

आपलं जंगी स्वागत पाहून सत्यजित खूप भारावून जातो..भारावलेला सत्यजित खूप उत्सुकतेने आपल्या आईच्या पाया पडतो…कुतूहलापोटी आपल्या आईला विचारतो…
सत्यजित – आई…मी कितीतरी वेळा या घरात असताना परदेशात जाऊन आलोय पण एवढा जंगी सोहळा कधीच नाही पहिला ग…आज काही खास कारण आहे…
वीणाताई – हो तर….खास कारण असल्याशिवाय का एवढा समारंभ ठेवलाय….
सत्यजित – मी येणार हे खास कारण असूच शकत नाही…काहीतरी नक्कीच असणार लहानपणापासून ओळखतो ग मी तुला…
वीणाताई – शकू ये इकडे ये…[ वीणाताई मोठ्याने म्हणतात…शकूही लाजत येते ] ये इकडे बैस इथे…
सत्यजित – आई काय आहे हे…
वीणाताई – सत्या…अरे ओळखलं का हिला…हि शकू…शकुंतला नवले…तुझी होणारी सहचारिणी…
सत्यजित – [ हळूच आवाजात वीणाताईंना जाब विचारतो ] आई…पण आत्ता का हि घोषणा करायची होती तुला…ते पण मी एवढ्या लांबून आलोय घरी…मला काहीतरी इनाम द्यायचं सोडून भलतंच बक्षीस दिलस तू मला…
वीणाताई – अरे आज शकूचा वाढदिवस आहे…निदान आज तरी असं बोलू नकोस…अठरा वर्ष पूर्ण झालेत आज शकूला…तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा तरी दे ना…आणि मी काय अगदी सर्वांना ओरडून थोडीच सांगतेय…
सत्यजित – [एका क्षणात चेहऱ्यावरचे हाव-भाव बदलून म्हणतो ] हैप्पी बर्थ डे शकू…!
शकू – आभारी आहे साहेब…
सत्यजितच्या तीन शब्दामुळे शकू कधी नव्हे ते मनमोकळेपणाने हसते जे याआधी ती कधीच हसली नव्हती म्हणून परत एक नवी उभारी शकूच्या डोळ्यात दिसते…ती एकटक फक्त सत्यजितकडे पाहत राहते…सत्यजितही तिथून लगेच आपल्या खोलीत जातो…खोलीत जाऊन आपल्या बायकोच्या म्हणजेच नर्मदेच्या तस्विरीपुढे जाऊन एक क्षण उभा राहतो आणि मनमोकळेपणाने रडून घेतो…शकूचा वाढदिवस असल्याने शकूही खुश असते…सत्यजित सगळ्या पाहुणे मंडळींची जेवणं उरकल्यावर खाली जातो तिथे हळूच वीणाताईंच्या कानात पुटपुटतो…
सत्यजित – आई…मी लग्नासाठी तयार आहे…
वीणाताईंचा आनंद गगनात मावेनासा होतो…परत आपल्या मुलावर वीणाताईंना गर्व वाटू लागतो…लंडनला गेल्याचा परिणाम असं वीणाताईंना वाटत…आणि मनातलं समाधान वीणाताईंच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागत…सत्यजितच्या अपघाताबद्दल वीणाताईंना काहीच कल्पना नसते…म्हणून सहजच वीणाताई सत्यजितला विचारतात..
वीणाताई – सत्या…तू मध्ये जवळ-जवळ आठवडाभर एकही कॉल केला नाहीस…सगळं व्यवस्थित तर होत ना…
सत्यजित – हो का गं…?
वीणाताई – मग मला असं का वाटतय की…तू काहीतरी लपवत आहे…?
सत्यजित – नाही ग तुझ्यापासून कसं लपवेल मी..?
वीणाताईंची नजर तेवढयात सत्यजितच्या हातावर जाते जिथे शस्त्रक्रियेचे काही व्रण वीणाताईंना दिसतात आणि सत्यजितला विचारतात-
वीणाताई – सत्या…मग तुझ्या हातावर हे कसले व्रण आहेत…तू कितीही लपवलस ना तरीही नाही लपवता येणार तुला कारण मी आई आहे रे तुझी…आता तरी सांग ना मला काय झालं होत…
सत्यजित – आई..एक छोटासा अपघात झाला होता मला…पण आपल्या ऑफिसमधले अग्रवाल सर होते म्हणून वाचलो मी…त्यांनीच मला वेळीच क्लीनिक मध्ये नेलं…नाहीतर जिवंत नसतो आज मी…
वीणाताई – हो…आणि नर्मदेची पुण्याई कामी आली…आणि कुणाचातरी पायगुणही…सत्या मला खरंच सांग…
सत्यजित – काय सांगू …?
वीणाताई – तू खरंच लग्नाला तयार आहेस ना…
सत्यजित – हो आई…फक्त तुझ्यासाठी….आणि नर्मदेसाठी…
वीणाताई – मग लगेचच उद्या मी ब्राह्मणाकडून लग्नासाठी मुहूर्त काढते ….आणि नवले कुटुंबियांना सांगते…
सत्यजित – आई…अगं पण एवढी घाई काय आहे…?
वीणाताई – शुभ कामात दिरंगाई नको…
दुसऱ्याच दिवशी वीणाताई लग्नासाठीचा मुहूर्त काढतात….ठरल्याप्रमाणे लग्नसोहळाही एकदम साध्या पद्धतीनं पार पडतो…प्रसिद्धीमाध्यमांमध्ये या लग्नाची चर्चा होते पण सत्यजितही त्याकडे दुर्लक्ष करतो…सत्यजितने लग्न तर केलं पण मनात वेगळेच डावपेच असतात…शकू आणि सत्यजितचा संसार खरंच फुलेल का…पाहुयात पुढच्या भागात…


प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.