अंगात येणे म्हणजे काय? खरंच बायकांच्या अंगात येतं का? जाणून घेऊ या अंगात येण्यामागचं कारण

angat yene:
आपल्या देशात हजारो मंदिरे आहेत. यातील बरीच मंदिरे स्वयंभू आणि जागृत आहेत. अशा मंदिरात सर्रास घडून येणारा प्रकार म्हणजे अंगात येणे. अंगात येणे हा प्रकार बहुतेक वेळा स्त्रियांच्याच बाबतीत घडून येतो. मध्यमवर्गीय महिला, तरुणी यांच्या अंगात येते. लहान मुली किंवा जेष्ठ महिलांच्या बाबतीत सहसा असे होत नाही. पुरुषांच्या अंगात येतच नाही असे नाही पण हे प्रमाण पुरुषांच्या मानाने महिलांमध्ये खूपच जास्त आहे.
अंगात येणे म्हणजे काय ??
अंगात येते म्हणजे नक्की काय होते ?? तर हा प्रकार देवाच्या, देवीच्या आरतीच्या वेळी, पालखीच्या वेळी घडतो. जिच्या अंगात येते ती बाई सुरुवातीला स्तब्ध होते, डोळे जड होतात, डोके आणि शरीराचा वरचा भाग फिरायला लागतो, हात आपोआप उचलले जातात, तोंडातून हुं हुं असा आवाज यायला लागतो, थोड्याच वेळात हालचालींचा वेग वाढतो, सगळ्या अंगाला दरदरून घाम फुटतो. मग बाकीच्या बायका अंगात आलेल्या बाईचा मळवट भारतात आणि नमस्कार करून दूर होतात तर लहान मुले घाबरून जातात.
हळू हळू देवीने त्या अंगात आलेल्या बाईचा चांगलाच ताबा घेतलेला असतो, देवी त्या बाईच्या माध्यमातून सगळ्या हजर असलेल्या भाविकांना कडक शब्दात सूचना देते, प्रकोप होण्यामागची कारणे वेगळ्याच भाषेत सांगते. पालखी आणि शेजारती झाली की मग अंगातील देवी बाहेर पडते. शुध्दीवर आल्यावर आपण काय केले किंवा काय बोललो हे त्या बाईला आठवत नाही. हिच्या अंगात देवी येते म्हणजे आपल्यापेक्षा देवीची हिच्यावर जास्त कृपा आहे, ही कोणीतरी खास आहे, आपल्यापेक्षा उच्च प्रतीची भक्त आहे असा सगळ्यांचाच समज होतो. अंगात आलेल्या बाईला अध्यात्मिक दृष्ट्या सगळ्यांपेक्षा उच्च स्थान दिले जाते. हे सतत होताना दिसून येते .
पण हे असेच असते का ?? म्हणजे अंगात येणाऱ्या व्यक्ती किंवा स्त्रिया या अध्यात्मिक दृष्ट्या उच्च दर्जाच्या असतात का ?? श्रेष्ठ असतात का ?? त्यांच्यावर इतरांच्या मानाने देवी जास्त प्रसन्न असते का ?? किंवा मग त्या इतरांपेक्षा चांगल्या भक्त असतात का ??? की मग यामागे काही गूढ लपले आहे का ?? काही शास्त्रीय, वैज्ञानिक करणे असतील का ??
तर हो नक्कीच यामागे काही मानसशास्त्रीय, वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत आणि सगळी कारणे हेच सांगतात की अंगात येणे हा फक्त अंधश्रध्देचा, अज्ञानाचा आणि मनाचा खेळ आहे. आपण जेंव्हा पासून मन, मनाची काम करण्याची पद्धत, मनाची शक्ती यांचा सखोल अभ्यास करायला लागलो ना तेंव्हापासूनच हे स्पष्ट दिसते आहे.
एक गोष्ट नीट पहिली तर आपल्या लक्षात येईल की, फक्त बायकांच्या त्यातल्या त्यात तरुण आणि पोक्त बायकांमध्येच हे घडते. लहान मुली आणि वृद्ध स्त्रियांच्या बाबतीत अंगात येणे हा प्रकार घडत नाही. याचे कारण जर लक्षात घेतले किंवा यामागचा नीट अभ्यास केला तर समजेल की यामागे मानसिक ताण, चिंता आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याची अव्यक्त इच्छा त्या व्यक्तीला म्हणजेच अंगात येणाऱ्या स्त्रीला पछाडत असते.
स्त्रियांवर नेहमीच पारंपरिक मतांचा, संस्कारांचा जास्त पगडा असतो. आपल्या मातांना विचारांना बोलून व्यक्त करण्याची सोय नसतेच बऱ्याचदा. आणि कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांचे तोंड बंदच केले जाते. आपला समाज कितीही विकसित किंवा एकविसाव्या शतकात वावरत असला तरीही स्त्रियांचे स्वतंत्र अस्तित्व आजही अनेक ठिकाणी मान्यच केले जात नाही रादर ही कल्पनाच अनेकांना पटत नाही.
त्यामुळे अंगात येण्याच्या प्रकारचे शारीरिक आणि मानसिक विश्लेषण करताना आढळून येते की, भुताने झपाटले, देवीने ताबा घेतला असे वर्णन करणे म्हणजे मानसिक कमजोरी किंवा दुबळेपणा आहे. अंगात येण्याचे सौम्य मानसिक आजार आणि तीव्र मानसिक आजार असे दोन प्रकार आहेत. मेंदूतील रासायनिक द्रव्याची कमतरता किंवा वाढ यामुळे मेंदूमार्फत नियंत्रित केल्या जाणाऱ्या क्रिया आणि आपले वागणे यात बदल होतो. यालाच मानसशास्त्रीय भाषेत अंगात येणे असे म्हणतात. अंगात येणे हा सौम्य प्रकारचा मानसिक आजार आहे. यालाच आपण न्यूरोसिस असे म्हणतो.
हेही वाचा
भारतातील काही रहस्यमय मंदिरे जिथे रोज काही ना काही घटना होत राहतात
अंगात येण्याचे पण दोन प्रकार आहेत.
- पारंपरिक वर्तन.
- धंद्याचा किंवा व्यवसायाचा भाग म्हणून अंगात येण्याचे नाटक करणे.
कारण अंगात येणे म्हणजे देवीची त्या व्यक्तीवर कृपा झाली असा समज आहे, मग ती व्यक्ती म्हनेल तसे आज्ञापालन होते आणि हेतू साध्य करून घेतला जातो.
तर पारंपरिक वर्तन या प्रकारात विशिष्ठ वेळी, ठिकाणी, नदीकाठच्या देवळात, पौर्णिमा, अमावस्या, जत्रा किंवा मग पशू हत्या करताना अंगात येते. सोबतच उपस्थित लोक वातावरण निर्मिती करतात आणि जास्तच परिणाम दिसून यायला लागतो.
तिसरा प्रकार म्हणजे भावनांचा आवेग वाढणे किंवा स्वतः स्वतःला संमोहित करणे. अशा प्रकारात बाह्य परिस्थीती, वातावरण किंवा परंपरा नसताना अंगात येणारी व्यक्ती स्वतःच्या भ्रमिश्ट अवस्थेत जाऊ शकते आणि तिच्या अंगात आल्याचे अनुभवास येते.
उदाहरण द्यायचे झाले तर नवरात्रात देवीच्या सजावट, मंडप, हिरवागार शालू, लालभडक कुंकू, दैत्यावर त्रिशूल रोखणारे हात आणि चमकणारे डोळे, जळणारा धूर, जोरजोरात म्हटल्या जाणाऱ्या आरत्या, घंटानाद, दिव्यांचा लखलखाट असे एकंदरीत वातावरण असल्यामुळे आपल्यासारखी सामान्य व्यक्ती पण भारावून जातात मग अंगात येणारी व्यक्ती हे पाहून घुमायला लागते.
चौथा आणि सर्वात गंभीर प्रकार म्हणजे हिस्टोरिया किंवा भ्रमिश्ट अवस्था. या प्रकारात मानसिक विघटन महत्त्वाचे असते. उदाहरण म्हणून समजा एखाद्या बाईला लग्न होऊन बऱ्याच वर्षानंतर ही मुल होत नसेल, घरातील मंडळी सतत बोलत असतील, नवरा दारू पिऊन मारहाण करत असेल, तिलाच दोष देत असेल, समाज, शेजारी पाजारी तिलाच बोट दाखवत असतील तर आरती ऐकली की तिच्या अंगात येते. एरवी कोणासमोरही तोंडातून शब्द न काढणारी ती स्त्री अंगात आल्यावर नवऱ्याची गचांडी पकडते, सासू सासऱ्याना शिव्या देते. मग हे कसे होते तर तिच्या अव्यक्त, अत्याचार सहन केलेल्या मनाने प्रकट केलेला आविष्कार असतो.
एकंदरीत काय तर अंगात येणे ही एक मानसिक अवस्था किंवा आजार आहे. अशा बायकांचा ज्या खूप मानसिक त्रासातून जात आहेत पण ज्या बायकांना त्यांची ही अवस्था सांगता ही येत नाही आणि बोलण्याची पण सोय नाही. अशा बायकांनी व्यक्त होण्यासाठी घेतलेला आधार किंवा व्यक्त होण्याची संधी म्हणजे अंगात येणे होय. खरतर ही खूपच दुर्दैवी बाब आहे की आजही आपल्या समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्रास, घुसमट, मानसिक ताण संपलाच नाही. अशा बायकांना व्यक्त होण्यासाठी अशा एखाद्या खोट्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो.
पण हा यावरील उपाय नक्कीच नाही.
यासाठी अंगात येणाऱ्या व्यक्तीची नेमकी अडचण काय हे समजून घ्यायला हवे.
अंगात येणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या जवळच्या व्यक्ती पासून लांब करायला हवे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे वैज्ञानिक सल्ला घ्यायला हवा.
तरच सगळ्या गोष्टी पूर्ववत होतील. पण आजही मानसिक उपचार करून घेणे हे अनेकांना पटत नाही. त्यापेक्षा एखाद्या तांत्रिक बुवा, बाबाकडे जाण्याकडेच लोकांचा कल असतो. अशाने उपचार तर मिळतच नाही पण त्रास मात्र वाढतो.
त्यामुळे तुमच्या जवळपास कुठेही असे प्रकार घडत असतील तर या प्रकाराला देवीची कृपा न समजता, अंगात येण्यामागचे कारण समजून घेऊन त्यावर मानसिक उपचार करण्याचा सल्ला द्या. आणि शक्य तितकी मदत करा.
==========