अधिक महिन्याचं अधिकचं आमंत्रण

©️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
संध्याकाळी ऑफिसमधून रेवा घरी आली तर घरात सासूबाईंचा लाडक्या लेकीला फोन सुरू होता,
‘‘नमू, उद्या लवकरच ये ग सकाळी. जरा गप्पाही होतील, जावईबापू कामावर गेले की लगेच निघ आणि त्यांना संध्यकाळी परस्पर इकडेच यायला सांग.’’
7-8 वर्षं झाली होती नमूच्या लग्नाला आता हा दुसरा-तिसरा अधिक महिना आला असेल, पण सासूबाईंनी अगदी साग्रसंगीत तयारी केली होती. रेवाला अनारशांची ऑर्डर द्यायला सांगितली होती. चांदीचं मोठं निरांजन, नमूला साडी, बाळाला छान ड्रेस आणि जावईबापूंना ड्रेस, चांदीचं घसघशीत निरांजन. सासूबाईंना काय करू नी काय नको असं होऊन गेलं होतं. तेवढ्यात रेवतीची मोठी जाऊ आली आणि म्हणाली,
‘‘उद्या नमू येतेय ना, मग मी परवा जाते माहेरी, आईने अधिक वाणासाठी बोलावलंय. काय हवं असा अत्ताच आईचा फोन आला होता.’’
‘‘हो का वा…’’ सासूबाईंनी तोंडभरून मोठ्या जावेचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या माझ्याही वहिनीचा फोन आला होता ती म्हणाली,
‘‘वन्सबाई यायचंय हो अधिक वाणाला.’’ सासूबाईंनी आपल्या माहेरची शेखी मिरवली.
वर ‘‘आता कशाला इतक्या वर्षांनी अधिक वाण? आईच्या माघारी केलंस की तू दोन-तीन वेळा आता नको बाई असं सांगितलं हो मी तिला.’’ रेवा सगळ्यांची लगबग बघत होती, मनातून जरा खट्टूच झाली. आपले आई-वडील नाहीत, भाऊही तसा लहानच पडतो त्याचंही अजून लग्न झालेलं नाही. कोण करणार आपल्या नवर्याचं कौतुक असं तिला वाटून गेलं. पण तरीही ती उत्साहाने नणदेच्या आगमनाच्या तयारीला लागली. रेवाचं आणि तिच्या नणदेचं खूपच मेतकूट होतं. ती तिला मैत्रिणीसारखीच होती. मोठी जाऊ श्रीमंत घरची होती, कामाची तिला तशी आवड नव्हती. त्यामुळे तिच्या कामाचा तसा उजेडच होता सासूबाईंनाही रेवावरच विश्वास होता. नमूने उद्याची रजा काढली होती. उद्या काय काय करायचं याची सासूबाईंना विचारून तिने तयारी करून ठेवली आणि जेवणं झाल्यावर ती झोपायला आपल्या खोलीत गेली. रेवाचा नवरा म्हणाला,
‘‘अगं मगाचपासून बघतोय, तू सर्व काम करत आहेस, पण म्हणावं तसा उत्साह नाही दिसत तुझ्या चेहर्यावर.’’
‘‘कुठं काय?’’
‘‘बरं सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण तुला काही मी आज ओळखत नाही.’’
‘‘सांगा बरं मी का नाराज असेन?’’
‘‘मोठ्या जाऊबाईंची कामात मदत नाही मीच का काम करायचं म्हणून तर नाही ना?’’
‘‘छे हो ऽऽ ऽ मी कधीच अपेक्षा करत नाही.’’
‘‘मग काय बरं?’’
‘‘तेच तर सांगतेय काहीच नाही.’’
‘‘काहीतरी आहे, तुला नसेल सांगायचं तर नको सांगू.’’
‘‘अहो, बाबांचं, मोठ्या दादांचं, तसंच जावईबापूंचं अधिक महिना म्हणून कौतुक होतंय. तुम्हाला मात्र सासूबाई नाही म्हणून यावर्षी तुमचा पहिला अधिक महिना असूनही तुमचं काहीच कौतुक नाही होणार…’’ बोलता बोलता रेवा डोळे भरून आले.
‘‘अगं वेडी आहेस का तू? मला काही गरज नाही त्या अधिक महिन्याच्या वाणाची. तुझ्यासारखी बायको मिळाली यातच मला आनंद आहे.’’
‘‘हे तर बोलायचं झालं, पण मला मात्र फार वाईट वाटतंय.’’
‘‘काहीही तुझं झोप आता दमलीस बघ किती.’’
दुसर्या दिवशी नमू आणि तिचा छोटा मुलगा पार्थ आल्याने घर अगदी भरून गेलं. सगळी धावपळ, दुपारची जेवणं झाली, रेवा वरवर खूप हसत होती, पण मनात मात्र छोटी दु:खाची छटा होती. संध्यकाळी जावई बापू, दीर, नवरा, मोठी जाऊ सगळे घरी आल्यावर अधिकवाणाचा कार्यक्रम झाला, फोटो, गप्पा-गोष्टी यात दिवस कसाच संपला. सासूबाई मात्र रेवाचं कौतुक करत होत्या, पोरीने सगळं हौसेने केलं हो… बास रेवाला तेवढंच पुरेसं होतं. नमूने जाता जाता रेवाला हळूच कुणालाही नळ कळता सांगितलं होतं, ‘‘उद्या माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे, ऑफिसमधून येताना माझ्या घरी ये आणि कुणाला सांगू नकोस.’’ आता हिचं काय काम? आणि आजच नाही का सांगायचं? रेवा नाही म्हंटलं तरी चडफडलीच, कारण आजची रजा म्हणजे उद्या ऑफिसमध्ये आजच्या पेंडीग कामाची लीस्ट आणि उद्याची नवीन कामे म्हणजे लोड असणार, त्यातच आजच्या धावपळीने पाय अगदी गळून गेले होते. पण ती काही बोलली नाही, जाऊदे जाऊ परत कधीतरी अत्ता काही बोलायला नको. म्हणून ती गप्प बसली.
दुसर्या दिवशी ऑफिसचं काम आवरता आवरता 4 कधी वाजले रेवाला कळलंच नाही, गडबडीत लंच पण घ्यायचं राहिलं होतं. दुपारचा चहा आल्यावर मात्र तिने पोळी-भाजी खाल्ली आणि त्यावर चहा घेतला तेवढ्यात फोनची रींग झाली. नमूचाच फोन
‘‘रेवा, येतेयस ना संध्याकाळी?’’
‘‘नमू, अगं आज जमेलसं वाटत नाही. उद्या चालेल का?’’
‘‘नाही नाही आजच ये. माझं काम आहे.’’
‘‘बरं…’’ जरा नाराजीनंच रेवाने फोन कट केला.
रेवा धावतपळत सात वाजता नमूच्या घरी पोहोचली तर तिथे तिच्या नवर्याची बाईक तिला बाहेरच दिसली.
‘‘अरे हा इथे कसा?’’ रेवा मनातल्या मनात म्हणाली, ‘‘मला आधी बोलला असता तर ऑफिसमधून मलाही पिकअप केलं असतं ना रवीने…’’ रेवाला आणखीनच राग आला, पण तिने तो मनातल्या मनात गिळला.
रेवाला पाहताच रवी म्हणाला, ‘‘अरे तू पण आलीस?’’
‘‘म्हणजे?’’
‘‘अगं नमूने मला अर्जंट काम आहे असे सांगून बोलावून घेतले, तू येणार हे ती बोलली नाही.’’
तेवढ्यात नमू हसतच बाहेर आली. ‘‘अगं नमू काय हा प्रकार?’’ रेवाने विचारले, आतून छान छान सुग्रास भोजनाचा सुवास येत होता. नमूने सांगितले, ‘‘कळेल थोड्याच वेळात.’’
तिने दोघांना फ्रेश होण्यास सांगितले आणि गरमागरम चहा दिला. थोड्या वेळाने तिचा नवरा आल्यावर दोघांना ओवाळले आणि 33 पेढे, चांदीचा दिवा, रेवाला छानसं ड्रेस मटेरियल आणि रवीला छानसा शर्ट दिला. हे काय रेवाला आश्चर्यच वाटलं.
नमू म्हणाली, ‘‘अगं मला हा मुलगा आहे, मला जावयाला वाण द्यायचं सुख काही मिळणार नाही, म्हणून हा घाट घातला.’’ रेवाच्या माहेरी काही होणार नाही, म्हणून हे सर्व केले याची पुसटशी जाणीवसुद्धा तिने होऊ दिली नाही. मग छान हसत-खेळत जेवण झालं आणि रेवा आणि रवी घरी निघाले. रेवाचे डोळे सारखे भरून येत होते, एकतर मनातल्या मनात का असेना पण नमूवर आपण चिडलो, आणि तिने मात्र आपल्यासाठी एवढं केलं हे शल्य होतंच.
नमूने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, ‘‘अगं मी काही ग्रेट केलं नाही, यात माझाच स्वार्थ आहे, वाणाचं पुण्य मलाच मिळणार आहे.’’ रेवाने काही न बोलता नमूला प्रेमाने मिठी मारली.
तरीही नमूला वाटत होतं की जरी हे झालं तरी माहेरचं कुठे काय मिळालं आहे, तिच्या मनाची रुखरुख लागून राहिली होती, नमूचा निरोप घेऊन ती जायला निघाली होती, तेवढ्यात रेवाचा फोन वाजत होता. अरे हा तर दुर्गा मावशीचा फोन. खरंतर दुर्गा मावशी म्हणजे रेवाच्या घरी स्वयंपाकाला येणारी मावशी. तिच्या आईची ती दूरची बहीण होती, पण परिस्थितीमुळे ती अशी स्वयंपाकाची कामे करीत असे, रेवावर तिचा विशेष जीव होता. तिने आता का बरं फोन केला, घ्यावा का न घ्यावा या विचारातच रेवाने फोन घेतला.
‘‘अगं रेवा बाळा कशी आहेस?’’ दुर्गा मावशीने प्रेमाने विचारले.
‘‘मी छान आहे मावशी, तू कशी आहेस.’’
अशा थोड्या गप्पा झाल्यावर दुर्गा मावशी म्हणाली,
‘‘बरं फोन याकरता केला होता की, उद्या जावईबापूंना घेऊन घरी ये. अधिक महिन्याचं वाण द्यायचंय त्यांना. आणि तू यापुढे काही कशाला वगैरे बोलू नकोस. उद्या ये मी वाट बघतेय.’’ रेवाला काय बोलावं कळेचना. बायकांना स्वत:च्या घरी कितीही सुख-समाधान असलं तरी माहेरहून छोटीशी भेट मिळाली तरी किती आनंद का होतो याचा तिला प्रत्यय येत होता. तिच्या चेहर्यावरचा आनंद बघून नमूला आणि तिच्या नवर्याने रवीने विचारले,
‘‘काय गं काय झालं? इतका कसला आनंद झालाय?’’
‘‘उद्या दुर्गा मावशीने आपल्या दोघांना बोलावलं आहे, अधिक वाण घ्यायला.’’ रवीच्या चेहर्यावर हसू होतं. तो म्हणाला,
‘‘रेवा, मावशीने बोलावलं तुला आनंद झाला ठीक आहे, पण मला अधिक वाण मिळालं नाही म्हणून काही फरक पडत नाही, माझ्यासाठी तूच अधिक आहेस.’’ नमूच्या देखत रवी असं बोलल्याने रेवा लाजून चूर झाली, पण तरीही तिला कुठेतरी आत्मिक समाधान मिळालं होतं, जसं की कृष्णाला सुदाम्याचे पोहे खाऊन अतीव आनंद झाला होता, तसंच माहेरच्या अधिक महिन्याच्या नुसत्या आमंत्रणाने रेवाच्या मनावरची मळभ दूर झाली होती. ती नमूला म्हणाली,
‘‘तू सुरुवात केलीस, आणि मला अधिक महिन्याचं अधिकचं आमंत्रण आलं.’’ घरी जाऊन सासूला आणि मोठ्या जावेला आजचं झालेलं कौतुक आणि उद्याच्या माहेरचं आलेलं आमंत्रण कधी एकदा सांगते असं रेवाला झालं होतं.
©️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
====================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
1 Comment
✅ Доброго вечера Розыгрыш ваучеров на скидку №178 Получить =>> https://forms.gle/TtrAiyWeAWS1CZty7?hs=c01494323573efae3a5809b2998231cd& ✅
f2ouw2