
सत्यजितच असं वागणं एकदम स्वाभाविकच होत…वीणाताई मात्र खुश होत्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी शकूला आणि तिच्या आई -वडिलांना घर पाहण्यासाठी म्हणून बोलवून घ्यायचं असं वीणाताई ठरवून टाकतात…याविषयी आपल्या मुलाशीही म्हणजेच सत्यजितशीही काहीच बोलत नाही…म्हणून सकाळीच वीणाताई सिंधूला फोन करून बोलवून घेतात…सिंधू आपल्या मालकिणीचा निरोप आल्याप्रमाणे सकाळी आपलं काम करण्यासाठी म्हणून येते-
सिंधू – काय विहीणबाई…यावं का आम्ही…?
वीणाताई – अगदी शंभर वर्ष जगशील बाई तू…अगदी तुझीच आठवण काढत होते बाई मी…हे काय एकटीच का आलीस ? बहिणीला का नाही घेऊन आलीस….विशेष म्हणजे शकू कुठे आहे…ती तरी यायला हवी होती ना…?
सिंधू – अहो…ताई संध्याकाळी येऊच कि आम्ही तिघी….तिघी नाही चौघे येउ संध्याकाळी…
वीणाताई – हो …हो…चालेन व्याही भोजन उरकून घेऊयात आपण सगळे…तेव्हाच साखरपुडा उरकून घ्यायला पाहिजे असंही मला वाटतंय…
सिंधू – नाही…नाही ताई…साखरपुडा नको एक तर अठरा वय पूर नाहीय तीच…गाजावाजा नकोच करायला…कसं हाय ताई…एक गोष्ट शकू अठरा वर्षाचीबी न्हाय…दुसरं म्हणजे साहेबांचं हे दुसरं लग्न…तेव्हा साखरपुडा वैगेरे नको नाही का…तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्यजितरावाना विचारलंत कि नाही तुम्ही…
वीणाताई – त्याला काय विचारायचं…माझ्या शब्दाबाहेर आहे का तो…
सिंधू – तुम्ही कल्पना तरी द्यावी निदान असं सुचवायचंय मला…
वीणाताई – ठीक आहे…मी थोड्यावेळाने फोन करेल त्याला…
सिंधू – नाही ताई…आत्ता माझ्यासमोर बोला…नाहीतर राहून जा….
वीणाताई – बरं…लावते फोन…[ असं म्हणून वीणाताई सिंधूपासून थोडं बाजूला जातात आणि सत्यजितला कॉल करतात ] हॅलो…सत्या…तू कामात अडकला नाहियस ना….नाही म्हणजे महत्वाचं बोलायचं होत तुझ्याशी…वेळ आहे का…?
सत्यजित – हो आई…बोल ना…!
वीणाताई – अरे आज…आपल्या घरी पाहुणे येणार आहेत संध्याकाळी येशील ना तू लवकर नेहमीपेक्षा तरी….
सत्यजित – आई…कोण येणार आहेत…पाहुणे माझं येन गरजेचं आहे का खरंच…
वीणाताई – हो खूप महत्वाचं आहे रे…ये ना…
सत्यजित – आई…एवढे दिवस तू सगळे पाव्हणं-रावळ सगळं मॅनेज करायचीस मग आता असं काय झालंय माझी गरज पडली…
वीणाताई – [थोडंसं रागावून म्हणतात ] सत्या…का तू असं करतोयस….तू आधीसारखा माझा मुलगा नाही आहेस…तू खूपच दृष्ट असल्यासारखं वागतो आहेस…कैलास आहे का तिथे…?
सत्यजित – हो घे माझ्यापेक्षा त्याच्याशी मन मोकळं केलेलं आवडत ना तुला…घे कैलास बोल…तुझ्या काकूंशी…
कैलास – हा काकू…बोला… ते सत्या एका महत्वाच्या मीटिंगबद्दल प्लॅन करत होता…थोडं कामाचं प्रेशर आहे म्हणून रागावलाय बाकी काही नाही…
वीणाताई – त्याच हे असं रागावणं नवीन नाहीय मला…गेले पंधरा दिवस ह्याच रागाचा सामना करतीय मी…त्याची मनधरणी तुलाच करायचीय…आज संध्याकाळी शकुंतला आणि तिचे आई-वडील येणारेत…आपलं घर पाहून होईल त्यांचं आणि त्याचबरोबर व्याही भोजनाचाही बेत आहे…सत्यासोबत तू आलास तरी फार बरं होईल…निदान सत्याची बाजू तरी सावरशील…जमेल ना यायला…
कैलास – काकू…मी शक्य तितकं सत्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करेन…काळजी करू नका…अगदी निश्चिन्तपणे संध्याकाळची तयारी करा तुम्ही…
वीणाताई – कैलास….! तू आहेस म्हणून सत्यावर लगाम आहे बाबा…नाहीतर अगदी बेलगाम असल्यासारखी गत झाली असती त्याची…ठीक आहे मी वाट पाहिलं तुमची…
असे म्हणून वीणाताई फोन ठेवून देतात…सिंधूच्या मनात तर शंकेची पाल चुकचुकते…कारण वीणाताई ज्याप्रकारे सत्यजितबरोबर गयावया करून बोलत होत्या …त्या बोलण्यावरून तरी सिंधूला कळून चुकलं होत की सत्यजित लग्नासाठी स्वखुशीने तयार नाहीय असं…म्हणून सिंधू वीणाताईंना म्हणते-
सिंधू – ताई…मी सगळं ठीक आहे असं समजायचं ना…?
वीणाताई – [नजर चोरून म्हणतात ] हो सगळं ठीक आहे…तू काळजी नको करूस…
सिंधू – ताई…मी आज नाही ओळखत तुम्हाला…खरं सांगाल…खरंच सत्यजितराव या लग्नासाठी तयार आहेत ना की दबाव टाकत आहेत तुम्ही असं तर नाही ना…
वीणाताई – सिंधू…मी सगळी कल्पना देऊन ठेवलीय ग सत्या ला तो आहे जरा हेखेखोर…नकारघंटा असतेच त्याची…पण मी आज तुला वचन देते…[सिंधूचा हात पकडून नर्मदेच्या तस्विरीसमोर नेतात ] तुझी पोरगी या घरात माझी मुलगी म्हणून राहील…तिला कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ देणार नाही आम्ही…ओह्ह्ह…तू विसरतीयस की तू मला तसं वचन दिल होतंस…तू कबूल केलं होतं की…‘तुला जर पाच दिवसात मुलगी पाहून जमलं नाही तर माझ्या निर्णयावर तू सहमत असशील…आता तू डळमळीत स्थिती करू नकोस तुझ्या मनाची…
सिंधू – ताईसाहेब…आम्ही गरीब माणसं…माझा लई जीव हाय माझ्या शकूवर तिची आय बी एवढा जीव नाही लावत तिला…एका गोष्टीं उणी आहे म्हणून लई बोल लावते तिला…पोरीच्या नशिबात लग्नाआधी सासुरवास होता…लग्नानंतर पण सासुरवास असलं तर मनात धाकधूक असणारच ना…
वीणाताई – तू काळजी नको करू माझ्याकडून आणि या घरातल्या मुलांपासूनही तिला काहीच त्रास नाही होणार…सत्याबद्दल मात्र मी नाही काही सांगू शकत… पण त्याच्याकडूनही तिला कुठलाच त्रास नाही होणार…याची खात्री मी देते…
सिंधू – माझी शकू लई गुणांची हाय…तुम्ही तिच्या वाटेत काटे जरी पसरले ना तरी ती तुमच्या वाटेत फुलंच वाहील…अन लई शांत हाय व ती….
वीणाताई – सिंधू एका भेटीत ओळखलं मी तुझ्या शकूला…म्हणून तर पसंत केलीय मी तिला…या घराची सून म्हणून…तिचा मान तिला मिळणारच…तू फक्त संध्याकाळी ये…
सिंधू – ठीक हे ताई…येईल मी संध्याकाळी….
सिंधू आपल्या होणाऱ्या विहीणबाईंचा निरोप घेते….संध्याकाळी मुधोळकरांकडे व्याहीभोजन असल्याने सिंधू खूप आनंदात आपल्या बहिणीला निरोप घेऊन येते…कावेरीलाही आनंद होतो…संध्याकाळच्या भेटीसाठी उत्सुक असते…उत्सुकतेपोटी आपल्या बहिणीपाशी उत्सुकता व्यक्त करते…
कावेरी – सिंधू…लई भारी घर असलं ना त्यांचं…जेवण तर लईच नंबरी असेल…
सिंधू – कधी खाल्लं नाहीय मी त्यांचं…पण…चांगलाच असणार ना तिथलं जेवण…तवा तुम्हीपण जरा…नीटनेटकं वागा तिथं नाहीतर आमची शोभा कराल…
कावेरी – हि साडी कशी वाटतीय बघ…मोरपिशी रंग खुलून दिसेल ना आपल्या शकूला…
सिंधू – हि असली साडी…नको…नको….ती गुलबक्षी रंगाची साडी दे…की…चांगली दिसली पाहिजे ना ती…का तुम्हला पाहणार आहेत तिथं सगळे…मी काय साधी साडी नेसल बाई….आणि महत्वाचं…साड्या भारीतल्या नेसताय मग बोलणंही समोरच्याला रुचलं इतकं चांगलं असू द्यात….शकू आली बघ..शकू ये इकडं बस माझ्यापाशी…
शकू – हा मावशी बोल ना…
सिंधू – चार गोष्टी सांगते तुला…आपण आज संध्याकाळी मुधोळकरांच्या बंगल्यावर जातोय तिथं कसं सगळं अदबशीर राहणं वागणं आपलं असलं पाहिजे…तू आहेसच गुणाची तशी…पण तुझं लग्न ठरलंय माहिती आहे ना तुला…
शकू – मावशी माहिती आहे….पण मी हि अशी मला चांगलं वागवतील ना तिथं…
सिंधू – अगं…मी सगळं सांगून ठेवलंय त्यांना…तू आपली सर्वांशी मिळून-मिसळून राहा तिथं…सगळ्यांना आपलंस कर…एकलकोंड्यासारखं राहू नकोस…तुला का बरं सांगतेय मी…खरं तर या घरात कुणाकुणाला शिस्त नाहीय त्या लोकांना सांगितलं पाहिजे…[कावेरीकडं रोखून पाहून म्हणते ]
कावेरी – मी शोभा करेल का सिंधू…काही बोलू नकोस…
सिंधू – तिकडं जातोय आपण मग असं रिकाम्या हातानं जाऊन नाही चालायचं…काहीतरी बनवून न्यावं लागेल…चला…लाडू करायला घेऊयात…त्याचबरोबर ओल्या नारळाच्या करंज्या पण करूयात…अगदीच रिकाम्या हाताने जाणं बरं नाही दिसणार….
आपल्या मावशीच्या सांगण्याप्रमाणे लाडू आणि करंज्या करून झाल्या…दिवसभरात सगळी जाण्याची तयारी करून झाली…
खासकरून शकू साठी आमंत्रण असल्याने शकूही व्यवस्थित अशी तयार होते गळ्यात चिंचपेटी…एक चैन,गुलबक्षी रंगाची साडी यान शकूचा सावळा रंग आणखी खुलून दिसत होता…करंज्या आणि लाडू करून नवले कुटुंब मुधोळकरांच्या इथे पाहुणचारासाठी जातं…तिथलं घर पाहून कावेरीच्या मात्र तोंडच पाणी पळत कारण घर जणू एका राजमहालासारखं भासत होत…घरात प्रवेश करण्यापूर्वी एक मोठा कारंजा सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो…पुढे आजूबाजूला सगळीकडे हिरवळ पसरलेली…त्यानंतर काही अंतरावर घराचे प्रवेशद्वार…प्रवेशद्वारापाशी गेल्यावर गुलाबपाणी शिंपडण्यासाठी खास काही लोक ठेवलेले असतात…ते सगळं शकू आणि तिच्या घरच्यांसाठी नवीनच असत…म्हणून सगळे फक्त आ वासून पाहत असतात…म्हणून कावेरीची वक्रदृष्टी सुरुवातीलाच त्या घरावर पडते…म्हणून या ठरलेल्या लग्नाकडून सुरुवातीलाच कावेरीच्या खूप अपेक्षा होत्या…थोडक्यात पैशाचा मोह कावेरीला आवरता येत नव्हता…सिंधू सगळं सावरून घ्यायला होती म्हणून बरं होत…वीणाताई सगळ्यांच्या स्वागतासाठी तयारच होत्या…संध्याकाळचे सहा वाजले होते… …सत्यजितला यायला अवकाश असल्याने यथोचित असा पाहुणचार वीणाताई करतात…त्यामुळे काही औपचारिक गोष्टी वीणाताई बोलतात…
वीणाताई – काय मग…कसे आहेत सगळे…
कावेरी – आम्ही सर्व मजेत आहोत…तुम्ही कशा आहात ?
वीणाताई – आम्हीही मस्त…मजेत आहोत…शकुंतला…ओळख करून दे आम्हाला सर्वांची…
शकू – काकू…माझं नाव शकुंतला…मी इथं जवळच्याच कंपनीमध्ये पावडर भरण्याचं काम करते…बाकी हि माझी आय…तीही चार घरची धुणं भांडी चे काम करते….अन हि माझी मावशी हाय…लई चांगली हाय माझी मावशी…अगदी माझ्या मैत्रिणीसारखी…
वीणाताई – हो ते सांगितलं तुझ्या मावशीने मला…
शकू – अन हा माझा धाकला भाऊ गणेश…आम्ही गण्या म्हणतो ह्याला…
वीणाताई – हा काय करतो शाळेत जातो कि नाही…?
शकू – हा जातो ना…लई हुशार हाय…पहिलीत आहे…
वीणाताई – आता मी माझ्या घरच्यांची ओळख करून देते…हि माझी मोठी मुलगी अलखनंदा…
असे म्हंटल्यावर शकू पटकन अलखनंदाच्या पायाशी वाकते…अलखनंदाही तिच्याकडे पाहून स्मितहास्य करते….मधेच…
कावेरी – [मधेच कावेरी वीणाताईंना टोकते…] लग्न झालंय वाटतं…न्हाई गळ्यात मंगळसूत्र दिसतंय म्हणून विचारलं..[ सिंधू रोखून आपल्या बहिणीकडे पाहते]
वीणाताई – हो माझ्या मुळीच लग्न झालं होत…पण सूत नाही जुळलं आमचं…गोरक्ष देशमुख नाव आमच्या जावयाचं..चांगलं चाललं होत…नियतीला दुसरच काही मंजूर होतं…जाऊ दे झालं गेलं…आम्ही आमची पोरगी पदरात परत आणली…जगणं नकोस केलं होतं त्या लोकांनी…
कावेरी – म्हणजे तुमच्याच मुलीचा नांदण्याचा पत्ता नाहीय…आमच्या मुलीला कसं नांदवणार तुम्ही..?
सिंधू – ताईसाहेब तिला असं नव्हतं म्हणायचं…शकूची काळजी घ्या एवढंच तिला म्हणायचंय…
वीणाताई – नाही…त्यांची शंका रास्त आहे…विचारू देत त्यांना काय विचारायचं आहे ते…
कावेरी – म्हणजे…आमच्या मुलीचा इथे काही निभाव लागणार नाही…खूप मोठं दिव्य आहे म्हणायचं…हि दोन मुलं कोण आहेत…?
वीणाताई – ही दोन्हीही मुलं माझी नातवंड आहेत…हा थोरला अभिमन्यू…याला खेळ खूप आवडतात…आम्ही त्याला एक स्पोर्ट्स अकॅडमी काढून देणार आहोत…आणि हा सागर यंदा बारावीला आहे…त्याला इंजिनिअर व्हायचं आहे…खूप मेहनती आहे तो…आणि माझा खूप लाडका…आणि ही जी आहे ना मुलगी घरातलं शेंडेफळ आकांक्षा आहे तीच नाव…ती यंदा दहावीला आहे…सागर,अभिमन्यू आणि आकांक्षा अशी तीन आमच्या सत्यजितची मुलं…
शकू उभा राहूनच वाकून नमस्कार करते…इतक्यात दारामध्ये सत्यजित आणि कैलास येऊन उभे राहतात लगेच वीणाताई सगळ्यांना ओळख करून देतात…
वीणाताई – आणि….हा माझा एकुलता-एक मुलगा,या घराचा मालक…आमचा मुधोळकरांचा व्यवसाय बाहेरच्या देशातही गेला आहे आणि तो फक्त माझ्या या मुलाच्या मेहनतीने…सत्यजित नाव आहे माझ्या मुलाचं…
सत्यजित – आई…हे काय आपला व्यवसाय तर माझ्या बाबांनी बनवला…बी त्यांनी पेरलं…पुढं फक्त आम्ही त्याच संगोपन केलं एवढंच…
कैलास – पाहिलंत…आमचा सत्या असाच आहे…कौतुक केलेलं आवडत नाही त्याला…नाही का काकू….
वीणाताई – सत्या…जा बरं तू फ्रेश होऊन ये….[ कौतुकाने म्हणतात ]
सत्यजित आला म्हणून वीणाताईंचा आनंद गगनात मावेनासा होतो…खूपच लगबगीने त्या जेवणाची ताट वैगेरे घ्यायला सुरुवात करतात….या गडबडीत वीणाताई आलेल्या पाहुण्यांना पाणी द्यायला चक्क विसरून जातात म्हणून ही गोष्ट अलखनंदा पटकन सांभाळून घेते…सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची सरबत घेऊन अलखनंदा घेऊन येते…थोड्याच वेळात जेवणाला सुरुवात होते तोपर्यंत सत्यजित आपली अंघोळ आटोपून जेवणासाठी येतो…
वीणाताई – सत्या…ये इथे बस…आज सगळं जेवण तुझ्याच आवडीचं आहे…हे बघ पनीर चिल्ली….स्टार्टर म्हणून तुला आवडत ना….आज खास मेनू आहे व्हेज पुलाव…आणि दम आलू केलाय आज खास…स्वीट डिश म्हणून खास तुझ्या आवडीची शेवयांची खीर केलीय…
सत्यजित – हो..हो…अगं केवढं केलंय ते…किती दिवसांचं जेवण केलंय…अन स्वीट डिश काय एक दिसत नाहीय मला…इथं तर गुलाबजाम…जिलबी…आणि बालूशाहीही दिसतीय…
वीणाताई – हो…सगळं तुझ्याच आवडीचं आहे…बघत काय बसलास…खा की..अरे तुलाच काय म्हणते मी…सगळेजण सुरुवात करा…
सत्यजित – आई..अगं तू पण बस ना जेवायला…अगं आणि पाहुण्यांशी ओळख तरी करून दे की माझी…
वीणाताई – अरे…या सिंधूमावशी तू ओळखतोसच की…आणि मी नाही का तुला त्यादिवशी शकूबद्दल सांगितलं तीच ही शकू आणि तिच्याशेजारी बसलेली तिची आई कावेरी आणि हा तिचा धाकटा भाऊ गणेश…
कावेरी – आणि…तसंच आम्ही तुमचे होणारे व्याही आहोत…हेही सांगा ना ताई…
सिंधू – कावेरी…अगं जेवण झाल्यावर बोलायचं आपल्याला…घाई काय आहे एवढी…
सिंधू ने आपल्या बहिणीला बोलताना वेळीच आवरलं…पण सत्यजित पुढे जेवण होईपर्यंत एकही शब्द न बोलता जेवण करत राहिला…वीणाताई मात्र शकूशी बोलत होत्या…
वीणाताई – शकुंतला…अजून काय काय आवडत तुला…स्वयंपाक…गाणी काय आवडत तुला…
शकू – काकू…मला स्वयंपाक येतोय पण एवढा भारी न्हाय जमत…तुम्ही शिकवाल..?
वीणाताई – हो का नाही…जरूर शिकविलं..
सत्यजितला खूपच अवघडल्यासारखं वाटतं होतं म्हणून कैलासला खुणावून जितकं लवकर जमेल तितकं इथून काहीतरी काम काढून निघायची विनंती सत्य करत होता…शकू मात्र अगदी आपलं घर असल्यासारखं बोलत होती….बाकी सगळेजण जेवण करण्यात गुंग झालते…आकांक्षा मात्र काहीतरी हरवल्यासारखं पाहत बसली होती कदाचित तिला शकू आवडली नसेल म्हणूनही असेल…अगदी प्रसन्नतेने जेवण झाले…सत्यजितही पटकन कामाचं निमित्त सांगून जेवणाच्या टेबलं वरून उठला… ..मनात नसतानाही आपली आई आपल्याला बळजबरीने लग्नासाठी उभा करतीय म्हणून आपल्या खोलीत कामाचं निमित्त सांगून उठला…पाठोपाठ कैलासही गेला…कैलासला सगळा प्रकार ठाऊक होता पण आपल्या मित्राची बाजू सावरण्यासाठी म्हणून खंबीरपणे कैलास थांबला होता…जेवणावळी उरकल्या त्यानंतर सगळं घर दाखवण्यासाठी वीणाताई आणि अलखनंदा दोघीही पुढे सरसावल्या…कावेरी नेहमीप्रमाणे आपलं घोड पुढे नाचवत होतीच…
कावेरी – ताई…थोरल्या मालकीणबाई कशा आपल्याला सोडून गेल्या…एवढी पोर पाठी टाकून गेल्या बिचाऱ्या…पाहवत नाही हो…आईविना पोरं…
सिंधू – थोरल्या बाईसाहेब नाही म्हणून काय झालं …वीणाताईंनी अगदी पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळली आहेत ही मुलं…ठाऊक आहे का तुला…
कावेरी – तसं नाही ग…एक तर बीजवर…त्यातुंन पहिल्या बायकोचे तीन मुलं…परत बहीण नांदत नाही…अशा घरात मुलगी देणं म्हणजे जळत्या निखाऱ्यावर चालायला लावतो आहे आपण तिला असंच मला वाटतंय…
वीणाताई – काय हवंय तुम्हाला…ही गडगंज श्रीमंती…हे वैभव…हा थाटमाट…सोन – नाणं बोला तुम्ही…लग्नह आम्ही लावून देऊ…
कावेरी – [एवढी श्रीमंती पाहून कावेरीला आधीच हाव सुटलेली असते म्हणून खूप मागण्या घालते] आम्हाला …एक फ्लॅट…दहा तोळे सोन…त्याचप्रमाणे लग्न लावून द्यावं लागेल…मंजूर आहे तुम्हाला…?
वीणाताई – मंजूर आहे…माझ्या मुलासाठी मी काहीही करेल…
वीणाताई आपल्या मुलाचं लग्न लावण्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार होतात…मोठ्या माणसांची बोलणी होईपर्यंत इकडे शकू सगळं घर न्याहाळत असते…फिरता-फिरता शकू सत्यजितच्या खोलीच्या इथे जाते…शकू आतमध्ये डोकावून पाहते पण आत शकूला कुणीच दिसत नाही…कारण
सत्यजित गेस्ट रूममध्ये जाऊन बसलेला असतो… …शकू आतमध्ये जाऊन खोलीतल्या गोष्टींवर एक कटाक्ष टाकते…ड्रेससिंग टेबल वर एक डायरी शकूला सापडते…त्यामध्ये सत्यजितने नर्मदेच्या सगळ्या आठवणी लिहून ठेवलेल्या असतात…त्या सगळं शकू काही वेळातच वाचून काढते…डायरीमध्ये लिहिलेलं असत…‘ नर्मदा…काहीही झालं ना तरीही मी तुला कधीच विसरणार नाही…माझ्या आयुष्यात जरी कुणी दुसरी मुलगी आली तरीही तिला मी माझ्या मनात कधीच स्थान नाही देऊ शकणार…या घराशी तीच नातं असेल…पण माझ्याशी नाही…ती जी कुणी असेल आईची सून होईल ,माझ्या मुलांची आई होईल…नंदाची भाऊजय असेल…घरातल्या नोकरांची मालकीण असेल…पण माझी बायको कधीच असणार नाही….‘ एवढंच वाचून शकूचे डोळे पाण्याने तुडुंब भरतात…कितीही पाणी थांबलं तरीही ते पाणी थांबणार थोडीच होतं…शकुन आपल्या आसवाना बांध मोकळा करून दिला…तेवढ्यात दरवाजाचा खट्ट असा आवाज झाला…घरात असणाऱ्या एका नोकराने सत्यजितच्या रूमचा दरवाजा बाहेरून लॉक केला….रूममध्ये कुणीच नाहीय असं समजून दरवाजा बंद झाला….तेवढ्यात शकू कावरी-बावरी झाली…तिला समजलेच नाही काय करावं ते…जवळ-जवळ अर्धा तास शकू खोलीमध्ये बंद होती….आस-पासच्या खोल्या अंतराने लांब होत्या सत्यजितची बेडरूम ही खास असल्याने सर्वांपासून लांबच्याच अंतरावर होती म्हणून कितीतरी आवाज शकू देत होती पण आवाज कुणालाच ऐकू गेला नाही…
काही वेळात…सत्यजित आपला मोबाईल तिथेच विसरून गेला असल्याचं सत्याला समजत…म्हणून आपला मोबाईल घेण्यासाठी म्हणून सत्या आपल्या रुमवरती जातो…खोलीत शकू मात्र बेडच्या खाली जमिनीवर डोळे मिटून बसलेली असते…हातातली डायरी जशीच्या तशीच असते…खोलीबाहेरून परत खट्ट असा आवाज शकूला येतो…आवाज आल्यासरशी शकू भानावर येते…जमिनीवरून थेट शकू बेडखाली लपून बसते…सत्यजित बेडवरचा मोबाईल घेण्यासाठी येतो…बेडरूममध्ये कुणीच नाही ही पाहून परत आल्या पावली सत्यजित जायला निघतो…तेवढ्यात खोलीत सत्यजितला शकू दिसते…
दोघांचीही पहिली नजरानजर होते….शकू खरंच सत्यजितला वाचलेल्या डायरीबद्दल विचारेल…की सत्यजितला डायरी शकुन वाचली म्हणून राग येईल…पाहुयात पुढच्या भागात…उत्सुकता अशीच असू द्यात…

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.