Skip to content Skip to sidebar Skip to footer

आषाढी एकादशी उखाणे

ashadi ekadashi quotes:

दाही दिशांना घुमतो विठुनामाचा गजर
रावांमुळे आला माझ्या जीवनाला बहर

विठ्ठल माझा पिता। रुक्मिणी माता
पुंडलिक भाऊ। बहीण चंद्रभागा
लागली मना ओढ भक्तीमाहेराची
रावांच्यासवे पार करते वाट जीवनाची

टिपरी वाजे, झांज वाजे, वाजतो म्रुदंग
रावांचे नि माझे साताजन्माचे ऋणानुबंध

अंगणातल्या तुळशीला प्रदक्षिणा घालते
रावांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते

पंढरपुरचा नित्ळा लावण्याचा पुतळा
रावांचा जीव बाई माझ्यात गुंतला

विठुराया, तुझे नाम घेता ओठी
इडापिडा टळून जाती, दारिद्रय नष्ट होती
मागणे मागते तुजपाशी रावांची होवो उदंड प्रगती
क्रुपाद्रुष्टी राहो तुझी माझ्या सख्यावरती

विठ्ठल नाही पाळत जात आणि धर्म
 रावांसोबत मी जाणलय सुखी संसाराचं मर्म

क्रुष्णतुळशीला आल्यात मंजिऱ्या दाट
    रावांचा आहे औरच थाट

एकतारी गाते सुरात गीत विठ्ठलाचे
    रावांचे नि माझे आहे नाते शतजन्मीचे

पंढरीत मेळा नाचे वैष्णवांचा
      रावांना ध्यास विठ्ठलदर्शनाचा

नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमरोमातून
      रावांसोबत तुझे गीत गाते अंत:करणातून

पंढरीचा राया दळण जनीचे दळतो
      रावांना भाव माझ्या अंतरीचा कळतो

आषाढी एकादशीला विठुनामाचा गजर
      रावांना आहे माझ्या गुणांची कदर

विठुमाऊलीला घालते तुळशीचा हार
      रावांना आवडते वाद्य सतार

इंद्रायणीच्या पाण्यात शहारे अंग अंग
       रावांसोबत मी विठ्ठलभक्तीत दंग

अवघे गरजे पंढरपूर, जाहला नामाचा गजर
       राव झाले आषाढीला पंढरपुरात हजर

आषाढीएकाशीचा करतो जोडीने उपवास
       आयुष्यभर लाभो मज रावांचा सहवास

पुंडलिकाच्या भेटीसाठी उभा विठु विटेवर
      राव जाता परदेशी येतो मला गहिवर

चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी
       रावांना आहे प्रिय श्रद्दा आणि सचोटी

रावांसाठी केला भात वरीतांदळाचा
एकादशीदिनी गजर विठ्ठलनामाचा

उपवासाची कचोरी, राजगिरा लाडू
रावांना विचारते पुरे का अजून वाढू

सुक्यामेव्याची खीर, फळांच्या फोडी
      उकडलेले शेंगादाणे, रताळ्याचे काप
      अळीवाचा लाडू , राजगिऱ्याची चिक्की
      गालात हसत राव म्हणे हेच ते आपलं
      एकादशी आणि दुप्पट खाशी

लग्नानंतरची पहिली आषाढी एकादशी
       सासरघरचा  पहिलावहिला उपवास
       नणंदेने दिले भाजके शेंगादाणे
       सासऱ्यांनी आणली वेलची केळी
       राव आले दमूनभागून म्हणतात कसे
      तू उपाशी ना आज म्हणून घेऊन आलो शहाळी नि आंबापळी


आषाढीएकादशीला बरसतात पावसाच्या सरी
….रावांचा आहे भारी जीव माझ्यावरी

लेकरांची सेवा विठुमाऊली करते
रावांच्या जोडीने मी वारी पंढरीची करते

चंद्रभागेतिरी वसली विठुरायाची पंढरी
      रावांसोबत भेट घ्यावी तुझी ही इच्छा अंतरी

आषाढीकार्तिकीला भक्तगणांचा मेळा
 विठुराया कनवाळू, श्रमकऱ्यांचा पिता
 प्रापंचिक गार्हाणी ठेवली मी बांधून
 चालले पंढरीला सोबत रावांना घेऊन

अनंत अपराध पोटी घाली
 माझी विठोबा माऊली
 तुझे नाम सदासर्वदा ओठी
 दे रावांना आशिष कोटी कोटी

पैठणहून एकनाथांची, त्र्यंबकहून निव्रुत्तीनाथांची
देहुहून संततुकारामांची, आळंदीहून ज्ञानदेवांची
शेगावहून गजाननमहाराज नं उत्तर भारतातून कबीरांची
आषाढीएकादशीला विठुरायाच्या भेटीलागी
पालख्या आल्या पंढरपुरा
रावांना प्रपंचातून नाही वेळ तरी  ध्यानीमनी  विठु बरवा

सर्व देवतांचे तेज एकवटले देवशयनी एकादशीत
रावांच्या जोडीने विठुदर्शन घेतले, मी आहे खुशीत

रुक्माई रुसली की रुसवा काढतो विठ्ठल भोळा
 रावांसाठी करते मी श्रुंगार सोळा

आषाढी एकादशीला विठ्ठलमंदिरात भजन
रावांचे नाव घेऊन करते सकलांना नमन

विठुच्या देहाला लेप शीतल चंदनाचा
अभिमान मला रावांच्या कर्तुत्वाचा

विठ्ठलाच्या गळ्यात शोभून दिसते तुळशीमाळ
रावांनी आणले चिरंजीवासाठी इवलाले टाळ

श्रीविष्णुला प्रिय शेषनागाची शैया
रावांचे गाव आहे भुलभुलैया

दऱ्याखोऱ्यांत विठू नांदतो
गरीबाच्या घरी हरी निजतो
हिरव्यागार शेतमळ्यात
रावांच्या रुपात मला हरी भेटतो

ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस
रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस

निव्रुत्तीनाथ,ज्ञानदेव,सोपानदेव,मुक्ताई
चौचांनी चालविली भिंत
रावांची साथ जीवनी नाही कशाची खंत

करा भूतदया संत एकनाथांचा संदेश
रावांसंगे आले परदेशी सोडूनी स्वदेश

तुकारामांसाठी आले स्वर्गातून विमान
रावांचे नाव घेते द्या आशीर्वाद छान

संत मुक्ताईने भाजले मांडे ज्ञानाच्या पाठीवर
रावांचे नाव गाजुदे जगाच्या पाठीवर

ज्ञानदेव माऊलींनी लिहिली ज्ञानेश्वरी
रावांचे घेते नाव आशीर्वाद द्याल ही खातरी

पारिजातकाचा सडा रुक्मिणीच्या अंगणात
रावांच्या साथीने करते संसाराची सुरुवात

भोळ्या विठुरायाला साथ रखुमाईची
राव घालतात मला साद प्रितीची

विठोबारखुमाई जोडपे आहे आदर्श
रावांना पहाताच होतो मला हर्ष

Leave a Comment

error: