अंजनेरीच्या कुशीत


डॉ अश्विनी राऊत
पाऊस हा तुमच्यासारखा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय.
या दिवसांत निर्सगाची किमया बघण्यासाठी आपण बाहेर पडतो, आणि निसर्गाच्या जवळ जाऊन त्याला अनूभवण्याचा प्रयत्न करतो.
मी देखील हाच उद्देश घेऊन काही वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना मित्र मैत्रिणींचा ग्रुप केला आणि कॉलेजपासून काही तासांच्या अंतरावर असणाऱ्या अंजनेरी पर्वतावर ट्रेक करायचा प्लॅन केला.
दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आवराआवर करून भाड्याने केलेल्या गाडीत सगळ्यांनी आपापल्या बॅग्स ठेवल्या. पहाटे अंगाला झोंबेल अशी हवा शरीरास जाणवत होती. त्यात नाशिकच्या रोमँटिक पावसासोबत गुलाबी थंडीची वेगळीच मजा असते.
कॉलेज पासून शंभर फुटांवर चहाची एक टपरी होती. आधीच आम्ही थंडीने कुडकूडलो होतो. त्यात चहाचा सुगंध दरवळत होता. अशात चहा प्यायची इच्छा न होणे म्हणजे नवलच… “चला, कडक चहा पिऊया. मग प्रवासाला सुरवात करूया” माझ्या या वाक्यावर सगळ्यांचे एकमत झाले. चहाच्या गरम घोटासोबत अंगातील थंडी उबदायक वाटू लागली होती. गाडी अंजनेरीच्या दिशेने धावू लागली. तसतसा आमचा उत्साह वाढत होता. पूर्वेकडून कोवळ्या सोनेरी किरणांचा वर डोकावण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु भरल्या ढगांच्या छायेखाली ते लपले जात होते. पंचवटी पासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या अंजनेरी पर्वतापर्यंतचा प्रवास किती आल्हाददायक वाटत होता. असे वाटत होते की हा रस्ता संपूच नये. कारण रस्त्याच्या दुतर्फा जरी मोठमोठ्या बिल्डिंगस असल्या तरी ताजी हवा आणि निसर्गाचं अस्तित्व लख्ख जाणवत होते. नाशिकबद्दल मला आवडणारी गोष्ट म्हणजे ते किती मोठ शहर आहे यापेक्षा त्या निसर्गाने त्या शहराला स्वीकारलं, आणि नाशिकने ते जपलं.
शहरातून बाहेर पडल्यानंतर लागणारी छोटी गावं , तिथले शेत, हिरव्या गर्द रंगात मिसळू पाहणारा पावसाळी रंग, समोर दिसणाऱ्या डोंगरांचे माथे, त्यावर आकाशभर पसरलेली ढंगाची छाया तरीही सूर्याचं जाणवणार अस्तित्व.
जणू ढग डोंगरावर अवतरले की काय! अस अदभूत दृश्य…
काल पडलेल्या पावसाने शेतात साचलेली छोटी तळे, त्यात खेळणारी लहान मुले. पक्षांच्या आवाजात मिसळणारे गुराढोरांचे आवाज… वाऱ्याच्या तालावर सळसळणाऱ्या पानांफुलांचा सुवास, नीट कान देऊन ऐकले तर पाऊस थेंबाचा रिमझिम नाद येऊ लागला होता. जणू काही संगीत मैफिल भरली होती आणि आम्ही पहिल्यांदाच असा रम्य सोहळा अनुभवत होतो. सकाळच्या सात वाजता जेव्हा आम्ही होस्टेलवर साखरझोपेत असू तेव्हा इकडे गावं, खेडी कामावर जायला निघतात. तेव्हा वाटलं, की डोळे बंद करून सुखाची कल्पना करण्यात नव्हे , खर सुख तर या सकाळच्या शांततेत आहे.
रिमझिम सरी बरसू लागल्या होत्या. रस्त्यावर काही वर्दळ नव्हती. पावसामुळे शेतं डोलू लागली होती. कामं खोळंबली म्हणून वैतागून पण पावसावर पीक निघेन, या समाधानाने माणसं घराच्या ओसरीला बसून पोराबाळांसोबत चहाचा आस्वाद घेताना पाहिली तेव्हा वाटलं, पाऊस , निसर्ग बघायला आम्ही पैसे देऊन निघालोय पण शहरात या ओसरीमधून पाऊस बघण्याची गंमत मात्र जगता येणार नाही. पैशावर विकत घेतलेला आनंद मी अजूनही जपून जपून अनुभवतेय. वाटत होते , चांगल्या नामवंत कॉलेजमध्ये शिकतेय, आरामदायी आयुष्य जगतेय, हवं ते विकत घेण्याची कुवत आहे, म्हणजे सुख वाट्याला आलेय. सुखाची ही व्याख्या खरी असली तरी आंतरिक सुखाची खरीखुरी जाणीव मला त्या दिवसाच्या तासाभराच्या प्रवासात झाली. जेव्हा पोटासाठी, दोन वेळच्या भाकरीसाठी राबणाऱ्या लोकांना बघितलं अन् त्यांच्या घामाच्या धारा किती बोलक्या वाटल्या. जगात सुरू असणाऱ्या स्पर्धेचा जणू या लोकांना गंध नव्हता. जणूकाही त्यांची स्पर्धा स्वतः शीच होती. डबक्यात खेळणाऱ्या, पावसात नाचणाऱ्या लहान पोरांना अजून खऱ्या जगाचं दर्शन झाले नव्हते. त्यांच्यासाठी सुख म्हणजे हेच होतं. क्षणभरासाठी मलाही वाटले की, गाडीतून उतरावे आणि बेधुंद, मनसोक्त त्या पोरांत बागडावे. वयाचा विसर पडून पुन्हा लहानगे व्हावे. पण बालपणीच्या सुखाच्या काळात रमणीय वाटणाऱ्या, लोभस वाटणाऱ्या,कुतूहल निर्माण करणाऱ्या गोष्टी वाढत्या वयानुसार हरवत जातात.
प्रवासातील आजूबाजूचे अनेक पैलू बघत अखेर आम्ही अंजनेरीच्या पायथ्याशी पोहचलो. पाऊस सरी हलक्या बरसत होत्या. पण कोणत्याही क्षणी त्या बेफाम होऊन कोसळू लागतील, म्हणून आम्ही ट्रेकसाठी लागणारं सामान एका बॅगमध्ये भरले. मोबाईल प्लास्टिक पिशवीत ठेवले. गाडीतून उतरून समोर उभ्या असणाऱ्या प्रचंड विशाल पर्वताकडे एक नजर टाकली. त्या भयाण मोठ्या पर्वताच्या उंचीला बघून भीतीने डोळे फिरले परंतु त्या विशाल पर्वतावर नांदणारं सौंदर्य स्वर्गाहून देखणं दिसत होतं. पऱ्यांच्या जगात पोहोचलो की काय! अस काहीसं मनोमन वाटून त्या सौंदर्याकडे आम्ही आकर्षित झालो. सौंदर्य नेहमीच आकर्षक वाटत मग ते माणसाचं असो किंवा निसर्गाचं… उरात बळ एकवटून आम्ही ट्रेक चढायला सुरुवात केली.
अंजनेरी पर्वताच्या कुशीत हनुमानाचे जन्मस्थान असलेले अंजनेरी हे गाव वसलेले आहे. हनुमानाचे जन्मस्थान असलेले अंजनीमाता मंदिर अंजनेरी पर्वतावर आहे. माता अंजनीच्या नावावरून या गावाला अंजनेरी हे नाव पडले असे म्हटले जाते. सूर्याला फळ समजून तो तोडायला निघालेल्या हनुमानाची गोष्ट आपण सर्वांनीच ऐकली आहे. त्याच्या उड्डाणाच्या आख्यायिका याच पर्वतावरून झाल्याचे म्हटले आहे. म्हणून या स्थानाला धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. जितके धार्मिकतेने हे पवित्र आहे तितकेच निसर्गाच्या विविध रूपाने नटलेलं आहे. जसजसे आम्ही वर चढत होतो, पावसाचाही आवाज चढत होता. त्याचे टपोरे थेंब अक्षरशः तोंडावर, अंगावर मारा करत होते. आमच्या पुढे कितीतरी लोकं याचा आनंद घेत मजेत पर्वत सर करत होते. पर्वताच्या कड्यावरून खाली बघितले तर अंजनेरी गाव छोटे दिसू लागले होते. ज्या शेतांना, घरांच्या ओसरीला बघून मी भाळले होते, ते सर्व मुंगीसम दिसत होते. आजूबाजूची झाडी हिरवीगार पण तितकीच भयाण वाटू लागली होती. पावसाचा वाढता जोर, वाऱ्याचा वेग आम्हाला पुढे जाऊ देत नव्हता. सारी शक्ती एकवटून आम्ही पुढे जात होतो कारण आम्हाला शेवटचा टोक गाठायचा होता. जिथे ढग उतरलेत तिथे जाऊन क्षणभर निवांत बसायचं होते. डोंगराच्या माथ्यावरून दिसणारं नाशिक पाहायचं होतं. आमची ही इच्छा आम्हाला पुढे जाण्याची ताकद देत होती.
अर्ध्यावर पोहचल्यावर चहा, बुट्टे, भजी, असे गाडे उभे होते. तिथे थोडावेळ विश्राम करायचे आम्ही ठरवले. “थोडं खाऊया, म्हणजे चालायला बळ येईल”. म्हणून आम्ही गरमागरम चहा भजी घेतले. सोबत आणलेल्या बॅग मधून टॉवेल काढून चेहरा कोरडा केला. पावसाचा मार लागल्याने सगळ्यांचे चेहरे चांगलेच लाल झाले होते. हे चहा भाजीवाले इतक्या वर रोज कसे सामान आणत असतील? पायथ्यापर्यंतच गाडी येऊ शकते. तिथून पुढे रस्ता नाही. म्हणजे ही लोकं रोज सामान घेऊन चढतात! या विचारानेच आमचे डोळे फिरले. एका दिवसात अर्धा पर्वत चढून आम्ही थकलो होतो. टोकापर्यंत जाण्याची इच्छाशक्ती आता दुबळी झाली होती आणि ही माणसं रोज इतका चढउतार कशी करू शकतात? अशी आमची आपापसात कुजबुज सुरू होती. काही मिनिटे तिथे आराम केल्यावर इथूनच माघारी फिरू असे, एकमत झाले होते. पण पुढे छोटा धबधबा आणि मंदिर आहे ते बघायचा उत्साहही होता. “इतकं सर करत आलोय तर आणखीन थोडं चालूया”. या विचाराने आम्ही पुढे जाऊ लागलो. डोंगराच्या भल्यामोठ्या कपारीतून छोटे छोटे कितीतरी धबधबे दुरून दुधासारखे दिसत होते, शुभ्र आणि पारदर्शी… झाडांची दाटी वाढत होती. लोकांचा कोलाहल होता पण निसर्गाच्या बाकीच्या आवाजात तो दुर्लक्षित होत होता. माणसाचं अस्तित्व तिथे होते पण जाणवत मात्र नव्हते. मनुष्यहीन त्या जागेवर केवळ मीच एकटी आहे आणि या सृष्टीच्या कुशीत शांत चालते आहे. मनात कसलेही विचार नाहीत. कारण समोर दिसणाऱ्या अद्भुत सौंदर्याने जणूकाही मला वश केले होते. अशी काहीशी माझी अवस्था झाली होती. डोंगराच्या त्या कुशीत मी माझी उरलेच नव्हते. त्या धबधब्याच्या शुभ्र पारदर्शी पाण्यात माझा चेहरा किती शांत आणि बाहेरच्या दुनियेपासून अलिप्त दिसत होता. अंतर्मनाला आपणहून बाहेर डोकावून पाहण्याची संधी जणू भेटली होती. म्हणूनच की काय सतत विचलित असणारे मन त्या वाहत्या पाण्यात देखील स्थिरावले होते. मनाला काबू करण्याची किमया निसर्गाइतकी कुणाच्यात असेल असं मला वाटत नाही. दमून भागून अखेर आम्ही धबधब्याच्या बाजूला बसूनच काही अंतरावर असणाऱ्या मंदिराला बघून हात जोडले. सकाळपासून पर्वत सर करत होतो. पायात त्राण उरला नाही असं जाणवत होते. माथ्यावर असणाऱ्या मंदिरापर्यंत जाण्याची धडपड धबधब्यापाशी येऊन संपली. दिवसभरात एकदाही सूर्यदर्शन झाले नव्हते. दिवसाचा कोणता प्रहर सुरू आहे हे समजत नव्हते. घड्याळात बघितल्यावर कळाले की संध्याकाळ झाली आहे. परतीच्या मार्गाने प्रस्तान करायला हवे. कारण होस्टेलवर वेळेवर पोहचणे बंधनकारक होते. जातानाचा प्रवास कोणत्याही काळजीविना मनमुराद झाला होता. परंतु परतीचा प्रवास वेळेच्या काळजीसवे धाकधूकीचा होणार होता.
डोळ्यांत संपूर्ण सामावून घेता न येणारे ते निसर्ग सौंदर्य, जमेल तेवढ सोबत घेऊन आम्ही पर्वत उतरू लागलो. अंजनेरीचे रूप आणि त्याची किमया अनुभवायची असेल तर पावसाळ्यात एकदा तरी अंजनेरीला भेट द्यायला हवी. जमिनीवरून आकाशातील ढगांच्या जवळ जाण्याची धडपड करण्याची गंमत काही औरच…
=================
तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============