
सिंधू आपल्या मालकीणबाईंचा निरोप घेऊन जाते…सोबत शकूही असते..सिंधू जात असताना पुटपुटत जाते…
सिंधू – बाई ग…माउली होती या घरची नर्मदाताई…
शकू – नर्मदा कोण ग मावशी…?
सिंधू – कोण म्हणजे काय…ते साहेब नव्हते का आपल्या आईपाशी बसलेले होते त्यांची बायको…लई स्वभावाला चांगल्या…चांगल्या म्हणजे कुणबी त्यांच्याबद्दल मागूनही वाईटवकट बोलत नसायचं…त्यांच्याकडं पाहिलं ना आपसूकच आदर वाटायचं मनात…सगळ्या घराला कसं बांधून ठेवलेलं त्यांनी…म्हणजे अजूनही घर बांधलेलच हाय…त्या असताना निराळंच होतं सगळं…रया गेली बाई त्या घरची…
शकू – मावशी पण काय झालं त्यांना कशा काय अचानक गेल्या त्या देवाघरी…
सिंधू – काही नाही ग गर्भाची पिशवी होती ना त्यांची तर त्याला कसलंतरी सूज आली होती…त्यांनी लक्षच दिल नाही वेळच्यावेळी…मग त्याचा झाला कॅन्सर मग काय…त्याची ट्रीटमेंट करता करता लई भोगलं ताईसाहेबानी…अशातच गेल्या की….गर्भाशयाचे आजार म्हणजे अवघडच काम असत त्याच….आता तुला नाही कळणार काय असते गर्भाची पिशवी ते…तुला तर ती नाहीच आहे…!
एवढे बोलून सिंधू अचानक शांत झाली…शकू रस्त्यातच थांबली जणू काही स्तब्ध मूर्तीच झाली होती तिची..सिंधू मात्र स्वतःला दोष देत बसते…आपण किती सहज बोलून गेलो ना आपण शकूच्या मनाचा काहीच विचार केला नाही…म्हणून रडू लागते आणि रस्त्यात मधेच थांबलेल्या शंकूंशी बोलते…
सिंधू – शकू…चुकले बाई मी बोलण्याच्या ओघात काहीही बोलून गेले ग…माफ कर मला…
शकू – मावशी तू कशाला माफी मागते…माझ्या नशिबात हेच असेल तर…लग्न करून सुद्धा सुखी नाही राहू शकत मी…
सिंधू – तुझी मावशी खमकी आहे…चल घरी असं तोंड पडू नकोस…मी बघेन तुझ्या लग्नाचं…बाई ग लग्नावरून आठवलं…या मुधोळकरांसाठीही चांगली मुलगी शोधायची जबाबदारी घेतलीय मी…हे बघ आई उभीच आहे दारात…काय ग कावेरी जेवण झालं की नाही तुमचं…अजून थांबलात होय…
कावेरी – नाही ग तुझं दाजी जेवलेत…मी थांबलीय तुमच्यासाठी…चला…हात-पाय धुवा आणि जेवायला बस…मी तोवर ताट घेते…
सिंधू – कावेरी…तू खूप दमलीस थांब आम्ही वाढून घेऊ तू फक्त जेवायला बस ….मी काय जेवण करूनच आलीय
असे म्हणून सिंधूने ताट केले…गण्या बाहेर मित्रांबरोबर खेळायला गेला असल्याने त्याच ताट केलं नाही…ताटामध्ये मस्त मुगाची भाजी,भाकरी आणि भात असं वाढलं…दोघीही मायलेकी जेवण करत होत्या…शकू भर्रकन जेवण उरकण्याच्या नादात होती…कारण एका कंपनीत पावडर भरण्याचं काम शकूला मिळालं होत…तिकडं अगदी काट्यावर काटा पोचावं लागत असल्याने जेवण उरकत होती…कावेरी तिची हि घाई पाहून वसकन ओरडून म्हणाली…
कावेरी – ए….बाय…जरा दमानं खा कि…कुठं लढाईला नाही जायचंय…कस व्हायचं काय माहिती या पोरीचं…सांभाळावी आम्हालाच लागणार तिला…
सिंधू – ए …बाय माझे…नको ना आत्ता जेवताना असं बोलूस..तो गण्या चकाट्या पिटवलं बाहेर त्याला नाही काही बोलायची…लेकरू कमवून आणतय तर त्याला बोलून-बोलून डागण्या देतेस…
कावेरी – एका गोष्टीन उणी हाय ते हाय…पण शिकली पण न्हाय पुढं…दहावीचं झालीय…चांगली नोकरी लागली असती जर शिकली सवरली असती तर…
सिंधू – त्यात तिची काय ग चूक…बाप असा पिदाडा मिळाला…तू हि अशी…
कावेरी – सिंधू…मी काहीच करत नाही का संसारासाठी…रोज लोकांची काम करून विट आलाय मलाही…ते काही नाही यंदा कशीही जागा सांगून आली ना लग्न उरकूनच टाकायचं हिचं…
सिंधू – अगं…त्या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी बघ…वर हाय ना त्यो बसलेला त्याला सगळ्यांची काळजी…तू नको काळजी करुस…
असं बोलता बोलता त्यांची जेवणं उरकतात…शकू आपलं जेवणं करून कामासाठी निघून जाते…हातावर पोट असल्याने कामात हलगर्जी केलेली तिकडे खपत नसे…म्हणून आपल्या कामाशी काम
तिला ठेवावे लागत …रोजचा दिनक्रम ठरलेला …सिंधू आवरून आपल्या कामावर जात …रोज-रोज मुधोळकरांच्या घरीही जाणं असल्याने वीणाताई रोज सिंधूला लग्नासाठी मुलगी पहिली कि नाही हे विचारत…
वीणाताई – काय ग…सिंधू…पाहिली का कुणी…
सिंधू – बाईसाहेब नका काळजी करू…मी पाहिली एक मुलगी आमच्या नात्यातली आहे…पण या घराला शोभेल अशी नाही आहे…आपल्या नर्मदावहिनींसारखी एकही नाही सापडत बघा…
वीणाताई – ठीक आहे…दोन दिवस पहा अजून मिळाली तर ठीक आहे…
सिंधू – पण थोरल्या मालकास्नी विचारलत का तुम्ही…
वीणाताई – त्याला काय ग विचारायचं…त्या दिवशी काय झालं पाहिलं त्याने डोळ्याने…
सिंधू – तसं नाही..पण आपलं विचारलेलं बरं…पुढं त्यांनाच आयुष्य काढायचंय एकमेकांसोबत… तवा माझं ऐका नाहीतर पुढे अवघड होऊन बसेल सगळं…
वीणाताई – आज विचारलेच त्याला…
बोलता-बोलता सिंधू काम आवरून निघून जाते…दिवसभराची काम आवरून घरात अलखनंदा,वीणाताई,आकांक्षा…एवढेच…अभिमन्यू घरात असून नसल्यासारखा…घरात कमी आणि बाहेर जास्त…असा अभिमन्यूचा वावर…त्यातल्या त्यात सागर घरात असायचा आपल्या आजीसाठी थोडासा वेळ काढणारा असा घरातला एकमेव…आजीबरोबर नेहमी बोलत असायचा आपलं मन मोकळं करायचा…
सागर – आजी…काय कस काय चाललंय…मी ऐकलंय ते खरंय का…
वीणाताई – काय ऐकलंय तू ..?
सागर – माझ्या पिताश्रींचा परत लग्नाचा घाट घालणार आहे ते…
वीणाताई – हो का…तुझीही आडकाठी आहे का याबाबतीत…
सागर – माझी कशाबद्दल आडकाठी असणार आजी…पण हे काय त्यांचं लग्नाचं वय नाहीय…एक नाही तर तीन मुलं आम्ही त्यांचे…आता आम्ही सगळे सक्षम आहोत,आमची काम, आमचे निर्णय आम्ही घेऊ शकतो…
वीणाताई – सागर…तुला काही अडचण आहे का या माझ्या निर्णयाबद्दल…?
सागर – नाही तसं नाही पण त्यांना या वयात मुलगी मिळणार तरी कुठून…
वीणाताई – त्याची काळजी तू करू नकोस…बाकी तू मुली पाहू शकतोस स्वतःसाठी….आत्ता लक्षात आलं…
सागर – काय ?
वीणाताई – तू आपल्या वडिलांच्या लग्नाला विरोध का करतोस ते…कारण तुला लवकरच तुझ्या आजीसाठी नातसून आणायची घाई झालीय…हो ना…
सागर – आजी….! असं काही बोलू नकोस ग…अजून १८ वय पूर्ण तरी होऊ देत कि…हा आता अभिदादा म्हटलं तर आहे त्याच वय लग्नाचं…
वीणाताई – तू मदत करशील का मला बाळा तुझ्या बापाला लग्नासाठी तयार कर…
सागर – आजी…आपल्याला काहीतरी करावं लागेल…तू ना आजारी पडायचं नाटक कर…आपण मस्त सिन क्रिएट करूयात…
वीणाताई – तू माझ्या बरोबर आहेस ना…यातच सगळं आलं…मी करेल तू सांगशील ते…
सागर – चल आत्तापासूनच लाग कामाला…
वीणाताई मस्त आजाराचं सोंग करून ठेवतात….सागरही खोटे डॉक्टर बनवून ठेवतो…संध्याकाळी सत्यजित यायच्या वेळेत अंगावर पांघरून घेऊन वीणाताई आपल्या खोलीत पडलेल्या असतात आपली आई घरात दिसत नाहीय म्हणून सत्यजित अलखनंदा ला विचारतो…
सत्यजित – नंदा…आई कुठे दिसत नाहीय…
अलखनंदा – सत्या…आई दुपारपासूनच आपल्या खोलीत झोपलेली आहे…
सत्यजित – का बरं…काय झालं असं…
अलखनंदा – डॉक्टर म्हणाले…शरीराचं दुखणं बरं करता येत…पण मनावरचं दुखणं कस बरं करता येईल…मनाला लावून घेतलाय आईनं त्यादिवशीचा प्रकार…जर आपण असंच वागत राहिलो तिच्याशी तर मनोरुग्ण होऊन बसेल ती एकदिवस…बघ बाबा…तुला तुझी आई धडधाकट हवीय कि नाही ते…काय म्हण आहे तीच तुझं लग्न व्हावं बस…एवढच…विचार कर थोडासा स्वतःचा नाही तर निदान तुझ्या जन्मदात्रीचा तरी विचार कर…
सत्यजित – मी आईला भेटून येतो…
सत्यजित आपल्या आईला भेटण्यासाठी जातो तिथे आईची अवस्था पाहताच सत्यजितला रडू कोसळते…सत्यजित आपल्या आईच्या पायापाशी बसलेला असतो…वीणाताई मात्र मनातल्या मनात हसत असतात…खरंच सत्यजित लग्नासाठी तयार होईल कि नाही पाहुयात पुढच्या भागात…
Post navigation

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.