कमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी

alu vadi recipe in marathi: पावसाळा सुरु झाला की अळू फोफवायला सुरुवात होते. काही ठराविक विक्रेत्यांकडेच चांगल अळू मिळतं. चांगलं म्हणजे बिनखाजीचं. अळूच्या पानावर पाणी ओतल्यास तो थेंब साचलेला किती सुंदर दिसतो!
अळू ही सुरण कुळातील वनस्पती आहे. दलदलीच्या जागी अळू चांगले फोफावते. अळूची पाने,देठ,कंद सगळचं खाण्यास योग्य असतं. अळूवर मेणासारखा थर असतो.
अळूच्या पानांत oxalic acid असल्याने ते खाल्ल्याने गळ्याला काटे टोचल्यासारखे वाटू नये म्हणून ग्रुहिणी त्यात चिंच,कोकम असं काही आंबट घालतात.
अळूच्या पानात झिंक, मँग्नेशिअम,कॉपर,आयर्न व पोटेशिअमही असते.
आपण अळूवडीची रेसिपी पाहूया.
◆अळूवडी बनवण्यासाठी साहित्य◆:
चार अळूची पानं(गर्द हिरवी, काळे देठ..वडीचं अळू)
एक मध्यम वाटी चणाडाळ
चार टीस्पून तांदूळ
डाळतांदूळ भिजवण्यासाठी पाणी
दोन टीस्पून कोकम आगळ(नसल्यास चिंच)
अर्धा टीस्पून हळद
पाव टीस्पून हिंग
बोटाचं पेरभर आल्याचे काप
साताठ लसूणपाकळ्या सोलून
दोन कमी तिखट हिरव्या मिरच्या
दोन टीस्पून मालवणी मसाला(घरगुती तिखट चालेल.)
एक टीस्पून जिरे
एक टीस्पून धणे
चारपाच कडिपत्त्याची पानं
एक टीस्पून साखर
चवीपुरतं मीठ
तळण्यासाठी तेल
◆कृति◆:
●अळूची पानं मध्यम आकाराची आणा व पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्या.
● मागच्या मधल्या शिरा सुरीने तासा. काहीजणं वरवंटा फिरवतात पानं पालथी घालून.
● करण्याआधी दोन तास वाटीभर चणाडाळ, चार चहाचे चमचे तांदूळ भिजत घाला.
●भिजवलेले डाळतांदूळ मिक्सरच्या जारमधे घ्या.
● त्यात मिरच्या, आल्याचा पेरभर तुकडा, लसूण पाकळ्या, जीरं, धणे, चहाचा चमचाभर साखर, चवीपुरत मीठ, हिंग, हळद, दोन चहाचे चमचे कोकम आगळ(नसल्यास चिंच) टाका.
●जरासं पाणी घालून सरबरीत वाटा नि ताटात पान पालथं घेऊन त्यावर वाटलेलं मिश्रण लावा. वरती दुसरं पान ठेवून त्यावरही वाटलेलं मिश्रण लावा. समोरची टोकं दुमडा. त्यावर वाटलेलं मिश्रण लावा म्हणजे ते निघणार नाही. दोन्ही बाजूच्या कडा आत वळवून त्यावरही मिश्रण लावून उंडा अधेमधे मिश्रण लावत आडवा वळा.
● टोपात पाणी उकळत ठेवा. त्यावर चाळणी ठेवून चाळणीत अगर मोदकपात्रात हे उंडे ठेवा. वरतून झाकण लावा. दहा मिनिटं उकडत ठेवा, मध्यम आचेवर.
● दहा मिनटांनी झाकण काढा. वाफलेल्या उंड्यात सुरी खुपसा. सुरीला ओलसर पीठ लागलं नाही म्हणजे अळूचा उंडा नीट वाफवला गेला आहे.
● थोडावेळ थंड होऊ द्या. कढईत तेल गरम होऊ द्या. गरम तेलात मध्यम आचेवर अळुवडी तळा.
●बेसन वापरून बरीचजणं करतात पण आम्ही अशा करतो. एकदा नक्की करून पहा.
अळूवडी ताकाच्या कढीसोबत छान लागते.
हेही वाचा
जेवणाची चव द्विगुणित करण्यासाठी हे पदार्थ नक्की करा.
पुण्याला भेट देताय? मग ह्या ठिकाणी चमचमीत आणि महाराष्ट्रीयन ऑथेंटिक पदार्थ नक्की ट्राय करा.
===================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.