
कावेरी – काय….?? त्या बीजवराशी लग्न लावणारे माझ्या पोरीचं…अक्कल आहे की नाही तुला…एक तर तो म्हातारा झालाय…तीन मुलांचा बाप…माझी मुलगी लहान वयातच विधवा होईल याची चांगलीच सोया लावलीस तू…शकू कुमारी राहील पण हे लग्न मी काही होऊ देणार नाही…[खंडू कोपऱ्यात पाडून सगळं ऐकत असतो …दारूच्या नशेतच आपल्या बायकोला म्हणतो…]
खंडू – आय….गगगप्प्पप…बस…कुठून आणणारेस मग सोयरीक चांगली….मेव्हणीबाई…चांगलं जमवताय तुम्ही…!
सिंधू – व्हय…ना दाजी मग तुम्हीच सांगा तुमच्या बायकोला…
खंडू – मेव्हणीबाई….थोडा वेळ बाहेर जा….हिच्याकडे बघूच दे मला…स्वतः पोरीचं जमवत न्हय…तू जमवायला निघालीस पण त्यात मोढता घालते हि बया…बाजूला सरक…नाहीतर सिंध्ये तुलाच फटके पडतील…
असं म्हणून खंडूने आपला पट्टा काढला…सिंधूला बाजूला सरकवली…त्या दिवशी कावेरीला बेदम चोपली…दुसऱ्याचदिवशी कावेरीने आपल्या मुलीच्या लग्नाला सहमती दिली…आणि भरमसाठ अटी तेवढ्या घातल्या…
कावेरी – सिंधू…काल जो प्रकार घडला या घरात…तो कुणालाबी कळता काम नये…शकुंतलाला पण सांगायचं नाही…तिला थेट बोहल्यावर उभं राहायला सांगू…मला आपलं हे घर बदलायचंय…दुसरीकडं घर घेण्यासाठी मुधोळकरांना पैशाची मदत करावी लागेल त्यांना…त्याचबरोबर गण्याच्या शिक्षणाचीही सोय त्यांना करावी लागेल…
सिंधू – ताई…अगं पण घर देऊपर्यन्त ठीक आहे…तू त्यांचा गैरफायदा घेऊ राहिलीस आता…
कावेरी – म्हणजे….त्यांनी मागणी घातलीय आपल्या शकूला आपण नाही…ते मागे लागून आलेत…आपण नव्हतो गेलो तिथे…पोरगी देतोय आपण आपली…चेष्टा थोडीच करतोय….
सिंधू – मी ते पाहून घेईल…पण तुमचा असा एक स्वाभिमान असू द्यात…नाहीतर सगळ्यात शोभा करून ठेवाल आमची…
कावेरी – तुझी कशी ग शोभा होईल…तू तिथलं काम सोडलं तर बरं होईल उगाच कशासाठी कामाला जायचं आता….शकू तुझी मालकीण अन तू तिथली नोकर…बघवणार नाही मला…तूच आमची शोभा करशील म्हणून तू तिथलं काम सोडलं तर बरं होईल…
सिंधू – पहिलं थोरल्या साहेबांचं म्हणं काय आहे आपल्या शकूबद्दल ते तर कळू देत
कावेरी – हा बाई…तू तेवढं विचारून पहा तुझ्या बाईसाहेबांना…नाहीतर त्यांचा नकार यायचा आपण आपलं मनात नुसते मांडे खात बसायचोत…
सिंधू – बरं निघू का मग मी…
कावेरी – थांब साखर खाऊन जा थोडी…म्हणजे दुपारपर्यंत आम्हाला चांगली बातमी तरी कळलं..
सिंधू – अगं…कशाला साखर आणि बिखर…चहा पाजलायस की एवढा…तोंड गुळचट पडलंय…निघते मी…
असं म्हणून सिंधू घर सोडते…मुधोळकरांकडे वीणाताई सिंधूची वाट पाहत असतात…सिंधू आल्या-आल्या घरातलं सगळं सांगूनच टाकते…त्याचबरोबर कावेरीने घातलेल्या अटीसुद्धा सिंधू बोलण्याच्या ओघात सांगून टाकते…
वीणाताई – माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती…तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत आम्हाला…आता फक्त सत्यजितच्या उत्तराची वाट पाहत आहोत आम्ही…एकदा का तो हो म्हणाला की गंगेत घोड न्हालं असं समजू आपण…
सिंधू – बाईसाहेब दुसरी गोष्ट अशी की…मी माझं इथलं काम कायमच सोडणार…
वीणाताई – तुझ्या निर्णयाला सुद्धा माझी सहमती असणार आहे पण नेमकं कारण समजल्याशिवाय मीही तुला हे काम सोडू देणार नाही…तेव्हा कारण नक्कीच सांगशील तू मला…
सिंधू – शकू इथली मालकीण होईल काही दिवसांनी…त्यामुळं मी इथं काम करणं बरोबर नाही वाटणार…मलाही आणि तिच्या आईवडिलांनाही…म्हणून इथलं काम सोडून द्यायचं असं मी ठरवलंय…
वीणाताई – जशी तुझी मर्जी…पण परत एकदा विचार करून कळवं मला…तू इथे काम न करता राहिलीस तरी चालेन मला…तसंही शकू एकटी इथे बावरले गं…
सिंधू – मी शकुच्या आईला विचारून पाहिल…ती म्हणाली तरच मी राहील…अन मलाबी माझ्या आई-बापांकडे निघून जायचंय गावी तिकडं पण कुणी नाहीय…तरी माझ्याशी बोलत जावा बाईसाहेब तुम्ही….माझा काही राग नाहीय…
वीणाताई – बाईसाहेब काय म्हणतेस ग…आता आपण व्याही होणार नाही का…मग बाईसाहेब…वैगेरे असं म्हणून आम्हाला परकं करू नकोस म्हणजे झालं…
सिंधू – ताई…आम्ही काही झालं तरी गरीब माणसं तुमची बरोबरी नाही करायचीय आम्हाला…तुम्ही लई माया केलीत आमच्यावर….माझ्या लेकीला सांभाळा म्हणजे झालं…
असं म्हणताना सिंधूच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ते ज्यांच्या पायावर डोकं ठेवलंय त्या माऊलीच्या पायावर डोळ्यातलं पाणी पडलं….खरंच सत्यजित…शकूशी लग्न करायला तयार होईल का अजून त्याचा होकार यायचाय…उत्सुकता अशीच असूद्यात पाहूया पुढच्या भागात काय होतंय ते….
त्यादिवशी सिंधू आनंदाश्रूंनी भरलेले डोळे घेऊन काम करत राहिली…सगळं काम आवरल्यावर सिंधू आपल्या घरी जाते…मुधोळकरांच्या घरी वीणाताई आपल्या सत्यजितशी मुलगी पाहिली असल्याचं सांगणार असतात ..कारण यावेळी हयगय करून चालणार नव्हती…रीतसर शकुच्या घरून होकार आला असल्याने काहीही करून वीणाताईंना आलेल्या स्थळाबद्दल सांगायचं होत…संध्याकाळी वीणाताई नेहमीप्रमाणे जपमाळ चाळत बसलेल्या असतात…सत्यजित घरात कैलासबरोबर येतो आपली आई आजारी असल्याने पाहिली कैलास वीणाताईंची चौकशी करतो –
कैलास – काय…काकू…तबियत काय म्हणतीय…?
वीणाताई – मी ठीक आहे रे सत्याचं लग्न होऊ देत मग झाले मी मोकळे डोळे मिटायला…
सत्यजित – आई…आता काय झालं असं अभद्र बोलायला…
कैलास – सत्या….जा तू आत जाऊन फ्रेश होऊन ये…[सत्या फ्रेश व्हायला आत जातो ]
वीणाताई – अरे बरं झालं त्याला आतमध्ये घालवलंस ते…महत्वाचं बोलायचं तुझ्याशी…
कैलास – बोला ना काकू…! [कुतूहलाने वीणाताईंना विचारतो]
वीणाताई – मी सत्यासाठी मुलगी पाहिलीय…तू पाहिलं आहेस तिला…
कैलास – काय सांगता…कधी इतक्यात पाहिलंय का मी …
वीणाताई – होय…तू पाहिल आहेस…
कैलास – काकू प्लीज…असं नका ना कोड घालू…
वीणाताई – अरे त्यादिवशी नर्मदेच्या श्राद्धाच्या वेळी नाही का ती सिंधूबरोबर होती ती मुलगी…तू तिच्याशी बोलला सुद्धा…
कैलास – शकुंतला…काकू पण ती केवढी लहान आहे…म्हणजे सत्याच्या मुलीच्या वयाची आहे ती…सत्या खरंच तयार होईल का लग्नाला…आकांक्षा एवढी आहे ती काकू…
वीणाताई – कैलास मी पूर्ण माहिती काढली आहे तिची…मला तर तीच मुलगी या घरची सून म्हणून हवीय…सत्या मी सांगूनही तयार नाही झाला तर तू त्याला कसही करून तयार करायचस….
कैलास – पण तीच मुलगी का काकू…?
वीणाताई – कैलास हे बघ एक तर तो लग्नासाठी तयार नव्हता…कसा बसा झालाय तयार…तर अटीच आहेत त्याच्या तशा…
कैलास – अटी….आणि कसल्या…?
वीणाताई – म्हणजे…तिला मुलं झाली नाही पाहिजे…तिच्याशी कुठलाही भावनिक संबंध ठेवायचा नाही….आणि बायको म्हणून जसं नर्मदाच स्थान या घरात होत तसं स्थान मी तरी तिला देऊ शकणार नाही अशा अटी…
कैलास – असं…असं…पण तिला जर मुलं हवं असेल तर…
वीणाताई – मुलीची तशी इचछा असूच शकत नाही कारण…[अचानक बोलायच्या थांबतात ]
कैलास – काकू काय झालं…?
वीणाताई – त्या मुलीला गर्भाशय नाहीय…
कैलास – काय…? बापरे…काकू…[सत्यजित येताना दिसतो म्हणून चटकन विषय बदलतो ] अरे…सत्या…आलास ये…काकू अलखनंदा ताई कुठे आहेत…मला ना त्यांच्याच हातचा चहा पिऊन जायचंय…
वीणाताई – थांब मी बोलवून आणते तिला…अलखनंदा चहासाठी आधण टाक जरा…कैलासला तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे…
अलखनंदा – हो आई…आलेच…
सत्यजित – कैलास…मघाशी घाबराघुबरा झालतास आता का अचानक चहाची हुक्की आलीय तुला…
वीणाताई – काही नाही…तुला लग्नासाठी मुलगी मिळाली की नाही हे विचारात होता मला…तेवढयात तू समोर आलास म्हणून अस्वस्थ झाला तो..बाकी काही नाही…
सत्यजित – लहानपणापासून ओळखतो मी त्याला…काहीच लपवू शकत नाही तो माझ्यापासून…बोल बरं कैलास …पटपट…
कैलास – ठीक आहे…महाशय ओळखतात मला…ऐका तर…तुझ्यासाठी मुलगी पाहिलीय काकूंनी…आपल्या इकडं कामासाठी सिंधू नाही का येत तीच्या बहिणीची मुलगी आहे शकू…
सत्यजित – काय…आई…एवढी लहान मुलगी…माझ्या मुलीच्या वयाची..!
वीणाताई – हो…तीच मुलगी मला सून म्हणून हवीय ह्या घरची…
सत्यजित – आई…हात टेकवतो आता मी तुझ्यापुढं…लग्न नको नको म्हणत असताना मला बळेच तयार केलंस तू…मी टाकलेल्या अटी तरी आठवून पाहायच्या ना एकदा…
वीणाताई – होय…मी सगळं आठवून बोलतेय…
सत्यजित – काहीच नाही वाटत मला तसं…कारण त्या शकूच वय पाहता तिला मुलं बाळ होण्याचं वय दिसतंय…अन मला ते नकोय…हे माहिती आहे ना तुला…एवढा माझ्यासाठी त्याग ती करू शकेल का…विचार कर ना तू…
वीणाताई – मुलं बाळ झाली तर चा प्रश्न आहे ना…मग त्या बाबतीत तू निश्चित राहा…
सत्यजित – काय बोलतीयस तुझं तुला उमजतंय ना…काहीही बोलतीयस तू आता…
वीणाताई – सत्या…शकूला गर्भाशयचं नाही जन्मापासून…मग मुलं -बाळ कशी होतील…
सत्यजित – तरीही…सगळं खूप घाईत होतंय असं वाटतंय मला…एकदा परत विचार कर आई…
वीणाताई – सत्या….[रागातच सोफ्यावरून उठतात ] तुला परत देव पाण्यात ठेवायची वेळ यायला हवीय का…तू जर ऐकलं नाही तर…उद्या माझं मेलेलं तोंड बघशील तू…
सत्यजित – आई…एकदा विचार कर …एक तर शकू अठरा वर्ष पूर्णही नाहीय…मला तुरुंगात टाकतील…अल्पवयीन मुलीशी लग्न केलं म्हणून…
वीणाताई – तू निर्धास्त राहा ना…हि गोष्ट कुठेही लीक होणार नाही या दोन वर्षात याची खबरदारी मी घेईल …तोपर्यंन्त शकू १८ वर्षाची होईलच की…
कैलास – मला काय वाटत…काकू तुम्ही शकुच्या मावशीबरोबर बोलून घ्यावं एकदा…म्हणजे तोपर्यंत सत्या चांगला विचार करेल किंवा मग आपण दुसरी मुलगीही बघू शकू…
वीणाताई – मी तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत…माझे केस काय उगाच पांढरे झाले नाहीत…मी आधीच बोलले आहे सिंधूबरोबर…सिंधुही आपल्या बहिणीशी बोललीय लग्नाबद्दल…आता तू नाही म्हणून फाटे फोडू नकोस..
सत्यजित – तुम्ही काहीही करा माझ्या अटी लक्षात ठेव म्हणजे झालं…
सत्यजित नेहमीप्रमाणेच तणतणत…आपल्या खोलीत जाऊन बसला…आपल्या आईबरोबर काही दिवस अबोला धरला…आता या सगळ्या गोष्टींची जणू वीणाताईंना सवयच झाली होती…लग्नातही सत्यजित असाच वागतो की काय….शकुंतला तरी त्यात बदल घडवेल की नाही…खरंच दोघांचं लग्न होईल की त्यात आणखी काही विघ्न येईल…उत्सुकता अशीच ताणून धरा….पाहुयात पुढच्या भागात काय होतंय ते….
क्रमश :

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.