आषाढी एकादशीचे महत्व आणि माहिती

१. आषाढी एकादशी माहिती
Ashadi Ekadashi in marathi : आपला महाराष्ट्र हा अनेक सण, रुढी, परंपरा यांनी भरलेला आहे. प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आणि कारणे आहेत. आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक देवालये , मंदिरे आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत ज्यांचा उल्लेख पुराणात आपल्याला पाहायला मिळतो. त्या त्या ठिकाणची कथा आणि इतिहास हा रंजक आणि वेगळा आहे.
ब्रहमा, विष्णु आणि महेश हे आपल्या सृष्टीचे निर्माण करते आहेत. या सगळ्यांचेच आजही आपल्या पृथ्वीतलवार जागृत असे स्थान आहे आणि कायमच राहील. हे सगळेच देव जनकल्याणासाठी नेहमीच कोणत्या ना कोणत्या रूपात प्रकट झाले आणि समाजकल्याणाचे काम करत राहिले. त्यातील भगवान विष्णूचे अदृश्य रूपातील अस्तित्व आजही कायम आहे. त्याचे पुरावे पुराणात आपल्याला पाहायला मिळतात. जिथे भगवान विष्णू भगवंताच्या रुपात पाहायला मिळतात ते स्थान म्हणजेच पंढरपूर. याच पंढरीत लाखो भाविक कानाकोपऱ्यातून विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात आणि तो सोहळा म्हणजेच ” आषाढी एकादशी “.
२. आषाढी एकादशीचे महत्त्व
संपूर्ण वर्षात एकूण चौदा एकादशी येतात. त्यातल्या आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. पौराणिक काळापासून ही एकादशी महत्वाची मानली जाते. आषाढ महिन्याच्या शुध्द पक्षात येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी किंवा आषाढ महिन्यातील एकादशी तिथी म्हणजे आषाढी एकादशी. बहुतेक वेळा आषाढ महिन्यात दोन एकादशी येतात. आषाढ शुध्द एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी.
तिथी जर वाढली तर किंवा अधिक महिना असेल तर अजून एक एकादशी येऊ शकते. आषाढ महिन्यातील ( जून/जुलै ) शुक्ल/ शुध्द पक्षातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी/ महा एकादशी / देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आता या एकादशीला देवशयनी का म्हणतात कारण आपले मनुष्याचे एक वर्ष म्हणजे देवांचे एक अहोरात्र असते. देवांच्या रात्रीला दक्षिणायन तर दिवसाला उत्तरायण असे म्हटले जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण म्हणजे दिवस पूर्ण होऊन दक्षिणायन म्हणजेच रात्र सुरू होते. म्हणूनच आषाढी एकादशील देवशयनी ( देवांच्या निद्रेची ) एकादशी म्हणतात.
देवशयनी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो. तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की भगवान विष्णू क्षीरसागरत शेषनागावर योगनिदिला जातात आणि कार्तिक एकादशीला बाहेर येतात. या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो. असेही म्हणतात की पंढरपूर मंदिरात ई. स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहचनाऱ्या पालखीची प्रथा पाडली.
देव जेंव्हा झोपलेले असतात तेंव्हा असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देतात, त्या असुरी शक्ती पासून ( असुर पासून ) स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत, साधना करणे आवश्यक आहे. या काळात रोजच्या पुजे बरोबरच भगवान विष्णूची ” श्रीधर” नावाने पूजा करून रात्रंदिवस तुपाचा दिवा लावण्याचा विधी किंवा व्रत करतात. घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांची पूजा केली जाते आणि म्हणूनच वारकरी संप्रदायात पंढरीच्या वारीला विशेष महत्त्व आहे.
हेही वाचा
जाणून घ्या हरिद्वारमध्ये गंगा स्नानास अनन्य साधारण महत्व का आहे?
महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर माहिती व इतिहास
३. आषाढी एकादशी का साजरी केली जाते?
आषाढी एकादशी या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. पंढरपूरला भगवंताचे अदृश्य रूपातील अस्तित्व आजही अनुभवायला मिळते, त्यामुळेच पृथ्वीवरील सर्वात प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर. इथे देवाचा वास कायम असल्यामुळे पंढरपूर आणि काशीविश्वेश्वर ही दोनच अशी तीर्थक्षेत्रे आहेत जी कधीच नाश पावणार नाहीत. वारीची परंपरा ही अनादी कालापासून सुरू झालेली आहे, साधारण आठशे वर्षांपेक्षा ही जास्त काळ ही परंपरा सुरू असल्याचे सांगण्यात येते.
पूर्वीच्या काळी जेंव्हा संतमहात्मे एकत्र यायचे तेंव्हा प्रत्येकजण एकमेकांच्या चरणावर डोके ठेऊन एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त करायचे . पायावर डोके ठेवल्याने लाभ होतो, तसेच दोघांचेही तेज वाढून अंगातला “मी” पणा, अहंकार, ताठा कमी होतो असे म्हटले जायचे. त्यामुळेच आजही थोरामोठ्यांच्या पाया पडण्याची परंपरा कायम आहे. ईश्वर चराचरात आहे ही भावना मोठी होते. हे संत लोक एकमेकांची भेट घेऊन आपले अनुभव, कथा, रचना, अभंग आणि भजने यांची देवाणघेवाण करत असत. तीच परंपरा कायम ठेवत कार्तिकी एकादशी पासून आषाढी एकादशी पर्यंत व्याष्टी आणि समष्टी म्हणजेच विचारांची देवाणघेवाण या साधनेचा अनुभव देण्यासाठी तसेच पुढच्या पिढी पर्यंत हे मार्गदर्शन मिळावे यासाठी आषाढी एकादशी साजरी केली जाते.
४. आषाढी एकादशी कशी साजरी करतात?
सगळा वारकरी संप्रदाय दशमीला म्हणजे एकादशीच्या आधी एकदाच जेवण करतात, एकादशीला सकाळी सकाळी स्नान करताना, तुळशीचे पान वाहून विष्णुपूजन केले जाते आणि संपूर्ण दिवस उपवास केला जातो. ज्यांना वारीला जाणे शक्य नसते ते भाविक घरातच राहून दिवसभर उपवास आणि विठुरायाचे जपनाम करत राहतात. ही वारी आळंदीपासून निघते ती पंढरी पर्यंत असते. या काळात सगळ्या वारकऱ्यांचे लक्ष हे चंद्रभागा स्नान, पंढरीचा वास आणि विठुरायाचे दर्शन याकडेच लागलेले असते. ज्या विठुरायाच्या दर्शनासाठी इतके दिवस चालत आलो तो भेटल्याचा आनंद सगळा शिण एका क्षणात नाहीसा करतात.
५. २०२२ मध्ये आषाढी एकादशी कधी आहे? (Ashadi Ekadashi 2022)
दर पंधरा दिवसांनी एकादशी येते. साधारण महिन्यात दोन एकादशी येतात. आषाढी वारी जून / जुलै महिन्यात येते. शुद्ध आणि शुक्ल पक्षात. येत्या २०२२ ( Ashadi Ekadashi 2022 ) मध्ये ही वारी २९ जून २०२२ रोजी सुरू होणार असून १० जुलै २०२२ रोजी संपणार आहे.
६. वारीचे महत्त्व व इतिहास
आषाढ आणि कार्तिकी या दोन्ही महिन्यातील शुद्ध एकादशीला वारी होते. ही वारी आळंदीतून संत ज्ञानेश्वरांची, देहूतून संत तुकाराम, शेगाव इथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराज, त्र्यंबकेश्वरयेथून संत निवृत्ती महाराज, पैठणहून एकनाथ महाराज आणि उत्तर भारतातून संत कबीरची पालखी निघते. विठुरायाचे लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल नामाचा गजर करत विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पायी चालत येतात. यालाच आपण आषाढी वारी म्हणतो.
आषाढी वारीस सुगीची उपमा दिली जाते. कारण शेतकरी पेरणी करून वारीला निघतात आणि वारी संपवून घरी येईपर्यंत शेत वाढण्यास सुरुवात झालेली असते. वारकरी संप्रदायात लहान- मोठा, श्रीमंत – गरीब असा भेद नाही. सगळेच विठुरायाचे भक्त असतात. पायी येत असताना सगळेच विठूचा जप करत येतात, कोणी टळ वाजवते तर कोणी नाचत गात येत. सगळ्यांच्या मनी फक्त भाव असतो तो विठूचा दर्शनाचा. स्वतःमधील मी पाणा विसरून, जात धर्म, पंथ, पद, संसाराचे व्याप सगळे काही विसरण्याची ताकद असते या नामात. नामाच्या गजरात पाऊले थिरकत असतात आणि चेहऱ्यावर शांत, प्रसन्न भाव असतात.
भारतातील काही व्रत-वैकल्ये आणि सण – २०२२
एकादशी दिवशी नित्यनियमाने न चुकता पंढरीला जाणे म्हणजे वारी. नित्यानियम म्हणजे वारी. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतो तो वारकरी धर्म. या वारी मुळेच यांना वारकरी असे नाव पडले. एकदा का याची गोडी लागली की मग लागली. आपले विठूरायावरील प्रेम, भक्ती म्हणून वारकरी कधीच वारी चुकवत नाही.
वारी ही भागवत संप्रदायाची धारणा आहे. वारी करणे हा त्यांचा धर्म आहे. इतके दिवस चालून वारकरी जेंव्हा चंद्रभागेत स्नान करून विठुरायाचे दर्शन घेतो तो अनुभव अद्वितीय असतो, अद्भुत असतो, मनाला वेगळीच शांतता देणारा असतो. याचे वर्णन शब्दात करताच येणार नाही. कित्येक भाविक डोळ्यातून आनंद अश्रू ढाळत असतात. आपल्याला आपला देव भेटला याचा आनंद शब्दात काय वर्णावा.
ही वारीची परंपरा तेराव्या शतकपासून सुरू झाली ती आजतागायत आणि पुढेही अनंत काळ अशीच चालू राहील. संत ज्ञानेश्वरांच्या घरात ही प्रथा होती, त्यांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतली आणि पुढे सर्व धर्माने, जातींना, समाजाला अनेक संताना एकत्र करून वारीत सहभागी केले.
आषाढी एकादशी ही प्रत्येकाने निदान एकदा तरी अनुभव घ्यावा अशीच गोष्ट आहे. आयुष्यातील सगळ्या कटकटी विसरून देवाच्या चरणी तल्लीन होण्यासारखे दुसरे कोणतेच सुख नाही, याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या वारीचा नक्कीच आनंद घ्या.
===============