आजीची माया

नानी: अहो किती वेळ तो पेपर चाळताय. आहे काय तेवढं त्यात. रोजचं मेलं खून,हाणामारी,खंडणी,घातपात,अपघात. सकाळी सकाळी जरा फिरुन यावं. चार गाणी ऐकावी.
नाना: हे बघ नानी, गाणी गुणगुणायचं वय राहिलं नाही माझं आता नि हा पाऊस हल्ली बारमाही झालाय अगदी. बाहेर फिरायला गेलो नि कुठंतरी पाय घसरुन पडलो न् खुब्याचं हाड मोडलं..
नानी: अहो,तुमच्या जीभेला काही हाड😳
नाना: ए हाड हाड..
नानी: काय म्हणालात😳
नाना: अगं तुला नाही गं..तुला कसा म्हणेन मी. त्या पेणकराच्या गाडीवर कुत्रं तंगडं वर करतय बघ. त्याला हाकलवतोय.
नानी: टायर पेणकरांचा कुत्रं गल्लीतलं. ते पेणकर नि कुत्रं काय ते बघून घेतील आपापसात. तुम्हाला कशाला उठाठेवी!
नाना: अगं नानी यालाच तर शेजारधर्म म्हणतात. उद्या आपल्या गाडीवर..
नानी: आहे कुठे आपल्याकडे गाडी..साधी सायकलही नाही. किती वाटायच़ मला, मागच्या सीटवर बसावं न् तुमच्यासोबत दूर फिरायला जावं. सगळंच केर मुसळात.
नाना : हा हा..अगं मुसळ केरात असतं ते.
नानी: तेच ओ ते. अर्थ समजला ना. झालं तर मग. भावना महत्त्वाची.
नाना: भावनावरुन आठवलं..आपली सूनबाई,भावना..आपली ही ती आशना.. उठली नाही ती.
नानी: एवढ्यात..आठाच्या टोल्याशिवाय उठतात का महाराणी.
नाना: झोपुदे गं. त्यांचेच झोपायचे दिवस आहेत आणि आपले खोकायचे..खो खो..खो.
नानी: ही घ्या ज्येष्ठमधाची काडी. काल त्या घोरपड्यांच्या घरी लस्सी पिऊन आलात नं.
नाना: अगं घोरपड्यांची सूनबाई काय लस्सी बनवते म्हणून सांगू आणि आग्रहाने देते हो. नाही म्हणवत नाही हो पोरीला.
नानी: त्या घोरपडीला नक्षत्रासारखी सून मिळाली नाहीतर आमची हिडिंबा.
नाना: काय गं. काहीही काय म्हणतेस.
नानी: अहो, हिचा नवरा आठास उठून ऑफीसला जातो, तर हिने सकाळी उठून डबा नको का द्यायला त्याला.
नाना: तू करतेस ना मग बोलून घालवू नकोस.
नानी: मी करतेच हो पण मी किती दिवस पुरे पडणार यांना. उद्या यांची मुलं होतील. त्यांना नको का करुन घालायला हिने? परवा म्हंटलं तुझ्या तरी पोळ्या लाटत जा तर लगेच आयशीला फोन..तिच्या आयशीचा दुपारी मला फोन..म्हणे, राग मानू नका पण स्पष्टच बोलते. माझी बबली एकुलती एक न् त्यात अगदी अभ्यासू त्यामुळे हे असं पोळ्या वगैरे लाटणं,आमट्या करणं नाही शिकवलं तिला. वेळच नसायचा तसा. घरात असायची कुठे बबली. सदा, भिंगरी पायाला. आजकाय तर एक्स्ट्रा लेक्चर्स उद्या सेमिनार आणि हो डान्स क्लासेस. झुंबा किती छान करते आमची बबली. पण तुमच्या त्रासाचीही कल्पना आहे मला. बबलीला मी डबा देत जाईन. तिची कलिग आमच्याच इमारतीत खालच्या मजल्यावर रहाते. तिच्या हाती देत जाईन हो..म्हणजे कसं माझी पोरगी जेवली याचं मलाही समाधान वाटेल. पोळ्यांना तुपच लावतात आमच्याकडे तेही साजूक तूप हो.” साजूक तूप म्हणे..जसं काय हिच बसते धारा काढायला न् तूप बनवते सायीच्या दह्याचं विरजण घालून. काय त्या डिंग्या.
बबलीला म्हणे सलाडचा डबा लागतो..शिवाय भूक लागली की चघळायला सुकी फळं, बेसनाचा लाडू.
नाना: देतेय न् तिची आई करुन मग झालं तर. तू कशाला त्रागा करतेस.
नानी: अहो, अशाने रुजणार कशी ती इथे. भाताची रोपं चिखलात लावतो, त्यांच्या मुळांनासुद्धा माती घट्ट पकडायला थोडा वेळ लागतो. ऊन,वारा,पाऊस यांचा तडाखा सहन करावा लागतो किनई.
सूनबाई(भावना): अहो आई केतू गेला? मला उठवलं नाही त्याने.
नानी☹️: केतू म्हणू नकोस माझ्या लेकाला. केतन नाव आहे त्याचं.
आशना: ठाऊकै ते मला. मी आपलं लाडाने..
नानी: लाडाने केतू (मनात, मग तू कोण..राहू😆)
आशना: चहा आणा मला. कसंतरीच होतं चहाविना.
नानी: धर बाई. गीळ एकदाचा.
आशना: काय म्हणालात. गीळ..असं तुम्ही केतूला म्हणाल😳 हा आपपरभाव झाला. मी कितीही तुम्हाला आई म्हणून हाकारलं तरी तुम्ही अंतर ठेवूनच वागता.
नाना: अगो, पी तो चहा..थंड होईल नाहीतर. मी समजावतो तिला.
नानी: कोणाला समजावताय😠 एवढं काय वाईट बोलले मी. तुमची आई मला नाही नाही ते बोलायची. सकाळी उठून चाळीस चपात्यांची चळत रचावी लागायची. त्याही स्टोव्हवर. बाहेरच्या नळावरुन पाणी आणावं लागायचं. तुमच्या बहिणींच्या वेण्या घालायला लागायच्या तेंव्हा नाही बोललात ते मी समजावतो आईला.
नाना : चुकलो.
आशना: बरोबरचै नाना तुमचं. तुम्ही आईंचीच बाजू घेणार. बायकोय नं तुमची. माझे ड्याडा नेहमी माझी बाजू घेतात.(मुसमुसत)
नाना: अरे ए पेंडशा, कुठे बाहेर चाललाहेस का? माझंही पुस्तक बदलायचंय. आलोच हो मी.
नानी: पळ काढताहेत मैदानातून पुळचट कुठचे. कधी म्हणून अंगात हिरीरी नाही. येताना शेंगा घेऊन या शेवग्याच्या. शेंगबटाट्याचा रस्सा कर म्हणत होता केतन.
आशना: इ..मला मुळीच आवडत नैत त्या शेंगा..त्या चघळायच्या..मग तो चोथा बाजूला ताटात टाकायचा. हाऊ इरिटेटींग.
नानी: मग काय चोथा गिळायचा😳
आशना: उद्या नाहीतरी वीकेंड आहे. मी मम्माकडेच जाणार. बाय नानी. माझी वाट बघू नका रात्री आणि हो केतूलाही मी रात्री डिनरला तिकडेच बोलवेन हं.
नानी: परत केतू😡. उठसूठ माहेरी. महिन्यातून साताठवेळा माहेरी. बरं, गेली की दोन दिवसांशिवाय यायचं नाव नाही आणि हा ठोंब्या हा सुद्धा मग सासरवाडीला..घरजावयासारखा.
आशना: हेलो केतू, ऐकना..उद्या मम्माचा बर्थडे आहे. मला नं तिला सरप्राईज द्यायचंय. तू इकडेच ये मम्माकडे मग ठरवू आपण रात्री.
रात्री झोपायला गेल्यावर
आशना: केतू, उद्या सुट्टी घे ना. मीपण घेतलीय. आपण दोघं छान शॉपिंग करुया. मम्मासाठी एक साडी, म्याचिंग पर्स,इमिटेशन ज्वेलरी आणि म्याचिंग फुटवेअर.
केतू: उद्या शक्य नाही गं. फॉरिन डेलिगेट्स यायचेत.
माझ्यासाठी ही मिटींग माइलस्टोन ठरेल कदाचित.
आशना: बरं, मग तुझं कार्ड ठेवून जा. माझे खर्च केले असते पण तू गीफ्ट दिलंस म्हंटल्यावर अधिक खूष होईल मम्मा. मी तर लहानपणापासनं घेतेच रे पण तिला मुलगा हवा होता ना आता तुझ्या रुपात तिला तो दिसेल. यू नो केतू, मला माझ्या मम्माड्याडाला खूप खूप खूष ठेवायचंय. ती दोघं इथे एकटी असतात ना म्हणून मला करमत नाही घरी मग मी येते इथे. आईंचा लगेच पापड मोडतो पण तुला चालतं ना रे केतू.
केतन: ऑफ कोर्स डार्लिंग. तुझे मम्माड्याडा माझेही मम्माड्याडा आहेत. त्यांना सांभाळणं,आधार देणं ही आपल्या दोघांची जबाबदारी आहे. बरोबर ना.
आशना: कित्ती गोड बोलतोस रे तू.😍😘
केतन: आशना..अगं माझ्या अकाऊंटमधून एकदम दहा हजार रुपये डेबिट झालेत. काय खरेदी करतेस की मस्करी.😎
आशना: केतू, बघ ना मला ही बॉटलग्रीन कलरची स्टडेड सारी खूपच आवडली. तसाच खड्यांचा नेकलेस,कंगन,झुमके,ब्रुचसुद्धा घेतलं आणि फुटवेअरही स्टडेड मिळालं. मम्मा नक्की खूष होणार बघ. पैसे थोडे जास्त लागले. चालेल नं हनी.
केतू: कर्म माझं.
आशना: मला काही बोललास🤔
केतू: नाही गं राणी..झालं तर निघ घरी नैतर अजून..
आशना: अजून..मला वाटलच तू अजून माझ्यासाठी काहीच कसं घेतलं नाही विचारणार. जानू,तू नं मनकवडा आहेस अगदी. त्यातलीच लाइट ब्लू कलरची सारी आणि तशीच एक्सेसरीज घेते माझ्यासाठी. कार्ड आहे नं माझ्याकडे. तू नको काळजी करुस.
केतू: 😡😡
सगळं जेवण फेमस हॉटेलमधून मागवलेलं. त्यादिवशी आशना मम्माकडेच राहिली. केतन मात्र रात्री बारा वाजता घरी गेला.
नानी: जेवलास का रे तिथे नीट. आणि आशना नाही आली?
केतन: ती रहाते म्हणाली, आजची रात्र. मी जेवलो पण थोडा दहीभात असेल तर वाढ नं.
नानी😍: माझं पोरगं ते. तू फ्रेश होऊन ये. वाढते मी.
(नानीने दोन ताटं घेतली.)
केतन: हे काय आई. जेवली नाहीस?
नानी: अरे बाळा, बरंच वाटत नव्हतं मला. ओटीपोटात दुखत होतं सारखं. आता जरा कमी आहे.
केतन: डॉक्टरकडे जायचं होतस ना.
नानी: अरे ती माझी डॉक्टरीण रजेवर आहे. कुठे मनालीला क काय गेलेय म्हणे. हे नंबर लावायला गेले होते. दवाखान्याच्या भिंतीवर कागद डकवून ठेवला होता. पंधरा दिवस तरी यायची नाही बघ आता.
केतन: मग दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊ.
नानी: नको रे..उगा राईचा पर्वत करतील. थोडी कळ काढेन मी. तुझं ऑफीस काय म्हणतय?
केतन: बँगलोरला नवीन ब्रँच उघडताहेत. बहुदा मला तिकडे पाठवतील. म्हणजे असं वाटतय एकंदरीत.
नानी: तुझं भलं होतंय ना मग जा तू. खुशाल जा. आशनाचं काय..तिची नोकरी..
केतन: ते आम्ही आधीच ठरवलय. तसंही माझं पेकेज वाढणार आहे. ती इथली नोकरी सोडेल मग तिथे रुळलो की शोधेल तिथे नोकरी.
नानी: काय करता अहात ते नीट विचार करुन करा. तिचं मत महत्त्वाचं बाळा. बायकोला ग्रुहित नको हं धरु कधी.
केतन: आई, अगं मी नानांचा मुलगा आहे. नाना कधी करतात का एखादं काम तुला विचारल्याशिवाय मग मी बरा तसं करेन!
(पांघरुणात डोळे मिटून असलेले नाना मायलेकरांच बोलणं ऐकून गालातल्या गालात समाधानाने हसत होते.)
केतन व आशना बँगलोरला गेले. तिथे भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहू लागले.
नानी: अहो आज केतनचा वाढदिवस नं. फोन लावा बघू त्याला.
नाना: लावतो थांब. महाशय अठ्ठावीस वर्षाचे झाले आता.
नाना: हेलो..हेलो केतन..नाना बोलतोय रे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला.
केतन: हो ना. नमस्कार नाना. तुम्ही बरे अहात ना आणि नानी.. तिची पोटदुखी..
नाना: धर बोल तिच्याशी.
नानी: बाळा,वाढदिवसाच्या शुभेच्छा रे तुला. आज तुझ्या आवडीची तांदळाची खीर करते हो. माझ्या तब्येतीची नको काळजी करुस. अरे चालायचंच. तसंच काही असलं तर मी सांगेन तुला बाळा आणि आशना बरी आहे ना रे. नीट सांभाळ हं तिला. दोघंचजणं आहात. एकमेकांना सांभाळून रहा. भांडूबिंडू नका. दे जरा फोन तिच्याकडे.
केतन: नानी, ती नाश्ता बनवतेय. तिचे मम्माड्याडा आलैत घर पहायला.
नानी: बरं बरं. सावकाश होऊदे तुमचं मजा करा. अनेक आशिष तुला.
नाना: पहिल्यांदाच आपल्याशिवाय बर्थडे साजरा करताहेत चिरंजीव.
नानी: छे! एकटा कुठैय तो. सासूसासरे आहेत तिथे.
नाना: अच्छा..कधी गेले..बोलले नाहीत ते आपल्याला..काहीतरी भेटवस्तू देता आली असती त्यांच्यासोबत.
नानी: असो. आपण इथे साजरा करु लेकाचा बर्थडे. वेलची सोला तुम्ही. मी खीर करायला घेते. अगाई गं..
नाना: नानी..नानी काय झालं तुला.. थांब मी डॉक्टर..फोन..शेजारी..नानी..पाणी..पाणी देऊ का तुला..नानी ..ए नानी.
शेजारच्या मुलांच्या मदतीने नानीला इस्पितळात हलवलं. तपासणीअंती फायब्रॉइडचं निदान झालं. त्वरीत ऑपरेशन करावं लागेल डॉक्टर म्हणाले. नानांनी सही दिली. शेजाऱ्यांच्या जीवावर सगळं पार पडलं. नानी शुद्दीवर आली तेंव्हा नाना उशाशी बसलेले. त्यांच्या डोळ्यांना धारा लागलेल्या.
“कुठे जात होतीस मला सोडून,” नाना लहान बाळासारखं काकुळतीने म्हणाले.
“आहे मी तुमच्यासोबत. काही होत नाही मला,”नानीने त्यांना धीर दिला. ते द्रुश्य पाहून डॉक्टरांचे,नर्सचेही डोळे पाणावले.
रात्रीपर्यंत केतन,आशना व सासूसासऱ्यांना घेऊन आला. आईला भेटला.
“बघ तुझ्या वाढदिवसादिवशी अशी भेट व्हायची होती आपली.” नानी म्हणाली.
“नानी..” केतन रडू लागला. काही वेळ त्याला सासूसासऱ्यांचा,आशनाचा विसर पडला. त्या जगात फक्त तो,नाना,नानी होते.
केतनच्या सासऱ्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला तसा तो सावरला. चारेक दिवसात नानीला घरी घेऊन आले. केतन नानीची काळजी घेत होता. आशनाही मदत करत होती पण केतनला ऑफीसमधून बोलावणं आलं. तो आशनाला म्हणाला,”काही दिवस तू थांब इथे. मी येतो दहाएक दिवसात तुला न्यायला ” पण आशना ऐकेना. केतनने तिला लाख विनवण्या केल्या पण ती ढीम्म. शेवटी तो चिडला..”तुझ्या आईला बरं नसतं तर थांबली असतीस ना.” बाण बरोबर लागला होता. शब्दाला शब्द फुटले.
बाहेर नाना अस्वस्थ झाले. घरात परिस्थिती काय नि यांची भांडणं काय..शेवटी नानांनी बेडरुमच्या दारावर थाप मारली,”पुरे झाला तमाशा. केतन, तू आशनाला घेऊन तुझ्या कामाला जा. मी आहे इथे नानीची काळजी घ्यायला.” केतन असहाय्यपणे मुठी आवळत राहिला.
नानांनी घरातील साऱ्या कामासाठी बाई लावली. नानीचं ते स्वतः जातीनिशी बघत होते. केतनने नानीचं ऑपरेशनचं बील भरलं हे आशनाला कळताच ती खवळली..”केतन, तुझ्या नानांकडे पैसे असताना तुला बील भरायची काय गरज होती? आणि तेही मला न विचारता..”
“हो भरलं मी हॉस्पिटलचं बील आणि आता बाई लावलेय तिचेही पैसे पाठवेन मी.”
“तेवढंच कर. आपलं घर घ्यायचं म्हंटलं तर पैसे नाहीत तुझ्याकडे आणि हे असे उधळायला..”
“आशना..” केतनने आशनावर हात उगारला.
आशना ब्याग भरुन तिच्या माहेराच्या दिशेने चालू पडली.
केतनने तिला थांबवले नाही.
“मम्मा..”आशना मम्माच्या गळ्यात हात टाकून रडू लागली. तिने सगळी कहाणी मम्माला सांगितली.
मम्माने तिचे डोळे पुसले..”उगी रहा बबली. माझी लेक म्हणजे त्याला वाटली कोण..हात उगारायची हिंमतच कशी झाली त्याची? कधी पोरीच्या अंगावर पाच बोटं उमटवली नाहीत आम्ही. फुलासारखं जपलं लेकीला आणि हा खुशाल..अरे नवरा झालास म्हणजे आमच्या पोरीला मारायचे हक्क नाही दिले तुला..” आशनाची मम्मा बडबडत होती. आशना मुसमुसत होती.
चारेक दिवसांनी केतनने आशनाला फोन लावायचा प्रयत्न केला..पण आशना उचलेना..तेंव्हा मग तो स्वतः येऊन थडकला. सासूबाईंचा पारा चढलेलाच होता पण केतू स्वतः तिला न्यायला आला. येताना तिने बर्थडेला दिलेला नेव्हीब्लू शर्ट घालून आला म्हंटल्यावर आशना पाघळली.
रात्री दोघा नवराबायकोंची दिलजमाई झाली नि बाहेर आशनाची मम्मा बोटं मोडत बसली,”काडीची अक्कल नाही पोरीला. नवऱ्याला कसं मुठीत ठेवावं..काही कळत नाही.”
केतन व आशना मग दोन दिवस नानानानींसोबत राहिले व बँगलोरला निघाले. काही दिवसांत आशनाने केतनला गुड न्युज दिली. केतन आता आशनाला फुलासारखं जपू लागला. तिला हरतर्हेने खूष ठेवू लागला.
नानांच्या प्रेमामुळे,सेवाभावामुळे,आशनाने दिलेल्या गुड न्यूजमुळे नानीची तब्येत झपाट्याने सुधारली.
सातव्या महिन्यात आशना मम्माकडे रहायला आली. ओटीभरणाचाही जंगी सोहळा केला होता. नानीने तिला चिंचपेटी भेट म्हणून दिली. यथावकाश आशनाला मुलगा झाला. केतन लगोलग आला लेकाच्या भेटीसाठी. नानीने स्वतः शिवलेली कुंची,दुपटी,झबली,टोपडी आणली. बाळ झाल्याने व नैसर्गिक प्रसुती झाल्याने दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं.
आशनाला डिस्चार्ज मिळाला. ती माहेरी गेली. केतन आपल्या ऑफीसला जॉईन झाला. बाळंत होऊन चार महिने लोटले तरी आशना माहेरीच होती. तिथे दूर बाहेरगावी लेकीला बाळाचं करायला कसं जमेल म्हणून आशनाच्या मम्माला तिला सोडवत नव्हतं. नानीची तब्येत तशी तोळामासा, त्यात माझ्या लेकीला काय बघणार ती..असं म्हणत ती आशनाला नानीकडेही पाठवत नव्हती. आशनालाही तेच हवं.होतं.
नानीला मात्र सारखं आशनाच्या माहेरी जावंस वाटायचं..बाळाला न्हाऊमाखू घालावसं वाटायचं..तो धुरीचा सुगंध रोमरोमात सामावून घ्यावासा वाटे. बाळाचे गोबरे गाल,लाडीक हसू,बाललीला..सारं काही मनसोक्त पहावंसं वाटे.
एकदा नाना नानीला घेऊन तिथे गेलेही. आशनाने बाळाच्या अंघोळीसाठी बाई लावली होती आणि ती बाई बाळाला शंभो घालायची तयारी करत होती. नानीचे हात साडी वर करुन घ्यायला..बाळाला मांडीवर झोपवायला न् ऊन ऊन पाणी त्याच्या अंगावर ओतायला शिवशिवत होते. आशनाची मम्मा बोलली,”तुम्ही बसा नानी जरा वेळ बाहेर. या आंघोळीला वेळ लागतो तसाही.”
नानीने हिय्या केला नि निग्रहाने बाळाला उचलून घेतलं. बाईकडून पाण्याची बादली आणून घेतली. बाळाला मांडीवर घेऊन ती त्याला साबू लावू लागली. ऊनऊन पाण्याची शंभो घालू लागली. पाणी लागताच बाळाने धार सोडली तशी नानी शहारली. आता ती खऱ्या अर्थाने आजी झाली होती.
——सौ.गीता गजानन गरुड.
=================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============