Skip to content Skip to sidebar Skip to footer

आजी..

©️®️ मिथून संकपाळ

समाजात वावरत असताना आपण सारे कुठल्या ना कुठल्या नात्यात बांधले जात असतो, मग ते नातं कधी घट्ट होऊन जातं, तर कधी विरळ. नात्याची दृढता ही त्या दोन व्यक्तींवर अवलंबून असते, जे या नात्यात बांधले जातात. एकमेकांशी होणारा संवाद, आदर, प्रेम आणि लळा या गोष्टी पुरेशा असतात कोणत्याही नात्यातील दृढता जाणून घ्यायला.

आजकाल नेमकं हेच कुठेतरी हरवत चाललंय, म्हणून मग आजकालच्या नात्यांमध्ये काही रस उरला नाही आणि आला दिवस कसातरी जगून घालवायचा असच काहीसं चालू आहे. याला अपवाद ही नक्कीच आहेत आणि असतीलही. काही नाती क्षणात घट्ट बनून जातात आणि काही नात्यांना कितीही वेळ दिला तरी ती विरळच राहतात.

आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसं भेटत असतात, अगदी वेगवेगळ्या रुपात आणि नात्यात, प्रत्येकाशी ती सलगी होत नाही. त्यासाठी कुठेतरी आतून आवाज यावा लागतो आणि मग ती जवळीक आपोआप साधली जाते. म्हणून आजच्या या जगात प्रत्येक माणूस प्रेम, आदर या गोष्टींचा भुकेला दिसतो आणि मग जेव्हा या गोष्टी मिळतात तेव्हा त्या भरभरून घेण्याचा प्रयत्न करतो.

अगदी असच काहीसं सध्या माझ्याबाबत घडलं –

रविवारी सकाळी मावस बहिणीचा फोन आला आणि दुपारच्या जेवणाचं आमंत्रण भेटलं.. आहाss.. कोल्हापुरी माणसाला मांसाहारी जेवणाचे आमंत्रण आणि ते सुध्दा रविवारी, म्हणजे सोन्याहून पिवळे..!! क्षणार्धात होकार दिला आणि तडक पोचलो तिच्या घरी. खरं तर बेत होता तिच्या घरी आलेल्या पाहुण्यांसाठी आणि मी म्हणजे वाढीव पाहुणा.. गावाकडून आलेल्या माझ्या दाजींच्या मावशी आणि आजी साठी हा खास बेत होता, पण मलाही न चुकता ते आमंत्रण मिळालं आणि मी त्या संधीचे सोने केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

खरं तर मी नवीन लोकांसोबत खूप कमी बोलतो आणि खूप वेळाने बोलतो, पण काही लोकांमध्ये समोरच्या व्यक्तीला बोलतं करण्याचा गुण असतो आणि तोच या आजीनं आत्मसात केला होता. घरी जाता क्षणीच माझ्याशी त्यांचं बोलणं चालू झालं. विचारपूस करण्यापासून ते अगदी मी किती अंतरावरून इथे पोचलो हे सारं त्यांनी माझ्याकडून वदवून घेतलं. साधारण दुपारचे १:३० वाजले असतील जेव्हा मी पोचलो होतो, त्यावेळी सुद्धा त्यांनी माझ्यासाठी चहा करण्यास सांगितलं,

“अग् काय करताय आत, च्या तरी देता का न्हाई?”

त्यावर मीच म्हटलं, ” आजी आता कुठं च्या, जेवायची वेळ झाली”

“हां, तेला काय व्हतं, एवढ्या लांबून आलास”

आणि मग चहा ऐवजी सरबत बनवला गेला, पण घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आम्ही कसं करतो हे जणू त्यांनी दाखवून दिलं. खरंच गावी असच सर्वांचं आदरातिथ्य केलं जातं अगदी मनपूर्वक, त्यामध्ये कोणतीच छुपी भावना नसते.

आजींसाठी खास मराठी चित्रपट टीव्ही वर सुरू होता आणि आजी तो लक्षपूर्वक बघत होत्या, त्यावरून सुद्धा आमची थोडीफार चर्चा झालीच,

“हेचं पिक्चर एकदम भारी असत्यात, लै हसवतोय” हे आजींनी लक्ष्या साठी केलेलं स्टेटमेंट.

मी पण त्यांच्या सांगण्याच्या शैलीचा आनंद घेत “हो” इतकंच म्हणालो.

“आणि ही कोण अलका कुबल न्हव का?”

“हो”

“काय तिचा पिक्चर होता, बिचारीला व्हिरीत ढकलून देत्यात, पाप..” असं म्हणत त्यांनी “माहेरची साडी” ची आठवण करून दिली.

नंतर सर्वजण जेवायला बसलो आणि तेव्हा सुद्धा आजींचा आग्रह माझं पोट तुडुंब करण्यास कारणीभूत ठरला. आमच्या सर्वांसोबत कुल्फी एन्जॉय करण्याचा मोह आजींना आवरता आला नाही, पण यासाठी त्यांच्या नातवाला म्हणजे माझ्या दाजींना, किती वेळा काही ना काही कामासाठी बाहेर जावं लागलं याचं मात्र त्या गणित करत होत्या आणि घरातील इतर सदस्यांना ते ऐकवत पण होत्या,

“किती येळला तेला भाईर पाठीवत्यात, एकदाच काय ते सांगा की आणायचं” असं नातवाच्या काळजीपोटी त्या इतरांना दरडावत होत्या.

जेवणानंतर आजींनी generation gap बाजूला ठेवत आमच्या सोबत हिंदी चित्रपट बघितला, तो ही अगदी पूर्ण. दुपारची झोप घेत नाही का, असं विचारलं असता –

“न्हाई बाबा दुपारी झोपायची सवय” असं त्यांनी उत्तर दिलं. पण मला आणि बाकीच्यांना मात्र त्यांनी दुपारी सुद्धा अंथरूण घालून द्यायला लावलेच. इथं पुन्हा एकदा इतरांसाठी असलेली काळजी दिसून आली.

वेळ संध्याकाळची.. साधारण ५:३० वाजले असावेत..

बाकी सर्वजण काही ना काही कामात लागले होते, मी आणि आजी बाहेरच्या खोलीत टीव्ही समोर.. आणि आजींनी आवाज दिला,

“अग्, कायतरी खायला तरी द्या”

आतून आवाज आला, “चिवडा देवू की भडंग देऊ?”

“दे काय तरी, बसताव आपलं खात”

त्यावर आजीसाठी आणि माझ्यासाठी भडंग दिला गेला आणि मस्त टीव्ही बघत तो खात राहिलो. नातवाला पण खायला द्यायला त्या विसरल्या नाहीत.

रात्रीच्या जेवणात पुन्हा एकत्र जेवायला बसलो, आणि सकाळच्या सारखाच आताही आजींचा आग्रह सुरूच होता. पांढरा रस्सा (कोल्हापूरची speciality बर् का) मोजकाच राहिल्याने, प्रत्येकजण तो रस्सा दुसऱ्याला कसा मिळेल याची काळजी घेत होते, आजींनी मात्र फर्मान सोडलं,

“सगळ्यांनी घ्यायचा, एकाला मिळालं एकाला न्हाई, मग ते बरोबर न्हाई वाटत. सगळ्यांनी जरा जरा घ्या”

आदेशाला मान देवून शेवटी सर्वांनीच तो रस्सा मग आपसात वाटून घेतला. इथं सर्वांना दिलेली समान वागणूक नक्कीच कौतुकास्पद होती, अन्यथा बऱ्याच वेळा घरच्या स्त्रिया पुरुषांसाठी कसं जास्त देता येईल याचा विचार करून स्वतःच मन मारून नेतात. इथं आजींनी मात्र समान कायदा लावत सर्वांच्या तोंडी तो रस्सा उतरवला.

रात्री खरं तर आजी जवळपासच राहणाऱ्या आपल्या मुलीच्या घरी राहायला जाणार होत्या, पण मला राहण्यास आग्रह करत त्यांनी स्वतःचा सुद्धा प्लॅन बदलला,

“आता कुठं जातोस बाबा, सकाळला जा. तू थांबलास तर मी थांबणार बघ न्हाईतर मी जाणार हाय” असं धमकीवजा आग्रह करत त्यांनी मला मुक्काम करण्यास भाग पाडलं. मी मात्र मनात वारंवार विचार करत होतो.. मी खरंच आज यांना पहिल्यांदा भेटतोय का? पहिल्याच भेटीत इतका आग्रह, आपुलकी, काळजी, लळा.. सर्व काही मी अनुभवत होतो. माझे आजी आजोबा असं कधी वागल्याचे मला आठवत नाही, दुर्दैवाने ते आज हयात नाहीत.. पण त्यांच्यापेक्षा जास्तच प्रेमळ वागणूक मला मिळत होती आणि म्हणून आजींच्या आग्रहाला, विनंतीला मान देवून मी मुक्काम करण्यास तयार झालो.

आता मी मुक्कामी राहणार आहे म्हटल्यावर त्यांनी पुन्हा सर्वांना सांगितलं,

“मगाशी गाजर खिसून ठेवल्यात तेचा हलवा करा, खावून जाऊ दे”

आणि खरंच सर्वांनी तो करायला घेतला. इतक्या रात्री जेवणानंतरची कामं आवरायची असताना सुद्धा पुन्हा तो हलवा बनवायचा.. पण कदाचित आजींचा आदेश म्हणून की काय हलवा बनवण्याची तयारी झाली आणि माझ्या मनात विचार आला.. बाकीचे कदाचित मनातल्या मनात माझ्या नावाने ओरडत नसतील ना…??

सर्वांच्या मदतीने हलवा तयार झाला आणि सर्वांनीच मग थोडा थोडा टेस्ट केला,

“उद्या सकाळी डब्यात भरून दे ग त्याला” 

“अहो डब्यात आणि कशाला, खाल्ला ना मी आता”

“असू दे, घेवून जा”

सकाळी ६:३० चा गजर वाजला तसा मी उठून आवरायला लागलो, इतक्यात बहीण उठली चहा करण्यासाठी.

“नको करू चहा, घरी जाऊनच घेईन”

तेवढ्यात आजी जागी झालीच होती,

“घोटभर पिऊन जा”

आता त्यांचा शब्द कोण टाळणार.. चहा घेतला आणि निरोप घेऊन निघालो,

“चला, येतो”

“नीट जा, पोचलास की फोन कर” आजींनी सांगितलं.

“हो करतो” असं म्हणून मी निघालो आणि पोचल्यावर आठवणीने फोन केला सुद्धा.

तिथून आल्यावर मात्र माझ्या डोक्यात बऱ्याच वेळा त्या घटना तरळू लागल्या होत्या, वर म्हटल्या प्रमाणे अचानक मिळालेलं प्रेम, आपलेपणाची वागणूक याने मी एका दिवसासाठी नक्कीच नात्याची श्रीमंती अनुभवली होती. त्याची पोचपावती म्हणून डोळ्यांच्या कडा कधीच पाणावून गेल्या होत्या.

जेमतेम एक दिवस गेला आणि मी न राहवून त्यांच्याशी बोलण्यासाठी बहिणीला फोन केला, आजींना फोन देण्यास सांगितलं,

“काय करताय आजी?”

“काय न्हाई बग बाबा”

“चहा पाणी झालं का?”

“च्या पाणी झालं, इडल्या खायाला ये आज”

“आजी दुपारी तरी सांगायचं, आलो असतो”

“आताच ठरलंय ह्यांचं, आणि मला कुठं फोन बीन लावाय येतोय. आज मी लेकीकडं जाणार म्हटल्यावर इडल्या कराय लागल्यात. ये की जेवून जा म्हणस”

“न्हाई आजी, आज जरा बाहेर जातोय”

“अजून हाय मी १५ दिवस लेकीकडं, आलास तर भेटून जा”

“बघतो कसा वेळ मिळतो”

“मी गावाकडं गेलो तरीबी फोन लाव अधनं मधनं”

“हो हो, घेतो मी नंबर तुमचा आणि लावत जाईन फोन”

“बरं, ऱ्हा बाबा चांगला खाऊन पिऊन” असा काळजीपूर्वक सल्ला देवून त्यांनी संभाषण संपवलं.

अशी गोड बोलणारी, आपलेपणाने वागणारी, काळजीपूर्वक जपणूक करणारी माणसं सोबत असतील तर नक्कीच जगण्याला हुरूप मिळतो. यांचं वागणं अगदी निस्वार्थ असतं, आणि म्हणून आपोआप आपण त्यांच्याशी जोडले जातो. नातं मग ते कितीही लांबचे असो, मनाने जवळ आलो की तेच नातं दृढ व्हायला वेळ लागत नाही. आजी या शब्दाचा नवा अर्थ आज उमगला –

“आ” पुलकिने

“जी” व लावणारी… अशी ती “आजी”  तर अशा या आजी कायम आठवणीत राहतील.

दिवस असा तो लिहिला नशिबात,

विस्मृती होणार नाही अजिबात..

प्रेमाने, मायेने घेतली माझी काळजी,

शतशः ऋणी राहीन मी आजी..!!

– मिथून संकपाळ

======================================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

error: