अन्नपूर्णा

©️®️सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. पावसाच्या अगदी अंगातच आलं होतं. विजा चमकत होत्या. कोकणातील जुन्या वळणाचं कौलारू घर. पागोळीतून पावसाच्या सरी पडत होत्या. निसर्गाचं दृश्य फारच विलोभनीय दिसत होतं. पण आपल्या पाच महिन्याच्या तिसर्या मुलीला मांडीवर घेऊन खिडकीतून पावसाकडे बघत बसलेली श्रेया त्या पावसाचा आनंद घेऊ शकत नव्हती कारण तिच्या डोक्यात पावसापेक्षाही जोरात विचारचक्र चालू होतं.
आतल्या खोलीतून हसण्याचा आवाज आला तशी ती आपल्या विचारातून जागी झाली. तेवढ्यात नवर्याची हाक आली,
‘‘श्रेया, मस्तपैकी भजी कर! पाऊस पडतोय.’’
‘‘आले’’ म्हणत श्रेया उठली आपल्या मुलाीला सासूबाईंच्या मांडीवर देऊन ती भजी करण्यासाठी आत वळली. पण जाता जाता तिची नजर त्या मांडलेल्या पत्त्यांच्या डावावर गेली आणि तिची तळपायाची आग मस्तकात गेली. धाकटा दीर, नवरा, दोन्ही मुली, धाकटी जाऊ लता, तिचा मुलगा सगळे पत्ते खेळण्यात मग्न होते. पत्ते, चहावर चहा, सोबत तळलेले गरे. लोळणं, आराम करणं यातच त्यांचं आयुष्य चाललं होतं. मान्य होतं की आंब्याच्या दिवसांत खूप कष्ट होतात, पण नंतरचे दिवस तसे बसूनच काढावे लागतात. तसंही हे काम एकट्या माणसाने करण्यासारखे होते त्यासाठी दोघे भाऊ भाऊ आपला वेळ काढत होते. एकाने दुसरा उद्योग करायला हरकत नव्हती, आणि तसंही परिस्थिती बरी होती, उत्तम नव्हती. खायचे प्यायचे वांदे नव्हते, पण साठवणूक काहीच नव्हती. पण सांगणार कोण?
श्रेया कष्टाळू कुटुंबातून आली होती, तिला असं आरामदायी जीवन पटण्यासारखं नव्हतं शिवाय हातात बळ आहे तोपर्यंत मुलांसाठी काहीतरी करून ठेवावं हाही विचार होताच. तिला खरंतर हे तिसरं बाळंतपण ही पटलं नव्हतं, पण काय करणार तिचा इलाज चालत नव्हता. तिने भराभरा कांदा चिरला, भजी तळणीत सोडता सोडता तिच्या विचारांना धुमारे फुटत होते.
तिच्या मनात लेले काकूंचे दुपारचे शब्द रेंगाळत होते. दोन दिवसांनंतर त्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती. जवळपास 50-60 माणसं होती, पण स्वयंपाक करायला बाई मिळत नव्हती. एक बाई ठरवली होती तिला अचानक काहीतरी अडचण आली होती, आता काय करावं या विचारात त्या पार गांगरून गेल्या होत्या. तिच्या मनात काहीतरी घाटत होतं, पण ते ओठांवर कसं आणावं याचा ती विचार करत होती. मस्त खमंग कुरकुरीत भजी तयार होत्या. त्या कुरकुीत भज्यांकडे समाधानाने बघत तिने मनाशी निश्चय केला.
सर्वांनी भजांचा फडशा पाडला. वर आल्याचा फक्कड चहा झाला. सर्व मंडळी तृप्त झाली. तिच्या पाककौशल्याचे सर्वांनी मनसोक्त कौतुक केले. तू अन्नपूर्णा आहेस असं सासूबाई कौतुकानं म्हणाल्या.
सर्वांची पोटं भरल्यावर श्रेया हळूच म्हणाली.
‘‘मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी विचारायचं आहे. म्हणजे माझा विचार पक्का आहे, पण तुमचं मत घ्यायचं आहे.’’
आता ही काय ज्ञानामृत पाजणार? अशा अर्थाने नवर्याने तिच्याकडे पाहिले. कारण श्रेयाची रिकामं बसणं, पत्ते खेळणं यावरून सतत कुरकुर चाललेली असायची. त्या कटाक्षाकडे दुर्लक्ष करत श्रेयाने आपले बोलणे पुढे रेटले. शेजारच्या लेले काकूंकडे पूजा आहे त्यांना मदतीची कशी गरज आहे, त्यांच्याकडे स्वयंपाकाला येणारी बाई अचानक कशी रद्द झाली हे सगळं तिने रंगवून सांगितलं.
‘‘हे तू का आम्हाला का सांगत आहेस?’’ असं नवर्याने विचारल्यावर ती जरा थांबत, म्हणाली,
‘‘मी त्यांच्याकडे स्वयंपाकाला मदतीला जाण्याचा विचार करतेय!’’
तिच्या या वाक्याने सारेजण तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागले.
‘‘आपल्याला काय गरज आहे असं काम करायची?’’ धाकटी जाऊ म्हणाली.
‘‘तुला झेपणारे का हे काम वहिनी?’’ धाकटा दीर म्हणाला.
‘‘तेच मला म्हणायचं आहे. तुला झेपणार नाही हे काम.’’ नवरा म्हणाला.
‘‘प्रयत्न करायला काय हरकत आहे? अत्ता त्यांची नड आहे, तर तीही निघेल आणि मलाही अंदाज येईल. तसंही घरात 40-50 माणसं जमतात तेव्हा आपण करतोच ना सारं?’’ तिनं प्रतिउत्तर दिलं.
‘‘अंदाज? कसला अंदाज?’’ नवर्याने विचारलं.
‘‘मी अशी स्वयंपाकाची कामं घ्यायचं म्हणतेय. नुसतं बसून मला कंटाळा येतो.’’ श्रेया म्हणाली.
सर्व जण शांत बसले. तिने सासूबाईंकडे पाहिलं. त्यांनीही कष्टाने आपला संसार उभा केला होता. नवर्याच्या माघारी अतोनात कष्ट करून मुलांना वाढवलं होतं, त्यांच्या मनानं मुलं जरा आळशीच निघाली होती याचं त्यांनाही वाईट वाटायचं, पण मुलांच्या मायेमुळे त्या तसं बोलू शकत नव्हत्या. पण आजच्या श्रेयाच्या बोलण्याने त्यांना आनंद झाला की, सुनेने असा विचार केला. तसं श्रेयाचं आणि त्यांचं जमायचंही छान. अधूनमधून श्रेयाच्या बोलण्यातून रिकामं बसणं तिला आवडत नाही हे त्यांना जाणवायचं, पण ती काय करू शकेल हे त्यांना सुचत नव्हतं. पण आज आपणच तिला अन्नपूर्णा म्हंटलंय ती हे नक्की करू शकेल. असे विचार त्यांच्या मनात येत होते. सर्वांची नजर आपल्यावर खिळली आहे हे त्यांना जाणवलं. कारण घरातील सर्व अधिकार सासूबाईंकडेच होते, बाकीच्यांच्या तोंडाच्या वाफा कितीही चालल्या, तरी आईचा शब्द ना सुना डावलत होत्या, ना मुलं.
सासूबाईंनी मांडीवरच्या बाळाला थोपटलं आणि म्हणाल्या,
‘‘मला श्रेयाचा विचार योग्य वाटतोय. एकतर लेले काकूंचे आणि आपले संबंध चांगले आहेत, माझ्या पडत्या काळात त्यांनी मला खूप मदत केली आहे. अत्ता त्या अडचणीत आहेत तर त्यांना मदत करण्याचा विचार चांगलाच आहे आणि श्रेयाच्या हाताला चव आहे, तर पुढेमागे अशी छोटीमोठी कामं तिने घ्यायला हरकत नाही. तिच्या मुलींकडे लक्ष द्यायला मी आणि लता आहोतच. ’’
आईने शिक्कामोर्तब केलं म्हंटल्यावर मुलं काय बोलणार? लताचा जरा जळफळाट झाला, पण ती गप्प बसली कारण सासू अजून खमकी होती.
‘‘माझी बाकी काही हरकत नाही, पण तिला झेपलं पाहिजे.’’ नवरा गुळमुळीत शब्दात म्हणाला.
‘‘मी नक्की झेपवेन. मी काकूंना सांगून येते.’’ श्रेया निश्चयाने म्हणाली.
श्रेयाने लेले काकूंना विनामोबदला मदत केली. अर्थात त्यांनीही फूल ना फुलाची पाकळी म्हणून तिला एक सुंदर साडी आणि थोडंफार धान्य दिलं.
काकूंकडे श्रेयाने केलेल्या स्वयंपाकाचे खूपच कौतुक झाले. तिचा कामाचा उरक आणि तिच्या हाताच्या पदार्थांची चव यांचे सर्वांनीच फार कौतुक केले. गावातले जवळपास सर्वच लोक आल्याने तिची ख्याती गावभर पसरली. आणि तिथे आलेल्या पाहुण्यांनी तुम्ही अशी कामं घेता का अशी विचारणा केली. तिने आपण सुरुवात करत असल्याचं सांगताच तिला कामं येऊ लागली. असं करता करता वर्षा-दोन वर्षांतच तिचा कामाचा पसारा वाढू लागला. कुठे मंगळागौरीची पूजा, कुठे सत्यनारायण, कुठे गणपतीच्या दिवसांत, कुठे नवरात्रात अशा ठिकाणी तिला स्वयंपाकासाठी बोलवू लागले. सर्वजण तिला अन्नपूर्णाच म्हणू लागले.
लता धुसफूस करे, हिला काय उठते की बाहेर सुटते. एक दिवस श्रेयाने गंमतच केली. तिलाही आपल्याबरोबर चल असा आग्रह केला, 25 किलो बटाटे सोलायला लावले तिच्याकडे कामाचा एवढा उरक नव्हता. ती ते काम करता करता थकून गेली. तिने श्रेयाला साष्टांग नमस्कार केला आणि मला आपलं घरच बरं हे मान्य केलं, पण तिथून पुढे श्रेयाला मात्रं सहकार्य केलं. हे करता करता श्रेयाने आणखी एक केलं की जिथे पूजा असेल तिथे जर त्यांना सहकारी लागणार असतील तर आपल्या नवर्याचं नावही पुढे केलं. नवरा सुरुवातीला जायला कंटाळा करायचा, पण नंतर नंतर त्यालाही हे काम करण्यात रस वाटू लागला. मुख्य म्हणजे खिसा गरम झाल्याने ते काम करायचा आनंद वाटू लागला.
पुढे श्रेयाच्या मुली मोठ्या झाल्या. त्या घरात आईला, काकूला मदत करू लागल्या. घरात सुबत्ता नांदू लागली. मुलींनाही लहानपणापासूनच कष्टाचं बाळकडू मिळालं. त्यांनी उत्तम शिक्षण घेतलं. त्यांना चांगल्या कोर्ससाठी फी भरणं श्रेयाला सोप्पं झालं. लताच्या मुलासाठीही श्रेयाने उत्तम शिक्षणाची व्यवस्था केली. त्यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती छान झाली. अशा रितीने एका घराचं गोकुळ झालं.
आता जेव्हा जेव्हा असा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा श्रेया खिडकीकडे पळते. बाहेरच्या पावसाकडे बघताना निसर्गाच्या विलोभनीय सौंदर्याचा आनंद घेते. आता तिच्या मनात विचारांची गर्दी होत नाही. त्या पावसाकडे ती आपला सखा म्हणून बघते आणि पुढील सोनेरी आयुष्याची स्वप्न बघण्यात गुंगून जाते.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
===================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============