
शकुने तातडीने डॉक्टरांना बोलावून घेतले…डॉक्टरी तपासणींमधून आजार हा मेंदूशी निगडित असल्याचे निदान झाले…डॉक्टरांनी मेंदूमध्ये संसर्ग झाला असल्याचे सांगितले…काळजीचे काही कारण नसल्याने शकू थोडी रिलॅक्स वाटत होती…तरीही डोकं दुखणं,ताप येन,उलट्या होणं…विशेष म्हणजे वागण्यात बदल अशा आजारांनी सत्यजितला ग्रासलं होत…शकू काही कारणाने सत्यजितच्या पाशी गेली तरी सत्यजित शकूवरती चिडायचा,मोठ्याने ओरडायचा पण तरीही शकू मुकाट्याने सगळं सहन करायची…डॉक्टरांनी एम आर आय करायला सांगितला त्यामुळे आलेल्या रिपोर्टवरून तरी काळजीचे काही कारण नाही असे निष्पन्न झाले होते…म्हणून त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे होते…शकू सत्यजितची अगदी व्यवस्थित काळजी घेत होती…तरीही औषधोपचार वेळच्या वेळी चालू होते म्हणून सत्यजितची नेहमीसारखी चिडचिड हळू हळू शांत झाली होती…म्हणून वीणाताईंनाही थोडं समाधान वाटत होत…शकूबरोबर बोलताना वीणाताई शकूला म्हणाल्या-
वीणाताई – मी खूप अपराधी आहे ग पोरी तुझी…!
शकू – आईसाहेब काहीही काय बोलताय…माझं कर्तव्यच आहे ते…
वीणाताई – अगं..पण तुझं वय काय आहे…हसण्या बागडण्याचं वय गं तुझं…पण मी तुला काय दिलंय…पोक्त बाईसारखी कामं करावी लागतायत तुला…
शकू – आईसाहेब…असं का बोलताय तुम्ही…आता यांचं हे दुखणं काय सारखं सारखं थोडंच येणार आहे…औषध चालू आहेत ना मग काळजी करण्याचं काहीच कारण नाहीय असं डॉक्टरांनी सांगितलं सुद्धा आहे…तुम्ही उगाच काळजी करताय…ते जंतुसंसर्ग आहे ना मेंदूमध्ये मग त्यात ना डॉक्टरांनी औषध सोडायला बोलावलंय चार दिवसांनी अजून…
वीणाताई – हो ना बाई गं औषध म्हणे मणक्यामधूनही दिलं जातं त्रास होत असेल बाई….
शकू – हो ना आईसाहेब…मग इंजेक्शन दिल्यावरती…त्यामधून जे जंतू आहेत ना ते किती प्रमाणात आहेत हे रक्ततपासणी करून पाहतात…
आपल्या सुनेला एवढी माहिती आहे हे पाहून वीणाताईंना आणखीनच कौतुक वाटते…सत्यजितच आजारपण थोड्यावेळासाठी विसरून जातात….शकू अगदी नित्यनेमाने सत्यजितची काळजी घेत असे सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत सत्यजितला काय हवंय आणि काय नको हे पाहत असे…काही दिवसातच
शकूच्या शुश्रुषेमुळे आणि डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली सत्यजित अगदी ठणठणीत बरा होतो…त्यानंतर मात्र सत्यजित शकूबरोबर मनात आधी धरून वागू लागतो…
सत्यजित – काय हे…इथं हे ठेवायचं नाही कितीवेळा सांगितलं गं तुला समजत नाही का…?
शकू – काय झालं…?
सत्यजित – अगं माझ्या लॅपटॉपची बॅग अशी इथं सोफ्याच्या खाली कुणी ठेवली….?
शकू – मी नाही ठेवली…
सत्यजित – मग काय तिला पाय फुटलेत कि काय…
वीणाताई – सत्या अरे किती चिडचिड करतोस..
वीणाताई आल्याबरोबर शकूला आधार वाटू लागला…म्हणून तोंड पाडून शकू बसली होती…एवढ्यात आकांक्षा आली आणि आपल्या मैत्रिणीसारख्या आईची बाजू सावरून म्हणाली…
आकांक्षा – डॅड…का तुम्ही शकूला ओरडताय…केवढी डिप्रेस झालीय ती…नका एवढं व्हॉलेंट होत जाऊस…
आपल्या मुलीचं असं काल आलेल्या मुलीची बाजू घेऊन बोलणं सत्यजितला रुचलं नाही म्हणून सत्यजित रागारागाने आपल्या खोलीत जाऊन कडी लावून बसला…वीणाताईंना आपल्या मुलावर कधी नवे तो इतका राग आला…वीणाताई रागाने तणतणत म्हणाल्या…” आता आतमध्ये काय तपाला बसणार आहेस कि काय”
सत्यजितचा रागाचा पारा आणखीनच चढला…सत्यजित रागाने म्हणाला ” घ्या…घ्या सगळे तिचीच बाजू घ्या…”
आपल्या नवऱ्याचा असा रुद्रावतार पाहून…शकू घाबरी घुबरी झाली….त्याच दिवशी सत्यजितला भेटण्यासाठी म्हणून सत्यजितची मावसबहीण खास कोकणहून आलेली असते…विभा शिरोडे असं नाव तिचं…आपल्या नणंदेला पाहताच शकुने आपला पडलेला चेहरा पुन्हा ताजातवाना केला…आल्याबरोबर पाणी देऊन त्यांच्या पाय पडली…विभाताई शकूवर काहीशा नाराजच…म्हणून शकूवर वैतागून म्हणाल्या…
विभाताई – काय गं…तुला कळत नाही का…एवढया मोठ्या वयाने मोठं असलेल्या माणसाबरोबर लग्न करताना…आमच्या सत्याला नाही कळत कुणी म्हणालं म्हणजे लगेच विरघळणारं पण तुला जराशीही लाज नाही का वाटली…खरं तर सत्याची ही जी काही अवस्था आहे ना तुझ्याचमुळे झालीय…
वीणाताई – अगं हो हो…जरा बस कि शांत….आल्या आल्या लागलीस बोलायला….सत्यजित बरा झालाय तेव्हा तू आली आहेस…बरा नव्हता तेव्हा कुठे गेली होतीस…कि नेहमीच्या दौऱ्यावर गेली होतीस…शकुंतलेला कशाला बोल लावतेस…अगं तिच्यामुळे तर बरा झालाय आपला सत्या…तोही तुझ्याचसारखा नंबर एकचा तिरसट…आता बरा झालाय ना तर शांत बसावं ना तर नेहमीसारखी तकतक करत खोलीत कडी लावून बसलाय…
विभाताई – मावशी पण कशाला लग्नाचा घाट घातलास तू…सत्याला काही झालं म्हणजे आपण ही अशी मुलगी किती दिवस सांभाळणार…?
वीणाताई – विभा….[मोठ्याने ओरडून] तू तुझ्या भावाच्या जाण्यावर का टपलीयस…चांगलं बोलावं जरा…भान हरपून शकुंतलेशी बोललीस…पण माझ्याशी असं अभद्र बोलत जाऊ नकोस….
इतक्यात शकू चहा आणि नाश्ता घेऊन येते…विभाची बडबड चालूच असते….
विभा – जनाची नाही तरी निदान मनाची तरी लाज बाळगावी माणसाने…तू एवढी तरुण आहेस अगदी पोरसवदा दिसतीयस तुला एखादा तरुण मुलगा नाही का सापडला…तीन मुलांचा बाप असलेल्या माणसांशी तू लग्न केलंयस तू…त्या आकांक्षाचाही विचार करायचा ना तू जरा…तिचं उद्या लग्न होईल…तिचं माहेरपण हिरावून घ्यायला टपलीय तिच्या सासरकडचे काय म्हणतील…बापाने दुसरं लग्न केलंय तेही या वयात…मग कोण सोयरीक देईल या घरातल्या मुलींना…
शकू आपली डोळ्यातून आसवं टिपकत शेजारीच उभी होती…आपल्या बहिणीचं हे लागट आणि खोचक बोलणं जिना उतरून खाली येणाऱ्या भावाने म्हणजेच सत्यजितने ऐकलं..आपल्या भावाला पाहताच विभाचं बोलणं अर्धवट राहतं आपल्या बहिणीला बोलण्याआधीच सत्यजित जिन्यावरून धाडकन घरंगळत येऊन जमिनीवर पडतो…सत्यजितला असं पडलेलं पाहून विभाताई गोंधळून जातात…तेवढ्यात सत्यजितला सावरायला शकू पुढे सरसावते…जिन्यावरून गडगडत खाली पडणाऱ्या आपल्या नवऱ्याचं डोकं एका हाताने आपल्या मांडीवर घेते…अन रक्त आपल्या साडीच्या पदराने पुसते…विभाताई हे सगळं उभा राहून फक्त पाहताच होती…मदत न करता परत शकूलाच जाब विचारला…
विभाताई – पाहिलंस…माझ्या दादाची आज ही अवस्था झालीय ती फक्त आणि फक्त तुझ्याचमुळे…तुझी ही पापी छाया त्याच्यावर पडली म्हणून…दादाला काही झालं ना तर याद राख…
शकूला त्यावेळी काहीच ऐकून घ्यायची आणि समजून घ्यायची काहीच इचछा नव्हती…आपल्या नवऱ्यावर तातडीने उपचार करण्याची त्यावेळी गरज होती शकुने तातडीने फोन करून ऍम्बुलन्सला बोलावले…तोपर्यंत सत्यजितच्या चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले आणि थोडं ग्लुकोस प्यायला
दिल्यावर सत्यजितला शुद्ध आली…सत्यजितने उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा उजव्या पायातून एक तीव्र कळ गेली…तसाच त्याने शकूचा हात आपल्या हातात घेतला…शकुनेही सावरलं…विभाताई गप्प होत्या सत्यजित शुद्धीत आल्याने तो बोलू शकत होता…सत्यजित म्हणाला…
सत्यजित – विभा अगं…केवढी बोलतेस तिला…यात तिची काही चूक नाही…तुम्हा बहिणींकडून तिचा मान राखला गेला पाहिजे…
आपला नवरा आपली खरी बाजू उचलून धरतोय हे पाहून शकूला बरंच हायस वाटलं…असुरक्षिततेची भावना त्या वाक्यामुळे कायमची निघून गेली…सत्यजितला समोर पाहताच भेदरलेली शकू त्या वाक्यामुळे आनंदाने वेडी व्हायची राहिली…इकडे विभाताईंना मात्र शकुनी बाजू सत्यजितने घेतली म्हणून तिळपापड उडत होता…काही वेळातच ऍम्ब्युलन्स आली…हॉस्पिटल मध्ये तपासणीमध्ये कळलं कि…सत्यजितच्या उजव्या पायाच हाड मोडलंय आणि डाव्या पायावर किंचितसा पक्षाघाताचा परिणाम झालाय…आपला संसार सुरु होताच उधवस्त होणार की काय अशी भीती शकूच्या मनाला लागून राहिली…शकू या परिस्थितीतही खचून गेली नाही…उलट सगळ्यांना धीर देत होती…पुढचे पंधरा दिवस सत्यजितला हॉस्पिटलमध्येच तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली राहावं लागणार होतं…या अवस्थेमध्येही विभाताईंना आपल्या घराची आणि संसाराची खूप काळजी म्हणून सत्यजितच्या अवस्थेकडे कमी लक्ष आणि फोनवरती जास्त संवाद असं त्यांचं चाललं होतं…हा सगळा प्रकार वीणाताई पाहत होत्या…‘ कुणाला कुणाची किती काळजी आहे ‘ हे यातून वीणाताईंना स्पष्ट दिसत होतं…
विभा……शकूला भेटल्यापासून दोघींमध्ये तरी एकतर्फी संवाद झाला होता…शकू शांत होती…विभा हॉस्पिटलमध्ये आली तरीही आपल्या घराचा,संसाराचाच विचार करत होती…त्यामुळे सगळी धावपळ शकूलाच करावी लागत होती…शकूची आपल्या नवऱ्याबद्दलची धडपड.वाटणार प्रेम हे सगळं पाहून मग विभाच्याही तिरस्कारयुक्त मनातल्या एका कोपऱ्यात शकूविषयी एक जिव्हाळा तयार होऊ लागला…लग्नानंतरच्या सुखी संसाराची स्वप्न जशी आपण रंगवली तशी स्वप्न शकुनेही रंगवलीच असतील…शकू म्हणाली…
शकू – हे औषध इथं या हॉस्पिटलमध्ये नाही भेटत…इथून दोन मैलांवर केमिस्ट आहे तिथे भेटत…विभाताई तुम्ही यांच्याकडे लक्ष ठेवा मी जाऊन घेऊन येते…
विभा – मला प्रिस्क्रिप्शन दे मी जाऊन घेऊन येते…तू थांब इथेच…
भावनांच्या धाग्यांनी विभाच्या अहंकारी स्वभावाला बहुदा आव्हान दिलं गेलं होतं…किंवा शकूच्या प्रचंड सहनशक्तीपुढे विभाच्या मनातली आग विझून गेली होती…
शकू – नाही ताई…उगाच तुम्हाला दगदग नको…मीच घेऊन येते…
शकूची फार दगदग होतं होती…कारण ते औषध त्या जवळच्या केमिस्टकडे नव्हतं म्हणून शकू ऑटो रिक्षाने दुसऱ्या केमिस्टवाल्याकडे गेली आणि औषध घेऊन आली…हॉस्पिटल मध्ये यायला उशीर झाला म्हणून वीणाताईंनी कारण विचारलं…
वीणाताई – आलीस का गं…खूप उशीर झाला…
शकू – हो ना आईसाहेब…खूप फिरावं लागलं…मिळालं हे काय कमी आहे…
शकू शांतपणे उत्तरली…विभाला हे पाहून शकूबद्दल विशेष कौतुक वाटलं…
विभा – बाप रे…हिंमत न हारता हिने आणूनच दाखवलं की औषध…माझ्या दादाची खरंच किती काळजी आहे हिला…मला नसत जमलं बाबा…एवढं…खरंच सत्या खूप नशीबवान आहे…
शकू – आईसाहेब….ताईसाहेब तुम्ही आता निश्चिन्तपणे घरी जा…मी सांभाळेन इथलं सगळं…
दोघीनाही एकदम मोकळं मोकळं वाटलं…जणू शकुने त्यांच्यावर मोठे उपकार केलेत की काय असं वाटू लागलं…जणू एक आधारच शकू बनली होती…पंधरा दिवसानंतर सत्यजित अगदी ठणठणीत बरा होतो त्यांनतर सत्यजितला डिसचार्ज दिला जातो….घरी आल्यानंतर पाहुणेमंडळींची सत्यजितला भेटण्यासाठी जणू एक रीघच लागली होती…विभाताईंचे सासरकडचे मंडळी,विभाताईंची दोन लहान मुलं सत्यजितला म्हणजेच आपल्या मामाला भेटायला कोकणातून आलीही होती…एकूण घरात एक जत्राच भरली होती…पाहुणेमंडळींचं करण्यात,सत्यजितची सुश्रुषा करण्यात शकूचा दिवस कसा निघून जाई ते तिला कळतही नसे…ज्या पद्धतीनं शकुने सगळं हाताळलं हे पाहून शकूविषयीचा पूर्वग्रह एका क्षणात नष्ट झाला…एकूण कुणाच्याही मनात शकूबद्दल तिरस्कार राहिलाच नव्हता…येणाऱ्या सगळ्या पै-पाहुण्यांच्या पाहुणचारात कसलीही कमी शकुने पडू दिली नाही…सत्यजितही हे सर्व पाहत होता…आपल्या बायकोच कौतुक सगळीकडे होतंय हे पाहून अगदी भारावून गेला होता….
अगदी लहान मुलांच्याही मागण्या शकू पूर्ण करत असे…खाण्याच्या बाबतीत आणि गोष्ट सांगण्याच्या बाबतीतही…लहान बंटी शकूला तर कुठे ठेऊ कुठे नको असं करत असे –
बंटी – मामी…मला हलवा करून दे ना…
शकू – देईल ना…हलवा करून देईल…
बंटी – मला सांगशील…या फोटोमधल्या म्हतारीचे केस पांढरे कसे…मग तिच्या हसबंड पण असाच पांढऱ्या केसांचा असणार ना….पण मामी तूसुद्धा मामाची मामी आहे ….मामाचे केस पांढरे मग तुझेही पांढरेच असायला पाहिजे ना मग तुझे केस काळे कसे गं…?
आता या प्रश्नावर शकू काय उत्तर देणार याकडे सर्वांचे कान लागले होते…शकू म्हणाली-
शकू – अहो…एक की नाही काळ्या पंखाची परी आली होती…नेमकी माझ्याचकडे आली होती…तिने की नाही मला…तिचे सगळे काळे पंख देऊन टाकले…मग माझ्याकडे पांढरे केस राहिलेच नाहीत…म्हणून माझे केस पांढरे नाहीत त्या परीने माझ्याजवळचे सगळे पांढरे केस घेऊन टाकले…माझ्याकडं फक्त काळे केस राहिले…म्हणून माझे केस काळे आहे…
बंटी – वा…मामी किती छान…आई मामी किती मस्त गोष्टी सांगते…मला इथेच राहू देत ना मामीपाशी…
विभाताईंचा चेहरा आनंदाने फुलला शकूबद्दलचा द्वेष,चीड सगळं काही धुवून निघालं…विभाही मग निघताना अबोल झाली…विभाला मनातून खूप रडावसं वाटत होतं…दारातल्या उंबरठ्यापाशी जाऊन अडखळल्या निघताना विभाने हाक मारली…” वहिनी….” त्या तीन शब्दांसाठी आसुसलेल्या शकुने नजर वर उचलली…तेव्हा विभाचे डोळे पाण्याने डबडबले होते…
विभा – वाहिनी…काही काम असेल तर फोन कर…
शकू – हो ताई…असेच अधून-मधून येत राहा…
हसऱ्या चेहऱ्याने शकुने आपल्या नणंदबाईना निरोप दिला…सत्यजितलाही त्यावेळी आपल्या बायकोची किंमत कळली…खरंच शकूची नातेवाइकांबद्दलची आपुलकी सत्यजितला आणि शकूला एकत्र आणेल….पाहुयात पुढच्या भागात…उत्सुकता अशीच असू द्या…
Post navigation

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.