.
तिने बेकरीकडे स्कुटी वळवली होती पण तिथेही निराशाच हाती पडली. पाव,ब्रेड करणारे कारागिरही संपावर गेले होते..जणू काही सामुहिक संपच पुकारला होता त्यांनी. हॉटेलात पार्सल मागण्यासाठी गेली तर तिथे हॉटेलमालक दुकानाला टाळं लावत होता..तो म्हणाला,कुकलोगोंका एकसाथ स्ट्राइक हुआ है। हाटल खोलके बुलाया उन लोगोनको मगर स्ट्राइक राष्ट्रव्यापी है, लगता है।”
निलाक्षी चरफडत घरी परतली. नील आपलं काम आवरुन मुव्ही बघत बसला होता. सोबतीला प्लेटमधे हाइड अँड सीकची बिस्कीटं खात होता.
आपण एवढ्या लांब जाऊन आलो नि हा लोद्या लोळतोय नि चरतोय ह्याचा खरा तर निलाक्षीला रागच आला तरी रागाला बांध घालत शक्य तेवढा विनय चेहऱ्यावर पांघरत तिने विचारलं,”हनी,तुला चहा येतो का रे करता?”
नील म्हणाला,”नाही गं,म्हणजे आई सांगायची..जरा स्वैंपाक शीक पण मला फारसं महत्त्वाचं वाटलं नव्हतं ते कधी. आय जस्ट इग्नोअर्ड इट बेब. बट यु शुड बी नोईंग समथिंग.”
नीलचं हे असं तर्हेवाईक उत्तर ऐकताच निलाक्षीने आतापर्यंत पांघरलेलं विनयाचं पांघरुण चेहऱ्यावरनं खसकन काढून फेकलं. खऱ्या बायकोच्या भूमिकेत येत त्याला सुनावू लागली,
“ओ,व्हाय मस्ट आय बी नोईंग द कुकी़ग शुकींग एण्ड ऑल देट.. आय नेव्हर हेड इन्टरेस्ट इन हाऊजहोल्ड चोअर्स. यु बेटर नो माय इंटेलिजन्स. आय हेड नेव्हर व्हेस्टेड माय टाईम इन प्रीपेरिंग मील.”
निलाक्षीचा हा लढाऊ पवित्रा बघताच, मित्र असला तरी जातीचा नवराच तो. दोन पावलं मागे सरत म्हणाला,
“बट डार्लिंग नाऊ व्हॉट टू डू?”
“युट्यूब रेसिपी,”युरेका युरेका करावं तसं निलाक्षीने हवेतच उडी मारली नि एक हात वर करत नाचू लागली. तसं निलनेही तिच्यासोबत हातपाय आडवेतिडवे केले. मग दोघात बट्टी झाल्याने दोघंही युट्युब वर दाखवल्याप्रमाणे चहा करु लागले. पण कधी किचनकडे ढुंकून न पाहिल्याने किचनची दयनीय अवस्था झाली.
बायकोला पहिल्यांदा किचनमधे असं पाहून निलमधे रोमान्सचा किडा वळवळला नं चहा उकळत असताना इकडे कठड्याला रेलून दोघा कबुतरांचं गुटरगु गुटरगु रंगात आलं पण हाय तो चहा कबाबमें हड्डीसारखा फसफसून वर आला नं क्षणार्धात उतू गेला.
दीर्घ चुंबनात रत असलेली निलाक्षी म्हणाली,”निल,कसला रे आवाज?” तेंव्हाकुठे निलची मनासारखी लागलेली चुंबनसमाधी उतरली नि पातेल्याकडे पहात त्याने त्याच्या मदनिकेस दूर सारत चहाचा गँस बंद केला. दूधही रात्री गरम केल्याचं राहून गेल्याने टोपात फुदूक फुदूक फुदकत होतं.
चहा गेसच्या शेगडीवर..शेगडीवरुन ओट्यावर ओघळला होता. निलाक्षीच्या गोबऱ्या गुलाबी गालांवर आसवं वाहू लागली. ती पुसायची की चहा ओतायचा या द्विधा मनस्थितीत नील असताना तो बोटांनीच गरम पातेलं उचलू पहात असताना टोप त्याच्या हातून निसटला व बाजूलाच चेअरवर बसलेल्या नीलाक्षीच्या हातापायांवर गरमगरम चहा सांडला.
निलाक्षी रागाने लालबुंद झाली व नीलचा इंग्लीशमध्ये उद्धार करु लागली. नीललाही जाम राग आला. त्यानेही तिची वाक्पूजा आरंभली,” तू मुलगी आहेस नं. तुला तरी स्वैंपाक आलाच पाहिजे. साधा चहाही येत नाही!”
यावर आपलं लांबसडक बोट नीलवर उगारत निलाक्षीभधील नवोदित तरुणी उद्गारली, “ए हेलो, तुला मी आधीच सांगितलेलं की हाऊजहोल्ड चोअर्स नाय जमत आपल्याला. तेंव्हा बरा,मला फक्त नी फक्त तू हवीस गं नीलू असं बोलत होतास.”
डोक्याला हात लावत निल म्हणाला,
“तिथेच चुकलो. एक चूक सुधारताही न येण्यासारखी करुन बसलो.”
निलाक्षीच्या रागाचा पारा प्रचंड वाढला? रागाने तिच्या नाकपुड्या लालेलाल झाल्या, फुलू लागल्या..तिचे किरमिजी ओठ थरथरु लागले. भांडणाचा ठेका धरत ती म्हणाली, “व्हॉट डू यु मिन..चुकलो बिकलो. आणि काय रे एवढा सुंभासारखा वाढलास. एरवी मेन विमेन इक्वेलिटीची भाषणं झाडतोस. तुला का येत नाही रे घरकाम! बोल बोल. माझ्याशी पंगा नाय घ्यायचा आधीच सांगून ठेवते!”
आत्ता दोघांच्याही डोळ्यांत एकमेकांविषयी कमालीचा राग जमा झाला होता. एवढ्यात त्यांच्या आवाजाने बाजूच्या आजीने दरवाजा ठोकवला. नवीन पेटर्नप्रमाणे ओपन किचन असल्याकारणाने आजीच्या ध्यानात सगळा प्रकार आला व या दोघांचे चेहरेही भांडणाची साक्ष देत होतेच.
बारीक चणीची,गोरटेली आजी ओल्या नारळाचे लाडू घेऊन आली होती. आजीने नीलच्या बोटांना व नीलाक्षीच्या हातापायाला बरनॉल लावलं.
नील नीलाक्षी नाही म्हणत असतानाही त्यांचा ओटा आवरून दिला. थोड्या वेळाने चहाही घेऊन आली. दोघं फुर्र फुर्र करत चहा प्याले. चहाच्या गरमीत राग कुठल्याकुठे छू झाला.
दोघे शांत झालेले पाहून आजी त्यांना म्हणाली, “हे बघा, कुणी आईच्या पोटातूनच शिकून येत नाही. तुम्ही स्वैंपाककला शिकला नाहीत. तुम्हाला वाटलं,खूप पैसे आहेत आपल्याकडे. पैशाने सगळं काही विकत घेता येतं,पण तसं नसतं बाळांनो. ह्या तुमच्या स्वैंपाकघरात काही वेळ घालवा.
मी तुम्हाला साधासोप्पा स्वैंपाक शिकवेन. वाटून वाटून कामं करायची. नील तुलाही स्वैंपाक आलाच पाहिजे.
तुझे आजोबा बघ आज माझ्यासाठी ओले काजूगर घालून मसालेभात बनवताहेत. कसला सुगंध येतोय बघ..तुला वाटेल बासमतीचा वगैरे..तो तर असतोच रे,पण त्याहून मोहक सुगंध माहितीय का बाळांनो तुम्हाला..तो असतो मायेचा सुगंध. आपल्या हाताने माझ्या आवडीचं करुन मला खाऊ घालायची भारी हौस त्यांना,”असं म्हणत आजी चक्क लाजली. तीचं ते लाजणं बघून नीलने निलाक्षीला हळूच डोळा मारला. निलाक्षीही मनापासनं हसली.
त्या दुपारी नील,नीलाक्षी दोघंही आजीकडे जेवली. दुसऱ्या दिवशीपासून मात्र आजी त्यांना अगदी चहा,कॉफी,वरणभात,पिठलंभात,पोळ्या असे साधेसोप्पे पदार्थ शिकवू लागली. दोघंही कामावरनं आली की आज्जीच्या हाताखाली आजीच्या आठवणी,गमतीजमती ऐकत मन लावून स्वैंपाक शिकू लागले.
कणिक तिंबणं, वेड्यावाकड्या पोळ्या लाटणं,त्यांवर ताटली मारणं असं करता करता महिनाभरात दोघांनाही छान पोळ्या जमू लागल्या.
आजोबाही आत्ताशा नीलनीलाक्षीसोबत गप्पा मारु लागले. कधी पत्त्यांचा डाव रंगू लागला तर कधी गाण्याच्या भेंड्या. गाण्याच्या भेंडीत अ आला की आजोबा गुडघ्यावर बसून आजीकडे हात करत,”ओ मेरी जोहरोजबी तुझे मालूम नहीं,तू अभी तक है हँसी और मैं जवाँ.
तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान.”
आजी मग अल्लड तरुणीसारखी लाजून गोरीमोरी होई.
यातून नील व नीलाक्षीला संसार कसा फुलवायचा असतो,आयुष्यभर एकमेकांना कशी साथ द्यायची हे सगळं कळत होतं.
आजीआजोबांचा एक मुलगा होता पण सैन्यात भरती झाला न् चार वर्षात तिरंग्यात लपेटून आला होता. आजीआजोबा फोटोचा अलबम काढून डोळ्यांच्या कडा पुसत ही त्यांची व्यथा सांगायचे. त्या मुलाचं लग्नही झालेलं पण मग आजीआजोबांनीच स्वतः त्यांच्या सुनेसाठी योग्य वर पाहून तिचं कन्यादान केलं होतं. ती आपल्या नवीन जोडीदारासोबत परदेशात सेटल झाली होती. पण आजीआजोबा या जुन्या घटना कुरवाळत बसले नव्हते तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद वेचत होते. प्रत्येक अडचणीत असणाऱ्याला जमेल तशी मदत करत होते.
आजी व आजोबांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीखही नील व नीलाक्षीने अलबममधून टिपून घेतली. त्यादिवशी त्या दोघांनी मिळून आमरस पुरी बनवली. मसालेभात तयार केला. आजीआजोबांना जेवायला बोलावलं.
आजी छान कुसुंबी नववारी साडी,नथ,अंबाड्यात मोगऱ्याचा गजरा अशा थाटात आली. आजोबाही परीटघडीचा सदरालेंगा,त्यावर जाकीट,खिशात लाल गुलाबाचं फुल लावून आले.
नीलने हॉलमधल्या झोपाळ्यावर बसवून आजीआजोबांचे फोटो काढले. निलाक्षीने आजीला हळदीकुंकू लावून तिची ओटी भरली. दोघांचही औक्षण केलं.
आजीच्या आवडीचं मोरपीसी रंगाचा पंजाबी ड्रेसचं मटेरियल निलाक्षीने आजीला गीफ्ट केलं तर आजोबांनी त्यांना आवडेल असं घड्याळ गीफ्ट केलं. जेवताना आजोबांनी निलनिलाक्षीच्या पाककलेला तोंड भरुन दाद दिली.
निलाक्षीने आजीआजोबांचा एकमेकांना आमरसपुरी भरवतानाचा फोटो काढला. दोघं आजीआजोबांच्या पाया पडली तसं दोघांनाही त्यांनी मिठीत घेतलं व औक्षवंत व्हा असा आशीर्वाद दिला.
(समाप्त)
——-©️®️ सौ.गीता गजानन गरुड.
========================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.
कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
==================