Skip to content Skip to sidebar Skip to footer

अबोल प्रीत बहरली…[भाग ११ ]

सत्यजितने  आपल्या आईसाठी लग्न केलं पण खरंच शकूबरोबर सत्यजित खुश होता का ? शकू मात्र आपल्या सासूबाई म्हणजेच वीणाताईंची मनापासून काळजी घेत असे…अलखनंदाताईंबरोबर तर एका मैत्रिणीचं नातं शकूच जमलं होत…सागर आणि अभिमन्यूही अगदी एका मित्राप्रमाणे शकूबरोबर वागत असतात…आकांक्षा मात्र आपल्या मैत्रिणीसमान आईशी काहीशी नाराजच होती…एक दिवस शकू पहिल्यांदाच आकांक्षा बरोबर बोलण्यासाठी जाते-

शकू – आकांक्षा…अगं येऊ का…हि पहा साडी कशी वाटतीय मी आईसाहेबांनाच विचारून घेतलीय…तुमच्यासाठीही आणूयात आपण…

आकांक्षा – शकू…तुला कुणी सांगितलं आणायला…आणि लगेच कारभारीण झाली कि काय इथली…मला थेट नावाने हाक मारलीस तू…हिंमत कशी काय झाली तुझी…

शकू – [रडवेली होऊन ]

ताई…चुकलं माझं…पण ही साडी…

आकांक्षा – हे बघ…तू इथे या घरात आलीस तेव्हापासूनच माझ्या डोक्यात गेलीय…आजीसाठी असशील तू तिची सून…माझ्यासाठी नाही…तेव्हा माझ्याशी न बोललेले बरे…

शकू रडवेली होऊन तिथून निघून जाते…स्वयंपाकघरात आल्यावर आपले अश्रू पुसते…सुनबाई का रडतीय याची कुणकुण अलखनंदाला लागते…शकूचा रुसवा काढण्यासाठी म्हणून अलखनंदा स्वयंपाकघरात जाते-

अलखनंदा – शकू वाहिनी अगं वाईट नको वाटून घेऊस…आकांक्षा जरा या मुलांमध्ये वेगळीच आहे…त्यामुळे तिचा मड असेल ना चांगला तरच तिच्याशी बोलायला जाशील तू किंवा मग जाऊही नकोस…माझ्याशी बोलत जा…

शकू – ताई…खरंच मला त्यांना दुखवायचं नव्हतं…

अलखनंदा – जाऊ देत ग…मला सांग आज काय बेत हे संध्याकाळच्या जेवणाचा…तुझ्याच मनाने होऊ देत…परवाची वाटल्या डाळीची आमटी भयंकर आवडली सत्याला…तरी तू केली आहे असं सांगितलं नाही आम्ही…नाहीतर तीही खाल्ली नसती त्याने…[ अलखनंदाने हळूच आपली जीभ चावली ]

हे ऐकून शकू परत रडू लागते…कारण सत्यजित लग्नानंतरच जे नवदाम्पत्याचं सुख असत ते शकूला देऊ शकत नव्हता…पण एक साधं बोलणंही कधी दोघांमध्ये झालं नव्हतं..म्हणून शकूला अलखनंदाचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं…

शकू – ताई…मी एवढी वाईट आहे का हो…माझा नवरा माझ्याशी बोलतही नाही…

अलखनंदा – शकू वहिनी…हे बघ तू वाईट आहेस कि नाही ते तू नाही ठरवायचं…ते ठरवणारे आम्ही आहोत…आमच्या दृष्टीने तर तू चांगलीच आहेस..स्वयंपाकात तू कुशल आहेसच मग लक्षात ठेव पुरुषाला खुश ठेवायचं असेल ना तर त्याचा मार्ग पोटातून शोधावा लागतो…आजही तू मस्त भरली वांगी कर…

शकू – मी करते ताई…पण नेहमीप्रमाणे मी स्वयंपाक केला आहे असं कळू देत ना यांना…नाहीतर तुम्ही भलत्याच कुणाचं तरी नाव सांगता…माझं नाव लपवून ठेवता…

अलखनंदा – ठीक आहे आज तुझं नाव सांगतो आम्ही…मग तर झालं…

शकू हसली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं नियोजन करायला गेली…संध्याकाळी सत्यजित येताच सगळेजण जेवणासाठी बसतात…भरली वांगी असल्याने सगळेजण उत्सुकतेपोटी जेवायला बसतात…सत्यजित नेहमीप्रमाणे म्हणतो –

सत्यजित – कुणी केलीत भरली वांगी…अप्रतिम आपल्या आचाराच्या हाताला एवढी अवीट चव असेल असं मला जन्मात वाटलं नव्हतं…पगार वाढवायला हवाय त्याचा…

अलखनंदा – पगार कशाला वाढवतो…प्रेम वाढावं थोडं…

सत्यजित – म्हणजे…ठीक आहे प्रेमाने त्याचा पगार वाढवतो…मग तर झालं…!

अलखनंदा – सत्या…तुझ्याशी बोलणं म्हणजे ना एक कोडंच वाटत मला…अरे प्रेम वाढव म्हणजे हा सगळं स्वयंपाक शकुंतला वहिनीने केलाय…बघ बाबा तूच…प्रेम वाढवायचं की पगार…

सत्यजित – मग हे आधी नाही सांगता आलं तुम्हाला…सखाराम आज माझं पार्सल बाहेरून मागवा…

सत्यजित रागारागाने टेबल वरून उठतो आणि आपल्या खोलीत जाऊन बसतो…शकू खाली मान घालून हुंदके देत रडत असते…साधारण दहा मिनिटातच सखाराम पार्सल घेऊन येतो…पार्सल घेऊन ताटात वाढून सत्यजितच्या बेडरूमबाहेर जातो आणि ताट देऊन सखाराम तिथेच उभा असतो…सत्यजितच्या त्या ताटातही भरलं वांग असत…ते ताट पाहून सत्यजित आपल्याच कपाळावर हात मारतो…” इथेही भरलं वांग…” इकडं  शकूच्या मनाला फार लागत…कसेबसे आपले जेवण उरकून बाहेर असलेल्या झोपाळ्यावर

जाऊन बसते…डोळ्यातली आसवं काही केल्या थांबत नव्हते…एका गोष्टींन उन असताना जी सल जाणवायची त्या उणेपणापेक्षाही या दुराव्याची सल खूप शकूच्या मनाला खात होती  म्हणून आपली शांत बसून शकू रडत होती…अलखनंदा तेवढ्यात आपल्या भावजईच्या जवळ येऊन बसते आणि म्हणते-

अलखनंदा – शकू वहिनी आमचा सत्या दादा ना आहे ग थोडा चिडखोर…पण मनाने हळवा आहे तो खूप तू नाराज होऊ नकोस गं…बोलेन तो हळू-हळू ….आणि हो…दादा बोलला नाही म्हणून तू उदास नको बसत जाऊ…बोलत जा गं…कदाचित नर्मदा वहिनींची आठवण होत असेल त्याला…म्हणून असा वागतोय ….बाकी काही नाही…

शकू – तसंही…मला भावना कुठे आहेत…मी प्रेम तरी कुणासाठी करू…माझं इथं कुणीच नाहीय….

अलखनंदा – तू नेहमी सकारात्मक गोष्टी कर…नकारात्मकता काढून टाक गं मुलं जन्माला घालूनच संसार होत नाही गं…एकमेकांच्या सोबतीनेच तर संसार होतो…एकमेकांच्या सुख-दुःखात तर साथ हवी असते एकमेकांची….आता मला एक कल्पना आलीय…तू नाही म्हणून नकोस फक्त…

शकू – हे जर माझ्याशी बोलणार असतील ना…तर काहीही करेल मी तुम्ही जे सांगाल ते…

दुसऱ्याच दिवशी अलखनंदा आपल्या शकू वहिनीचा मेकओव्हर करते…जशी आपली नर्मदा वहिनी असायची अगदी तसाच मेक अप अलखनंदा आपल्या लाडक्या शकू वहिनीचा करते…भरजरी कांचीपुरम साडी,त्यावर साऊथ इंडियन झुमके केसांचा अंबाडा अशाने शकूचा सावळा रंग अधिकच खुलून दिसतो…पाहुयात निदान शकूचा मेक ओव्हर तरी सत्यजितचं लक्ष वेधून घेईल की नाही ते…उत्सुकता अशीच असू द्यात…

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.