अजय पुरकर विषयी माहिती | Ajay Purkar information in marathi

Ajay Purkar information in marathi : काही लोकांना उपजतच स्वतःमध्ये असलेल्या कलागुणांची जाण असते. त्यामुळे अशा लोकांचा आयुष्यात काय करायचे आहे ,याचा निर्णय झालेला असतो किंवा निदान तशी कल्पना तरी त्यांना असते. आपला फोकस स्पष्ट असल्याने त्या दृष्टीने पाऊले उचलायला लहान वयातच सुरुवात होते आणि मग जिथे जायचे आहे ते ठिकाण समोर दिसते.
कला क्षेत्र हे खूप अस्थिर आहे असे मानले जाते आणि ते खरंय म्हणा. या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेळेचे बंधन नसते, कधी कधी हातात खूप काम असतं तर कधी कधी महिनोन्महिने किंवा वर्षभर काहीच काम नसतं,शिवाय जे काम मिळत ते कितपत चालेल, प्रेक्षक पसंती यावरच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे या क्षेत्रात येताना खूप संयम हवा आणि मिळालेल्या संधीचे सोने करण्याची ताकद सुद्धा. पण एकदा का तुमच्यातील कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आणि कामात जम बसला तर मग हे क्षेत्र पैसा,प्रसिध्दी,ओळख,नाव सगळे काही मिळवून देते.
आज अशाच एका कलाकाराची ओळख आपण करून घेणार आहोत, निम्मित आहे त्यांच्या दर्जेदार भूमिकेमुळे गाजलेल्या आणि चर्चेत असलेल्या चित्रपट “पावनखिंड” याचे. पावनखिंड चित्रपटात छत्रपती शिवाजी राजांचे उजवा हात म्हणून ओळखले जाणारे “बाजीप्रभू देशपांडे” यांची भूमिका साकारणारे, नाटक, चित्रपट आणि मालिका सारख्या सर्वच भागात आपल्या भूमिकेची छाप पाडणारे, भूमिकेतील नावीन्य आणि वेगळेपण जपणारे प्रसिद्ध कलाकार “अजय पुरकर” यांची.
- १. अजय पुरकर ह्यांच्याविषयी माहिती | Ajay Purkar information in marathi
- २. अजय पुरकर ह्यांचे शिक्षण आणि अभिनयापुर्वीचा पेशा
- ३. अजय पुरकर वकिलीकडून अभिनयाकडे कसे वळले
- ४. अजय पुरकर ह्यांची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द
- ५. अजय पुरकर ह्यांनी लॉकडाऊनचा सदुपयोग कसा केला
- ६. पावनखिंड चित्रपटातील बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा रोल अजय पुरकर ह्यांनी कसा निभावला
१. अजय पुरकर ह्यांच्याविषयी माहिती | Ajay Purkar information in marathi
२. अजय पुरकर ह्यांचे शिक्षण आणि अभिनयापुर्वीचा पेशा
अजय पुराकर सुरुवातीचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेले होते पण त्यांच्या आईची तब्येत बरी नसल्या कारणाने ते पुन्हा त्यांच्या आईकडे पुण्यात आले.अजय सरांचे वडील बँकेत काम करत होते तर आई गृहिणी होत्या. अजय सरांनी सुरुवातीचे शिक्षण सेंट दगडूराम कटारिया या शाळेत घेतले तर विद्यालयीन शिक्षण एमएएस गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथे पूर्ण केले. तिथे त्यांनी एलएलबी ची पदवी सिम्बायोसिस कॉलेज ऑफ लॉ मध्ये पूर्ण केली.
अजय सरांनी एल.एल.बी पूर्ण केल्यानंतर पुढे एल.एल.एम ची पदवी प्राप्त केली त्यावेळी ते गाणं शिकत होते. गाण्याची आवड त्यांना लहनपणापासूनच होती कारण त्यांच्या आईला गाणे खूप आवडत असे आणि त्यांच्या आईला त्यांचे वडील म्हणजेच अजय सरांचे आजोबा गाणं शिकवत असत. तीच आवड अजय सरांना ही होती,त्यासाठी राम माटे यांच्याकडे ५ वर्षे गाणे शिकले आणि पुढे पंडित विजय सरदेशमुख यांच्याकडे बाकी गाण्याचे धडे घेतले.
३. अजय पुरकर वकिलीकडून अभिनयाकडे कसे वळले
एल.एल.एम करत असताना अजय सर शास्त्रीय आणि सुगम संगीताचे कार्यक्रम घेत असत. खरतर अजय सरांना अभिनयाची आवड खूप लहानपापासूनच होती, अगदी आठवीत असल्यापासून ते शाळेतील कार्यक्रमात भाग घेऊन अभिनय करत असत. पुढे जेंव्हा त्यांनी एल.एल.एम पूर्ण केले आणि वकिली व्यवसाय सुरू केला तेंव्हा त्यांच्या व्यवसायाला खूप यश मिळाले. त्यांची वकिली खूप चालत होती मात्र त्यांच्यातील कलाकार काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता, काय करावे, वकिली करावी की अभिनय क्षेत्रात काम करावे हे त्यांना समजेना. त्याच वेळी २००९ मध्ये झी मराठी वरील “असंभव” या मालिकेसाठी त्यांना पहिल्या रोल ची ऑफर मिळाली. अजय सरांनी ती स्वीकारली आणि हा अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला की यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळाला.
त्यानंतर लगेच “गुंतता हृदय हे” या मालिकेसाठी त्यांना विचारण्यात आले, यात त्यांनी इन्स्पेक्टर वाजलवर ही भूमिका साकारली आणि ती सुद्धा लोकप्रिय ठरली. या दोन्ही भूमिकांमुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला होता मग मात्र त्यांचा गोंधळ संपला होता, वकिली सोडून सरळ अभिनय क्षेत्रात काम करण्याचे त्यांनी ठरवले आणि आजपर्यंत कधीही त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
हेही वाचा
गड आला पण सिंह गेला” असे उद्गार शिवाजी महाराजांच्या तोंडातून का निघाले
करोडो रुपयांची नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. आज नवऱ्यासोबत चालवतेय स्वतःची कंपनी
४. अजय पुरकर ह्यांची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द
फक्त मालिकांमध्ये नाही तर नाटक आणि सिनेमांमध्ये सुद्धा अजय सरांनी काम केले आहे. “घाशीराम कोतवाल” हे त्यांचे पहिले नाटक होते. अभिनया सोबतच गाणे ही आवड, खरतर आवड हा शब्द खूपच छोटा होईल, गाणे( संगीत ) हे अजय सरांचा आत्मा आहे असे ते म्हणतात. अजय सरांनी सारेगमप सेलिब्रिटी पर्वात भाग घेतला होता, त्यावेळी ते पहिल्या तीन क्रमांक पैकी एक होते हा कार्यक्रम २०१३ मध्ये प्रसारित होत होता. यावरूनच अजय सरांचे गाण्यातील ज्ञान लक्षात येते.
प्रेमाची गोष्ट (२०१३), संघर्ष (२०१४), मुंबई टाईम (२०१६), मुळशी पॅटर्न (२०१८), फर्जंद (२०१८), भाई व्यक्ती की वल्ली आणि फत्तेशिकास्त (२०१९ ), बंदिषाला या चित्रपटात त्यांनी उत्तम आणि प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील अशा भूमिका पार पाडल्या, या शिवाय त्यांनी २०१२ मध्ये फरारी की सवारी या हिंदी चित्रप टत ही काम केले आहे. तसेच तू तिथे मी, राजा शिवछत्रपती, अस्मिता, तू माझा सांगाती, ज्ञानेश्वर माऊली अशा एक ना अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. सध्या ते मुलगी झाली हो या मालिकेत दिव्याच्या वडिलांची नकारात्मक भूमिका साकार करत आहेत. याशिवाय नांदी आणि संगीत सौभद्र ही नाटके करत आहेत.
फर्जंद चित्रपटात त्यांनी साकारलेली मोत्याची मामा ही भूमिका प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली आणि त्याचे खूप कौतुक झाले. कोडमंत्र या नाटकात अजय सर खूप महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. आता त्यांचे ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गुंतता हृदय हे या मालिकेत त्यांनी दुहेरी डीतेक्टिवची भूमिका साकारली होती, यावरून त्यांनी वेगवेगळ्या छतांच्या भूमिका साकारल्या आणि अभिनयाची छाप पाडली हे दिसून येते.
५. अजय पुरकर ह्यांनी लॉकडाऊनचा सदुपयोग कसा केला
२०२० मध्ये कोरोना मुळे लॉकडाऊन पडले आणि सगळ्या जगाला त्याचा चांगलाच फटका बसला. मग त्यात कला क्षेत्र कसे मागे राहील ?? अजय सर त्यावेळी जंगजौहर चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. करोनात्यामुळे १८ मार्च २०२० ला काही दिवसांसाठी चित्रीकरण थांबवले पण परिस्थिती खूप बिघडली आणि सगळे जगच ठप्प झाले. या परिस्थितीत सगळेच खूप हताश झाले. नैराश्याने ग्रस्त झाले. सगळ्यांच्या हातातून काम गेले. बऱ्याच लोकांनी आत्महत्या केली आणि सगळ्या जगावर नकारात्मकतेची काळी सावली पडली होती अशा वेळी अजय सरांनी एक गोष्ट केली आणि ती म्हणजे “आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करणे आणि या परिस्थितीचा कसा उपयोग करू शकतो याचा विचार”.
त्यांना शूटिंग दरम्यान ज्या गोष्टी करता आल्या नाहीत, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. सगळ्यात आधी त्यांनी त्यांचा बराचसा वेळ त्यांच्या आई वडिलांना दिला. यावेळी त्यांना जाणवलं की आई वडिलांना मुले मोठी झाल्यावर फक्त त्यांचा वेळ हवा असतो बाकी त्यांची कसलीही अपेक्षा नसते. अजय सरांना स्वयंपाक करायला खूप आवडते. त्यांनी लॉकडाऊन मध्ये खूप सारे पदार्थ करून आई बाबांना खाऊ घातले.
त्यांची दुसरी आवड आणि त्यांचा आत्मा म्हणजे संगीत. त्यांनी या काळात रोज ४-५ तास उत्तम रियाज केला आणि त्याचे समाधान त्यांना मिळाले. जगातील परिस्थिती तर कोणी बदलू शकत नव्हते पण या काळात गरज होती ती सकारात्मक राहण्याची आणि काहीतरी सकारात्मक देण्याची. हीच गरज त्यांनी ओळखली आणि “५ चा चहा” हा ऑनलाईन कार्यक्रम सगळ्यांच्या भेटीला आणला. या कार्यक्रमात त्यांचे मित्र दिगपाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, हरीश दुधाडे आणि अजय सर होते. या कार्यक्रमात उत्तम वाचन, उत्तुंग लोकांबद्दल माहिती आणि संगीत आणि त्यातले किस्से लोकांना ऐकायला मिळत. हा कार्यक्रम अजय सरांना एक वेगळेच समाधान देऊन गेला.
अजय सर म्हणतात, “आयुष्यात थोडे हादरे बसले, म्हणून काही संपूर्ण आयुष्य वाया जात नाही, संकटांनी कितीही खेलवर आघात केला, तरी पुन्हा घट्ट पाय रोवून उभ राहायचं, हेच आपल्या माणूस असण्याच लक्षण आहे.”
खरंच किती मोलाचा आणि प्रेरणा देणारा संदेश सरांनी आपल्याला दिला, खरतर हे त्यांच्या अनुभवातून त्यांना मिळालेली शिकवण त्यांनी आपल्याला दिली आहे. ते म्हणतात हे ऐकुन आता तुम्ही कोणत्याही संकटावर निधड्या छातीनं सामोरे जाऊ शकता.
६. पावनखिंड चित्रपटातील बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा रोल अजय पुरकर ह्यांनी कसा निभावला
सध्या अजय सरांचा गाजत असलेला आणि चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे “पावनखिंड”. यात अजय सरांनी “बाजीप्रभू देशपांडे” यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारणे हे त्यांच्यासाठी खूप मोठे आव्हान होते, पण अजय सरांनी ते अगदी सहजपणे पेलले आहे. अजय सरांनी ही भूमिका साकारली नाही तर ती जगली आहे. अजय सर म्हणतात बाजींचे संवाद ऐकुन अंगावर काटे उभा रहात होते.
पावनखिंड निमित्ताने अजय सरांनी लोकमत फिल्मील दिलेल्या खास मुलाखतीत सर म्हणाले, पावनखिंड साठी प्रचंड मेहनत आणि वर्कआऊट करावे लागले, पण ही भूमिका माझ्याकडे आल्यानंतर मी बाजीप्रभू देशपांडे सारखा दिसतो की नाही, हा मला पडलेला पहिला प्रश्न होता. कारण त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांचं वय ५० पलीकडे होते आणि त्यानुसार तब्येत करावी लागणार होती. यासाठी जिम मध्ये जाऊन वर्कआऊट करावं लागणार होत शिवाय त्याच वेळी मी मालिका मध्येही काम करत होतो, मग मी वर्कआऊट साठी वेळ कसा देणार हा प्रश्नही होताच. पण यासाठी आशुतोष कुलकर्णी यांनी त्यांना खूप सहकार्य केलं असं अजय सर म्हणतात. ही भूमिका जीवंत करण्यासाठी प्रचंड शारीरिक मेहनत लागणार होती ,त्यामुळे ते पहाटे ५ वाजता जिममध्ये जात वर्कआऊट करत आणि दिवसभर मालिका करून पुन्हा संध्याकाळी जिम करत या सगळ्यात आशुतोष कुलकर्णी त्यांच्या सेवेत हजर होते.
बाजीप्रभू देशपांडे सारखा लूक येण्यासाठी अजय सरांनी १२ मिषा बदलल्या होत्या
त्यातील एक सिलेक्ट झाली आणि लूक तयार झाला. चित्रपटाचे शूट करत असताना खिंडीतील लढाई हा एक वेगळाच अनुभव होता लढाई दरम्यान २५ शॉवर सुरू असायचे आणि त्यात दृश्य म्हणजेच सीन द्यावे लागत, हे सोपे नव्हते असं अजय सर म्हणाले. मृत्यूचा शेवटचा सीन शूट करताना सकाळी ६ च कॅलटाईम असायचं आणि संध्याकाळी सहा पर्यंत ते भिजत राहायचे, यावेळी त्यांना ना खाण्या पिण्याच्या ना ब्रेकचे भान होते. पण शूट करताना मजा आली आणि अनुभव हे काम समाधान देऊन गेले असे सर म्हणतात.
पुढे अजय सर म्हणाले या चित्रपटाचा एक सीन शूट करत असताना मला एक भास झाला, सीन खिंडीतल होता, बाजीप्रभू आणि महाराजांचा. जिथे बाजी म्हणतात, आम्ही इथे थांबतो,तुम्ही विशाळगडाकडे जा. हा सीन खरंच खूप भावनिक होता आणि हे साकारणं कठीण होते. खिंडीत युद्ध आणि बाजींच्या मृत्यूचा पूर्ण सीन अंतिम टप्प्यात आला होता, याचदरम्यान अचानक काही लोक माझ्याकडे बघत असल्याचा भास मला झाला, खूप माणसे होती आणि नुसती बघत असल्याचं जाणवलं. एखादी कलाकृती घडते आणि ज्या तन्मयतेने घडते किंवा एखादा व्यक्ती घडवत असेल तर अस काहीतरी झालं, हा भास होता की आणखी काही माहीत नाही. पण या नंतर अजय सर २-३ दिवस ना कोणाला भेटले ना बोलले. हळू हळू यातून ते बाहेर पडले.
कदाचित बाजीप्रभू देशपांडे आणि बाकीचे सैन्यच हे सगळे पुन्हा एकदा पहात असेल. देव जाणे पण असा विलक्षण अनुभव अजय सरांना या चित्रपटाचे शूट करताना आला. हा चित्रपट त्यांना खरे समाधान देऊन गेला, ही भूमिका मी खऱ्या अर्थाने जगलोय असे ते म्हणतात.
तर अशा या हरहुन्नरी कलाकाराला त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!!