Skip to content Skip to sidebar Skip to footer

अबोल प्रीत बहरली….[भाग ८]

समोर सिंधूला पाहताच वीणाताई झोपेतून एकदम जाग्या होऊन भानावर येतात…वीणाताई झोपेतून आत्ताच उठून आल्यात हे सिंधूला पटकन समजते…सिंधू आपल्या विहीणबाईंना विचारते-

सिंधू – काय ताईसाहेब…आज उशीर झाला वाटतं…उठायला…चहा ठेऊ की कॉफी…

वीणाताई – नाही मी अंघोळ करून येते…काम आवरायला घे…आज खूप उशीर झाला…मला उठायला…

सिंधू – व्हय…ताईसाहेब कधीतरी कर्त्या बाईने उशिरा उठावं…त्यात काय एवढं…

वीणाताईंच्या समोर अगदी पेचप्रसंग उभा ठाकला होता सिंधूला कालच सत्यजितबरोबरच बोलणं सांगायचं की नाही…म्हणून अगदी द्विधा मनस्थिती वीणाताईंची झालेली असते…मनात शंका खूप असल्याने सिंधू कडे वीणाताईंचं लक्ष नसत म्हणून वीणाताई मनातली घालमेल सांगू शकत नव्हत्या…’ अंघोळीला जाऊन येते…तू जाण्याआधी मला भेटून जा…’ एवढं सांगून वीणाताई तिथून गेल्या…सिंधूचा काम आवरण्याचा सपाटा चालूच होता…वीस मिनिटांनी वीणाताई येतात…सिंधू आपलं काम करत असते…

वीणाताई – सिंधू…मला थोडा चहा ठेवतेस का…आणि दोन कप ठेव चहा…

सिंधू – होय ताई…दोन कप चहा घेणार वाह…पहिल्यांदाच सवय करून घ्या हा…कारण शकूला पण चहा फार आवडतो…

वीणाताई – [ लग्नाबद्दल सिंधू बोलली असल्याने वीणाताई संभ्रमात पडतात आपला मनसुबा सांगू लागतात] हो सिंधू…एवढी कसली घाई आहे…चहाची सवय होऊन जाईल मला…पण आज तू माझ्याबरोबर चहा घेशील म्हणून तुला मी दोन कप चहा ठेवायला लावला…

सिंधू – असं…होय..बरं…[ सिंधूला वीणाताईंच्या मनात काहीतरी आहे हे समजत] ताईसाहेब…मनात काहीबी ठेवू नये मोकळं करावं आपलं मन…काय झालं ताई…मनाची घालमेल दिसतीय मला…

वीणाताई – तू मनात राग धरू नको बस…

सिंधू – ताईसाहेब…मी का राग धरू…?  माझं इमान तुमच्या पायाशी आहे…मला राग धरायचा काय बी अधिकार नाहीय…जोतिबा शपथ…

वीणाताई – जर हे लग्न दोन वर्षांनी करायचं ठरलं तर….

सिंधू – काहीच अडचण नाहीय…पण काही खास कारण…

वीणाताई – मला समजून घेशील इतकंच खूप आहे माझ्यासाठी…अगं आमचा सत्या लंडनला जातोय महत्वाचं काम आहे म्हणतोय…तिथंही व्याप वाढून ठेवलाय…म्हणतोय तिथे दोन वर्ष थांबावं लागेल खरा व्यवसाय तिथेच करायचाय…

सिंधू – म्हणजे परत नाही येणार इकडं…

वीणाताई – नाही ग तसं नाही ग…दोन वर्ष थांबावं लागेल इतकंच…

सिंधू – ताईसाहेब…खरं सांगा…माझ्यापासून काही लपवून ठेऊ नकासा…साहेब लग्नासाठी जबरदस्तीने तयार नाही झालेत ना…त्यांची इचछा हाय ना…

वीणाताई – सिंधू…तुझा माझ्यावरती विश्वास नाहीय…!

सिंधू – ताईसाहेब तसं नाहीय…पण तिच्या आईला मी काय आणि कसं सांगू…

वीणाताई – मी विश्वास पटवून देईल त्यांना…तुला माझ्यावर विश्वास असला पाहिजे…बोल तू मी काय करू…एक मिनिट चल माझ्याबरोबर…

असे म्हणून वीणाताई सिंधूला हाताला पकडून देवघरात घेऊन जातात…देवघरातला तळी भंडारा उचलतात आणि स्वतःच्या कपाळावर लावून सिंधुच्याही कपाळी लावतात असं करून  सिंधूला आश्वस्त करतात… 

वीणाताई – सिंधू…आता तरी विश्वास बसला ना माझ्यावर…काहीही झालं तरीही शकुंतला या घरची सून होणारच..

सिंधू – माझ्या मनाचं सोडा हो ताई…तिची आई ऐकलं का एक तर लई लहरी आहे कावेरी आमची…

कावेरीची पैशाबद्दलची हाव वीणाताईंनी एका भेटीमध्ये पारखली असते म्हणून वीणाताई कावेरी साठी दुसरं काहीतरी विचार करून ठरवतात…

वीणाताई – मी तुमच्या घराचा सगळा खर्च पाहते मग तर झालं…

सिंधू – नाही ताई…असं नका करू…गरीब असलो तरी पैशासाठी एवढं हपापलेले नक्कीच नाही आहोत आम्ही…

वीणाताई – मग माझ्याकडून तूच कावेरीताईंना लग्न दोन वर्ष पुढे ढकलल आहे असं सांगशील का…?

सिंधू – ठीक आहे मी सांगेल…तिला पटवेल मी काहीही करून…फक्त तुमच्यासाठी…!

असे म्हणून सिंधू आपल्या मालकीणबाईंचा निरोप घेते…आपली बहीण काहीही झालं तरी लग्न पुढे ढकलण्यासाठी तयार होणारी नसते म्हणून सिंधू खूपच शिताफीनं सगळी बाजू सांभाळत असते…काहीही करून कावेरीला दोन वर्ष थांबण्यासाठी तिला तयार करायचं असत बस्स…घरी आल्यानंतर सिंधू आपल्या बहिणीशी बोलते-

सिंधू – कावेरी…काल चा बेत कसा वाटला मुधोळकरांचा…घर…जेवण कसं वाटल सगळं…

कावेरी – लईच भारी बेत व्हता ग…पण मला काही त्या अलखनंदा च माहेरी राहणं बरं वाटलं नाही बघ…कसाबी असला तरी नवराच आहे आपला…त्याला सोडून माहेरी राहणं बरं नाहीय…आता तुज दाजी किती मारतात मला मी काय सोडून गेलीय का त्यांना…?

सिंधू – व्हय ना…मग मी आज वीणाताईंना सांगूनच आले…अलखनंदाविषयी…ती जर तिच्या सासरी म्हणजे नवऱ्याच्या घरी नांदायला परत गेली तरच आमची शकू तुमच्या सत्यजितशी लग्न करेल…असा मी भंडाराच उचलून सांगितलंय वीणाताईंना….हे बघ माझ्या हाताला भंडारा लागलाय…अन वीणाताईनीबी मला विश्वास दिला की अलखनंदा परत तिच्या सासरी नांदायला जाणारच…मगच शकू या घरात सून म्हणून येईल…

कावेरी – मग बोलल्या का वीणाताई त्यांच्या नवऱ्याशी…?

सिंधू – अगं बाई माझे….आपल्या जावयाशी बोलणं म्हणजे काय मस्करी वाटली की काय तुला…त्यासाठी दोन वर्ष थांबावं लागेल…

कावेरी – काय….? असं काय बोलणार आहे दोन वर्षात….

सिंधू – मी आपलं आपल्या शकूचा अन आपल्या घराचा पहिला विचार केला बाई…कारण बघ नंदेचा धाक लई असतो बघ….मुधोळकरांच्या संपत्तीतही वाटा मागेल ती….एकदा का अलखनंदाताई तिच्या सासरी नांदायला गेल्या ना की मग कसला वाटा अन कसलं काय…सगळं आपल्या शकूलाच मिळणार की…

कावेरी – असं होय….हे मग आधी नाही सांगायचं….

सिंधू – पण त्यासाठी दोन वर्ष वाट पाहावी लागणार बघ आपल्याला…चालन का…?

कावेरी – हम्म….काहीतरी मिळवायचं असलं की काहीतरी गमवावं लागताच ना….चालतंय की…लागुदेत दोन वर्ष…पण ती मुलगी त्या घरात राहिली नाही पाहिजे…

सिंधू – कोण मुलगी…?

कावेरी – अगं…अलखनंदा गं…!

सिंधू – चालेन ना…मग मी उद्या लागलीच वीणाताईंना तुझा निरोप सांगते…

असं म्हणून सिंधू त्यादिवशी खूपच आनंदात आपली काम आवरून बसते…कारण दोन्ही बाजू खरंच खूप शिताफीने हाताळलेल्या असतात…दुसऱ्याच दिवशी वीणाताईंना सिंधू आपली बहीण दोन वर्षानंतर लग्न करायला तयार झालीय असं सांगते…म्हणून वीणाताईहि खूप सिंधूवर खुश असतात…दुसरीकडे सत्यजित लंडनला जाण्यासाठी तयार झालेला असतो…कैलासावर भारतातल्या बिसनेसची जबाबदारी टाकलेली असते म्हणून सत्यजित अगदी निश्चिन्त मानाने लंडनला जातो…मुधोळकर इंडस्ट्रीस एक फोर्जिंग क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जात असते…त्यामुळे लंडनला गेल्यावर सत्यजितची अशी गैरसोय होत नसते… …भारतामधून काही असे खास सहकारी सत्यजितने आधीच लंडनला पाठवलेले असतात…त्यातल्या त्यात अग्रवाल सर,जोशी सर हे दोन विश्वासू सहकारी तिथे आधीपासूनच असतात…लंडनला पोचल्यावर सत्यजित आपल्या आईशी न बोलता कैलासबरोबर संपर्क साधत असे…

सत्यजित – कैलास…सगळं ठीक आहे ना तिकडं…

कैलास – होय साहेब…सगळं ठीक आहे…काकू मात्र शांत-शांत असतात…

सत्यजित – काहीही करून तिला बोलतं ठेवत जा…नाहीतर उगाच मनाला लावून घेत जाईल ती माझ्या गोष्टी…

कैलास – कुठल्या गोष्टी…?

सत्यजित – लग्न…शकू…नवले फॅमिली…ऐकवत नाहीरे…

कैलास – तुला मी अजूनही सांगतोय…ते कारण सांगून जर तू गेला असशील ना तर…तू तुझ्याच आईपासून लांब जातोय असं समजेल मी…आणि किती दिवसांनी परत येणार आहेस…की कायमचा तिथेच स्थायिक होणार आहेस..?

सत्यजित – मी दोन वर्षांनी परत येणार आहे…आशा आहे…या लग्नाचं खूळ डोक्यामधून जाईल सर्वांच्या….

कैलास – नाही सत्या….परत येशील तर तू….सकारात्मक दृष्टिकोन घेऊन येशील…नकारात्मक गोष्टी थेम्स मध्ये टाकून देशील…

सत्यजित – थेम्स मध्ये…म्हणजे…?

कैलास – सत्या…भारतातली पवित्र नदी गंगा…तर लंडनची पवित्र नदी थेम्स आहे ना…मग आपल्याकडे कसं पाप गंगेमध्ये धुवून निघत…तसं…तू तिकडे थेम्स नदीला गंगा नदी समज आणि नकारात्मक दृष्टिकोन कायमचे टाकून येशील…बस…एवढंच म्हणणं आहे माझं…

सत्यजित – कैलास…फक्त आपलं ऑफिस सांभाळ बाकी…काकू आहे तुझी सांभाळून घ्यायला…

असं म्हणून सत्यजितने फोन ठेवला….असेच वर्ष सरत चाललं होत…सत्या आपला फोर्जिंगचा व्यवसाय खूप जोमाने पुढे नेत होता…असेच एक दिवस आपली ऑफिसमधली काम आटोपून एका हॉटेल मध्ये सत्यजित जेवणासाठी गेला होता….जेवण ऑर्डर केल्यावर आपला हॉटेलमधील दृश्य न्याहाळत बसला होता…तिथे काय नेमकं घडत की सत्यजित दुसऱ्या लग्नाचा विचार परत करू लागतो…खरंच सत्यजित आपल्या लग्नाचा परत करेल..? …हाच निर्णय शकूच आयुष्य बदलू शकेल…? प्रश्न खूप आहेत…याच उत्तर पुढच्या भागात मिळेल … उत्सुकता अशीच असू द्यात…पाहुयात पुढच्या भागात…

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.