Skip to content Skip to sidebar Skip to footer

अनुबंध

®️सौ मधुर कुलकर्णी

इंदूच्या पार्कला चकरा मारून झाल्या आणि ती मैत्रिणींच्या कट्टयावर आली.घरी जायच्या आधी अर्धा तास ती इथे बसत असे.,सगळ्याच समवयस्क,पन्नास ते साठच्या मधल्या.काहींना जावई,काहींना सुना आल्या होत्या.केसरीच्या ‘माय फेअर लेडी’ च्या सिंगापूर ट्रिपला सगळ्यांची ओळख झाली आणि छान मैत्री जमली. पण ह्या गृपचा एक नियम होता.घरची गाऱ्हाणी कुणीही सांगायची नाहीत.तिथे फक्त वाचन,सिनेमा,तरुण वयातील आठवणी हेच विषय असत.काही जणी गृहिणी होत्या,काही नोकरीतुन व्हीआरएस घेतलेल्या.

    “ये ग इंदू,झाले का तुझे राऊंड मारून?आणि आज चेहरा का पडलाय तुझा?” सुनीताने विचारलं.

   “काही नाही ग,जरा दमले आज.”इंदू कट्टयावर बसत म्हणाली.

   “फ्रेश लेमन ज्यूस घे मग,थांब मागवते.”विद्या म्हणाली.

  “नको ग,परत शुगर वाढायची.” इंदू म्हणाली.इथे कसं सांगणार की येणाऱ्या नवीन सुनेच्या नोकरीवरून आज घरात वाद झाला.घरची गाऱ्हाणी करायची नाही असा नियम होता.

   “अग, तो नवीन सिनेमा आलाय न ‘झिम्मा’ तो बघूया.बायकांची गम्मत आहे त्यात सगळी.मी काढते तिकीट.”विद्या म्हणाली.

   विद्या स्वभावाने अगदी बिंदास.बँकेतून व्हीआरएस घेतली होती.आणि आता छान आयुष्य एन्जॉय करत होती.तिला जे हवं ते ती करायची.कर्तव्याला चुकली नाही पण आयुष्याचा आनंद घेत जगत होती.

   इंदूला विद्याचा खूप हेवा वाटायचा. असं वागणं  आपल्याला कधी जमलंच नाही.तिला हल्ली एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती.कमावणाऱ्या स्त्रीला विचारांचं स्वातंत्र्य असतं.संसारासाठी ती हातभार लावते त्यामुळे तिच्याबद्दल आदर असतो.

      लग्नाआधी इंदू एका छोट्याश्या फर्म मधे टायपिस्ट होती.पण लग्नानंतर तिला ती नोकरी सोडावी लागली.मिलिंदची फिरतीची नोकरी त्यामुळे तिने ती नोकरी सोडली.मिलिंदने खूप यश मिळवलं,उच्चपदावर पोहोचला.पैशाची कमतरता नव्हती.सगळी सुखं हात जोडून उभी होती पण इंदू कुठेतरी अतृप्त होती.हातून सतत काहीतरी निसटल्यासारखं वाटायचं.

     प्रज्वलचा जन्म झाल्यावर मोठया दिराकडून सासूबाई तिच्याकडेच कायमच्या राहायला आल्या.प्रज्वल दोन वर्षांचा झाल्यावर तिला एका शाळेत ज्युनिअर केजीत शिक्षिकेची ऑफर आली होती.सासूबाईंनी थोडा वेळ प्रज्वलला सांभाळलं तर आपण नोकरी करू शकतो असं तिला वाटलं.तिने विषय काढल्यावर मिलिंदने सरळ नकार दिला, “आईचं वय आता मुलं सांभाळायचं नाहीय,तिला आराम हवा.”

   “अहो,थोडा वेळ पाळणाघरात ठेवू त्याला.आत्ता जरी ज्युनिअर केजी असलं तरी पुढे चांगला चान्स मिळू शकतो.” इंदू म्हणाली.

    “तुला कशाची कमी आहे नोकरी करायला?तुला हवं ते सगळं मी देतो.साड्या,दागिने,स्वतःच घर,दारात गाडी सगळंच तर आहे.” मिलिंद तिला दाद न देता म्हणाला.

   “पण पैशासाठी मला नोकरी करायचीच नाही.”

   “आता कृपा करून माझं अस्तित्व जपायचं आहे,हे असलं काही मला ऐकवू नकोस.वेळ जात नसेल तर एखादा क्लब जॉईन कर.” मिलिंद म्हणाला.

      काहीतरी चांगलं काम करण्यासाठी नोकरी करायची आहे,वेळ जाण्यासाठी,पैसा मिळवण्यासाठी नव्हे,हेच जर मिलिंदला कळत नसेल तर वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता.त्यानंतर इंदूने कधीही नोकरीचा विषय काढला नाही.ऐश्वर्य हात जोडून उभं होतं पण मनात एक सल कायम राहिला.

   प्रज्वल आठवीत गेल्यावर इंदू,सासूबाई आणि प्रज्वल पुण्यात स्थायिक झाले.मिलिंद एकटाच नोकरीच्या गावी जायचा.नंतर आयुष्य सासूबाईंचं आजारपण,प्रज्वलचं शिक्षण याभोवतीच फिरत राहिलं. आत्ता कुठे जरा मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटत होतं.

     प्रज्वलचं लग्न ठरलं होतं.लव्ह मॅरेज.त्याची होणारी बायको सई एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होती.हुशार, देखणी,माणसं जपणारी.तिचं आणि इंदूचं छानच जमलं होतं. प्रज्वलचा बिझिनेस होता.मिलिंदची इच्छा होती की सईने नोकरी सोडून प्रज्वल बरोबर काम करावं.पण सईला ते मान्य नव्हतं. तिचे इंटरेस्ट वेगळे होते.त्यावरूनच आज सकाळी इंदूचं आणि मिलिंदच शाब्दिक झालं.प्रज्वलची वडिलांसमोर बोलायची अजून हिम्मत नव्हती.त्याची भुणभुण आईच्या मागे.

   “इंदू,कुठे हरवली आहेस ग?जायचं न उद्या सिनेमाला?” सुनीताने विचारल्यावर इंदू भानावर आली.

  “हो जाऊया की.काढ तिकिटे.चला, मी निघते.लग्न पंधरा दिवसांवर आलंय, आता कदाचित माझं पार्कमधे येणं होणार नाही.” इंदू कट्ट्यावरून उठत म्हणाली.

   “पंधरा दिवस ना,भरपूर अवकाश आहे.आणि तू तर वरमाय.तुला काय कामं आहेत ग?मला बोलावं,मी येते मदतीला.” विद्या लगेच म्हणाली.

   लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडलं.प्रज्वल-सई दृष्ट लागावी इतके देखणे दिसत होते.दोन तीन दिवसात पाहुण्यांची गडबड पण संपली.प्रज्वल-सई फिरायला गेले होते.त्यांना यायला अजून आठ दिवस  होते. एक दिवस जेवताना मिलिंद म्हणाला,
   “इंदू,कोथरूडला हा बंगला बांधून आपल्याला पंचवीस वर्षे झालीत.या भागात कुणी यायला तयार नव्हतं तेव्हा हा प्लॉट मी घेऊन ठेवला होता.पूर्वी फक्त तीन खोल्या होत्या.पैसा येत गेला आणि इतका भव्य बंगला मी बांधू शकलो.माझा विचार आहे की आता कर्वे नगरचा आपला फ्लॅट विकावा.आता प्रज्वल त्याच्या बिझिनेसमधे छान सेटल झालाय.सईला राजीनामा द्यायला सांगू.प्रज्वलचं ऑफिस वरच्या मजल्यावरच आहे.सई त्यालाच बिझिनेस मधे मदत करेल.आता तो फ्लॅट ठेऊन तरी काय करायचा?”
  

   “नको नको,विकू नका.”इंदू लगेच म्हणाली आणि जास्त न बोलता तिथून उठली.

   आज कट्टयावर जायचं इंदूने ठरवलं.सकाळी अलार्म लावून उठली.पार्कमधे जॉगिंग केलं आणि मैत्रिणींना भेटायला आली.
  
     “या सासूबाई,इंदू लग्न छानच झालं ग.अगदी थाटात.पण तु आता कट्ट्यावर येशील न? का सुनबाई नोकरी करतात म्हणून सासू डबा करतेय.”,उज्वला हसतच म्हणाली.

  “ए ,नो गॉसिपिंग,इथला तसा नियम आहे.इंदू तु माझ्याकडे ये दोन दिवस श्रमपरिहारासाठी.तुला अगदी हातात चहा आणून देईन.”विद्या म्हणाली.

   “येणारच आहे विद्या,तशी बरी सोडेन तुला” इंदू हसत म्हणाली. ” चला निघते मी,आज प्रज्वल-सई येताहेत.उद्या भेटू परत.”

   इंदू घरी आली तर प्रज्वल-सई आलेलेच होते.सईने इंदूला आल्या आल्या मिठी मारली.
  “आई,पपा कसे आहात तुम्ही दोघे?” सईने विचारले.

  “आम्ही मजेत ग.तुमची ट्रिप कशी झाली?छान फ्रेश दिसताय दोघेही.”इंदू कौतुकाने दोघांना बघत होती.

     “खूप छानआई,एंजॉईड व्हेरी मच.” प्रज्वल म्हणाला.

     रात्री जेवताना मिलिंदने नको तो विषय काढलाच.
   “सई, व्हाय डोन्ट यु जॉईन प्रज्वल? तु रिझाईन कर.घरचा इतका मोठा बिझिनेस असताना तुला नोकरीची काय गरज?”

    इंदूला ते अजिबात आवडलं नाही.नवी नवरी,आज तिचा सासरचा पहिला दिवस आणि हा विषय.सई तरी काय उत्तर देणार?तिला नोकरी सोडायची नाही हे तिने प्रज्वलला आणि इंदूला आधीच सांगितले होते.

   “आत्ता जेवताना तो विषय नको.दोन दिवसांनी बोलू.”इंदू म्हणाली.इंदूला टेन्शन आलं.मिलींदच्या ह्या बोलण्याने त्या नवरा बायकोत तणाव नको.तिने मनात
काहीतरी ठरवलं.

   दोन दिवसांनी इंदूने रात्री प्रज्वल आणि सईला त्यांच्या खोलीत बोलावले.
  “प्रज्वल, सई; मी एक निर्णय घेतलाय.महिन्याभराने तुम्ही दोघेही कर्वेनगरच्या फ्लॅट मधे शिफ्ट व्हा.तुमच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही तुमची स्पेस जपा,आम्ही आमची जपतो.आमचं दडपण घेऊन जगू नका.तुमचं आयुष्य तुमच्या मर्जीनुसार जगा. प्रज्वलचं ऑफिस इथेच आहे म्हटल्यावर रोज भेट होईलच.सई, तु पण न चुकता येत जा.कधी यायचं ते तुझ्या सोयीने ठरव.काही दुखलं,खुपलं तर एकमेकांसाठी आपण कायमच आहोत.पण सुरवातीलाच नात्यांचं ओझं होऊ नये असं मला वाटतं. सई, तु तुझी नोकरी सुरू ठेव.उद्या मुल झाल्यावर पाळणा घराची पण तयारी ठेव.कारण करिअर करणाऱ्या आईचं मूल देखील तिच्यासारखंच प्रॅक्टिकल व्हायला हवं.आत्ता कदाचित माझे शब्द कठोर वाटतील पण मी पूर्ण विचारांती निर्णय घेतलाय.झोपा आता, गुड नाईट.”

  प्रज्वल-सई रूमच्या बाहेर गेल्यावर इतका वेळ गप्प बसलेला मिलिंद म्हणालाच,
   “इंदू,व्हॉट आर यु टॉकिंग? हा कसला निर्णय?आणि मला विचारलं सुद्धा नाही.सईने नोकरी सोडायची नाही,मुलं पाळणाघरात ठेवायची.त्याचे आजी आजोबा असताना पाळणाघर कशाला?”

   इंदूने आश्चर्याने मिलिंदकडे बघितलं. हाच का तो मिलिंद! माझी आई ह्या वयात मूल सांभाळणार नाही,तिला आराम हवा म्हणणारा.
  “निर्णय योग्यच आहे माझा.सईमधे मी आता मला बघतेय.तिचं करिअर तिच्या मनासारखं व्हावं हीच माझी इच्छा आहे,जे मी नाही करू शकले.आणि पाळणाघरात वाढणारी मुलं जास्त सक्षम,धीट होतात.”

   “म्हणजे हे तु मुद्दाम मला दुखवण्यासाठी करते आहेस तर.”मिलिंद चिडून म्हणाला.

   “तसा विचारही माझ्या मनात कधी येणार नाही हो.पण स्त्रीचं जग संसार,मुलं नातेवाईक ह्यापलीकडे काही असू नये का?आणि ते विश्व घराबाहेर पडल्यावरच निर्माण होतं.आता ही नवीन पिढी आहे.आपल्यामुळे त्या दोघांमधे तंटा नको.आणि एकाच तर गावात आहो,असं किती लांब आहे?थोडा विचार केलात तर तुम्हालाही माझं म्हणणं पटेल.झोपा आता शांतपणे.” इंदूने दिवा मालवला.

    सकाळी इंदू कीचनमधे चहा करत होती.सई फ्रेश होऊन किचनमध्ये आली.
  “सई, राग आला का ग कालच्या माझ्या बोलण्याचा?” इंदूने विचारलं.

   “नाही हो आई,उलट खूप भारी वाटलं,मला अशी सासू मिळाली म्हणून.पण मला कुकिंग कोण शिकवेल आता?नाहीतर प्रज्वलचं आणि माझं त्यावरून भांडण व्हायचं.” सई हसत म्हणाली.

   “मै हुं ना,इंदू कुकिंग क्लासेस.पण फी द्यावी लागेल हं “इंदू गमतीने म्हणाली.

  “डन आई,काय फी हवी?”सईने विचारलं.

   “आपल्या दोघींचं नातं,सासू सुनेचं नाहीतर तर माय लेकीचं असावं ही फी हवीय मला.”

   “दिली आई ” सईने इंदूचे हात धरले आणि दोघींनी मनाशी खूणगाठ बांधली…हे अनुबंध जपण्यासाठी…

©️®️सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Leave a Comment

error: