Skip to content Skip to sidebar Skip to footer

आत्मसन्मान

‘‘काय आवरलं का?’’ वेदिकाच्या घरात घुसून समोरच्या काकू तिला उपरोधिक स्वरात प्रश्‍न करत होत्या.

‘‘चाललंय.’’ वेदिकाने त्यांच्याकडे न बघताच उत्तर दिलं. तिचा उद्योग चालूच होता. पसारा आवरणं सुरू होतं. आज काहीतरी बिनसलंय याची काकूंना कल्पना आली. थांबावं की जावं काहीच कळेना. वेदिका त्यांच्याशी बोलण्याच्या मूडमध्ये नव्हती एवढं खरं, पण जर ती दु:खी आहे तर तिला एकटं टाकावं असं काकूंना वाटेना. त्या पाच मिनिटं शांत बसून राहिल्या. मग काकूंनी इकडची तिकडची बडबड सुरू केली. वेदिका त्याला अगदी जुजबी उत्तरे देत होती. शेवटी कंटाळून काकू जायला निघाल्या. तेव्हा वेदिका म्हणाली,

‘‘बसा ना काकू चहा करते.’’

‘‘चहा वगैरे काही नको, तू बरी आहेस ना?’’ त्यांनी आपुलकीने विचारले. त्याबरोबर तिच्या मनाचा बांध फुटला. डोळ्यांतून गंगा-जमुना वाहू लागल्या. बस बरं इथं आणि सांग काय ते! काकूंनी तिला प्रेमाने आपल्या बाजूला बसवलं. दोनच वर्षं झाली होती. वेदिका काकूंच्या शेजारी राहायला आली होती. काकूंची आणि तिची गट्टी जमली होती. ती चांगली शिकलेली होती, नोकरी करत होती, पण मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्‍न आला म्हणून वेदिकाने नोकरी सोडली होती. तशी ती घरात राहून बारीकसारीक उद्योग करत असे,

पण तिच्या वेळेनुसार त्यामुळे तिच्या लेखी आणि बाकींच्यांनाही त्याची तशी फारशी किंमत नव्हती. वेदिकाचा नवरा वल्लभ अगदी चांगला नवरा होता. तो वेदिकाला खूप समजून घेत असे. आपल्या कुटुंबासाठी तिने नोकरी सोडली, सर्व घर ती उत्तम सांभाळते याची त्याला पुरेपूर जाणीवही होती आणि कौतुकही होतं.

त्यामुळे वल्लभ तिला काही बोलला असेल याची सुतराम शक्यता नव्हती, तरीही वेदिकाचा मूड आज का बरं नाहीये? काकूंना काही समजतच नव्हतं. तशा काकू फटकळ होत्या, पण प्रेमळही तितक्याच होत्या. नेहमी तिला काम लवकर आवरावं याबद्दल काकू उपदेशाच डोस देत असत. वेदिका शांत होईपर्यंत काकूंनी मनातल्या मनात अनेक आराखडे बांधले होते, पण ते सारे फुटकळ निघाले. त्यांना काहीच आदमास बांधता येत नव्हता

‘‘काय झालं वेदिका?’’ शेवटी काकूंनी परत विचारलंच. वेदिका म्हणाली, ‘‘काकू, घरी राहून काम करणार्‍या बायकांना काहीच किंमत नसते हो. कुणीही यावं आणि टोला मारून जावं, मला काहीतरी उद्योग सुरू करायचा आहे किंवा मी करत असलेलाच उद्योग मोठ्या प्रमाणावर करायचा आहे.’’

‘‘काय झालं ते तरी सांगशील. तुला कोणी काही बोललं का? वल्लभचं आणि तुझं भांडणं झालं का?’’ काकूंनी विचारलं.
‘‘छे हो! वल्लभ कधीच काही बोलत नाही, पण काकू, आज सकाळी सकाळी शकूताईंचं आणि माझं भांडण झालं.’’
‘‘काय सांगतेस?’’ कधीही कुणालाही शब्दानेही न दुखावणार्‍या वेदिका भांडीवाल्या शकुशी का बरं भांडली असावी? काकूंना प्रश्‍न पडला.

मग वेदिकाने सर्व सांगितलं. वेदिका काहीं कामानिमित्त पुढचा आठवडाभर सकाळी 11 वाजता बाहेर जाणार होती. एरवी शकू सगळ्यांची कामं उरकून तिच्या वेळेप्रमाणे तिच्याकडे येत असे. कधी लवकर, कधी उशिरा वेदिकाकडे येणार्‍या शकूच्या वेळेला काही काळवेळच नव्हती. वर ती वेदिकाला म्हणून दाखवत असे, तुम्ही काय घरीच असता ना तुमच्याकडे कधीही आलं तरी चालतं. दुसर्‍या कुणाचं तरी नाव घेऊन ती बाई कशी लवकर जाते, किती उशिरा घरी येते, नोकरी करते म्हणून तिचं कौतुकही करत असे.

वेदिकाला कधीही वाईट वाटत नव्हतं. ती दुर्लक्ष करीत असे. कारण नोकरी आणि घर सांभाळणं किती जिकरीचं काम असतं हे तिनं स्वत:ही अनुभवलं होतं. उलट ती त्यांच्या सर्वांच्या किल्ल्या सांभाळण्याचं काम करत असे, पण आज जेव्हा वेदिकाने शकूला आठवडाभरासाठी सकाळी लवकर येण्याची विनंती केली तेव्हा शकूने चक्क नकार दिला. एरवी कधीतरी ती सकाळी आठलाच तिच्याकडे येऊन भांडी घासून जात असे.

‘‘नाही हो ताई, नाही जमणार लवकर यायला, त्या अमूक-तमूक आहेत त्यांच्याकडे लवकर जावं लागतं, यांच्याकडे इतके वाजता जावं लागतं, तुमच्याकडे 10 वाजता यायलाही जमणार नाही, कारण एकाच्या पोळ्या आहेत ही कारणं सांगायला सुरुवात केली. विशेष म्हणजे या सर्व बायका शकूला अगदी कामवाल्या बायकांप्रमाणे वागवत असत, अगदी जेवायला बसल्या तरी थांब जरा आम्ही जेवतोय असं सांगत असत.

आणि वेदिका मात्र जर शकू जेवणाच्या वेळेत आली तर आपल्याबरोबर तिचंही ताट वाढूत देत असे. आपल्याबरोबरच जेवायला बसायला देत असे. अगदी स्वयंपाकघरात चहा करण्याचीही तिला मुभा होती.’’ खरंतर शकूने असं सांगितल्यावर तिला रागच आला होता, पण तरीही म्हणतात ना अडला हरी…. त्याप्रमाणे ती म्हणाली, ‘‘मग एक काम कर, मी दोन वाजता परत येणार आहे, तू त्यानंतर ये.’’

‘‘ताई, माझं काम दीडलाच संपतं, मग मी अर्धातास कसं थांबू? घरी सर्वजण जेवणाची वाट पाहात बसतात. तुम्ही किल्ली ठेवून जा ना.’’ शकूने सांगितलं.

‘‘हो अगं तू माझ्याकडे किल्ली ठेव ना.’’ काकूंनी पण सांगितलं.

‘‘प्रश्‍न किल्ली ठेवण्याचा नाहीये काकू, मी कधी बाहेर गेले तर तुमच्याकडे किल्ली ठेवतेच ना? मग शकू तिच्या वेळेत येऊन काम करून जातेच की. पण मला राग आला तो तिच्या वागणुकीचा. मी जर तिच्यासाठी बारा महिने तिच्या सोईप्रमाणे वागते आहे तर माझ्यासाठी आठवडाभर तिला अ‍ॅडजेस्ट करता येऊ नये याचे मला वाईट वाटले.

‘‘बरोबरच आहे तुझं. पण काय करणार? जग असंच आहे बघ.’’ असं म्हणत काकूंनी वेदिकाच्या खांद्यावर हात ठेवला.
‘‘काकू, यावरून मला एक कळलंय की तुम्ही कुणासाठी कितीही केलंत तरी त्याचा काही उपयोग नाही, तेव्हा स्वत:साठी काहीतरी केलं पाहिजे. आणि स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. तरच जगात आपली किंमत राहील. आता माझा उद्योग मी मोठ्या प्रमाणात वाढवीन तेव्हाच मला आता मला चैन पडेल.’’

‘‘शाब्बास! मी रोज तुला हेच सांगत असते, की घरची कामं लवकर लवकर आटप म्हणजे तुला तुझा उद्योग-धंदा वाढवायला वेळ मिळेल. तू बाकीच्या लोकांना महत्त्व देऊन स्वत:चं काम मागं ठेवतेस.’’ काकूंनी पण बोलूून घेतलं.

‘‘हो काकू, आता मी तसं करणार नाही, पण सांगू का काकू, शकू जे काही वागली ते बरंच झालं.’’ काकूंना कळेना ही असं का म्हणतेय?

‘‘तिने माझ्या झोपलेल्या आत्मसन्मानाला जागं केलं.’’ तिच्या या वाक्यावर मात्र काकू आणि ती मनापासून हसली आणि वेदिकाच्या मनातली सारी किल्मिशं दूर झाली. तिच्या दु:खी चेहर्‍यावर विजयी भाव दिसू लागले.

– सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

=================

तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: