Skip to content Skip to sidebar Skip to footer

अबोल प्रीत बहरली…[भाग १२ ]

सत्यजित नेहमीप्रमाणे आपल्या रोजच्या धावपळीतून संध्याकाळी घरी येतो…फ्रेश होऊन आल्यावर चहा घेऊन शकू येते…चहाचा कप एका हातात आणि दुसरीकडे शकू उभी असते…सत्यजित एकटक शकुकडेच पाहत राहतो…आणि म्हणतो — ” नर्मदा…चहा खूप मस्त आहे…” इतक्यात शकू म्हणते…” साहेब…मी शकुंतला आहे…” असं म्हणते आणि लाजून स्वयंपाकघरात जाते…सत्यजितने पहिल्यांदाच केलेल्या कौतुकामुळे शकूच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागतात कधी एकदा ही गोष्ट अलखनंदाच्या कानावर घालते असं शकूला वाटतं…शकू स्वयंपाकघरात गेल्यानंतर…सत्यजित भानावर येतो…’ आपण जिचं आत्ता कौतुक केलं ती तर शकू होती म्हणून सत्यजित पुन्हा चिडचिड करू लागतो…

सत्यजित – सखाराम तुला किती वेळा सांगितलं…चहा घेऊन तू आलं पाहिजेस म्हणून…नंदा…बाहेर ये आधी…

अलखनंदा – काय दादा…काय झालं केवढी चीड-चीड करतोयस तू…आणि माझ्याकडे काय काम आहे तुझं आत्ता…

सत्यजित – त्या मुलीच्या अंगावर ती साडी दिसतीय…कुणाची आहे ती साडी…?

अलखनंदा – कोण मुलगी…आपल्या या घरात तुझी मुलगी आकांक्षा सोडली ना तर दुसरी कुणीच मुलगी नाहीय…बाकी सगळ्या बायका आहेत लग्न झालेल्या…

सत्यजित – नंदा…मी शकूबद्दल बोलतोय…

अलखनंदा – मग स्वतःच्या बायकोला मुलगी का म्हणतोयस…?

सत्यजित – अगं…ती साडी कुणाची आहे…तुला माहिती आहे नर्मदेच्या वस्तू कुणीही वापरायच्या नाही असं मी आधीच बजावलं होतं…मग कुणाला विचारून दिली ती साडी…?

अलखनंदा – दुसरं कुणाला दिलीय मी तरी ती साडी…तुझ्याच तर बायकोला दिलीय…

सत्यजित – मी आधीच बजावलं होतं ना माझ्याशी लग्न करून येणारी मुलगी एक तर या घराची सून असेल…तुझी वाहिनी असेल…माझी कुणीच नसणार आहे ती….तरीही तुम्हाला असं वाटतंय का मी तिच्या जवळ खेचला जाईल हे….नर्मदेची साडी नेसली म्हणजे ती नर्मदा झाली असं नाही…नर्मदेचे गुण असायला हवेत…

सत्यजितची कानउघडणी चाललेली असते तेवढयात कैलास दार ठोठावत म्हणतो  

कैलास – काय मग मित्रा बायको आली आणि मला विसरलात की…वाहिनी दिसत नाहीय कुठे गेल्या…?

अलखनंदा – [सारवा-सारव करतात ] अरे कैलास…ये ना आज खूप दिवसांनी येणं केलं…वाहिनी स्वयंपाकघरात गेलीय…चहा ठेवत असेल बहुतेक…घरात कुणी आलं ना की न सांगता चहा ठेवत असते माझी वहिनी…थांब मी आलेच पाहून…

असं म्हणून अलखनंदा स्वयंपाकघरात पाहण्यासाठी जाते पण तिथे शकू मात्र दिसत नाही…चहासाठी आधण ठेवते आणि शकूला शोधायला तिच्या खोलीत जाते …खोलीमध्ये शकू रडत असताना दिसते …अलखनंदा आपल्या लाडक्या भावजयीला समजावते….

अलखनंदा – शकू वहिनी तू जर अशीच रडत बसलीस ना तर कसं होणार…सत्या दादा असाच चिडतो…

शकू – ताई…माझं नशीबच फुटकं…देव तरी असा कसा ओ ताई …

अलखनंदा – शकू…ऐक..नशिबाला दोष देऊ नकोस…कधी-कधी आपणच नशीब घडवायचं असत…खाली चल कैलास आलाय…माहिती आहे ना तुला तो…?

शकू – व्हय…माहिती आहे मला…या घरात सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याशीच बोलली आहे मी…

अलखनंदा – अगं मग…तू बोललं पाहिजे सर्वांशी अशी एकांतात राहत जाऊ नकोस तू…नर्मदावहिनी सर्वांशी अशीच हसून-खेळून राहत असायची…तू तर पाहुणे आले की आतमध्ये जाऊन बसतेस स्वयंपाकघरात…फक्त हाताला गोडी असून चालत नाही…बोलण्यातही तितकीच मार्दवता असली पाहिजे आणि हे कसब फक्त आपल्या सारख्या बायकांनाच दिलंय…चल बरं पटकन उठ चेहरा स्वछ धुवून ये खाली…चहासाठी आधण टाकलंय मी…पाहून येते पाहिलं..मी चहा…तू ये आटोपून लवकर…

असं म्हणून अलखनंदा स्वयंपाकघरात चहा आधीच करून ठेवते…शकू आपलं आवरून खाली जाते…पाहिलं स्वयंपाक घरात जाते…हातात चहाचा ट्रे आणि काही खाण्यासाठीचे पदार्थ घेऊन जाते…कैलासला पाहताच वाकून नमस्कार करते…आणि आपलं बोलणं सुरु करते…

शकू – कैलास भाऊजी…कसे आहात..? वाहिनी कशा आहेत…?

कैलास – अपेक्षा कशी असणार..? मला मात्र छळछळ छळत असते…

शकू – वाटतं नाही हा…त्या तुम्हाला छळत असतील असं…कारण तुमचा आवाज भयंकर कडक आहे…

शकूचे हे वाक्य ऐकून कैलासला क्षणभर नर्मदावहिनींची आठवण होते…थेट कैलास सत्यजितला म्हणतो-

कैलास – सत्या…मला ना आत्ता नर्मदावहिनींची आठवण झालीय…सत्या आपण एक काम करूयात का एक दिवस अशीच पिकनिक काढूयात ना…लोणावळ्याला गेलो होतो ना आपण नर्मदावहिनी…मी स्वतः , नंदा ताई…आणि अपेक्षा किती धमाल केली होती ना…

सत्यजित – आता कशी रे आड ना मधी पिकनिक काढलीस तू…एवढ्यात नकोय पिकनिक वैगेरे असं काही…

कैलास – सत्या…तू जरा अतीच करतोयस हा…ते काही नाही लोणावळा पिकनिक डन…वहिनी तुमचं काय मत आहे पिकनिकविषयी…

शकू – हा…चालन की…तसंही बाहेर अजून कुठं गेलोच नाही ना आपण सगळे…मी सगळी तयारी करून ठेवते… …चकल्या…शंकरपाळ्या…लाडू…तिखट पुरी असं सगळं बनवून ठेवते…

कैलास – हो वहिनी…करून ठेवा…खुपदिवसात खाल्लं नाहीय…नर्मदावहिनींच्या हाताची चव असायला पाहिजे तुमच्या हातालाही…[मस्करी करत म्हणतो ]

शकू – त्यांच्या हातची चव कशी असणार माझ्या हाताला…त्यांच्या पंगतीला नका बसवू भाऊजी मला…त्यांच्या पायाशी जागा आहे माझी…

शकूच्या या वाक्यावर सत्यजित शकूकडे पाहतच राहतो…कदाचित एवढ्या कमी वयात एवढी समज असणारी मुलगी त्याने पहिल्यांदाच पाहिली असावी…नवरा म्हणून आपणच कुठेतरी कमी पडतोय याची जाणीव थोड्या वेळापुरती सत्यजितला होते…पण पुन्हा काही झालं तरी आपल्याला असं भावनिक होऊन चालणार नाही हे सत्यजितला वाटतं आणि परत पहिले पाढे पंचावन्न….थोड्यावेळासाठी का होईना पण शकूबरोबरच आपलं नातं सत्यजितने स्वीकारलं असतं…आयुष्यभरासाठी खरंच स्वीकारेल की नाही सत्यजित हे नातं….म्हणून कैलास आणि अलखनंदा दोघांनाही एकत्र आणण्यासाठी धडपडत असतात…शेवटी खूपच हट्टाने सत्यजित लोणावळ्याला जाण्यासाठी तयार झाला…साधारण दोन-तीन दिवसांनी सगळेजण सहलीला जाण्यासाठी तयारी करू लागले ..शकुने सगळं खाण्या-पिण्याचं सामान असा सगळा लवाजमा तयार करून ठेवला आणि सहलीला जाण्यासाठी तयार झाली…मस्त कपडे घालून अपेक्षाही त्यादिवशी सहलीसाठी आली…

अपेक्षा – काय ग बाई…ही जीन्स ना लंडनवरून आणलीय यांनी…कसली मस्त आहे ना…काय ग शकू…तू नाही का घातलीस जीन्स किंवा एखादा वन पीस वगैरे…

शकू – नाही ओ …वहिनी मला आवडतही नाही…साडीतच कसं चांगलं वाटतं बघा…आपल्या बायकांनी कसं साडीतच राहावं…

अलखनंदा – नाही वहिनी…तुला आवडत असेल तर तू पंजाबी ड्रेस घालू शकतेस…जीन्स वैगेरे इतक्यात नको…नाहीतर दादा ओरडेल…तसंही तुझं वय आहे ड्रेस आणि कुर्तीस घालण्याचं…थांब मी आलेच तुझ्यासाठी एक ड्रेस घेऊन ठेवलाय मी…तोपर्यंत सखाराम…ओ सखाराम…हे सगळं गाडीमध्ये नेऊन ठेवा…दादा आलाच की निघायचंय आम्हाला…

अलखनंदा ताई आणलेला एक ड्रेस घेऊन येतात…शकू तो ड्रेस घालून येते…तिच्यावर तो ड्रेस अगदीच खुलून दिसतो….लाल रंगाचा कुर्ता त्यावर जांभळ्या रंगाची ओढणी खूप सजत असते शकूवर…सत्यजित तयार होऊन येतच असतो पण…येतानाच सत्यजित शकूकडे पाहतो आणि मधेच पाय अडकून पडतो…कैलास आपल्या मित्राला सावरतो…आणि म्हणतो…विकेट आताच पडली सत्या तुझी…

सत्यजित – काही काय बोलतोस…सामन्यात उतर मग दाखवेल तुला…

कैलास – वहिनी…अहो आमचा सत्यजित आहे ना…मस्त क्रिकेट खेळतो…पहालच   तुम्ही…पण तुम्हालाही खेळावं लागेल हा….

शकू – हो का नाही…खेळेल की मी…

एवढे बोलून सगळेजण पिकनिकसाठी जायला निघतात…मस्त गणपतीचं नाव घेऊन पिकनिकचा शुभारंभ करतात…त्यानंतर गाण्यांच्या भेंड्या…सिनेमांची नाव असा मस्तपैकी सर्वांचा प्रवास चाललेला असतो…त्यानंतर हॉटेलमध्ये उतरून सर्व जण जेवणाचा आस्वाद घेतात…तिथून मग सगळेजण कुणे धबधबा पाहायला जातात…

कैलास – वहिनी…कुणे धबधबा म्हणजे सर्व पर्यटकांचं आकर्षण आहे बरं…सगळीकडं कशी नुसती हिरवळच…हिरवळ…तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल तिकडं गेल्यावर…

शकू मात्र सर्वांची बोलणी मस्त ऐकत बसलेली होती…कारण लांबवर अशी कधीच सहलीसाठी ती गेली नव्हती…काही तासातच सगळेजण कुणे धबधब्यावजवळ जाऊन पोचतात…गाडीमधून उतरल्या उतरल्याच कुणे धबधब्याच्या आसपासचा परिसर जणू स्वर्गच वाटतं होता…सगळीकडे फेसाळतं पाणी आणि सर्वदूर पसरलेली हिरवळ हे सगळं पाहून शकू अगदी भारावूनच गेली होती…सत्यजितही निसर्गसौन्दर्य पाहून थक्क झाला होता…खरंच हे निसर्गाचं रूप सत्यजित आणि शकू एकमेकांशी काही रोमँटिक क्षण घालू शकतील….ही सहल दोघांमध्ये प्रेमाचे संकेत देऊ शकेल का…पाहुयात पुढच्या भागात…

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.