आक्का

©️®️ गीता गरुड.
विश्वनाथ एसटीतून उतरला. लाल तांबडी मळलेली पाऊलवाट नि समोर हिरवंगार रान. त्याने डोळे भरून ते निसर्गलेणं पाहिलं.
विश्वनाथ कित्येक महिन्यांनी नव्हे वर्षांनी आज बहिणीच्या गावाला आला होता. आजुबाजूची चार डोकी त्याला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता.
आक्काच्या घराकडे एक उंच चढण गेली होती तीवरून तो चालू लागला. हल्ली चालण्याची सवय कमी झाल्याने त्या चढावाला त्याला धाप लागली. छातीत कसं वरवर भरल्यासारखं झालं. नदीचा पुल जवळ आला तसा विश्वनाथ तिथल्या आडव्या रुळांना मुठीत धरत उभा राहिला.
नदी संथ वहात होती, किती किती स्वच्छ स्पटिकासारखं पाणी, त्याचं मन हळूहळू शांत होऊ लागलं. श्वास एका लयीत होऊ लागला.
नदीच्या दोन्ही काठांना झाडी होती. झाडीत कसलीशी छोटी देवळी होती. विश्वनाथला आठवलं, लहानपणी तो सुट्टीला आक्काच्या सासरी रहायला यायचा तेंव्हा आक्का या नदीच्या भल्यामोठ्या खडकांवर दोन बादल्या धुणं रोज धुवायची, विशु तिच्यासोबत कपडे वाळत घालायचा, तिथे पाण्यात पाय घालून बसायचा.
लहानलहान मासे पायाभोवती गोळा होऊन पायाला लागलेला मळ खायचे तेंव्हा त्याला गुदगुल्या व्हायच्या. आक्काच्या जावेची पोरं नि गावातली इतर पोरंसोरं एका बाजूला पोहायला जायची, खडकावरनं नदीत सूर मारायची, उताणीपाताणी पोहायची. मधेच गुडुप व्हायची, परत बाहेर यायची.
विशुलाही हाकारायची पण विशुला भिती वाटायची. विशु कधी पोहायला गेला नव्हता. त्याच्या आपल्या आक्काशी गप्पा चालत. पुढे मग बारावीनंतर तो होस्टेलवर राहू लागला नं बहिणीचं घर हळूहळू लांबलांब जात राहिलं.
विश्वनाथच्या आक्काला लग्नानंतर तब्बल दहा वर्षांनी मुलगा झाला, त्याअगोदरचं तिचं जीणं म्हणजे सासरच्यांच्या मते खायला काळ नि भुईला भार असं होतं.
एकत्र कुटुंब असल्याने जाऊबाई बाळंत झाली की तिला शेकशेगडी, मेथीची पेज, लाडू, घरातलं, बाहेरचं हे सारं आक्काने करायचं हे न सांगता ग्रुहित धरलेलं, घरातल्या प्रत्येकाने.
मुलावरून आक्काला कोणी डिवचलं नव्हतं कधी म्हणून गावात त्या कुटुंबाला मानत पण आक्का मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खायची. पोरगं दुधाला घेऊन जाऊबाई निजून रहायची, आणि घरातली, आल्यागेल्यांची उस्तवार आक्का गपगुमान करायची. तोंडातनं शब्द न काढता शारिरीक कष्ट ताकदीच्या मानाने अधिक असले तरी करत होती, पिचत होती.
आक्काला मुलं झाली तेंव्हा थोरल्या दिराने वेगळेचार केला. आक्काचं बाळंतपण माहेरी झालं खरं पण नवरा घरी एकटा, म्हणून महिन्याभरात दुधपित्या बाळासोबत आक्काला घरी परतावं लागलं. कपडे, भांडी, गुरंढोरं, शेण भरणं सगळंसगळं करावं लागलं.जाऊबाई बारशाला तेवढी येऊन गेली.
पुढे विश्वनाथला नोकरी लागली, त्याचं लग्न झालं. विश्वनाथची विशाखा दिसायला जणू रेखाच. टपोरे पाणीदारडोळे, केसांचा जाड शेपटा. विश्वनाथ विशाखात पुरता गुंतला.
विशाखा म्हणेल ती पुर्वदिशा झाली. विशाखाला विश्वनाथचे आईवडील जवळ नको होते, ती रोज त्यावरून कुरबुरी करू लागली, भांड्याला भांडी लागू लागली.
विश्वनाथच्या आबांनी यावर उपाय काढला. मुलाचं मन न मोडता त्याला समजावून सांगितलं, शहरात आता मन नाही लागत. गावची ओढ लागलेय. विशाखाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तिने जायची सगळी तयारी करून दिली. झटपट ब्यागा आणून त्यांचे कपडेही भरून दिले.
विश्वनाथ आईआबांना गावी सोडून आला. गावी जुनं घर होतं त्यांच. ते दुरुस्त करायचं मनात होतं विश्वनाथच्या पण विशाखा म्हणाली दमडीही खर्च करू देणार नाही. आपलंच आपल्याला होईना झालंय! विश्वनाथ गप्प बसला. घर, नोकरी, अधेमधे आईवडिलांना भेटून येणं त्याचं चालू होतं. मधे वडील निवर्तले, आईचंही जास्त झालं. तिला स्वत:ची कामं स्वतः करता येईनातशी झाली.
विश्वनाथला शेजारच्यांनी सांगितलं, आलाच आहेस तो आईला घेऊन जा. एव्हाना विश्वनाथलाही दोन मुलं झाली होती. त्यांच्या परीक्षा, इतर उपक्रम यात माझ्याकडून आईचं होऊ शकणार नाही असं म्हणत विशाखाने हात वरती केले. विश्वनाथने आक्काकडे पाहिलं. तो न बोलताही आक्काने त्याच्या मनातलं ओळखलं व आईला आपल्याकडे घेऊन गेली. आक्काकडे तब्बल दोन वर्ष आई राहिली पुढे थोड्याशा आजाराचं निमित्त होऊन तीही निघून गेली. आता रक्ताच्या नात्याचे हे दोघेच भाऊबहीण होते एकमेकांना.
मुलं आता मोठी होत होती. शहरातलं घर गरजेच्या मानाने लहान पडत होतं. विशाखाच्या मैत्रिणी टुबीएकेत, बंगल्यात राहू लागल्या होत्या नि तिलाही आता ऐसपैस घर हवं झालं होतं, त्यासाठी गावाकडची जमीन, घर विकायचं असा विशाखा आग्रह करू लागली पण आक्काचाही तर वाटा होता त्यात.
जे पैसे येतील त्यातले अर्धे आक्काला द्यायचे हे विशाखाच्या पचनी पडणारं नव्हतं. ती स्वतः एकदा विश्वनाथला घेऊन आक्काकडे गेली. जाताना आक्कासाठी, भावजींसाठी, आक्काच्या मुलांसाठी कपडे, मिठाया घेऊन गेली होती. आक्कानेही त्यांना कोंबडं कापून पाहुणचार घातला, भांडीकुंडी झाल्यावर विशाखाने महागाई, पोरांच्या शाळेची फी, मोठ्या घराची गरज..असे एकेक विषय पोतडीतनं बाहेर काढले व आक्काला म्हणाली, गावची जमीन, घर विकलं तर तुमच्या भावावरचा आर्थिक ताण कमी होईल.
आक्का गप्प ऐकत होती पण भावजी ताडकन उभे राहिले. “आई मरायला आली तर आमच्या दारात आणून सोडलीत. तिची आम्ही सेवाचाकरी केली नि आता घर, जमीन विकायचं काढलत तर आम्हाला सरळ धान्यातनं खडा काढून टाकावा तसं बाजूला टाकता. याचसाठी ही कापडं नि बहिणीला साडी आणलात ना!”
भाऊजींच्या या बोलण्याचा विशाखाला राग आला. तीही ताडताड बोलू लागली. बाण एकमेकांना भिडावेत तसे शब्दांना शब्द भिडत होते. भिंतींना आजुबाजूचे कान गोळा झाले. विश्वनाथ नि आक्का हताश होऊन बघत होते. त्यानंतर साताठ वर्ष विश्वनाथ इच्छा असुनही आक्काच्या घरी गेला नाही की आक्कालाही कधी माहेरपणाला त्याने बोलावलं नाही.
नणंदेकडून हक्कसोडवर सही मागणाऱ्या विशाखाने आपल्या माहेरून आपला वाटा मात्र हक्काने घेतला होता. तिच्या भावाने, वहिनीने तिला तो देताना अजिबात कांकू केलं नव्हतं विश्वनाथला आक्का आठवत होती, विशाखा नं भावजी जागेविषयी भांडताना हताशपणे बघणारी.
आक्काने माहेरीही भरपूर कामं केली होती. सासरीही तिला मुल होईस्तोवर सुख नव्हतच. माहेरपणाला तर तिला तिच्या बाळंतपणानंतर कधी आणलंच नव्हतं पण तिने कधी कसलीच कुरकुर केली नव्हती.
फोनवर कधी विश्वनाथ बोलला तर तब्येतीला जप सांगायची. गावच्या मालमत्तेतला आक्काचा वाटा घेऊन भाऊजींनी तो त्यांच्या रहात्या घराच्या बांधकामावर खर्च केला होता.
आक्काचा मुलगाही आता मोठा झाला होता. मामेभावंडांची सलगी नव्हतीच कारण येणंजाणंच तुटलं होतं. येजा चालू राहिली तर जिव्हाळा कायम रहातो नं जिव्हाळा राहिला तर नाती टिकतात, पाणी वहात राहिलं तर नदी नाहीत नुसतेच खडक नि धोंडे.
तासभरतरी विश्वनाथ भूतकाळात हरवला होता. मागून एक मेंढरांचा कळप गेला, त्यांच्या विशिष्ट गंधाने विश्वनाथ भानावर आला. तो पुन्हा वाट चालू लागला.
पाणंद लागली, त्याला आठवलं, कपाळावर दोन हंडे, काखेत कळशी घेऊन आक्का याच पाणंदीतून चालायची. विहीरीत डोकावूनही पाहिलं त्याने. सुर्याच्या किरणांनी चमकत्या पाण्यात त्याला विश्वनाथच्या चेहऱ्याऐवजी छोट्या विशूचा चेहरा दिसला आणि मागून हाक तशीच पुर्वीसारखी ऐकू आली,”विशा पडशील रे, वाकून बघू नको हिरीत.”
विश्वनाथ मागे वळला नं चालू लागला. पाणंदीच्या बाजुच्या झाडीत जास्वंदीची फुलं लोंबत होती, पंकुळीचे घोस दिमाखात पुढे आले होते.
आड्याची काठी काढून तो पुढे सरला तसा आक्काचा मोती अंगावर आला. आक्काच्या दशरथाने त्याला बाजूला घेतला. दशरथात विश्वाला तरुणपणीचे भाऊजी दिसले.
पाय धुवून तो माजघरात आला. तिथे अंधारात आक्का बसली होती. भाऊजी गेल्यानं तिच्या अंगावरचं सौभाग्यलेणं ओरबाडून न्हेलं होतं जनरीतीने. आता ती विश्वाला आईसारखीच भासली अगदी.
आबा गेल्यानंतरची आई, अशीच तर अगतिक होती.
तेच डोळे, तेच डोळ्यांतले भाव, केसांचा काळेपणा मेहंदीने घेतला होता. ते तांबूस झाले होते. दशरथाची बायको तिची वेणीफणी करत होती. दशरथाने चहा करून आणला मामासाठी.
विश्वाला काय बोलायचं काही कळेनासं झालं होतं. दशरथ स्वतः आईला बळेबळे पेज भरवत होता. किती प्रेम करत होता माऊलीवर नि मी! विश्वनाथ स्वतःला त्याच्या जागी ठेवून पाहू लागला तसा तो त्याला अधिकच खुजा जाणवू आगला.
विश्वाला मोकळं होता येत नाहीए हे आक्काने ओळखलं नं तीच बोलू लागली. कारभारी कसे आजारी पडले, कसा दवाखाना केला, मुलाने, सुनेने कशी देखभाल केली, कर्तव्यात कोणतीही कसूर नाही ठेवली ते सांगत होती.
दशरथ म्हणाला,”मामा, तुझीच आठवण काढत होती आई. कुणासमोर मन सोडून बोलली नाही इतकी बोलतेय तुझ्यापुढं.”
विश्वाला भरून आलं. वाटलं वाटलं आक्काला गच्च मिठी मारावी नि सांगावं,”आक्का आक्का रडू नको गं. मी आहे नं सावलीसारखा उभा राहीन तुझ्या पाठीशी.” पण त्याने रोखलं स्वत:ला. विशाखा घेऊ देणार होती का काही आक्कासाठी, करू देणार होती का तिचं माहेरपण! त्याचं मन पुन्हा निराश झालं. आक्का मात्र विचारत होती सतरा प्रश्न..तब्येत बरी आहे ना विशा! असा का हडपडलायस, मुलं कशी आहेत..विशाखाला जप..एक ना दोन सतरा काळज्या त्या निरागसं जीवाला.
समाप्त
=========================
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.