Skip to content Skip to sidebar Skip to footer

अबोल प्रीत बहरली….[भाग-१५]

सत्यजितला द्विगुणित असा आनंद होतो…आजारपणामधून पूर्णपणे बरे झालो याचाही आणि घर परत नर्मदा होती तेव्हा जसं होतं तसं जिवंत झालं याचंही…असेच वीणाताई आणि सत्यजित बोलत बसले होते…

सत्यजित – आता जरा बरं वाटतंय…

वीणाताई – हं….माझी काळजी मिटली…तीर्थाटनास जाईन असा विचार करते आता…

सत्यजित – या वयात कसलं गं तीर्थाटन वैगेरे…कर की आराम काही दिवस…

वीणाताई – या वयात नाही मग कधी….खरं तर देवदेव लहानपणापासूनच करायचा असतो…या वयात करणं हेही चुकीचंच आहे…बरोबर आहे तुझं म्हणणं…

सत्यजित – चला…कधीतरी माझं म्हणणं पटलंय तुला…

वीणाताई – त्यापेक्षा एक काम कर…तू आणि शकुंतला असे दोघे जावा ना देवदर्शनाला…

सत्यजित – आई…आता कसलं देवदर्शन…खूप कामं पेंडिंग आहेत एक तर मी एवढे दिवसांची सुट्टी घेतलीय….असं जबाबदारी सोडून कसं चालेन…

वीणाताई – कसली सुट्टी सत्या…आपलाच व्यवसाय आहे रे…तू लोकांना सुट्ट्या देतोस…स्वतः सुट्ट्या घेत नाहीस…ते काही नाही…अष्टविनायक करून यायचंय तू…मी तसा नवस बोलले होते…

सत्यजित – ठीक आहे बाई…जातो मी…फक्त शकूला सांगून ठेव तसं…

वीणाताई आपल्या मुलाचं हे वाक्य ऐकून मनातल्या मनात सुखावतात कारण एवढ्या दिवसांनी आपल्या बायकोच नाव सत्यजितच्या ओठांवर आलं होतं….आता वीणाताईंनी प्लॅन तर ठरवलाय अष्टविनायक दर्शनाचा पण वीणाताईंच्या मनात मात्र वेगळाच प्लॅन तयार होता…’दोघांना मस्तपैकी डेट वर पाठवण्याचा’ यासाठी डेस्टिनेशन कैलासच्या मदतीने ठरवणार होत्या….सत्यजितशी बोलणं झाल्यावर वीणाताईंनी पटकन कैलासला फोन लावला दोघांनाही मस्त गोव्याला पाठवायचं असं वीणाताईंनी आणि कैलासने परस्पर ठरवलही याची कुठलीच माहिती दोघांनीही सत्यजितला कळू दिली नाही…दोघांनाही देवदर्शनासाठी जायचंय असंच सांगितलं…म्हणून सामानाची बांधाबांध करत होते…सत्यजितनेही आपल्या

आईला देवदर्शनासाठी जातो अशी सहमती दर्शवली होती पण सत्यजितच्याही मनात शकूला बाहेर डेटला घेऊन जावं असा विचार सारखा-सारखा डोकावत होता…तशी शॉपिंगही सत्यजितने केलेली होती….डेटवर न्यायचं आहे या कल्पनेने सत्यजित रात्रभर जागत होता…असेच एक दिवस कैलास घरी आलेला असताना सत्यजित भरदिवसा सोफ्यावर बसून डुलक्या घेत होता…कैलास आपल्या मित्रावर गालातल्या गालात हसू लागला…आणि म्हणाला…

कैलास – बाप रे…नाईट शिफ्ट करतोस की काय सत्या…दिवसाढवळ्या झोपा काढतोय…वहिनी जरा पाणी आणाल..मला हवं तेवढं पाणी पिऊन टाकेन मी…आणि राहिलेलं पाणी या सत्याच्या चेहऱ्यावर शिंपडील…काय कसं वाटलं याला झोपेमधून जागं करण्याची युक्ती..

शकू – काय हो भाऊजी…नेहमी थट्टा करता तुम्ही…

कैलास – का बरं…? वहिनी तुम्ही नाही का थट्टा करत कधी…

शकू – आमचं घरात चाललेलं असतं नंदाताईंबरोबर मस्करी करणं…पण यांना आवडत नाही असं सारखं सारखं कुठल्याही कारणावरून हसलेलं…म्हणून मग मौन बाळगावं लागत…

दोघांच्या बोलण्याने सत्यजित अचानक जागा होतो…आणि म्हणतो…

कैलास – काय मग सत्या…झोपा कसल्या काढतोयस…वहिनींना घेऊन मस्तपैकी बाहेर घेऊन जा की…

सत्यजित – [सत्यजित झोपेतच असल्याने काय बोलतोय हे त्याला कळत नव्हतं ] अरे हो…त्याचाच तर रात्र भर विचार करत होतो….! [ सत्यजितचं बिंग फुटलं ]

कैलास – अरे…वाह्ह्ह….माझ्या वाघा…तू तर या आधीच असं नियोजन बनवायला हवं होत…

सत्यजित – कसलं नियोजन…[ आपण झोपेत काय बोलून बसलो हे सत्याला उमगलं…म्हणून सारवा-सारव करत सत्यजित म्हणाला…]

कैलास – सत्या…नाटक करू नकोस आता…आता तुम्ही दोघेही एकत्र कुठेतरी अशा खास डेट वर जायलाच पाहिजे… तुम्ही एखाद्या मुव्हीला जाऊ शकता…एकत्र कुठेतरी जेवायला जाऊ शकता….अरररे….पण तुम्हीअजूनही एकमेकांना ओळखतच नाही मग कसं जाणार…त्यासाठीच तर डेट नावाचा प्रकार असतो….मला माहितीय ना…तुला नसेलच माहिती…

शकू – भाऊजी…चहा आणलाय…तुम्हाला आवडतो तसा…

चहा देऊन शकू आपल्या कामासाठी निघून जाते…तेवढयात सत्यजित आपल्या मित्राशी बोलू लागतो…

सत्यजित – अरे तू तर असं बोलतोय पण आईने तर देवदर्शनासाठी जाण्याचा बेत आखलाय तेही अष्टविनायक दर्शन…

कैलास – असं…अरे मग मलाही त्यांनी तसंच…..[ कैलास ने हळूच आपली जीभ चावली कारण वीणाताईंचं आणि आपलं आधीच ठरलंय तर सगळं सत्यजितला कळेल म्हणून कैलासने आपल्या जिभेला लगाम खेचला ]

सत्यजित – कैलास…बोल की असं अचानक का थांबलास…कुणी सांगितलंय तुला जे तू आत्ता बोलत होतास…

कैलास – कुठे काय…काहीच नाही…

सत्यजित – मग वहिनींनी काही सांगितलं का आणायला जे तू विसरलास…

कैलास – हो ना…अरे विसरलोच होतो…तिनं ना एक साडी आणायला सांगितली होती…

सत्यजित – कुठली रे साडी…? खोटं बोलू नकोस…माझ्याशी…मला सगळं कळलंच पाहिजे खरं काय आहे ते…

कैलास – सत्या…अरे खरं सांगायचं तर आईसाहेबांनीच माझ्यावर ही कामगिरी सोपवली होती…तुम्हा दोघांनाही कुठेतरी एकांत मिळावा म्हणून गोवा किंवा केरळ अशा ठिकाणी आम्ही पाठवणार होतो…पण तुही तोच विचार करत होता म्हणून मला बरं वाटलं…

सत्यजित – मग आता तुमच्या प्लॅनच काय ?

कैलास – जाऊ दे तू तुझ्या डेट चा प्लॅन केलाय हे काय कमी आहे…[मोठ्याने हसतो ]

कैलास खूप दिवसांनी खूप समाधानी आणि प्रसन्न मनाने मुधोळकरांच्या घरातून निघून जातो…दुसरीकडे सत्यजित आपल्या बायकोला कसं तयार करायचं याचा विचार करत बसतो…लगेच अलखनंदा ला बोलावतो आणि म्हणतो-

सत्यजित – नंदा…तुला तुझ्या वहिनीला मस्त तयार करावं लागेल…

अलखनंदा – कशासाठी…काही विशेष कारण…

सत्यजित – तुला सांगायला हरकत नाही कारण आज मी तिला डेट वर घेऊन जातोय…

अलखनंदा – दादा….मला एक चिमटा काढतोस…मी काय ऐकतीय याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीय…[गालातल्या गालात हसते ]

सत्यजित – नंदा…आता माझी फिरकी घेतेस की काय…आत्ताच कैलास आला होता तोही असाच काहीतरी बोलत होता….गेला वैतागून…

अलखनंदा – काय भांडला तुम्ही…?

सत्यजित – नाही ग असाच बोलत होता काहीतरी…ते जाऊ देत तू सांग…तुझ्या वहिनीला नीट तयार करणार आहेस की नाही ते…

अलखनंदा – अरे पण कशासाठी तयार करायचंय ते तरी कळू देत ना मला…नाहीतर मी तयार करेल सत्यनारायण पूजेसाठी…करायला जायचे गणपती व्हायायचा मारुती असं नको व्हयला…

सत्यजित – अगं बाई…डेट वर जायचंय डेट वर….हुश्श्श…[ सत्यजितने उसासा टाकला ]

अलखनंदा – ओह्ह्ह…हे बाकी छान जमलंय हा तुला…

सत्यजित – नंदा…कौतुक पुरे…तुला जमणार आहे की नाही ते सांग…

अलखनंदा – जमेल रे…तुला हवी तशी तयार करते वहिनीला…आज त्यासाठी मला शॉपिंग ला जावं लागेल तू येशील ना बरोबर माझ्या…. …. एक वन पीस घेऊयात…त्यावर ज्यूलरी घ्यावी लागेल…बाकी सगळं मी पाहते…

असं म्हणून अलखनंदा आपल्या कामासाठी निघून गेली…जाताना सत्यजितलाही बरोबर घेऊन गेली…ज्यूलरी,वन पीस असं सगळं खरेदी करून घेऊन आली मग शकूला तयार करण्याचा विडाच जणू अलखनंदाने उचलला…दोनच दिवसांनी शकूला अलखनंदा पार्लरमध्ये घेऊन गेली…जणू शकूचा नव्याने पुनर्जन्म झाला…शकू रोजच्यापेक्षा सुंदर दिसू लागली…त्यानंतर आणलेला ड्रेस शकुने घातला…त्यावर साजेसा असा मेकअप अलखनंदाने केला शकू खरंच जणू स्वर्गातली अप्सराच वाटत होती…भेटण्याचं ठिकाण निश्चित झालं एक निसर्गाच्या सानिध्यात असलेलं एक प्रशस्त हॉटेल आणि टेबल सत्यजितने बुक केलं…त्यावर लिलीच्या फुलांचा गुच्छ असं सगळं बुक केलं होत…शकूला आणण्याची जबाबदारी अलखनंदा वर होती म्हणून एका दुसऱ्या गाडीतून शकू येणार होती…शकूचा झालेला मेकओव्हर सत्यजितला माहिती नव्हता तो एकप्रकारे सुखद धक्काच होता…सत्यजित शकूची वाट पाहत बसला

होता…काही वेळातच एक गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली…लांबसडक केस मोकळे सोडलेली…त्याच केसात गुलाबी रंगाचा डेलियाचं फुल खोवलेलं…अशी तरुणी सत्यजितला येताना दिसली…सत्यजित मनातल्या मनात म्हणत राहिला देवाने अशी सुंदर गोष्ट बनवली आहे…खरंच एवढी सुंदर बनवू शकत असेल का देव अशी गोष्ट…?’ असे मनात म्हणत होता…पण नंतर ती मुलगी आपल्याच दिशेने येत असल्याचे सत्यजितला वाटले….आपला भ्रम नसून ती मुलगी खरंच आपल्याच बाजूने येतीय याची जाणीव सत्यजितला झाली…

सत्यजितच्या जवळ आल्यावर ती हसली आणि म्हणाली…ओळखलं का ? ” त्यावर सत्यजित हसत म्हणाला-

सत्यजित – नाही ओळखलं…

ती मुलगी – मी सौभाग्यवती शकुंतला सत्यजितराव मुधोळकर….

सत्यजित – खरं सांगू…मी तुला ओळखलंच नाही…

शकू – मला वाटलंच होत तुम्ही मला नाही ओळखणार….

शकू एवढं म्हणते परत सगळं वेष बदलून येते…आणि म्हणते-

शकू – मला माहिती होतं तुम्हाला तुमची बायको साध्या वेशात ओळखता येईल ते…

सत्यजित – असं काही नाही…बायको कुठल्याही वेशात आली ना तरीही ती ओळखता यायला हवी…

शकू – पण तुम्ही मला ज्या वेशात ओळखता ना त्याच वेशात मी नेहमी तुमच्या समोर असेल…

शकूचे हे वाक्य ऐकून सत्यजित विचार करू लागला…आजकालच्या मुलींसारखं फक्त हौस म्हणून तऱ्हेतऱ्हेचे कपडे घालून फिरणं…यात स्वतःचा आनंद शोधतात मुली पण शकू माझाच आनंद पाहतेय…असं मनातल्या मनात सत्यजितला वाटलं…सत्यजितने त्याच प्रेमाने शकूचा हात आपल्या हातात घेतला…आणि आपल्या मिठीत पहिल्यांदा शकूला घेतलं…ती मनाला धुंद करणारी संध्याकाळ शकूच्या कायमस्वरूपी लक्षात राहिली…सुरुवातीला अबोल वाटणारी कळी  नंतर-नंतर बहरलीच की….

समाप्त

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.