
सकाळची वेळ…सगळ्यांची कामाची गडबड…घरात फक्त कैलासचा आवाज कैलास फक्त आवाज वाढवून कामे करून घेणार बाकी घरातले सगळे त्याच्याच आवाजावर काम करणार जणू घरातला एक प्रकारचा हंटर…सत्यजितला या सगळ्या आवाजानेच जाग येते…वीणाताई कैलासाला म्हणतात-
वीणाताई – कैलास…अरे काय हे…बायको वैतागत असेल तुझ्यावर…केवढा आवाज तुझा आवाजानेच कापरं भरत असेल तीला नाही का…पण काही म्हणं आमच्या सत्यजितचा तू बालपणीचा मित्र…एक दिवाणजी म्हणून कधी वाटलाच नाही तू आम्हाला…कायम घरातलाच एक सदस्य भासलास तू…
कैलास – काकू…काम करवून घ्यायचेत एखाद्याकडून मग तितका आवाज चढायलाच हवा ना आपला…मग काम उरकणार कधी…वजन असलं पाहिजे वजन…!
सत्यजित – वजन कसलं वजन….अपेक्षा वाहिनी वैतागत असतील तुझ्यावर…[जांभई देत म्हणतो]
वीणाताई – अरे…उठलास तू…गीता जा चहा घेऊन ये….
कैलास – काय काकू…अजूनही कामवाल्या बाईच्या हातून चहा….स्ट्रेंज…!
सत्यजित – सकाळी…सकाळी काय याच आई….बीजवर नको करू मला…कशाला लग्नाच्या फंदात पडतोय माझ्या…मला फक्त माझ्या वडिलांनी वाढवलेला व्याप सांभाळायचा आहे…लग्न-बिग्न नको ग आत्ता…आणि हे वयही नाहीय माझं लग्नाचं…तीन पोरं आहेत माझ्या पदरात अजून…
वीणाताई – सत्या…तुला फक्त लग्नाचा विचार कर असं आम्ही म्हणत आहोत….तुला लगेच बोहल्यावर उभं राहा असं नाही म्हणत कुणी…तुझ्याच बाबतीत नियती कशी काय फिरली कोण जाणे…अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार होता माझ्या पोराचा…माझ्या पोराला एकट्याला टाकून गेली….मी म्हातारी किती दिवस राहणार याच्यासाठी…नर्मदा….परत ये ग…नाहीतर तूच काहीतरी कर तुझ्या नवऱ्यासाठी एकट्याला नाही पाहवत ग…
आपल्या आईची बडबड अशीच चालू राहणार हे सत्यजितला माहिती होते म्हणून काहीही न बोलताच सत्यजित चहा घेऊन अंघोळ आटोपून आणि नाश्ता करून निघणार असतो….अंघोळ करून येईपर्यंत वीणाताई आपलं मन कैलास बरोबर गप्पा मारून मोकळं करत असतात…
कैलास – काकू…मलाही त्याला असं एकट्याला नाही बघवत…तुमच्यापेक्षा जास्त मीच त्याच्यासोबत असतो अगदी सावलीसारखा राहतो मी त्याच्याबरोबर…अलखनंदा ताई सासरहून परत आल्या त्या कायमच्या…म्हणून सत्या ने परत कधीच दुसऱ्या लग्नाचा विषयही काढला नाही…पण आपल्या बहिणीचं दुःख पाहावलं नाही म्हणून एवढा मोठा निर्णय घेतला…कधी आपला स्वतःचा विचार करणारे काय माहिती…काहीही करून सत्याला लग्नासाठी तयार करावाच लागेल….आत्ता टार्गेट फक्त एकच ‘सत्याला लग्नासाठी तयार करणं…! ‘
वीणाताई – माझ्या मनातलं बोललास बाबा…तुझ्यामुळे मला दोन मुलांचं सुख भेटतय…
कैलास – काकू दोन मुलं कशी काय…तुम्हाला तर एकच मुलं आणि एक अलखनंदा ताई…
वीणाताई – अरे बाबा…तू माझा दुसरा मुलगाच की…
कैलास – ओह्ह्ह्ह….चला निघतो आता आम्ही…सत्य येईलच इतक्यात…नाहीतर मला फायरिंग होईल…
सत्यजित – अहो…दुसरे चिरंजीव चला आवरा पटकन…बोलणी झाली की नाही अजून…मायलेकांची…?
वीणाताई – अरे झालीय…गोळ्या व्यवस्थित घे…सत्यजित तू वेंधळा आहेस एकदम कैलास लक्ष ठेवत जा रे…बाई ग बाई मीही किती बावळट आहे ना…सत्या तुझ्यामुळे मीही वेंधळी होणारे बघ…
सत्यजित – काय झालं आता…कशामुळं तुही वेंधळी झालीस…?
वीणाताई – तुझ्यामुळे आणि कुणामुळे…? अरे…या आठवड्यात नर्मदेचं श्राद्ध आहे…तयारी करावी लागणार खूप अपेक्षाला बोलावशील कैलास मदतीला…तेवढाच मला विरंगुळा…या घरात सवाष्ण कुणीच नाही…अलखनंदा आहे पण ती आपल्या विश्वात असलेली…बोलवायचं तरी कुणाला…बोलावशील का अपेक्षाला…
सत्यजित – कशाला उगाच वहिनीला बोलावतेस…आकांक्षा आहे की तयारी करायला…शिवाय अभिमन्यू आणि सागरही आहेत की….
वीणाताई – अरे…सत्या…सवाष्ण बाई नको का घरात कुणीतरी…आकांक्षाला काय कळतंय…अजून दहावीला आहे ती…सागर आणि अभिमन्यू कडून कसल्या मदतीची अपेक्षा करू…दिवसभर तेही आपल्या रूममध्ये बसून काय करतात कुणास ठाऊक…ते काही नाही अपेक्षा हवीच मला या घरात…एक तर माझं भुंडं कपाळ…ते कुणासमोर नेऊ मी…पितर जेवू घालावं लागेल…स्वयंपाकाचं बघू आम्ही…पण पितर जेवू घालणं नैवेद्य दाखवणं ही सवाष्ण बाईची काम…बाबा तू बाकी अपेक्षाला घेऊनच ये…
कैलास – हो काकू मी येईल घेऊन…काळजी करू नका…सगळं ठीक होईल…
घरातली सगळी माणसं जिकडली तिकडं झाल्यावर वीणाताई आपली कामवाली सिंधू हिच्याबरोबर बोलत बसते…
सिंधू – बाईसाहेब…आज काय मग आवरलं का समद्यांचं..
वीणाताई – आवरतय कुठं ह्यांचे नेमणेंष्टे चालत असतात…सागर अजून अंघोळ करतोय अभिमन्यू केव्हाच गेलाय तिथून तसाच कॉलेज ला जाईल…आकांक्षा काय यंदा दहावी म्हणून तिचा अभ्यास आणि ती जेवायला येईल तेवढी एक वाजता…आपण काहीही बोलायचं नाही…घरात करती सवरती मीच तेवढी…दिमतीला हवं बाई कुणीतरी…मी गाठली आता पासष्ठी मी काय काय बघणार…
सिंधू – बाईसाहेब मनातलं बोलू का ?
वीणाताई – बोल बाई…निदान तू तरी तुझं मन मोकळं कर माझ्यासमोर…
सिंधू – थोरल्या साहेबांचं लगीन लावून द्या…लगीन…बघा घर कसं उजळून निघेल…लक्ष्मीची पावलं येतील घरात…
वीणाताई – तू ना अगदी माझ्या मनातलं बोललीस…तुझ्या तोंडी साखर पडो …आणि हो निघशिल ना तेव्हा मला सांग…बोलायचं तुझ्याशी…
सिंधू – व्हय बाईसाहेब…!
एवढं बोलून सिंधू आपली काम आवरते…सिंधू ही खूप आधीपासून मुधोळकरांकडे कामासाठी होती…नर्मदेचं असणं…वागणं…वावरणं तिने प्रत्यक्ष पाहिलं होत…तिच्याचसारखी मुलगी वीणाताईंना सुनबाई म्हणून हवी होती…म्हणून आपली काम आवरल्या-आवरल्या सिंधूने दारातच मालकीणबाईंना आरोळी ठोकली…
सिंधू – बाईसाहेब….निघते बरं…उद्या येईल अशाच टायमाला…
वीणाताई – अगं ये इथे बस…[असे म्हणून वीणाताईंनी एक खुर्ची सिंधुसमोर सरकवली ]
सिंधू – हा …बाईसाहेब बोला…
वीणाताई – सिंधू…नर्मदेला तर तू आधीपासूनच पाहत आलीस…म्हणजे जेव्हा नर्मदा सून म्हणून या घरात आली तेव्हापासून तू नर्मदेला पाहिलंय…अनुभवलंय…
सिंधू – व्हय कि बाईसाहेब…
वीणाताई – मग…मला एक मुलगी पाहशील का आमच्या सत्यजितसाठी त्याची बायको म्हणून…या घराला सून म्हणून…आकांक्षा,सागर आणि अभिमन्यूची आई म्हणून …विशेष म्हणजे अलखनंदाची वाहिनी म्हणून…बघशील का एखादी मुलगी…
सिंधू – बाईसाहेब पण थोरल्या साहेबांचं काय म्हणं आहे ते तर कळू देत की…
वीणाताई – त्याच काय म्हणणं असणार…लग्नाला नको म्हणतोय…पण त्याच काही ऐकायचं नाहीय…
सिंधू – बरं बाईसाहेब…निघते मी…माझ्या नजरेत असेल एखादी तर पाहीन थोरल्या मालकांसाठी…
वीणाताई – घरात कशाला म्हणून कमी नाहीय…पैसे ठेवायला जागा नाही…तेवढ्या घरच्या लक्ष्मीची कमी आहे बघ…या क्षीण झालेल्या नजरेत फक्त या घराच्या लक्ष्मीला पाहायचंय…
सिंधू – बाईसाहेब त्यो…हाय ना बसलेला वर त्यो बगुन घेईल सगळं…
वीणाताई – त्यानंच नाही भागायचं…काहीतरी चमत्कार घडला पाहिजे…तरच हे जुळून येईल… …याला सुद्धा घरात सून पाहिजे असं वाटलं पाहिजे…
वीणाताई मात्र आज संध्याकाळी लग्नाचा विषय काढल्याशिवाय राहत नाही…काहीतरी मनाशीच पुटपुटत जपमाळ ओढत त्या सोप्यावर बसलेल्या असतात…
वीणाताई – ओम गण गणपतये नमः….ओम गं गणपतये नमः…
सत्यजित – राधाबाई पाणी घेऊन या…
वीणाताई – माग….राधाबाईलाच पाणी माग….[रागाने माळ ओढतात ]
सत्यजित – आई…काय झालं…? मग तूच घेऊन ये पाणी…
वीणाताई – कर म्हातारीची चेष्टा…काही मनावर घेऊ नकोस लग्नाचं…
सत्यजित – आई…आता अवकाश आहे अजून आकांक्षांच्या लग्नाला…येतील स्थळ हळू हळू मीही ओळखीच्यांना आधीच सांगून ठेवलंय…तुही सांगून ठेव तुझ्या भजनीमंडळातल्या बायकांना…
वीणाताई – मी आकांक्षांच्या लग्नाचं बोलत नाहीय…मी तुझ्या लग्नाबद्दल बोलतेय…
सत्यजित – आई…वेड लागलंय का तुला…किती वेळा सांगितलंय …माझ्या मुलांच्या लग्नाचं पाहायला हवय मी या वयात…तू खुशाल माझ्या लग्नाच्या गोष्टी करतीय…लोक काय म्हणतील…
वीणाताई – लोकांचं सांगू नकोस कौतुक मला…मला तुझी काळजी वाटतीय…किती दिवस असा एकटा जगणारेस आयुष्य…आकांक्षा जाईल लग्न करून परक्याचाच धन ते …अभिमन्यू आणि सागर राहतील त्यांच्या संसारात आपल्या बायकांकडे पाहत…तुझं काय सोबत हवी ना शेवटपर्यंत कुणाचीतरी…
सत्यजित – आई…का माझा अंत पाहतेस…नको म्हटलंय मी तुला सारखं…कैलासाला हाताशी धरून तू चांगलंच मला पेचात पाडतीस…घरी आलो नसतो तर फार बरं झालं असत…बाहेर असतो तिथेच खरं सुखात राहतो मी…सारखी तुमची कटकट…जीव नकोसा झालाय मला…
असे म्हणून सत्यजित रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जातो….रूममध्ये गेल्यावर एका हातात सिगरेट घेऊन आरामखुर्चीत बसतो…बसल्या बसल्या मनात आधीचे विचार घोंगावू लागतात….विचार करत असतानाच नकळत आपल्या रूममध्ये असलेल्या खिडकीमधून बाहेर डोकावतात….मन दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करतात पण काही केल्या आपल्या बहिणीचा म्हणजेच अलखनंदाचा विचार मनात घोळू लागतो….विचारांच्या तंद्रीत असतानाच बेडच्या दारावर थाप मारल्याचा आवाज येतो…दारात पाहताच आपली बहीण उभी असलेली सत्यजितला दिसते…अंगावर फिकट रंगाची साडी,केसांची सैलसर लांब वेणी,हातात सोन्याच्या बांगड्या अशा पेहरावात अलखनंदा दारात उभी असलेली सत्यजितला दिसते…आपली बहीण आल्याचे कळताच सत्यजित म्हणतो-
सत्यजित – काय माग नंदा…कसं येन केलंत आपल्या भावाकडे…
अलखनंदा – का रे इकडे तुझ्या खोलीत यायला कारणच असावं लागत का ?
सत्यजित – तसं नाही ग…तू कारणाशिवाय बोलत नाहीस ना म्हणून…
अलखनंदा – या बांगड्या घे…मला काहीच उपयोग नाही याचा…
सत्यजित – नंदा…अगं असू देत तुझ्याचसाठी तर बनवून आणल्यात मी…
अलखनंदा – सत्या…मी होणाऱ्या वहिनीसाठी देतेय…
सत्यजित – नंदा…कृपा करून हा विषय नकोय मला…
अलखनंदा – सत्या…असं नको म्हणूस रे…माझ्याबाबतीत जे घडलं ते तुझ्याबाबतीत कसं काय होऊ शकेल…असं कधी होत का…एक साधा अपघात झाला गोरक्षला त्यानंतर तो कधीच बाप होऊ शकणार
नाही असं डॉक्टरांनी सांगितलं…पण सर्वांनी मी अपशकुनी आणि वाईट चालीची म्हणून मला घराबाहेर कायमच काढलं…म्हणून मी इथे आलीय…हा त्या लोकांचा समज त्याला इलाज नाही…पण माझ्या बाबतीत असं काही घडलं हे सगळं अनपेक्षित होत…त्याचा एवढा विचार करू नकोस रे…तुझं आयुष्य आहे अजून खूप चांगलं जगावं तू तुझं आयुष्य असं मला प्रामाणिकपणे वाटत…
सत्यजित – नंदा…पण दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा मला होत नाही ग…तरीही बघुयात पुढचं पुढे…तुझ्यासारखी गुणी बहीण असताना मला दुसरं काही नको ग…
सत्यजितच्या जेवणाची वेळ झाली म्हणून सत्यजित जेवणासाठी जातो…त्याच्याबरोबर अलखनंदाही जाते असेच काही दिवस न बोलताच सत्यजित घरात वावरत असतो…घरात फक्त आपल्या बहिणीशी तो बोलत असतो…म्हणून श्राद्धाचा दिवस येइपर्यंत वीणाताईही काहीच बोलत नाही एकूण घरात मौनव्रत सुरु असत…श्राद्धाचा दिवस येऊन ठेपतो…
क्रमश:

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.