
सत्यजितने एक रागीट असा कटाक्ष शकूकडे टाकला त्यानंतर सत्यजित शकूला म्हणाला…
सत्यजित – काय ग मुली…इथं काय करत होतीस…?
शकू घाबरी घुबरी होऊन खाली पाहत होती…भीतीने शकूच्या तोंडच पाणी पळालं…म्हणून शकू हलकाच आवंढा गिळते आणि जमिनीकडे पाहूनच म्हणते…
शकू – न्हाई…मी हिथं घर पाहत होते समदं…तसं ताईसाहेबानीच सांगितलं होत मला…
सत्यजित – काय ग…वय काय आहे तुझं…?
शकू – आता दहावीचं झाली माझी मग दहावीत गेल्यावर सोळा वय लागतं…मग सोळाच वय हाय माझं…
सत्यजित – काय गं…लग्न या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला…
शकू – न्हाय…म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतीय…लग्न म्हणजे माणसांना जोडणारा एक सोहळाच असतोय की..!
सत्यजित – तशी बरीच समज आहे म्हणायची…
इतक्यात कुणीतरी आल्याची चाहूल सत्यजितला लागते म्हणून तिथून आपल्या खोलीत जाऊ पाहतो…तेवढयात शकूला म्हणतो…
सत्यजित – मी पण काय तुझ्याशी बोलत उभा राहिलोय…माझा मोबाईल राहिला खोलीत म्हणून मी इथं आलो होतो….
असं म्हणून सत्यजित आपल्या खोलीत जाऊन मोबाईल घेऊन तिथेच खोली बंद करून बसतो…आपल्या तोंडावर दरवाजा बंद करून घेतला म्हणून शकू हिरमुसली होऊन तिथून निघू पाहते…अलखनंदा तिथूनच जात असते तशी जात असताना शकूला सत्यजितच्या खोलिच्याइथे पाहून थोडीशी थबकते…आणि म्हणते…
अलखनंदा – काय ग…शकू…कशी वाटली सत्याची खोली….की खोलीत गेलीच नाही तू अजून…
शकू – नाही ताई…मी जाणारच होते…पण दरवाजा बंद आहे खोलीचा…आता एवढं मोठं घर म्हणजे खोली पण मोठीच असणारं की…
अलखनंदा – [हसून] हा…हा…आमचा सत्या पण ना…एक नंबरचा नसनखवडा आहे…तू ये ना मी सगळं घर दाखवते तुला…
शकू – हो ताई…[ असं म्हणून आपली साडी सावरत शकू अलखनंदाबरोबर घर पाहू लागते ]
अलखनंदा – काय ग शकू….तुला मुलं आवडतात का…?
शकू – व्हय ताई…आपण लहान मुलांशी त्यांच्यासारखच लहान होऊन खेळलं ना की मग आपसूकच मनाला उभारी येते…
अलखनंदा – अगं…सत्याचा आकांक्षावर खूप जीव…आणि तसाच माझ्यावरही…मी सत्याशी आणि सत्या माझ्याशी बोलल्याशिवाय राहिलो नाही कधी…
शकू – तुम्हाला काही मुलं-बाळ…?
अलखनंदा – [ स्तब्ध होऊन एका जागीच खिळून उभी राहते कारण शकुने तर थेट अलखनंदाच्या वर्मावर बोट ठेवलं ] काय…?
शकू – मी म्हंटल…तुम्हाला मुलं-बाळ किती…?
अलखनंदा – नाही ग…माझा संसारच झाला नाही तर मुलं-बाळ कशी काय होतील…
शकू – मला माफ करा ताई….मला खरंच माहिती नव्हतं…
अलखनंदा – अगं …तू कशाला माफी मागतेस…एक वेळ होती ती…तीसुद्धा जी निघून गेली…आता विचार करणं सोडून दिलंय मी…
शकू – [ विषय बदलून बोलते ] ताई चला ना आपण खाली जाऊयात…
अलखनंदा – हो…हो चल…चल…
शकू आणि अलखनंदा दोघीही खाली जातात…त्यानंतर वीणाताई शकूला आणि तिच्या घरच्यांना मान-सन्मानाने कपडे देऊन नवले कुटुंबाची बोळवण करतात….शकू हे सगळं पाहून अगदी भारावून जाते…वीणाताईंच्या बोलण्यातला मधाळपणा पाहून…सत्यजित आपल्याशी जे काही वागला हे शकू एका क्षणात विसरूनही जाते…सगळे अगदी हसतमुखाने मुधोळकरांकडचा पाहुणचार घेऊन जातात…त्याच
दिवशी…त्याच रात्री सत्यजितच्या मनातून काही लग्न न करण्याचा विचार जात नाही…तोच विचार घेऊन सत्यजित आपल्या आईशी बोलण्यासाठी म्हणून येतो…
सत्यजित – आई…मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे…
वीणाताई – हा…बोल ना बाळा…
सत्यजित – आई …हे लग्न आपण पोस्टपोर्न करू शकतो ना….?
वीणाताई – [हसून] असं का वाटलं तुला अचानक…?
सत्यजित – का…मला असं काहीच वाटू शकत नाही का..?
वीणाताई – बाळा…अरे पण असं अचानक का डोक्यात आलं तुझ्या…
सत्यजित – आई…मला लंडन ला जावं लागतंय…आपला व्यवसाय केवढा एक्सपांड झालाय परदेशातही…
वीणाताई – खूप चांगली गोष्ट आहे…बघ एखाद्याचा पायगुण कसा असतो ते…
सत्यजित – [ स्वतःच्या कपाळावर चापट मारतो ] आई…आता सरळच बोलतो मी…शकू बरोबर काही संबंध जोडायला नकोय एवढ्यात…कारण मला हे लग्न इतक्यात नकोय…
वीणाताई – सत्या…हे काय बोलतं आहेस तू…? बरोबर आहे मी मेली करंटीच आहे नाही का…उगाच मनात इमले बांधत बसलीय…
सत्यजित – हो आई…दोन वर्ष राहावं लागणार आहे मला तिथे….एवढा वेळ त्याच संदर्भात मी बोलत होतो कॉन्फरन्स कॉल वर हवं तर कैलासला विचार…
वीणाताई – त्याला तर विचारणारच आहे मी…मला पाहिजे तेव्हा मी त्याला विचारेलच…मला तोंडघशी पाडू नकोस फक्त…
सत्यजित – आई…तुला मी तोंडघशी पाडतोय…एक तर मला न विचारता माझ्या लग्नाचा घाट घातलाय तू…ती गरीब लोकं आहेत गं….तुझं आजारपण मध्ये डोकं वर काढत होतं म्हणून मी या लग्नाला तयार झालो…तर तुला माझं एवढंही म्हणणं पटत नाहीय…माझ्या वडिलांनी एवढं साम्राज्य निर्माण करून ठेवलंय मला तेच पुढे वाढवायचं आहे निदान त्यांच्यासाठी तरी माझा विचार व्हावा एवढंच माझं म्हणणं आहे…तू कितीही आजारी पडली तरीही माझा हा निर्णय बदलणार नाहीय हे लक्षात ठेव आई तू…
वीणाताई – [ रागात ] मग काय ठरवलं आहेस तू…
सत्यजित – मी माझाही विचार करतोय आणि तुझाही विचार करतोय …हे लग्न दोन वर्षानंतर होईल…तुला काहीही करून सिंधू मावशींना सांगावं लागेल…ते कसं ते तू पहा…
वीणाताई – हा तुझा शेवटचा निर्णय आहे तर….!
सत्यजित – हो…
वीणाताई – ठीक आहे…मी सांगेन त्यांना…पण ती साधी माणसं आहेत….तोपर्यंत मी त्यांना असं आशेवर नाही ठेवू शकत…सर्वात पाहिलं आपण मागणी घातलीय त्यांना…
सत्यजित – आई…तू किती आततायीपणाने निर्णय घेणार आहेस अजून…मला न विचारता ठरवलं सगळं…अलखनंदाच्या बाबतीतही असाच निर्णय घेतला असणार तू म्हणूनच तिला मला इथं पाहावं लागतंय…
वीणाताई – तुला खूपदा सांगितलंय…जे व्ह्याच होतं ते होऊन गेलं….उलट नंदा इथे सुरक्षित आहे…
सत्यजित – मला चार-पाच दिवसात निघावं लागणार आहे…सिंधूमावशींना काय सांगणारेस ते पहा तू फक्त…
वीणाताई – सत्या…ही शेवटची वेळ तुझी…परत मी तुझं काहीही ऐकून घेणार नाहीय…
सत्यजित – धन्यवाद…माझ्या भावना पोहोचल्या…
असं म्हणून सत्यजित आपल्या खोलीत जाऊन झोपतो…वीणाताईंच्या मनात मात्र सिंधूला काय सांगावं असा प्रश्न…रात्रभर वीणाताईंच्या डोक्यात एकच विचार ‘ सिंधूला काय सांगावं…?’ शेवटी मनाची पक्की तयारी झाली…आणि पहाटे वीणाताईंचा डोळा लागला…
सकाळी वीणाताईंना काही लवकर जाग आली नाही…वीणाताई कशा बशा उठतात…सिंधू समोर आलेली दिसते…सिंधूला पाहताच वीणाताई तिच्याचकडे पाहत उभ्या राहतात…काय बोलावं ? कसं बोलावं ? हे वीणाताईंना काही केल्या सुचत नव्हतं…खरंच वीणाताई सत्यजितचा मनसुबा सिंधू ताईंना सांगू शकतील का…पाहुयात पुढच्या भागात…
Post navigation

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.