Skip to content Skip to sidebar Skip to footer

असतील शिते तर जमतील भुते!!

  ‘’स्वीटू अगं  स्वीटू काय करतेस ? झाली का कामं  ?’’

पेडणेकर काका आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून बाहेरूनच घरात एक नजर फिरवून स्वीटूचं दार ठोकावतात….

स्वीटू, “पेडणेकर काका!!!! या ना आत या…..आई अगं पेडणेकर काका आलेत….काका या ना आत या….  बसा”

स्वीटूची आई आपले हात टिपत स्वयंपाक घरातूनआली,  “भाऊजी, या ना वहिनींना नाही घेऊन आलात ? या बसा मी चहा आणते !”

इतक्यात स्वीटू, ‘’आई चहा नको…. काका तुम्ही आईस्क्रिम घेणार का….तसंही तुम्ही एवढ्या उन्हातून आलात काहीतरी थंड झालंच पाहिजे आणि आज मी पहिल्यांदा स्वतःच्या हाताने बनवलं आहे’’

पेडणेकर काका, “अरे वा !!!! स्वीटूने बनवलं आहे तर मग चव घ्यावीच लागेल….  घरात फ्रिज नव्हता फ्रिज आणला कि काय ?”

स्वीटूची आई, “हो यांनी घेतलाय….इंस्टालमेंट वर”

काका, “ओह्ह अच्छा….! पण हा सुभाष गेलाय कुठे ?”

स्वीटूची आई,, “अहो भाऊजी हे रोज संध्याकाळी बाहेर फिरायला जातात….हे पहा आलेत कि ! पहा पेडणेकर भाऊजी आलेत”

स्वीटूच्या वडिलांना फ्रेश होऊन येईपर्यंत पेडणेकर काका घरातील कोपरा न कोपरा न्याहाळत होते आणि स्वीटूशी गप्पा मारण्यात दंग झाले.

स्वीटूला म्हणाले, “अग यंदा कितव्या वर्षाला आहेस तू ?”

स्वीटू, “काका मी यंदा  एम. कॉम च्या दुसऱ्या वर्षाला आहे” 

काका, ‘’अच्छा…! शिक्षण झालंच म्हणायचं कि.. ’’

तेवढ्यात स्वीटूची मैत्रीण आली अभ्यासाला आणि ती आत मध्ये निघून गेली..

पेडणेकर काका घर व्यवस्थित न्याहाळात होते, घरात ए.सी. , फ्रिज , वॉशिंग मशीन, नवा एलईडी असं सगळं घर भरलेलं दिसलं त्यांच्या मनात विचार आला,

‘सुभाषची एकंदर परिस्थिती चांगली दिसतीय घरात कशालाही कमी दिसत नाही…. आपण स्वीटूला सून करून घेतली तर ….’ 

इतक्यात स्वीटूचे वडील सुभाष दिवाणखान्यात आले…. दोघ्यांच्या मस्त गप्पा रंगत आल्या होत्या, चहा-पाणी झाले…. स्वीटूची आई स्वयंपाकाला लागली,

इतक्यात पेडणेकर काका, “वहिनी जेवण वैगेरे नको हा, घरी स्वयंपाक तयार असेलच….  मोहीतची आई वाट पाहत असेल माझी निघतो मी”

स्वीटूची आई, “अहो भाऊजी स्वीटूनेच केलाय सगळा स्वयंपाक!”

पेडणेकर काका, “नाही हो वहिनी निघतो मी , भारीच आग्रह करताय तुम्ही पुढच्या वेळी मोहित आणि  शालिनीला घेऊनच येईल मी स्वीटूच्या हातचं जेवायला मग तर झालं !”

स्वीटूची आई, “ठीक आहे नक्की या वाट पाहू आम्ही सगळे !”   

पेडणेकर काका सर्वांचा निरोप घेऊन आपल्या घरी निघाले, यानंतर  तिघेही जेवायला बसले….

सुभाष काका स्वीटूच्या आईला, “गोडाचं काही केलाय का ?केलं असेलच तर स्वीटूचं तोंड गोड कर पहिले!! ”

स्वीटूची आई , “का हो ?? आज इतक्या दिवसांनी गोडाची आठवण आली तुम्हाला” ?

सुभाष, ” अगं  आपल्या स्वीटूला माझ्या मित्राने म्हणजेच पेडणेकराने त्याच्या मुलासाठी मागणी घातलीय ”!

एवढ्यात स्वीटू कावरी-बावरी झाली, स्वीटूच्या आईचा तर आनंद गगनात मावेनासा झालं आणि ती पटकन म्हणाली, ” मी देवापुढे गोडाचा नैवेद्य दाखवून आले हा ! खूपच चांगली बातमी सांगितलीत तुम्ही ”

ऐकून स्वीटूही मनातल्या मनात खुश होतीच कारण ती बऱ्याचदा आपल्या बाबांबरोबर पेडणेकर काकांच्या घरी गेली होती. मोहित आणि तिच्यात बऱ्याचदा संभाषण झालं होतं.

काही दिवसांनी दोघांच्या लग्नाची बोलणीही  झाली आणि सहा महिन्यांनंतर मुहूर्तही काढला…. दोघांच्या भेटी गाठीही वाढल्या.. दोघे एकमेकांना जाणून घेऊ लागले…. पण नियतीला काही भलतेच मंजूर होते…. सगळं व्यवस्थित चाललं असताना अचानक काही दिवसांनी स्वीटूच्या बाबांचे अपघातात निधन झाले, त्यांचे दिवसकार्यही दोघी मायलेकींनीच केले. 

मग आपल्या वडिलांचा शब्द पाळण्यासाठी दोघीही पेडणेकरांकडे गेल्या पण इतक्यात लग्न नको असे पेडणेकरांनी म्हटले म्हणून दोघीही हिरमुसल्या चेहऱ्याने घरी परत आल्या. त्यानंतर स्वीटूने मोहितशीही संपर्क साधायचा प्रयत्न केला पण काही ना काही कारण देऊन मोहित स्वीटूला टाळत होता. स्वीटू पुरती मोहित मध्ये गुरफटली होती…. पण थोड्याच दिवसात तिने स्वतःला सावरलं आणि तिने आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलं. कारण तिला स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं होतं….तिच्या वडिलांनी ज्या ज्या वस्तू इंस्टालमेंट वर घेतल्या होत्या त्या वेळेवर बँकेत इंस्टालमेंट जमा करू न शकल्याने बँकेने जप्त केल्या होत्या …. बघता बघताच थोड्याच दिवसात वस्तुंनी भरलेलं घर मोकळं झालं….वस्तूंपेक्षा आपला माणूस गेला ह्याचं दुःख स्वीटूला आणि तिच्या आईला जास्त होतं.

घराचे सुद्धा हफ्ते चालूच होते…. त्यामुळे स्वीटूच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे आणि सुभाषची जी काही जमापुंजी होती ती घराचे हफ्ते फेडण्यातच गेले होते.  एक वर्षभर दोघीनींही कसतरी होतं नव्हतं ते गहाण ठेवलं आणि आपला कसातरी गुजारा केला होता. पण स्वीटूने आपल्या अभ्यासावरचं लक्ष कधीच हटू  दिलं नाही आणि वर्षभरातच आपलं शिक्षण पूर्ण करून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ती मॅनेजर या पदावर नोकरीसाठी रुजू झाली…. आणि मग काय…? त्यांच्या राहत्या घराचा तर जणू कायापालटच झाला, म्हणजे सगळ्या लिलावात गेलेल्या वस्तू परत आपल्या घरात विराजमानाचं झाल्या…. स्वीटूच्या आईला तर अगदी भरून पावलं होतं …. “लेकीनं आपल्या बापाची कसर भरून काढली”….  असं आल्या गेलेल्याना सांगू लागली. 

एक दिवस अचानक पेडणेकर काका आले आणि स्वीटू आणि मोहितच्या लग्नाचा विषय काढला, स्वीटूच्या आईला तर खूपच आनंद झाला कारण आपल्या नवऱ्याची एकच इच्छा राहिली होती….  तेवढी पूर्ण झाली कि मी आनंदाने डोळे मिटेल…. असं तिला वाटायचं कारण किती झालं तरी मुलगीच ती आणि जोवर पोरीचं लग्न होऊन ती सुखाने नांदत नाही तोवर हुरहुरच वाटते.

स्वीटूची आई, “भाऊजी मी एकदा स्वीटूशी बोलेन आणि मगच आपण पुढचा निर्णय घेऊयात…!”  यावर पेडणेकर काकांनी सहमती दर्शवली आणि स्वीटूच्या आईचा निरोप घेतला.

दुसऱ्याच दिवशी स्वीटूच्या आईने स्वीटूशी लग्नाचा विषय काढला,

“स्वीटू बघ बरं योग असले कि सगळं कस व्यवस्थित जुळून येतं , तेव्हा ना बेटा तुझे योगच नसतील, आत्ता योग आहेत, मग कसं दोनाचे चार हात करून घे….  मग कसं तुझ्या संसाराचा गाडा चाललेला मी पाहिन आणि आनंदाने डोळे मिटायला मोकळी होईल ”

स्वीटू –  ”आई संध्याकाळची वेळ आहे वास्तू तथास्तु म्हणत असते, असं अभद्र बोलू नकोस गं …. तुला माझ्या लग्नाची काळजी आहे ना, मग ऐक, मला मोहितशी लग्न नाही करायचं ….!”

आई –   ”का गं  ? कालपर्यंत तर त्याचा फोटो घेऊन फिरणारी तू अचानक नाही का म्हणतेस ? ”

स्वीटू –  “आई शांतपणे ऐक, बाबा गेले तेव्हा आपल्या घराची आर्थिक परिस्थिती ढासळली, तेव्हा तर खरं मोहितच्या आधाराची खरी गरज होती, पण तो तर माझ्यापासून जाणून बुजून तुटक तुटक वागू लागला….  तू काळजी करशील म्हणून मी तुला हि गोष्ट सांगितली नाही कारण तुला जर हे कळलं असतं तर तुझा धीर खचला असता …. म्हणून मी मोहीतचा विचार न करता आपल्या पायावर उभं राहायचं ठरवलं आणि पेडणेकर काकांनीही त्यावेळी लग्नाचा विषय टाळला होता….. आता आपली परिस्थिती हळू-हळू सुधारतेय तर मला मागणी घालायला आलेत याचा अर्थ काय होतो आई ? त्यांना मी नकोय माझा पैसा हवाय, माझी पोस्ट हवीय जिथे मला किमंत नाहीय त्या घरात मी कशी जाऊ???? “

ते म्हणतात ना, “असतील शिते तर जमतील भुते…!” असं म्हणून स्वीटू आत मध्ये गेली आणि स्वीटूची आई मात्र आपल्या मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिली.

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.