अंबिका

“अंबू..अगो अंबे
कुठं राहिली ही पोर. सतरावेळा साद घातली तरी यायचे नाव नाही. कसला बोडक्याचा खेळ खेळतात! सदानकदा त्या मंदिराच्या पडवीत पडलेल्या असतात. लहान का ही अंबिका. बघता बघता अश्शी सात वर्षे सरुन गेली,”
बयोआजी लाल आलवणाचा पदर सारखा करत बोलत होती.
“सुनबाई..सुनबाई,अगो त्या अंबूस साद घाल हो. माझ्या घशात काही त्राण उरले नाही. बरे,परसवात वाळत घातलेली आमसुले काढलीस का गो? या वळीवाच्या पावसाचा काहीएक नेम नाही बघ.”
बयोआजीचे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर व प्रत्येक गोष्टीवर घारीसारखे लक्ष होते. वयाच्या अगदी पंचवीसाव्या वर्षी आलेलं वैधव्य, तिच्या मरणासोबतच संपणार होतं. जलोदराच्या दुखण्याने राजबिंडा नवरा गेला नि बयोचे कमरेखाली सळसळणारे नागिणीसारखे लांबसडक केस न्हाव्याच्या कातरीने कातरले आणि मग मागिलदारीच्या खोलीत दर महिन्याला तिचं डोकं भादरलं जाऊ लागलं, त्यानंतर नहाणं..न्हाताना न्हाव्याचे झालेले किळसवाणे स्पर्श पुसण्याचा तो आटोकाट प्रयत्न.
बयोआजीचा वासुदेव, तेव्हा अगदी दहा वर्षाचा होता. अडनिड्या वयाचा. आपल्या आईचं हे असं भुंड होणं वासुला मुळीच आवडलं नव्हतं. केसांचा खोपा,त्यावर जाईचा गजरा, अंगात खणाची चोळी,चौकडचं टोपपदराचं लुगडं,कानात बुगडी,कुडी,गळ्यात मणीमंगळसुत्र,हाती बिलवर,पाटल्या,पायी जोडवी..हा सगळा साज वासुचे वडील गेले नि नाहीसा झाला
व वासुसमोर आली..लाल आलवणातली भुंडी आई. ‘आsssssई,’ केवढ्याने किंचाळला होता तो नि हमसून हमसून रडला होता. दोन रात्री बोलला नव्हता आईशी.
वाडीतील भल्या माणसांच्या मदतीने, रत्नांग्रीहून पुण्यास जाऊन तिथल्या आश्रमशाळेत वासुदेव शिकू लागला. विष्णुशास्त्रीबुवांनी वासुसाठी स्थळ आणले, सरवट्यांच्या रजनीचे. मुलगी बघणं झालं,पत्रिका जुळल्या, लग्न लागलं. सरवटेंची रजनी.. वासुदेव त्र्यंबक करंबेळकरांची पत्नी झाली. रजनीचे नर्मदा असे नामांतरण झाले.
बयोने नर्मदेस मुलीप्रमाणे वागवले होते. दुपारी ओटीवर गप्पा मारायला येणाऱ्या बाया म्हणत,”बाकी नर्मदे तू नशिबवान हं. तुला बयोसारखी समजून घेणारी सासू मिळाली.” नर्मदेच्या लहानपणीच तिचे आईवडील निवर्तल्याने ती चुलत्यांकडे रहायची.
चुलत्यांनीच तिच्यासाठी वरसंशोधन करुन वासुदेवाशी तिचे लग्न लावले होते. पहिली पाच वर्षे सासर माहेर असं करत करत नर्मदा आता सासरच्या अंगणात छान रुळली होती.
वासुदेवही त्याकाळची व्ह.फा. पास होऊन पोलादपुरास सरकारी कचेरीत कामाला लागला होता.
खरे तर नर्मदा वासुदेवरावांसोबत त्यांच्या कचेरीच्या गावी जाऊन राहू शकली असती पण सासूबाईंस एकटे सोडून नवऱ्यासोबत परगावी जाणे नर्मदेस उचित वाटले नव्हते.
चुलत्यांकडे न मिळालेली आपुलकी तिला सासरी मात्र सढळ हस्ताने मिळत होती. नर्मदेस चार मुले झाली त्यातली दोन जगली. थोरला यशवंत जो शिक्षण घेत होता आणि धाकटी अंबिका,जिला बयोआजी लाडाने अंबू म्हणायची. दोन्ही नातवंड बयोआजीचा जीव की प्राण होती.
सांजेला अंबू काचापाणी खेळून घरी आली; थोडसं जेवून सूस निजली.
आदल्या रात्री भिजत घातलेल्या रिठा,शिकेकाई याने नर्मदेने लेकीचे केस धुतले. छान बटवेणी घालून दिली. “आई, मी मंदिराच्या सभागारात आहे गं,” म्हणत अंबू पळालीसुद्धा.
आज नर्मदेने पुरणपोळीचा घाट घातला होता. बयोआजी सुनेस सगळ्या सूचना देत होती. वेलची,जायफळ,सुंठ यांचे प्रत्येकी प्रमाण किती घ्यावे हे नर्मदेस ठाऊक नव्हते असे नव्हे पण ती सासूस विचारुन घालत होती,तेवढंच म्हाताऱ्या जीवाला बरं वाटायचं.
मंदिराच्या पडवीत चुलबोळकी लावून अंबू,ठकी,सखू,यमीचा भातुकलीचा खेळ रंगला होता. शकू मात्र आली नव्हती. आज शकूच्या बाहुल्याशी अंबूच्या बाहुलीचं लग्न ठरवणार होते. अंबू हिरमुसली..’अशी गं काय ती शकुडी आलीच नाही. आता माझ्या भावलीला कसं वाटेल! मी तिला सांगितलेलं की आज तुला बघायला येणारैत. म्हणून तर नवीन जरीचं कापड नेसवून आणली तिला. ए आपण शकूच्या घरी जाऊया का गं?”
“नको त्यांची कपिला गाय बांधलेली नसली तर पाठ घेते हो. परवाच विश्वंभरभटजी कनकेश्वराला जाताना ही कपिला कुठे जवळच्या रानात होती. तेथून वेगाने पाठ घेतली विश्वंभरभटजींची.”
“अग्गो,काय सांगतेस काय?” तोंडावर हात ठेवून खुदकन हासत अंबू म्हणाली.
यमी म्हणाली,”मला ठाऊक आहे तिच्या न येण्याचं कारण.”
“काय गं?”अंबूने विचारलं.
“शकूस मुका मुलगा झाला.”–यमी
“कसं शक्य आहे. मला तरी दिसला नाही तो कुठे.”–अंबू
यावर यमी खुदकन हसली व म्हणाली,”समजेल तुला लवकरच.”
त्यानंतर चार दिवसांनी शकू जेंव्हा दिसली तेंव्हा अंबूने तिस विचारले,”मुलास नाही आणलेस?”तुला मुका मुलगा आहे ना. शकू लाजली व म्हणाली,”ते एक गुपित आहे. काही दिवसांत तुलाही कळेल हो.”
एकदा ध्यानीमनी नसताना,अचानक गोखलेगुरुजी गुहागरातील पळसुलेंचे स्थळ अंबूसाठी घेऊन आले. पत्रिकांची टिपणं जुळली, मुलगी बघणे झाले, ठराव झाला. चार दिवस लग्न झाले. पाहुण्यांचे येणेजाणे,रुखवते,वरमाईचे न्हाणे सारे वाजतगाजत झाले.
घरापुढल्या मंडपाला आम्रपर्णाची तोरणे लावली होती. केळीचे खांब उभे केले होते. एका दगडावर ऊन पाण्याने वधुवरांची स्नाने झाली. परस्परांना चुळी मारल्या. लग्नाच्या पंगतीत वरवधुंनी एकमेकांना घास भरवले.
लग्न मुहूर्तावर लागले.. मानपान यथास्थित झाले. हजार पान उठले. दोनतीन भाज्या,चटण्या,लोणची,कोशिंबीरी,पापड,कुरडया तसेच गव्हले-मालत्या खीर होती. जिलबी हे मुख्य पक्वान्न होते. मांडवपरतणीही थाटाची झाली. मुख्य बेत मोतीचूर लाडवाचा होता. आग्रह करकरुन वाढण्यात आले.
अंबूने लाजल्याचा अभिनय करत उखाणा घेतला,
वाजले सनई चौघडे, मुहूर्त तो लग्नाचा।।
गोपाळरावांच्या संगतीने करते, प्रवास साताजन्माचा।।
निघताना नर्मदेने अंबूची ओटी भरली. तिला कुंकू लावलं. नर्मदेचा गळा दाटून आला होता. तिने विहिणबाईंकडे पाहिलं. विहिणबाईंनी तिला काळजी नसावी असं खुणेनेच सांगितलं. बयोआजीने नातीस उराशी धरले. पदराने डोळे टिपले.
वरपक्षाच्या गाड्या उभ्या होत्या. गोपाळ ज्या बैलगाडीत बसला होता, तीत अंबू जाऊन बसली. लग्न होऊन अंबू बैलगाडीतून गुहागरास जाताना तिला आपण आईपासून दूर जात आहोत एवढंच काय ते कळून ती रडत होती. लग्न म्हणजे काय असतं,नवरा म्हणजे काय असतो याची तिला यत्किंचितही कल्पना नव्हती.
गावच्या वेशीपर्यंत वासुदेवराव लेकीला सोडायला आले होते. अखेर व्याह्यांनी वासुदेवरावांना समजावले,तेंव्हा कोठे गाड्या पुढे हाकल्या गेल्या.
गाड्या दिसेनाश्या होईस्तोवर वासुदेवराव भरल्या डोळ्यांनी हात हलवीत राहिले. त्यांच्यासोबत यशवंतही होता. वाडीतली माणसे होती; ज्यांनी त्यांना घरी आणले.
इकडे गुहागरास पळसुलेंचा मोठा चौसोपी वाडा होता..दोन पडव्या,माजघर,स्वयंपाकघर,कोठीची खोली,देवघर,दिवाणखाना..पळसुल्यांचे एकत्र कुटुंब होते. सासरे,चुलत सासरे,त्यांची कुटुंब..
अंबू,चुलतसख्खा दिर, नवरा, आजुबाजूची मुले यांसोबत खेळायची. आळीभर भटकायची. निजताना मात्र तिला आईची आठवण येई तेंव्हा सासूबाई तिला प्रेमाने थोपटत. लग्नानंतर तिचं नाव सरला ठेवलं होतं.
रात्री अंबू सासूबाईंच्या कुशीत मायेने शिरली आणि म्हणाली,”मला नको सरला नाव. मला नाही आवडलं. आई, बयो आजी,..’अंबू’ म्हणतात तसंच म्हणाल का?” तेव्हापासून सासरकडची सगळी मंडळीही तिला अंबू म्हणू लागली.
एके दिवशी पहाटेच अंबू सासूबाईंजवळ घाबरीघुबरी होऊन आली. अनसूयेच्या क्षणात लक्षात आलं. ती म्हणाली,”अंबू,चल तुला मी नीट समजावून सांगते. शिवू नको हो मला. अगो,मुका मुलगा झाला तूस. तू ऋतूमती झालीस हो. आता तुझ्या आईवडिलांना कळवावयास हवे. मखराची तयारी करावयास हवी. मुहूर्त काढावयास हवा.”
आईवडिलांना, भावाला भेटायला मिळणार म्हणून अंबू मनामधे सुखाच्या हिंदोळ्यावर डोलू लागली. तीचे पाणीदार डोळे लकाकू लागले.
कार्यक्रम यथोचित पार पडला. आईवडिलांस,भावास भेटून अंबू खूष झाली. वासुदेवरावांनी लेकीजावयासाठी व विहिणव्याह्यांकरता आहेर आणला होता.
सुट्टी संपली तसा गोपाळ विद्यार्जनासाठी पुण्यास गेला. पुण्यास,त्याला राहूनराहून अंबिकेची आठवण यायची.
कादंबरीतल्या नायिकेच्या जागी त्यास अंबिका स्वप्नात दिसू लागली होती, आंबेवर्णी,हसरी,सडपातळ व तरतरीत जशी नुकतीच उमललेली सुगंधी चाफेकळी.
गोपाळ हे त्र्यंबक पळसुले व अनसूया पळसुले यांचे एकुलतेएक अपत्य. गोपाळच्या आधी अनसूया चारवेळा दुवेतली होती.
अंबूचे चुलत सासरे,केशव यांची दोन मुले..थोरली शांता..जिला चिपळूणास दिली होती व धाकटा श्रीधर. श्रीधर शाळा शिकत होता.
दुपारच्या वेळेस अंबूचा डोळा गुरफटला. जाग आली तशी ती चूळ भरुन माजघरात आली. माजघरात शांता बसली होती. तिचे सासरे तिला मुल होत नाही म्हणून सोडून गेले होते. घरात अगदी सुतकी वातावरण झालं.
वडीलधारी माणसं शांतेच्या सासरी समजूत घालावयास गेली पण तिच्या सासरचे ऐकून घेण्यास तयार होईनात. शेवटी माणसे हात हलवीत परत आली.
गोपाळ मेट्रीकची परीक्षा उतरला आणि सरकारी नोकर म्हणून अलिबागेस कामास लागला. उमेदवारीचा कार्यकाल संपताच त्याने अर्ज करुन गुहागरास बदली करुन घेतली.
अंबूलाही आता गोपाळ घराजवळ हवासा वाटे. त्याचे घरादारात वावरणे तिला प्रसन्न करे.
फळशोभण झालं आणि अंबू गोपाळसोबत माडीवरील खोलीत झोपू लागली. अंबू व गोपाळच्या उत्तररात्री गोडगुलाबी शब्दांनी,स्पर्शांनी बहरु लागल्या..
अंबू व गोपाळ यांचे लाजरे,चोरटे नेत्रकटाक्ष शांता पाही तेव्हा तिचे मन अशांत होई. नहाणीकडे जाऊन ती थंडगार पाण्याच्या कळशा अंगावर घेई. शांताच्या आईस,राधिकाबाईंस लेकीचे मन कळत होते पण त्याही असहाय्य होत्या. शांतेचे उभे आयुष्य वैराण झाले होते. त्यात अंबूवहिनी म्हणजे शितल जलाचा शिडकावा होती.
दुपारची कामे आवरली की अंबू शांतेसोबत बसे तेंव्हा शांता सांगे,”वहिनी तूस सांगते,हे परित्यक्तेचं जीणं जगणे म्हणजे जीवंतपणी नरकयातना भोगणे हो.
मलाही भाग घ्यावासा वाटतो चैत्रगौरीत,मंगळागौर जागवावीसी वाटते,नटूनथटून न्हाणी,मुंजीला जावंस वाटतं पण मुल होत नाही ती बाई आणि..भाकड गाय दोघींची गत एकच. इथूनतिथून सारे काही मुलावर येऊन थांबते. अंबूस शांतावन्संचं बोलणं ऐकून फार वाईट वाटे. ती मग शांता वन्संला रत्नांग्रीच्या गुजगोष्टी सांगे.
एके दिवशी प्रात:काळी अंबू मागीलदारी ओकाऱ्या काढत होती. शांताने तिच्या कपाळावर हात दाबून ठेवला. तिला लिंबूसरबत करुन दिले..वैद्यांनी सौभाग्यवती सरला या गर्भवती असल्याचे सुतोवाच केले.
अंबूच्या सासूबाई,चुलतसासूबाई दोघीही अंबूचे डोहाळे पुरवत होत्या. तिला हवं,नको ते खाऊ घालत होत्या. गोपाळही तिचं दिसामाजी खुलत जाणारं रुप कौतुकाने पहात होता.
तिसऱ्या महिन्यात अंबूची चुलतसासूबाईंनी चोरओटी भरली. सातव्या महिन्यात डोहाळजेवण केले. अंबू माहेरी जाणार म्हणून गोपाळ नाराज झाला. आदल्यादिवशीची रात्र बोलण्यात कधी सरली हे त्या जोडप्याला कळलेदेखील नाही.
वासुदेवरावांसोबत अंबू बाळंतपणासाठी माहेरी आली.
बयोआजीचा जीव नातीसाठी किती करु नि किती नको असा होत होता. अंबूला भेटायला तिच्या सख्या येत. सासरच्या घरची कहाणी सांगत. कुणाची नणंद खडूस तर कुणाची सासू वैरीण. अंबूस हे ऐकून फार दु:ख होई.
नऊ महिने पुरे झाले नि एका रात्री अंबूस वेणा सुरु झाल्या. सुईणीला बोलावून आणलं. बयोआजीने बोलायचे तितके नवस केले. अंबुच्या अंगावरुन उतरुन झालं. अंबूला बराच त्रास होत होता. सुईणीने बाळ काढले,तरी तिला जरा संशय आला. “अगो बाई अंबे अजून एक आहे हो. जरा कळ काढ,” सुईण म्हणत होती आणि भावाला बहीण आली.
बहीणभावंड एकत्र जन्मास आली हे ऐकून बयोआजी, वासुदेवराव, नर्मदा..इतकंच नव्हे तर आजुबाजूच्या घरातील सारी मंडळी आनंदी झाली.
गोपाळरावांस ही तार तातडीने पाठवण्याची वासुदेवराव तयारी करु लागले आणि घरी दुसरीच तार येऊन थडकली,अशुभाची. गोपाळराव यांचे ज्वराने अकस्मात निधन. वासुदेवरावांच्या हातातला कागद खाली पडला. पोटच्या गोळ्याच्या नशिबीही आईच्या नशिबी आले तसे वैधव्य यावे..याहून दु:खद ते काय! घरावर शोककळा पसरली.
काळजावर दगड ठेवून, नर्मदेने अंबूस गोपाळरावांच्या अकाली निधनाची बातमी दिली. अंबूचा अक्षरशः दगड झाला. अंगावरचं दूध सुकलं. तान्ही बाळं दुधासाठी रडू लागली तरी अंबूस पान्हा सुटेना, ती बाळांना गोंजारेना. सगेसोयरे, शेजारीपाजारी येऊन हळहळ व्यक्त करत होते. नर्मदा बाळांना गाईचं दूध भरवत होती.
अंबूच्या केशवपनास वासुदेवरावांनी ठाम विरोध केला.. म्हणाले,”लहानपणापासून आईस अशी विकेशा पाहिली,आत्ता लेकीस त्या अवस्थेत पहाण्याचं त्राण नाही. बयो आजी म्हणाली,”वासुदेवा,जनरीत हो ही. करावेच लागते तसे . उद्या यशवंताचे लग्न व्हावयाचे आहे.”
यशवंत पुढे झाला,”हरकत नाही. माझ्या बहिणीने केशवपन केले नाही म्हणून जर कुणी मला मुलगी देत नसेल तर मी आजन्म अविवाहित रहाण्यास तयार आहे.”
अंबूचं सुकेशा रहाणं सासरच्यांना पटलं नाही. सासरची दारं तिच्यासाठी कायमची बंद झाली. अनूसयेस सुनेबद्दल आपुलकी होती पण ती स्वतः असहाय्य होती. सासरे,त्र्यंबकराव यांना समाजाचे भय होते.
अंबू आता थोडी दु:खातून बाहेर येऊ लागली होती. माहेरी सगळीजणं तिचं मन जपत होती. आपल्या भावाचं लग्न आपल्यामुळे होत नाही,कुणी मैत्रिणीही आपल्याशी बोलायला येत नाहीत..असं हे वाळीत टाकलेलं जीवन अंबूस असह्य होऊ लागलं.
मुलं मात्र छान वाढत होती. मान धरत होती,.कुस पलटत होती..ढोपराने रांगत होती..पावलं टाकू लागली.
ओटीवर केसरी वाचला जायचा. चर्चा व्हायच्या. त्यांतून अंबूला कळले की कोणा अण्णासाहेब कर्वेंनी पुण्यास हिंगोली येथे विधवाश्रम काढला आहे. विधवांना व त्यांच्या मुलांना तेथे आश्रय मिळे. विधवा स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी शिक्षण दिले जाई,त्याशिवाय त्यांच्या मुलांचं पालनपोषण,शिक्षण सर्व आश्रमात होत असे.
अंबूच्या डोक्यात बेत घोळत होता. खरंतर ही वेळ, दु:ख करत अंधाऱ्या खोलीत बसण्याची,स्वतःला एका कोशात गुंडाळून घेण्याची..पण अंबूने निर्णय घेतला.. पुण्यास जाण्याचा.. तिथे मुलांसह आश्रमात रहाण्याचा, या अनिष्ट रुढी पाळणाऱ्या समाजापासून विलग होऊन शिक्षित होण्याचा..
वासुदेवराव,नर्मदा,यशवंत..कुणाच्या आर्जवाला ती बळी पडली नाही. मुलांना घेऊन अंबू पुण्यास गेली. तिथे अंबूच्या शिक्षणास प्रारंभ झाला. शिक्षणाने अंबूच्या दु:खावर मात केली. अंबूला आश्रमात तिच्यासारख्याच समदु:खी बायका भेटल्या. तिथे ती शब्द,वाक्यरचना शिकू लागली. मोठमोठ्याने वाचू लागली.
एखादा शब्द वाचता येण्यातला आनंद काय वर्णावा! तिने पाटीवर गोपाळ लिहिलं नि त्या अक्षरांना बोटांनी स्पर्श करत राहिली. जणू तिच्या अर्ध्यावर सोडून गेलेल्या साथीदाराशी ती हितगुज साधत होती.
‘इकडे काळजी करु नये. आम्ही व मुले कुशल आहोत. पुत्राचं नाव चिरंजीव व पुत्रीचं जानकी ठेवलं आहे.’ असं बरंच काही लिहायचं होतं तिला. अजून बराच पल्ला गाठायचा होता.
एके दिवशी अंबूची चुलत वन्सं शांता,दोन लुगडी गाठोड्यात बांधून घेऊन अंबूसोबत आश्रमात रहावयास आली. कितीतरी कालावधीनंतर जीवाभावाची सखी भेटल्याने अंबूला कोण आनंद झाला. शांताही अंबूसोबत शिकू लागली.
यशवंतचे लग्न ठरले पण सख्ख्या भावाच्या लग्नासही अंबूस जाता आले नाही. अंबूने केशवपन करुन घेतले नसल्याने गावातील माणसे तिच्यावर नाराज होती. यशवंताची पत्रे मात्र यायची तिला. जमल्यास भेटूनही जायचा,तिला व भाचरांना.
अंबू जशी व्यवस्थित लिहू लागली तसं तिने रात्री दिव्याच्या प्रकाशात यजमानांना पत्रे लिहिण्यास सुरुवात केली. त्यात विरह,स्वप्न,ध्येय..सारं काही असे.
ऋतूचक्र फिरत राहिले. झाडांची पानगळ होत होती,धरणी तापत होती पुन्हा पावसाळा आला की स्रुष्टी हिरवा साज नेसायची,सजायचीधजायची. अंबूची मुलं एकेक इयत्ता वर चढत होती.
अंबूची लेकरं मोठी होतं होती. चिरंजीव मेट्रीक झाला व फर्ग्युसन कॉलेजात जाऊ लागला. जानकी मेट्रीक झाली. तिचे लग्न करुन दिले. जावई,अरविंदराव आधुनिक विचारांचे भेटले.
चिरंजीवाने आश्रमानजिक जागा घेऊन घर बांधले. शांता आत्ता अंबूच्या घरी राहू लागली. तिने शिलाईकामाचे प्रशिक्षण घेतले.
अंबू स्वतः आश्रमात शिकवायला जात होती. मध्यंतरी बयोआजी निवर्तली तेंव्हाही अंबूस माहेरास जाता नाही आले. दोन रात्री अंबूच्या डोळ्यांतलं पाणी खळलं नाही.
चिरंजीवाने एका परित्यक्तेशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. सरळ वाटेने सर्वच जातात. लहानपणापासून आपल्या आईचे चाकोरीबाहेरचे जगणे पाहून; आधुनिक विचारांचे संस्कार त्याच्या मनावर बिंबवले गेले . परित्यक्ता राधा तिच्या दीड वर्षाच्या मुलीसह अंबूची स्नुषा झाली.
जानकी व अरविंदरावही आपल्या दोन लेकरांना घेऊन येत तेंव्हा घर मुलांच्या किलबिलाटाने भरुन जाई.
अंबू मात्र पतीच्या फोटोपुढे बघत जणू त्यांना सांगे,”बघा हं आपला साजिरागोजिरा संसार. छायाचित्रातील गोपाळरावांच्या डोळ्यांतही समाधान तरळे.
समाप्त
गीता गरुड.
=================
1 Comment
Varsha Rane- Sawant
किती छान शेवट केला 😍 बर वाटलं…. खूप नवीन नवीन शब्द ही समजले … अप्रतिम 😍