अबोल प्रीत

काकू, ए काकू, ऽऽऽ काकू ऽऽऽ पूर्वा पोटतिडकीनं हाका मारत होती, पण काकूचं घर बंद होतं ती काही दार उघडत नव्हती.
‘‘आज हिला माझी आठवण आली. चार दिवस कुठे कडमडली होती, सांगून तरी जायचं, काही रीती रिवाज आहेत की नाही?’’ काकू आतल्या आत चडफडत होती. खरंतर दार उघडून कधी एकदा पूर्वाला भेटतो असं तिला झालं होतं कारण पूर्वाची तिला सवय झाली होती, पण राग, इगो वर काढत होता. नाहीच उघडायचं दार जाऊदे तिला माझी गरज नाही, माझं तरी काय अडलंय.
शर्मिला काकू या गावात आली तेव्हा सगळ्या गावाची वहिनी म्हणून ओळखली जात होती. तिच्या लग्नाला जवळपास 50 वर्षं झाली होती. भरलेला हा वाडा हळूहळू रिता झाला होता. तरुण पिढी नोकरीच्या शोधात शहराच्या ठिकाणी गेली होती, जुन्या खोडांनी मान टाकली होती. काकू एकटी भुतासारखी या घरात राहात होती. तिची मुलं तिला शहरात बोलवत होती, पण तिला तिकडे चैन पडत नसल्याने ती तिकडे राहात नसे. गावातलं घर, झाडं त्याची देखभाल ही कारणं ती सांगत असे. गावातल्या बायका अधूनमधून वयनी वयनी करत शर्मिलाकडे येत, घटकाभर बसत, घरातली गार्हाणी सांगत आणि जात असत. त्या बायकांना या शर्मिलावहिनीच्या एकटेपणाचा हेवा वाटे. हिचं आपलं बरं आहे केलं तर केलं नाहीतर नाही. पण तिचं एकटेपणाचं दु:ख यांना काय कळणार?
चार वर्षांपूर्वी एकदा गीता वहिनीची पूर्वा शर्मिलाकडे आली. ‘‘काकू, काकू म्हणून तिने तिच्याशी गप्पा मारल्या.’’ शर्मिलाला ही नवी पुतणी आणि या नव्या पुतणीला काकू फारच आवडू लागली. काकूशी तिचं खूपच जमू लागलं. जणू तिला काकूच्या रूपात एक मैत्रीणच मिळाली. काकूशी ती कोणत्याही विषयावर गप्पा मारी. काकूकडून नवीन रेसिपी, थोडंसं विणकाम ती शिकून घेऊ लागली. तशी पूर्वा काही रिकामी नव्हती ती शिकत होती. दिवसाचा निम्मा वेळ तिचं कॉलेज, अभ्यास यात जात असे आणि संध्याकाळची वेळ ती काकूकडे काढत असे. काकू घरात एकटी असल्याने तिला काकूकडे यायला संकोचही वाटत नसे. काकूच्या झोपाळ्यावर बसणे, काकूच्या फुलझाडांची फुले काढून त्याचे गजरे करणे. कधीतरी काकूला आपल्या हातचं काहीतरी करून घालणे नाहीतर इतर वेळा काकूच्या हातचं चविष्ट थालिपीठ, आंबोळी यावर ताव मारणे असा पूर्वाचा उपक्रम सुरू होता. गीताही काकूकडेच जातेय ना मग जाऊ दे म्हणून बिनधास्त होती. कारण गीताचे आणि शर्मिलाचे संबंध चांगले होते.
पण चार दिवस पूर्वा शर्मिलाकडे आली नाही, न सांगताच पूर्वा अचानक का येत नाहीये म्हणून शर्मिला नाराज झाली. खरंतर आपणच पूर्वाकडे जाऊन यावं असं तिला वाटत होतं, पण राहुदे आपण कशाला जा? तिने कळवायला नको का? असं वाटून शर्मिला घरीच तिची वाट बघत बसली होती.
‘‘काकू, तू दार उघडत नाहीस तर मी जाते हाऽ ऽ , पण लक्षात ठेव आता मी सारखी येऊ शकणार नाही कारण माझं….’’
काय कारण? काय असेल? लग्न ठरलं असेल का हिचं? काय झालं अशी आता ही मुलगी सारखी येऊ शकणार नाही कसं होईल माझं?
‘‘काकू मी जाते हा ऽऽ’’
पूर्वाचं हे निर्वाणीचं वाक्य ऐकून काकू पळत आली आणि तिनं दार उघडलं. आधी पूर्वाच्या चेहर्याकडे पाहिलं तर तिचा चेहरा फार सुकून गेला होता.
‘‘पूर्वा, काय झालं तुला?’’ काकू एकदम घाबरून म्हणाली.
‘‘तेच तर तुला सांगायचं होतं, पण तू दारच उघडेनास..’’ पूर्वा रडवेल्या आवाजात म्हणाली.
काकूने आधी पूर्वाला घरात घेतलं. पूर्वाने भिरभिरल्या नजरेनं घरात पाहिलं.
‘‘कुणाला शोधतेयस गं?’’
‘‘शोधत नाही ग! पण ते..’’
‘‘अग तो माझ्या बहिणीचा मुलगा आला होता परवा. दोन दिवस राहिला. अजून राहा म्हणत होते, पण कुठचं काय? सारखा बेचैनच होता, तुझी चौकशी मात्र करत होता.’’
‘‘हम्म..’’ पूर्वा म्हणाली. तिच्या डोळ्यांसमोर त्याची मूर्ती आली. उंच, गोबर्या गालांचा, कुरळ्या केसांचा, मिश्किल हसणारा तो पूर्वाला फारच आवडला होता. त्याच्या डोळ्यांत पण ती त्याला आवडल्याचं स्पष्ट दिसत होतं, पण…
‘‘बरं तू का आली नाहीस चार दिवस?’’
‘‘जरा तब्येत बिघडली होती माझी.’’
‘‘हो चेहरा मलूल झालाय.’’ मग काकूच्या आणि तिच्या परत गप्पा झाल्या. काकूने छान खायला केलं, काकूचा राग पूर्ण गेला, पण पूर्वाच्या मनात प्रश्न तसाच राहिला,
‘‘तो परत कधी येणार?’’ काकूला ती हे काही विचारू शकत नव्हती. कदाचित आपल्यावर रागावून, आपली वाट बघून तो निघून गेला असेल. त्या दिवशी त्याला पाहून, संकोचून जे आपण निघून गेलो ते परत आलोच नाही, पण त्याचा चेहरा मात्र मनातून जात नव्हता, शेवटी आज मनाचा हिय्या करून आपण इथे आलो, तर तो नव्हताच.
‘‘पूर्वा पूर्वा ऽऽ करत काकू काही तरी सांगत होती, पण पूर्वाचं चित्तं मात्र थार्यावर नव्हतं.
****
पूर्वा आणि काकूचं गूळपीठ परत नेहमीसारखं सुरू झालं होतं. पूर्वा येत होती, जात होती. मनात मात्र कधीतरी काकू त्या आपल्या भाच्याचं नाव काढील किंवा त्याच्याबद्दल काहीतरी सांगेल असं तिला वाटत होतं, पण रामा शिवा गोविंदा काकू काही ब्र काढत नव्हती. कधीतरी पूर्वाला राग यायचा, या काकूला माझ्या मनातलं बाकीचं सगळं कळतं, अगदी मला आज काय खावंसं वाटतंय हेही कळतं, पण हे मात्र कळत नाही मग कसली मैत्री माझी आणि काकूची? पण तो लटका राग तेवढ्यापुरताच होता. तिचं काकूवर आणि काकूचं तिच्यावर नितांत प्रेम होतं. तिला दुखलं, खुपलं आईपेक्षा काकूलाच ती सांगत होती, पण ही गोष्ट सांगायला मात्र तिला संकोच वाटत होता.
पूर्वाचं शिक्षण आता पूर्ण झालं होतं, घरात लग्नाचे विचार सुरू झाले होते. कसं सांगावं घरच्यांना, आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही कधीतरी एकदा चुकतं त्याला पाहिलं होतं. मग एकदा तिने मनाचा हिय्या करून काकूकडून काहीतरी माहिती काढली तेव्हा त्याचं नाव सुमुख आहे आणि तो इंजिनिअर असून चांगल्या पदावर नोकरी करत आहे एवढंच तिला माहीत होतं. पण आपल्याला तो आवडतो हे कसं सांगणार? तसंच त्याच्या मनात काय आहे हे कसं कळणार? जाऊदे आपण काही विचारच करायचा नाही, जे काही घडेल ते पाहात राहायचं असं शेवटी तिने ठरवलं आणि तिच्या पहिल्या वहिल्या मनातल्या मनात असलेल्याल्या अबोल प्रेमाला तिने मनातल्या मनात तिलांजली देऊन टाकली.
घरच्यांचे प्रयत्न सुरूच होते. स्थळं बघणं, त्यांना फोन करणं सुरू होतं. एक दिवस पूर्वाच्या आईने तिला सांगितलं उद्या एक परिवार तुला भेटायला येणार आहे, पत्रिका जुळलेली आहे, तू त्यांना पसंत आहेस. पूर्वाने मानेनेच होकार दिला. आता ती सगळं विसरून लग्नाला तयार झाली होती. ती काकूकडे गेली आणि उद्या बघण्याचा कार्यक्रम आहे, कोणती साडी नेसायची वगैरे सर्व चर्चा झाली होती. सुमुखचा विचार तिने मनातून पूर्ण काढून टाकला होता.
थोड्याफार गप्पा झाल्या पूर्वा जायला निघाली तेवढ्यात आणि दारात काहीतरी हालचाल जाणवली. दारात एक मोटार उभी राहिली. सुमुख आणि त्याचं सर्व कुटुंब दारात हजर होतं. पूर्वा त्याला पाहून एकदम दचकली. मोठ्या प्रयत्नपूर्वक तिने मनातून याचा विचार काढून टाकला होता आणि आज अचानक अगदी नको त्या वेळी हा दत्त म्हणून हजर. तिच्याकडे पाहून तो अगदी गोड हसला. तिला काहीच सुचेना ती काहीच न बोलता पळत घरी गेली.
घरी जाताना तिच्या मनाचा बांध अगदी फुटला होता. ती रडवेली झाली होती, काय करावं काय नाही तिला काहीच सुचत नव्हतं. पण ती आता घरच्यांच्या आनंदावर विरजण टाकणार नव्हती. तिने घरी गेल्यावर शांतपणे एका खोलीत बसून आधी आपलं मन मोकळं केलं आणि नंतर ती पुढच्या तयारीला लागली. दुसर्या दिवशी सकाळी पाहुणे येणार असल्याने फारच धावपळ सुरू होती. शेवटी जेव्हा पूर्वाला बघायला आलेल्या लोकांच्या समोर जाण्याची तिची वेळ आली तेव्हा तिला सुमुखचा चेहरा दिसू लागला. इतका वेळ प्रयत्नपूर्वक तिने मनातून निग्रहाने त्याची आठवण काढण्याचे टाळले होते, त्याला आपल्याबद्दल काही वाटत असते तर त्याने आपल्याला थांबवले असते किंवा काहीतरी संपर्क साधायचा प्रयत्न केला असता असेही विचार मनात येत होते. काय करावं बाहेर जावं की न जावं हा प्रश्न तिच्या मनात सारखा येत होता.
आई-वडील बाहेर हाका मारून दमले, पण ती काही बाहेर जाईना. ती मख्खपणे बसून राहिली. मला जरा बरं वाटत नाही, मी 10 मिनिटांनी येते असं म्हणून खोलीची कडी लावून बसली.
10 मिनिटं झाली, पंधरा मिनिटं झाली, अर्धा तास झाला आता मंडळी वाट बघून गेली असतील, मुलगी फारच नखरेल आहे म्हणाली असतील असं वाटून पूर्वाने खोलीचं दार उघडलं तर दारात सुमुख आणि काकू उभे.
‘‘अरे, तुम्ही कसे इकडे?’’ पूर्वाने चेहर्यावरचा आनंद लपवत विचारलं.
‘‘काय करणार? आम्ही मुलगी बघायला आलो, पण मुलगी समोरच येईना.’’ सुमुखचा भारदस्त आवाज तिने पहिल्यांदाच ऐकला आणि तिच्या मनात अक्षरश: कारंजी फुटली.
‘‘पूर्वाबाई, माझी सून होशील का?’’ काकूने तिला मिठी मारतच विचारलं.
‘‘काकू, तुझ्याशी तर मी बोलणारच नाही.’’ म्हणून पूर्वा काकूला आणखीनच बिलगली.
समाप्त
©️ ®️ सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
===========
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.
=============